ओढ मिलनाची…( प्रेमकथा)

Love Stories

पहाटे पाचचा गजर झाला तशीच स्वरा लगबगीने उठून आवरायला लागली. आज खूपच उत्साहात होती स्वारी, कारणही तसेच होते. तब्बल सहा महिन्यांनंतर ती मयंकला भेटणार होती. आठ वाजता मयंक पोहोचणार तेव्हा त्यापूर्वी तयार होऊन एअरपोर्टवर जायचा तिचा प्लॅन होता. आंघोळ करून आली तशीच ओल्या केसांना सुकवत स्वतः ला आरशात निरखून बघताना तिला त्यांच्या लग्नानंतर मयंक सोबतची पहिली सकाळ आठवली.

त्या दिवशी ती अशीच नुकतीच न्हाऊन आलेली. मयंकच्या आवडीची लाल रंगाची साडी नेसून तयार झाली आणि आपल्या ओल्या केसांना सुकवत असताना मयंकने हळूच येऊन तिला मिठी मारली. अलगद तिची हनुवटी बोटांनी वर करत नव्या नवरीच्या चेहऱ्यावरचे ते तेज बघून तो क्षणभर तिला बघतच राहीला आणि ती लाजून चूर..🥰 त्याच्या नजरेला नजर सुद्धा भिडवू शकत नव्हती ती. तितक्यात तिच्या ओलसर केसांची बट गालावरुन मागे करत त्याने तिच्याकडे बघत “गुड मॉर्निंग स्वीटहार्ट” म्हणताच ती आपला चेहरा त्याच्या छातीवर लपवून कशीबशी गुड मॉर्निंग म्हणाली होती.

आजची सकाळ तिला अगदी तशीच काहीशी वाटत होती. आजही त्याचा आवडता नी लेन्थ ड्रेस घालून , हलकासा मेकअप करून ती तयार झाली.  घरात त्याच्या स्वागताची तयारी रात्रीच करून ठेवलेली तरीही सगळं नीट तर आहे याची खात्री करून ती कार घेऊन एअरपोर्टवर जायला‌ निघाली. कधी एकदा मयंकला भेटते असं झालेलं तिला.

स्वरा आणि मयंक हे एक नवविवाहित जोडपे, दोघांचे अरेंज मॅरेज. स्वरा दिसायला अतिशय नाजूक, प्रेमळ स्वभावाची एक लहर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची. चाफेकळी नाक, बोलके डोळे तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडायचे. साधारण राहणीमान असलेली ही स्वरा बघताक्षणी कुणालाही आवडेल अशीच गोड असली तरी तिला काही तिच्या मनात घर करेल असा कुणी आजवर भेटला नव्हता शिवाय तिचा जरा लाजाळू स्वभाव सुद्धा आड यायचाच. आयटी कंपनीत चांगल्या पदावर ती नोकरीला होती. अशी ही सर्वगुणसंपन्न स्वरा मयंकला पहिल्या भेटीतच खूप आवडली.
मयंक एका इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला, आकर्षक व्यक्तिमत्त्व, पिळदार शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज असलेला मयंक स्वराला पहिल्या नजरेत मनात घर करून गेला.

दोघांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नाला आठवडा होत नाही तोच त्याला सहा महिन्यांसाठी विदेशी जाण्याची संधी चालून आली. लग्नापूर्वी जरा कल्पना होतीच त्याला याविषयी पण इतक्या लवकर सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन लगेच जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तशी कल्पना त्याने लग्नापूर्वी स्वराला दिलेली. शिवाय शॉर्ट टर्म ट्रिप असल्याने तिला घेऊन जाणे इतक्यात शक्य नव्हतेच. नुकतंच लग्न झाल्यावर हे गोड दिवस अनुभवावे अशी मनापासून खूप इच्छा असूनही त्याला स्वरा पासून काही महिने दूर जावे लागले. स्वराने त्याला याबाबत खूप समजून घेतले. सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे नंतर आयुष्यभर आपण सोबत आहोतच असं तिने मोठ्या विश्वासाने त्याला म्हंटल्यावर तो तिच्या अजूनच प्रेमात पडला. फोन, व्हिडिओ कॉल वर एकमेकांना बघत सहा महिने संपले खरे पण हा काळ अगदी सहा वर्षां प्रमाणे भासलेला. आज दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागली होती.
मयंकची नजर स्वराला शोधत होती आणि स्वराची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती.

एअरपोर्टवर पोहोचतात मोठ्या आतुरतेने ती त्याची वाट बघत होती. काही वेळातच तो समोरून येताना दिसला तशीच तिची धडधड वाढली. त्याचीही नजर तिच्यावर पडली तसाच तो एकटक तिला बघत तिच्या दिशेने येत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. तो जवळ आला तशीच तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली, नजरेनेच क्षणभर ते एकमेकांशी बोलत होते. एकमेकांच्या डोळ्यांत बघताना ती एका वेगळ्या विश्वात हरवली, त्याला डोळेभरून बघताना या भेटीची आतुरता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो तिचे हे भाव अलदी अलगद टिपत तिचं सौंदर्य न्याहाळत होता.
“आय मिस्ड यू सो मच स्वरा..” असं मयंक अगदी मनापासून प्रेमळ भावनेने म्हणताच ती भानावर आली.
त्याच्या चेहऱ्यावर खिळलेली तिची नजर स्थिर ठेवून ती लाजतच उत्तरली , “आय मिस्ड यू टू.. चला निघूया..”

दोघेही घरी जायला निघाले. स्वरा ला कार ड्राइव्ह करताना पहिल्यांदाच बघितले होते त्याने. ती कार ड्रायव्ह करताना तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. कधी एकदा स्वराला मिठीत घेऊ असंच काहीसं झालेलं त्यांचं. मयंक एकटक आपल्याला बघतोय हे तिला कळत होतं, तिलाही ते आवडलं होतं. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायच होत पण आनंदाच्या भरात शब्द काही सुचत नव्हते. ही गोड शांतता भंग करायला तिने कार मधला रेडिओ सुरू केला. त्यावर या क्षणाला अनुसरून अगदी योग्य गाणे लागले…

“उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये….

उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये….

ऐसा हुआ असर….

ऐसा हुआ असर………

ऐसा हुआ असर के मेरे होश उड़ गये‌…

उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…”

अगदी या गाण्या प्रमाणे तिच्या मनाची अवस्था झाली होती.
ते गाण्याचे बोल ऐकताच तिने स्वतः शीच हसून चॅनल बदलायला हात पुढे केला आणि मयंकने तिचा हात पकडून गाणे न बदलण्याचा इशारा केला. त्याच्या स्पर्शाने तिला अंगावर रोमांचक काटा आला. स्वतः चा हात पटकन बाजूला घेत ती म्हणाली, “कार ड्रायव्ह करताना असं डिस्टर्ब करू नये..”
तिच्या या वाक्याने दोघांचे प्रेमळ  संभाषण सुरू झाले.  त्याला हा क्षण खूप आवडला होता. काही वेळातच ते घरी पोहोचले. दार उघडताच घरातून येणारी सुगंधी लहर त्याला स्पर्शून गेली. हॉलमध्ये त्याच्या स्वागतासाठी तिने छान तयारी केली होती. समोरच्या टेबलावर त्याची आवडती जरबेरा ची फुले
अगदी सुंदररित्या मांडलेली होती. गुलाबांच्या पाकळ्यांनी हार्ट च्या आकार तयार केलेला होता त्यावर स्वराने लगेच ‘वेलकम बॅक स्वीटहार्ट’ लिहीलेला केक आणून ठेवला, मेणबत्त्या लावल्या. घरात सर्वत्र एक वेगळाच सुगंध दरवळत होता. दोघांचं हे घर स्वराने खूप सुंदर सजविले होते. घरात येताच त्याला अगदी प्रसन्न वाटले.
“चला आता पहिले फ्रेश होऊन या तुम्ही..” असा स्वराचा प्रेमळ आदेश मिळताच मयंक भानावर आला. फ्रेश व्हायला आत गेला तसंच त्याला अजून एक सरप्राइज मिळाले. बेडरूम मधल्या भिंतीवर स्वराने दोघांचे एकत्र घालवलेल्या काही गोड क्षणांचे फोटो लावलेले होते. लग्नापूर्वीची दोघांची पहिली कॉफी डेट पासून ते मयंकला एअरपोर्टवर सोडायला गेल्यावर काढलेला सोबतचा फोटो असा त्यांचा आतापर्यंतचा प्रेमाचा सगळा प्रवास फोटो बघून परत एकदा त्याच्या नजरेखालून गेला.
तो फ्रेश होऊन आला‌. इकडे स्वरा स्वतः च्या हातांनी बनविलेला त्याच्या आवडीचा नाश्ता , चहा, केक कटींग साठीची सगळी तयारी करत होती. तो तिला न्याहाळत तिच्याजवळ आला आणि क्षणाचाही विलंब न लावता अलगद त्याने तिला मिठीत घेतले. या क्षणासाठी किती वाट बघावी लागली असंच काहीसं झालेलं त्यांचं. तिनेही तिचा चेहरा त्याच्या छातीवर ठेवला. त्याची मिठी हीच आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा आहे याची तिला परत एकदा जाणिव झाली. सहा महिन्यांचा दुरावा आता संपला होता, एकमेकांच्या भेटीसाठी आतुर झालेल्या दोघांसाठी हा खूप खास क्षण होता. हळूहळू दोघांची मिठी घट्ट होत गेली, हृदयाची स्पंदने वाढतच गेली. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर करून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले तशीच ती शहारून परत त्याच्या मिठीत शिरली.

दोघांच्या प्रेमाला , संसाराला आज खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

अशी ही दोघांच्या आतुर भेटीची प्रेमळ कथा कशी वाटली हे नक्की कळवा 😊

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed