रंगीत स्वप्न आयुष्याचे…(भरकटलेली तरुणाई आणि आई वडील)

Parenting-Relations-Social issues

       तनिषा आई वडिलांना एकुलती एक, दिसायला अतिशय सुंदर, बोलके डोळे, गोरापान वर्ण, अगदी कुणालाही बघताक्षणी आवडेल अशीच गोड. आई वडील दोघेही नोकरी करणारे त्यामुळे तनिषाला ते शक्य तितका वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे मित्रपरिवार तिच्यासाठी खूप जवळचा. शाळेला सुट्टी असली आणि आई बाबा घरी नसतील तर एकटेपणा दूर करायला ती मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायची.

   अगदी लहानपणापासूनच तनिषाला आकर्षक होते ते म्हणजे मॉडेलिंग, ग्लॅमरस जीवनाचे. मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं असं तिचं शाळेत असतानाच ठरलेलं त्यामुळे वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासूनच ती स्वतः ची नीट काळजी घेऊ लागली. व्यायाम, खाण्यापिण्याची काळजी तर घ्यायचीच पण आपण कसं दिसतोय याकडे तिचं आता जास्त लक्ष राहायचं. जसजशी ती वयात येऊ लागली तसंच तिचं स्वतःच्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष देणं सुरू झालं. अगदी मॉडेल प्रमाणे फिगर बनवायची त्यासाठी गूगल वर उपाय शोधण्यापासून ते करून बघण्याचे प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या पॉकेट मनी मधून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स आणायचे, मग मित्र मैत्रिणींना भेटताना अगदी छान मॉडेल प्रमाणे तयार होऊन जाणे हा तिचा एक छंदच बनला. अगदी लहान‌ वयांत तिला ग्लॅमरस जीवन हवेहवेसे वाटू लागले. शाळेत असल्यापासून तिला तिचा वर्गमित्र विनय फार आवडायचा, तो एका उद्योगपतींचा मुलगा, श्रीमंत घराणे , दिसायला देखणा, उत्तम डान्सर, अभ्यासात सुद्धा हुशार, मुलींशी जरा फ्लर्ट करणारा. तनिषाशी त्याची चांगली मैत्री झाली. तनिषा चे मॉडर्न राहणीमान, तिचं सौंदर्य बघून तोही तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला आपल्याविषयी काय भावना आहेत हे त्याला लगेच कळाले होते. एक हॉट, मॉडर्न मुलगी इतका भाव देतेय म्हंटल्यावर तोही हवेत. नववीत असतानाच दोघांचे अफेअर सुरू झाले. तनिषा आता तर अजूनच स्वतः कडे जास्त लक्ष द्यायला लागली. दररोज रात्री उशिरापर्यंत फोन, व्हिडिओ कॉल्स असं सगळं सुरू झालं. याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होत होतात. इतर मित्र मैत्रिणी दोघांनाही लव्ह बर्ड म्हणून चिडवायचे , तनिषाला ते खूप भारी वाटायचे. आपला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काही तरी वेगळं केलंय असं काहीस वाटायचं तिला.

    आई बाबांना मात्र या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. आपली मुलगी मॉडर्न आहे, सुंदर आहे शिवाय हुशार आहे, त्यात वावगे असे काही नाही असा आई बाबांचा दृष्टीकोन. दररोज रात्रीच तनिषा आणि आई बाबांची भेट व्हायची मग एकत्र जेवताना जरा अभ्यास , इतर गप्पा मारल्या की परत तिघेही आपापल्या कामात गुंतायचे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आई बाबा तनिषाला फार काही वेळ देऊ शकत नव्हते. आठवडाभराची कामे, आराम यात त्यांचा वेळ जायचा. आपण सगळं काही तनिषा साठीच तर करतोय असा त्यांचा समज पण हे सगळं करताना आपण तनिषाला समजून घेण्यात मागे पडतो आहे हे त्यांना त्या क्षणी कळत नव्हतं. वरवर पाहता तनिषा ची अभ्यासातील प्रगती उत्तम वाटली त्यामुळेच कदाचित तिचं सगळं काही उत्तम चाललंय असा त्यांचा समज झालेला.
   दहावीची परीक्षा झाल्यावर तिच्या मित्र मैत्रिणींचा गोव्याला जायचा प्लॅन झाला. तनिषाने घरी परवानगी मागितली तेव्हा आई बाबांनी सुरवातीला नको म्हंटले पण सगळेच जाताहेत म्हंटल्यावर तिलाही जायला होकार मिळाला‌. विनय सोबत आता छान एंजॉय करायला मिळणार म्हणून तनिषा अजूनच आनंदी होती. मनसोक्त शॉपिंग करून ती मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला गेली.
पहिल्यांदाच विनय आणि तनिषा घरापासून दूर एकत्र आल्याने दोघेही वेगळ्याच विश्वात होते. वयाच्या या नाजूक टप्प्यावर एकमेकांविषयी ओढ असणे हे नैसर्गिकच आहे. घरी आई बाबांना आपल्यासाठी वेळ नसतो पण विनय आपल्याला किती खास वागणूक देतोय, किती काळजी घेतोय, त्याच आपल्यावर किती प्रेम आहे, असा विचार करून तनिषा अजूनच विनयच्या जवळ आली. त्याच्यासाठी कांहीही करायला तयार अशी तिची परिस्थिती झालेली होती. अशातच दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतानाच त्यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली.

जे काही झालं त्यानंतर तनिषाला मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना जाणवत होती पण इतर मित्र मैत्रिणींच्या नकळत दोघांमध्ये जे काही झालं त्याविषयी कुणाला सांगावं तिला कळत नव्हतं. विनय मात्र जाम खुश होता. तिला अपसेट झालेलं बघून विनय तिला म्हणाला , “तनू, अगं हे सगळं नैसर्गिक आहे. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग हे इतकं तर चालतं गं, प्रेम व्यक्त केलंय आपण फक्त बाकी काही नाही. पुढे तुला मॉडेलिंग करायचं ना, मग जरा बोल्ड तर व्हायला पाहिजे तू….अशा लहानसहान गोष्टींवरून अपसेट झालीस तर पुढे कसं होणार तुझं..बी बोल्ड , बी स्ट्रॉंग..”

तनिषा शरीराने मित्र मैत्रिणींसोबत असली तरी मनाने मात्र कुठेतरी हरवली होती. विनय मात्र परत परत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, यात काही चूक नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. अशातच तीन दिवसांनी ते सगळे घरी परतले. गोव्याला जाऊन आल्यापासून तनिषा जरा वेगळी वागते आहे हे तिच्या आईला कळायला वेळ लागला नाही. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही, सध्या सतत एकटी घरी आहे त्यामुळे कंटाळा आलाय म्हणत तिने विषय टाळला. या दरम्यान तनिषा ची चिडचिड खूप वाढली. विनय आता तिला एकट्याच भेटून परत परत तिच्याकडे त्याच गोष्टींची मागणी करत होता. एकदा तनिषा ने नकार दिला तर त्याने तिला धमकी दिली की, गोव्याला गेल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याविषयी फ्रेंड्स गृप मध्ये सगळ्यांना सांगणार म्हणून.
त्याच्या अशा धमकीमुळे तनिषा अस्वस्थ झाली. विनयने खरंच सगळ्यांना याविषयी सांगितले तर आपली बदनामी होईल, आई बाबा काय विचार करतील अशा विचाराने ती अजूनच घाबरली.
जे काही झालंय त्यामुळे भलतंच काही तर होणार नाही ना, आपण प्रेग्नंट तर नाही ना अशा बर्‍याच गोष्टी तिला त्रास देत होत्या. दिवसभर ती घरात बसून राहायला लागली, मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणारी तनिषा आता त्यांनाच टाळायचा प्रयत्न करत होती. इतर मैत्रिणींना तिच्या या वागण्याचा अर्थ काही कळेना.
विनय आणि तनिषा चे भांडण झाले असणार म्हणून ती आता येत नसेल, काही दिवसांत होईल नीट असा विचार करून त्यांनीही तिला फार काही खोदून विचारले नाही.

या महीन्यात नेमकी तनिषा ची मासिक धर्माची तारीख लांबली. त्यामुळे ती अजूनच घाबरली, आता जर सत्य सगळ्यांसमोर, आई बाबांबरोबर आलं तर काय करायचं हाच विचार करत ती दिवस घालवू लागली. या गोष्टीचा तिच्या मनावर, शरीरावर खूप परिणाम झाला. तिच्या टवटवीत, तेजस्वी सौंदर्याला जणू कुणाची नजर लागली असंच काहीसं झालेलं. झोपेची कमी, सतत विचार, ताण, हार्मोन्सचे बदल यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स, डोळ्याभोवती काळे वर्तुळ दिसायला लागले. आता आपण पूर्वी प्रमाणे सुंदर दिसत नाही मग आपलं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असे नकारात्मक विचार ती करायला लागली.
तिची अवस्था बघून आई बाबांना तिची खूप काळजी वाटली. काही तरी चुकतंय हे त्यांना कळत होतं पण काय झालंय हे तनिषा कडून कळणे अवघड होते.
तनिषाच्या आईने तिच्या मैत्रिणींना याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, “ती गोव्याला जाऊन आल्यापासून आमच्याशी जास्त संपर्क ठेवत नाहीये, भेटायला टाळते आहे. त्यामुळे नक्की काय झालंय आम्हाला नाही माहीत.”

तनिषाच्या एका मैत्रिणी कडून तिच्या आईला तनिषा आणि विनयच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यामुळेच कदाचित तनिषा अशी वागते आहे अशी शंका तिच्या आईला आली. आपल्या मुलीने काही चुकीचे पाऊल तर उचलले नसेल ना अशी‌ त्यांना धाकधूक वाटली.
तनिषा ची परिस्थिती बघून वेळ न घालवता तिच्या आई बाबांनी तिच्याशी विनय विषयी बोलण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ती घाबरली, आई बाबांना कसं कळालं म्हणून जरा चकित झाली पण आईने तिला जवळ घेत मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तशीच ती ढसाढसा रडली. आई बाबा मला माफ करा, मी चुकले, मी भावनेच्या भरात चुकीचं वागले म्हणत ती कितीतरी वेळ रडत होती.

तिने असं म्हणताच तिच्या आईला वेगळीच काळजी वाटू लागली. काय झालंय ते नीट सांग बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं म्हणताच ती म्हणाली, “आई बाबा, तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी वेळ नसतो, खुप एकटी पडलेले मी. मी लहान असताना सांभाळायला मावशी होत्या. नंतर माझं मी स्वतःची काळजी घेतेय बघून मी एकटीच घरात असायची. अशा परिस्थितीत माझ्यासाठी माझे मित्र मैत्रिणी खूप जवळचे वाटले मला. माझा एकटेपणा दूर करायला खूप आधार पण दिला त्यांनीच. माझ्यावर तुम्हा दोघांचे प्रेम नाही म्हणून तुम्ही मला वेळ देत नाही असं वाटायचं मला. अशातच विनयने मला प्रपोज केले आणि आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे या भावनेने मी भारावून गेले. मलाही खूप आवडायचा तो पण गोव्याला गेल्यावर आमच्यात जे काही झालं त्यानंतर तो बदलला. एकदा झालेली चुक मला परत करायची नव्हती पण विनय मला धमकी देत राहीला आणि मी घाबरून त्याला नकार देत नव्हते. पण नंतर मला खूप भिती वाटली, विनय आपल्याला फसवितो आहे असं वाटलं मला…आता तर मी आधी सारखी छान दिसत नाही असही तो म्हंटला..आई माझं स्वप्न वेगळं होतं गं पण झालं काही तरी वेगळंच…मी खूप मोठी चूक केली…”
ती परत रडायला लागली.

जे काही तनिषा ने सांगितले त्यावर आई बाबांचा विश्वासच बसत नव्हता. सगळा प्रकार ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसला. आपण पैसा, करीअर याच्या मागे लागून तनिषाला समजून घेण्यात कमी पडलो. तिला बालपणापासूनच हवा तितका वेळ दिला नाही, तिच्याशी नीट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. ती वरवर आनंदी दिसतेय, हुशार आहे बघून सगळं काही ठीक आहे असंच आपण समजत गेलो पण एक पालक म्हणून आपण अपयशी ठरलो हे तिच्या आई बाबांना खूप उशीरा कळाले.
जे काही झालंय त्यात तनिषा पेक्षा जास्त चूक आपलीच आहे, काय योग्य काय अयोग्य हे तिला वेळीच पटवून सांगितले असते, तिला जरा वेळ देत तिच्याशी नीट संवाद साधला असता तर कदाचित तनिषा ने हे पाऊल उचलले नसते याची खंत दोघांनाही जाणवली.

आता यापुढे आम्ही तुझ्या सोबत आहोत, सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी तनिषाला धीर दिला.

तनिषाच्या वागण्यामुळे तिला नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला, तिच्याशी संवाद साधायला जरा अधिक वेळ झाला असता तर कदाचित तनिषा आई वडिलांना कायमची दुरावली गेली असती असा विचार मनात येऊन आई अजूनच घाबरली.

झाल्या प्रकाराने आई बाबांचे डोळे उघडले. यापुढे तनिषाला समजून घ्यायचे तिला शक्य तितका वेळ द्यायचा असा संकल्प त्यांनी केला.

झाल्या प्रकाराने तनिषा स्वतः चा आत्मविश्वास गमावून बसलेली. तिच्या गमावलेला आत्मविश्वास परत आणायला आई बाबांना खूप मेहनत घ्यावी लागली. ही परिस्थिती सांभाळणे त्यांच्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते पण यात चूक आपलीच आहे हे त्यांना कळाले होते.

हळूहळू सगळं सुरळीत झालं. तनिषा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पण आपण समजून न घेतल्याने तनिषा भरकटली, तिच्या आयुष्यात एक कटू भूतकाळ आपल्यामुळे निर्माण झाला अशी सल त्यांच्या मनात कायम राहिली.

ही कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच कुटुंबात दिसून येतेय. आई वडील त्यांच्या करीअर मध्ये व्यस्त असतात, मुलांशी हवा तितका संवाद होत नाही शिवाय विभक्त कुटुंब त्यामुळे एकटेपणा जाणवला की वयात येताना मुलं मुली मित्र मैत्रिणींचा आश्रय घेतात. अशातच कधी कधी तनिषा प्रमाणे चूक करून बसतात तर कधी अशा परिस्थितीत अपराधीपणाची भावना जाणवल्यावर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतात.

प्रेम आणि आकर्षण यातला फरक, काय योग्य काय अयोग्य याविषयी संवाद पालकांनी आपल्या मुलांशी साधणे खरंच खूप गरजेचे आहे ना. मुलांना विश्वासात घेऊन नीट समजूत काढली तर तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकीचे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed