आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला

Love Stories

       अमन बर्‍याच वर्षांनी आज आजोळी आलेला. आजोळी आता आजी आजोबा नसले तरी दोन मामा मामी, भावंडे असं एकत्र कुटुंब. गावाच्या मधोमध प्रशस्त घर, चहुबाजूंनी अंगण त्यात फुलाफळांची झाडे. अमन‌ बालपणी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचाच पण जसजसे दहावी नंतर शिक्षण सुरू झाले तसे त्याचे येणे जाणे बंदच झालेले. आता कॉलेज संपले, नोकरीची ऑफर हातात होती पण तिथे रुजू व्हायला अजून काही दिवस बाकी होते तेव्हा मामा मामींना भेटायला जायचा अमनचा बेत ठरला.

     सायंकाळी सहाच्या सुमारास तो गावात पोहोचला. गावी येताच त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. बस मधून उतरून मामांच्या घराच्या दिशेने जायला निघाला तोच त्याच्या कानावर शब्द पडले, “अमन…कसा आहेस? खूप वाट बघितली रे तुझी… खूप उशीर केलास यायला…”

त्याला तो आवाज ओळखीचा वाटला, त्याने मागे वळुन पाहिले तर काही माणसे त्यांच्याच कामात गुंतलेली दिसली पण जिचा हा आवाज आला ती काही दिसली नाही. त्याला जरा विचित्र वाटले, जिची आठवण दररोज व्याकूळ करायची तिचाच आवाज होता हा याची त्याला खात्री पटली पण ती दिसत का नाही… उशीर केलास यायला असं का म्हणाली ती…अशा प्रश्नांची उत्तरे काही त्या क्षणी त्याला मिळत नव्हती.

     मामा मामी तर एक निमित्त आहे पण मनापासून जिला भेटायला आलो ती भेटणार की नाही हा विचार त्याच्या मनात आला तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो पुढेपुढे जात राहीला. काही मिनिटांतच मामाच्या घरी तो पोहोचला. अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, दादा आला म्हणून सारी भावंडं त्याच्या अवतीभवती फिरत आनंदात उड्या मारत होती. मामा मामी मोठ्या कौतुकाने अमनचे स्वागत करत होती. जरा फ्रेश होऊन तो अंगणात खाटेवर येऊन बसला, सगळी बच्चे कंपनी अंगणात खेळण्यात मग्न होते. त्याची नजर बाजुला असलेल्या आरतीच्या घरावर स्थिरावली, तिच्या घरात कुणी दिसत नव्हते पण घरासमोर दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. तिची एक‌ झलक दिसावी या आशेने त्याचे डोळे तिलाच शोधत होते तितक्यात मामी गरमागरम चहा घेऊन आल्या.

“काय अमन, दमला असशील ना रे…चहा घे…बरं वाटेल जरा…”

“दमलो‌ नाही पण चहा नक्कीच घेणार मामी तुमच्या हातचा…” असं म्हणत त्याने चहाचा कप उचलला. मामा येतात बरं का गाई म्हशी बांधून, तू घे सावकाश चहा.. आम्ही जरा स्वयंपाकाचं बघतो म्हणत मामी घरात गेल्या.

अमन ने हळूच छोट्या भावाला जवळ बोलावून आरतीच्या घराकडे बोट दाखवून विचारले , “या घरांत कुणी राहते‌ की नाही..अंधार दिसतोय..”

छोट्या म्हणाला, “आरती ताई ची आई असते ना..एकटीच राहते ती..”

त्याच्या बोलण्याने अमनला विचार करायला भाग पाडले. आरतीची आई एकटीच राहते मग तिचे बाबा, आरती हे सगळे कुठे असतील या प्रश्नाने तो विचारात पडला. आरतीचे लग्न झाले असेल का…आणि मग तो आवाज कुणाचा होता…आवाज आला पण ती का नसेल दिसली…काय झालं असेल नक्की…
विचार करून अमनच्या डोक्यात नुसताच गोंधळ उडाला होता. काही तरी विचित्र नक्की घडतंय याची त्याला चाहूल लागली होती. आजुबाजूला कुणीतरी आहे असा भास त्याला जाणवत होता पण काय होतंय ते नेमकं कळत नसल्याने तो जरा अस्वस्थ झाला. तितक्यात मोठे मामा त्याच्या शेजारी येऊन बसले. लहान मामा अंगणातल्या हौदा जवळ हात पाय धूत होते.
  
  मामांसोबत जरा वेळ गप्पा गोष्टी केल्यावर त्याने विचारले, “मामा, शेजारी आरती राहायची ना हो.. लहानपणी यायची माझ्यासोबत खेळायला…आता कुणी दिसत नाही त्यांच्या घरात…”

त्यावर मामा म्हणाले, “आरतीची आई एकटीच राहते तिथे आता. मागच्या वर्षी आरतीने आत्महत्या केली आणि तिच्या वडिलांना तो धक्का सहन झाला नाही, ते आजारपणाने गेले. आरतीच्या आईच्या डोक्यावर बराच परिणाम झाला या सगळ्याचा. बिचारी कुणाशी बोलत नाही, काही संबंध ठेवत नाही, सतत म्हणते की माझी आरती माझ्या आजुबाजूला आहे, ती माझ्याशी बोलते. त्यामुळे गावकरी तिला वेडी म्हणतात…”

अमनला हे सगळं ऐकून धक्काच बसला. “आरतीने आत्महत्या केली?…पण का?…”

“कुणालाच सत्य माहीत नाही, काही जण म्हणतात तिचं लफड होत कुणाशी तरी..ती गरोदर होती…त्याने लग्नाला नाही म्हंटले म्हणून हिने स्वतः ला संपविले. कुणी म्हणते पाय घसरुन पडली नदीत कपडे धुताना… नुसत्याच मनाच्या थापा मारतात लोकं पण खरं काय कुणास ठाऊक..”

आता मात्र अमनच्या पायाखालची जमीन सरकली. काही तरी गडबड नक्कीच आहे हे त्याला लक्षात आले. त्याला हे सगळं ऐकून खूप दुःख झाले. आरती असं कधीच करणार नाही याची त्याला खात्री होती तेव्हा नक्कीच तिच्यासोबत काही तरी झालंय हे कळायला अमनला वेळ लागला नाही. आरतीला भेटायच्या ओढीने आज इथे आलो आणि ती या जगात नाही हे त्याच्यासाठी खूप धक्कादायक होते. गावात पोहोचताच त्याला झालेला तिच्या आवाजाचा भास….गावात आल्यापासून जाणविणारं तिचं अस्तित्व त्याला या सगळ्यात काही तरी गुपीत नक्की आहे , कदाचित तिला काही तरी सांगायचे आहे हे त्याला लक्षात आले.
आता आरतीच्या सत्य जाणून घेण्याचा त्याने निर्धार केला.

या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मामींनी जेवायला हाक मारली आणि अमन भानावर आला. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. मामा मामी , भावंडे सगळे हसत खेळत जेवण करण्यात , गप्पा गोष्टीत रमले होते पण अमन मात्र वेगळ्याच विश्वात हरवला होता, मनोमन अस्वस्थ झाला होता.

जेवणानंतर मामांसोबत गावात जरा फेरफटका मारायला गेला तेव्हा त्याला सतत आजुबाजूला कुणाचा तरी भास होत होता. आरती अदृश्य स्वरूपात आजुबाजूला वावरत आहे हे त्याला जाणवत होते.
रात्री झोपताना त्याला आरती सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाली.

क्रमशः

आरती आणि अमन यांच्यात काय नातं होतं?
आरती सोबत काय झाले, ती अमनला तिच्या आत्महत्येचे कारण सांगेल का..तिने नक्की आत्महत्या केली की काही अपघात झाला…अमन हे सत्य कशाप्रकारे शोधून काढणार हे बघूया पुढच्या भागात.

पुढे काय होणार याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असणार ना…

पुढचा भाग लवकरच…

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed