मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.
मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.
कॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”
शुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.
मोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.
शुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.
शुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”
तिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”
शुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.
अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.
शुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”
मोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…
एकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”
तिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो, जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…
असा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला. तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.
त्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.
अशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”
ती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोनवर सांगितले नव्हते.
दोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.
मोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.
काही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला तू हवा आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”
त्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”
ते ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”
आज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.
या दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.
एका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.
याविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed