फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा)- भाग पहिला

Love Stories

“प्रचिती, अगं जाशील ना बरोबर तू एकटी? नाही म्हणजे अगदीच ग्रामीण भागात पहिल्यांदाच जाते आहेस ना म्हणून जरा काळजी वाटली..त्यात तिथे आठवडाभर राहणार, तेही परक्या घरी.. खाण्यापिण्याची नीट सोय होणार की नाही काय माहीत..” प्रचिती ची आई तिला काळजीच्या सुरात प्रश्न विचारत होती.

“डोन्ट वरी माय डियर मॉम…मी अगदी व्यवस्थित जाऊन परत येते.. आणि तुला सांगितलं ना, राहण्याची सोय मिस्टर अजिंक्य नी केली आहे त्यांच्याच फार्म हाऊसवर.. त्यांच्याच फ्लॉवर फार्म मध्ये माझा प्रोजेक्ट आहे.. ते सगळे तिथेच राहतात सो डोन्ट वरी..” प्रचिती तिची बॅग भरत आईशी बोलत होती.

“ते सगळं ठीक आहे गं पण ते मिस्टर अजिंक्य पण तुला अनोळखीच ना.. म्हणजे फोन वर दोन तीन वेळा बोललीस तितकीच ती ओळख..मी पण आले असते बघ तुझ्या सोबत पण नेमकं पप्पा कामानिमित्त बाहेरदेशात गेलेत आणि इथला फॅक्टरी चार सगळा लोड माझ्यावर आहे सध्या..” – आई.

प्रचिती ने आईला कडकडून मिठी मारली आणि म्हणाली, “किती काळजी करतेस मॉम तू..मी आता मोठी झाली ना, मी नीट काळजी घेईन माझी आणि काहीही वाटलं ना तर लगेच परत येईल बघ..ओके.. नाऊ स्माइल प्लीज..”

प्रचितीने PhD साठी फुलांवर रिसर्च करायचं ठरवलं होतं. निसर्गावर भरभरुन प्रेम होतं तिचं, त्यातही फुलांवर जास्तच… लहानपणापासून मुंबईत वाढलेली, श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला अतिशय सुंदर, मध्यम बांधा, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट, चेहर्‍यावर आत्मविश्वासाचे तेज. प्रचिती रात्रीच्या स्लीपर कोच ने ठरलेल्या गावी जायला निघणार होती. तिथे अजिंक्यची निरनिराळ्या फुलांची शेती होती. इंटरनेट वरून अजिंक्य च्या फ्लॉवर फार्म विषयी माहिती काढून त्याच्याशी संपर्क करत प्रचिती ने तिचा प्रोजेक्ट त्याच्या फार्म वर करायचं ठरवलं होतं.

निघताना तिने अजिंक्य ला फोन केला. अजिंक्य ला ती पहिल्यांदाच भेटणार होती. स्लीपर कोच थांबेल त्या ठिकाणाहून अजिंक्यचे फार्म जवळपास वास किलोमीटर अंतरावर होते. त्या ठिकाणी अजिंक्य प्रचिती ला घ्यायला येणार होता.

आपल्या मेहनतीने उभ्या केलेल्या या फुलांच्या शेतीवर रिसर्च करायला मुंबई वरून मॅडम येणार म्हणून तो पहाटेच उठला. आंघोळ वगैरे करून कडक इस्त्री केलेला फिटींगचा पांढराशुभ्र शर्ट , डार्क निळ्या रंगाची जिन्स घालून तो तयार झाला. प्रचिती आठच्या सुमारास पोहोचणार असं माहीत असूनही तो प्रचिती पोहोचण्याच्या तासभर आधीच तिची वाट बघत स्टॉपवर उभा होता.

काही वेळातच लांबून बस येताना दिसली तसाच तो जरा सतर्क झाला आणि एकटक बसकडे बघत उभा राहिला. क्षणातच त्याच्यासमोर बस येऊन थांबली आणि प्रचिती त्यातून उतरली. अजिंक्य अजूनही तसाच उभा होता, प्रचिती ला समोर बघताच तो नकळत तिला बघतच राहिला. अगदीच फिटींगचा लालचुटुक स्लीवलेस कुर्ता, ऑफव्हाईट लेगीन्स, गोरापान रंग, कोरीव बोलके डोळे, लालचुटुक नाजूक ओठ, चेहर्‍यावर भूरभुरणारी केसांची बट.
इतकी सुंदर मुलगी प्रत्यक्षात जणू तो पहिल्यांदाच बघत होता. तिला बघत मनातच तो पुटपुटला, “आईशप्पथ… अप्सरा बघतोय का काय मी.. टिव्हीवर नट्या असतात तशाच दिसतात प्रचिती मॅडम तर..”

प्रचिती हळूहळू तिची भलीमोठी बॅग सांभाळत त्याच्याकडेच येत होती. जरा जवळ येऊन ती, “हाय.. तुम्हीच मिस्टर अजिंक्य ना?” म्हणताच तो भानावर आला. काय बोलावं त्याला क्षणभर का,तर नव्हतं. गोंधळलेल्या अवस्थेत तो म्हणाला, “अ…अ…हो..हो..मी अजिंक्य… अजिंक्य पाटील…”

प्रचिती ने गोड स्माइल देत हात पुढे केला आणि म्हणाली, “हाय..मी प्रचिती चिटणीस…तशी फोन वर ओळख झाली आपली..”

अजिंक्यने थरथरत्या हाताने तिच्या पुढे केलेल्या हाताला हात देत हाय हॅलो केले..काय बोलावं त्याला कळत नव्हतं. दुसर्‍याच क्षणी तो स्वतः लाच म्हणाला, “अज्या‌..अरे असा काय करतोय..त्या मॅडम आहेत.. कामानिमित्त आल्या आहेत.. पाहुण्या आहे आपल्या..काय काय विचार करतोय तू त्यांच्याविषयी..काय म्हणतील मॅडम…”

अजिंक्य भानावर येत म्हणाला, “मॅडम, दमल्या असणार ना तुम्ही प्रवास करून..चला निघूया घरी जायला..द्या बॅग
इकडे..” अजिंक्य प्रचिती ची बॅग स्वतः कडे घेत म्हणाला.
बाजुला उभी केलेल्या अजिंक्यच्या गाडीतून दोघेही घरी जायला निघाले. वाटेत रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे, गार वारा, रम्य निसर्ग दृष्य बघताच प्रचितीचे मन अगदी प्रसन्न झाले.

प्रचिती- “काय मस्त वातावरण आहे ना… खरं सांगायचं तर हे सगळं पहिल्यांदाच अनुभवते आहे मी.. अंगातला सगळा शीण निघून जातो खरंच अशा मोकळ्या हवेत…”

अजिंक्य- “काय सांगता मॅडम, म्हणजे… पहिल्यांदाच बघताय होय तुम्ही हे सगळं..हे तर काहीच नाही अजून जाम भारी बघा आमचा गाव..गावालगत नदी आहे, जवळच काही डोंगररांगा आहेत.. हिरवीगार शेती आहे… तुम्हाला नक्कीच आवडेन बघा..”

प्रचिती – “वाह इंटरेस्टिंग…फार धमाल आहे तर मग इकडे… आणि हो, मला‌ मॅडम मॅडम काय म्हणताय..प्रचिती म्हणा …मी काही मॅडम नाही हो.. आणि बिनधास्त तू म्हंटलं तरी चालेल..अहो जाहो नको…”

अजिंक्य- “अहो पाहुण्या आहात तुम्ही.. असं एकेरी नावाने कसं बोलवायचं तुम्हाला…प्रचिती मॅडम म्हणतो हवं तर..”

प्रचिती त्यावर खळखळून हसत म्हणाली, “बरं…”

अजिंक्य ला काय बोलावं कळत नव्हतं. जरा विचार करून तो म्हणाला, “प्रवासात त्रास नाही ना झाला तुम्हाला..आता घरी गेल्यावर खाऊन आराम करा मस्त..आई तुम्ही येणार म्हणून सकाळीच सगळ्या तयारीला लागली असणार बघा..मी तर पहाटेच उठून आलो इकडे..परक्या गावात तुम्हाला वाट बघत बसायला नको ना म्हणून..”

बोलून झाल्यावर अजिंक्य जीभ चालत मनातच पुटपुटला, “जरा जास्त बोलून गेला का काय अज्या तू..”

प्रचिती – “अरे बापरे.. माझ्यामुळे उगाच त्रास झाला ना तुम्हाला..घरी पण सगळ्यांना सुद्धा..”

अजिंक्य लगेच तिचे वाक्य तोडत म्हणाला,”नाही नाही… अजिबात नाही..उलट सगळे आतुर आहे तुम्हाला भेटायला.. तुमच्या स्वागताला…धाकटी बहीण रेश्मा तर जाम उत्साहात आहे..”

काही वेळातच दोघेही घराजवळ पोहोचले. गाडीतून खाली उतरताच प्रचिती चौफेर नजर फिरवत बघतच राहीली. निळेशार आकाश, दूरपर्यंत पसरलेली रंगीबेरंगी फुलांची शेती, ठराविक जागी फुलांच्या निगराणी साठी केलेले शेड, शेताच्या लगतच दुमजली फार्म हाऊस, त्याच्या चहुबाजूंनी हिरवीगार झाडे…

अजिंक्यची बहीण रेश्मा धावतच गाडी जवळ येत म्हणाली, “नमस्कार मॅडम, मी रेश्मा.. अजिंक्य दादाची धाकटी बहीण..वेलकम बरं का आमच्या गावात..या ना…”

तिच्या आवाजाने प्रचिती भानावर येत म्हणाली, “हाय रेश्मा..हो अजिंक्य नी सांगितलं मला तुमच्याविषयी आताच गाडीतून येताना.. प्लीज तू तरी मॅडम नको म्हणू.. हवं तर ताई म्हण..”

रेश्मा- “ओके प्रचिती ताई..चला जाऊया आत..”

त्यावर दोघीही हसल्या.
प्रचिती- “हो हो..जाऊया…एक मिनीट हो, बॅग तितकी घेते मी..”

अजिंक्य – “घेतो की बॅग मी..चला तुम्ही..”

प्रचिती – “नको नको..घेते मी…”

रेश्मा प्रचिती चा हात धरून म्हणाली, “ताई, तुम्ही चाल… बॅग आणतो दादा…😉”

 

क्रमशः

कथा मोठी असल्याने भागांमध्ये लिहीत आहे.

पुढचा भाग लवकरच पोस्ट करू😊

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

 

Comments are closed