मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले की विनयला मानसी आवडते आणि तो मानसीला प्रपोज करणार आहे, ते ऐकताच मोना मनोमन दुःखी झाली.
पुढे मानसी विषयी विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.
त्याला भेटून मोना होस्टेलमध्ये परत आली. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मानसी सोबतही फारसं काही ती बोलली नाही. जरा थकले गं, आपण उद्या बोलू म्हणत मोना बेडवर पडली. रात्रीच्या त्या अंधारात ती ढसाढसा रडली. पण आता विनयला प्रॉमिस केल्या प्रमाणे त्याला मदत करायची असं तिने ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती मानसी आणि विनय सोबत अगदी नॉर्मल वागत असल्याचं दाखवत असली तरी मनापासून ती उदास होती.
इकडे विनय मानसीचा वाढदिवस खास बनविण्यासाठी मस्त तयारीला लागला होता. मोना शक्य ती मदत त्याला करत होती. बघता बघता तो दिवस आला. आज मानसीचा वाढदिवस होता. ठरल्याप्रमाणे सकाळीच मोना मानसीला तयार करून बाहेर घेऊन गेली. दोघीही एका मंदिरात पोहोचल्या तर विनय तिथे आधीच हजर होता. दररोज न चुकता देवाला नमस्कार करून मानसी दिवसाची सुरुवात करायची त्यामुळे आज वाढदिवसाची सुरवात सुद्धा मंदिरात जाऊन झाली. तिघेही नंतर एका हॉटेलमध्ये पोहोचले. विनय ने आधीच तिथे एक टेबल बूक करून सगळी तयारी केली होती. पूर्ण टेबलवर गुलाबांच्या पाकळ्या, त्याच्या मधोमध तिचा आवडता चॉकलेट केक, हार्ट च्या आकारात लावलेल्या मेणबत्त्या, टेबलच्या बरोबर वरच्या बाजूला छताच्या दिशेने लावलेले लाल फुगे, मंद आवाजात हॅपी बर्थडे टू यू असे म्युझिक. सगळं बघून मानसीला आनंदाचा गोड धक्का बसला. “किती सुंदर आहे हे सगळं..फक्त माझ्यासाठी..माझ्या वाढदिवसासाठी.. आयुष्यात पहिल्यांदाच इतका छान वाढदिवस साजरा होतोय आपला..” मनात असाच काहीसा विचार करत ती टेबलच्या दिशेने जात होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. लाल पिवळ्या रंगाचा बांधणीचा पंजाबी ड्रेस घातलेली मानसी चेहऱ्यावर जराही मेकअप नसताना खूप सुंदर दिसत होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून विनय अजूनच तिच्याकडे आकर्षित झाला. मोना त्यांच्या सोबत आहे याचा क्षणभर विनयला विसर पडला. तिघेही टेबलवर पोहोचले. मानसीने केक कट केला. नंतर काही वेळाने विनय ने मानसीच्या हातात गुलाबाचे फुल देत तिला प्रपोज केले. त्याला ती अगदी शाळेपासून आवडते, तिच्यावर त्याचं खूप प्रेम आहे हे तिला अगदी आत्मविश्वासाने सांगत आयुष्यभर मला तुझी साथ हवी म्हणत तिला मागणी घातली. त्याचं असं सरप्राइज बघून मानसी जरा घाबरली, लाजली पण तिच्याही मनात त्याच्या विषयी प्रेम होतेच. शाळेपासून नाही पण कॉलेजमध्ये आल्यावर तो तिचा पहिलाच मित्र, त्याची झालेली मदत, त्याचा मनमिळाऊ, प्रेमळ स्वभाव, त्याचा सहवास यामुळे तिलाही तो आवडायचा पण त्याच्या मनात सुद्धा आपल्याविषयी प्रेम आहे याची तिला जरा जराही शंका आली नव्हती. त्याच्या या सरप्राइज मुळं पण तिचा जरा गोंधळ उडाला तरी तिने कुठलाही विचार न करता त्याचे प्रपोजल स्विकारले तशीच मोना मनोमन रडायला लागली. विनय आणि मानसी खूप आनंदी होते पण मोनाला मात्र हा प्रेमभंग अगदी नको नकोसा झाला होता. कुठे तरी दूर पळून जावेसे वाटत होते पण विनय आणि मानसी साठीचा आनंदी क्षण आपल्यामुळे खराब होऊ नये म्हणून ती चेहऱ्यावर कसे बसे हास्य आणून ती त्यांच्या आनंदाची साक्षीदार बनली होती.
वेळ गेली तशी ती विनयच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं त्याच्यावर असलेलं हे प्रेम विसरणे तिला अशक्य झाले होते.
मानसी आणि विनय मात्र एका नव्या विश्वात रमलेले होते. दोघांचं जिवापाड प्रेम बघून मोनाला कधी कधी त्यांचा हेवा वाटायचा.
आता शक्य तितकं त्यांच्या सहवासात जाणे मोना टाळत होती.
अशातच भराभर वर्ष संपत आले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा तिघांनी मस्त पार्टी करायचे ठरवले. तिघेही एकत्र बर्याच दिवसांनी बाहेर पडले. त्या दिवशी विनय ने मोनाची मस्करी करत तिला विचारले, “मोना, काय गं..तुला अख्ख्या कॉलेजमध्ये कुणीच आवडला नाही का..”
त्या क्षणी तिच्या मनात परत एकदा कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे एकच गाणे गुणगुणत होते,
“तुझे याद ना मेरी आई..किसी से अब क्या कहना…”
कॉलेज नंतरही दिवसेंदिवस मानसी आणि विनय यांचे प्रेम बहरत गेले. दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोना आयुष्यात पुढे जात होती पण अजूनही विनय मध्ये गुंतलेली होती. दुसऱ्या कुणावर परत असं मनापासून प्रेम करता येईल की नाही याची तिला शंकाच वाटत होती. मानसी आणि विनय यांना मात्र मोनाच्या मनस्थितीची, विनय विषयीच्या प्रेमाची जराही कल्पना नव्हती.
अशी ही तिघांच्या मैत्रीची आणि विनय-मानसीच्या प्रेमाची गोष्ट कशी वाटली हे नक्की कळवा 😊
मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
© अश्विनी कपाळे गोळे