फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा

Love Stories

एक दिवस सकाळीच प्रचिती ने अजिंक्य ला फोन केला आणि म्हणाली, “आज दहा वाजता न्यूज चॅनल बघ.. तुझ्यासाठी सरप्राइज आहे..”

प्रचिती असं काय सरप्राइज देणार आहे हे अजिंक्य ला काही कळालं नाही. त्याने “ठिक आहे नक्की बघतो..” म्हणत उत्तर दिले.

त्यालाही आता उत्सुकता लागली होतीच. पटापट आवरून तो शेताकडे चक्कर मारून आला आणि कधी एकदा दहा वाजतात याची उत्सुकतेने वाट बघू लागला. बघतो तर काय , प्रचिती ने त्याची घेतलेली मुलाखत, त्याच्या शेतीचे, त्यातील विभिन्न प्रकारच्या फुलांचे फोटो व्हिडिओ चक्क न्यूज चॅनलवर..त्याने आई आणि रेश्मा ला मोठ्याने हाक मारली.
अजिंक्य ला टिव्हीवर बघताच त्या दोघींनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. टिव्हीवर भरभरून होणारे कौतुक बघून अजिंक्य च्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रु वाहू लागले. त्याने लगेच प्रचिती ला फोन केला.

इकडे प्रचिती सुद्धा टिव्हीवर अजिंक्य ला बघत होती. फोन वाजला तशीच फोन उचलत ती त्याला म्हणाली, “काय मग.. कसं वाटलं सरप्राइज..तुझ्या मेहनतीचं फळ आहे हे…”

अजिंक्य अश्रू आवरत म्हणाला, “मी इतका ग्रेट नाहीये पण तुझ्या मुळे आज मी चक्क टिव्हीवर..माझा विश्वास बसत नाहीये..”

प्रचिती – “तुझ्याकडून आदर्श घेऊन इतरांनी सुद्धा असं वेगळं काही करावं..शेती करणे , गावात राहणे काही कमीपणा नाही हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून सगळं केलं मी..ही तुझी मुलाखत बघून तू कुणा ना कुणा साठी नक्कीच प्रेरणा स्थान असणार याची खात्री आहे मला..”

अजिंक्य – “थ्यॅंक्यू प्रचिती…लव्ह यू…”

प्रचिती- “काय म्हणालास…परत एकदा म्हण..”

इकडे आई आणि रेश्मा च्या समोरच अजिंक्य प्रचिती ला चक्क “लव्ह यू..” म्हणाला बघून आई आणि रेश्मा त्याच्याकडे आश्चर्याने बघत होत्या.

आई – “अज्या, काय बोलतोय..आधी तू फोन ठेव बघू..”

अजिंक्यने प्रचिती ला “सॉरी… भावनेच्या भरात बोलून गेलो चुकून…नंतर बोलतो..बाय..” म्हणत फोन ठेवला.

“आई अगं असं काही नाही… आनंदाच्या ओघात चुकून काहीतरी बडबडलो बहुतेक मी..”

रेश्मा – “आई, चुकून नाही होत असं काही..बरं का..मनात असतं तेच ओठांवर येतं…दादाला प्रचिती ताई जाम आवडते…मी बघितलं ना स्वतः च्या डोळ्यांनी..”

अजिंक्य – “काहीही काय बडबड करते गं रेश्मा तू…आई असं काही नाही..”

आई – “हे बघ अजिंक्य, ती खूप गोड मुलगी आहे पण आपल्या आणि त्यांच्या परिस्थितीत खूप तफावत आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही..”

अजिंक्य त्यावर काहीही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर भाव बघून आई सगळं समजून गेली.

रेश्मा विषय बदलत म्हणाली, “आई, दादाला गावात सगळ्यांनी बघितलं असेन ना गं टिव्हीवर..किती भारी..‌सगळं प्रचिती ताई मुळे झालं..दादा अभिनंदन बरं का..”

अजिंक्य ने नुसतीच स्माइल दिली.

आई – “अजिंक्य, आज आबा असते तर किती अभिमान वाटला असता त्यांना…तुझी मुलाखत टिव्हीवर आलेली बघून गावभर साखर वाटली असती त्यांनी..अशीच प्रगती करू बाळा… ”

आईचे बोलणे ऐकून अजिंक्य भावनिक झाला, तितक्यात अजिंक्य ला प्रचिती चा मेसेज आला, “तू भावनेच्या भरात जे बोललास ते मला जाम आवडलं…”

त्याच्या मनात लगेच विचार आला, “म्हणजे प्रचिती ला सुद्धा मी आवडतो..?”
अजिंक्य आता द्विधा मनस्थितीत सापडला होता. एकीकडे प्रचिती चा मेसेज वाचल्यावर झालेला आनंद आणि दुसरीकडे आईचे बोलणे…तो एकटाच नदीकाठी जाऊन बसला… त्याच्याच विचारात मग्न…जरी दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं तरी या नात्याला बहुतेक इथेच थांबवावं लागेल असा काहीतरी विचार करून त्याने डोळे घट्ट मिटले..तिच्या आठवणीने नकळत अश्रू ओघळत गालांवर ओघळले. मनातच तो पुटपुटला, “का आलीस प्रचिती माझ्या आयुष्यात…खूश होतो मी माझ्या विश्वात…एका आठवड्यात मी तुझ्यात इतका कसा काय गुंतलो…मला खरंच काही कळत नाहीये प्रचिती…नको होतं तू इकडे यायला..”

तितक्यात प्रचिती चा फोन आला. त्याने बघूनही फोनला काही उत्तर दिले नाही. तिचा लगेच मेसेज आला, “अजिंक्य, काय झालंय..फोन रिसिव्ह कर ना प्लीज..”
त्याला आता प्रचिती सोबत काय बोलावे काही कळत नव्हते.
त्याचा टिव्हीवर आलेला इंटरव्ह्यू बघून बरेच जण अभिनंदन करायला त्याच्या घरी आले, फोन केला पण तो सगळ्यांशी नेहमीप्रमाणे मोकळा बोलत नव्हता. चेहऱ्यावर कसंबसं हसू आणत सगळ्यांना सामोरे जात होता.
रेश्मा ने त्याची अवस्था ओळखली. तिच्या मनात विचार आला,” आपण उगाच आईला सांगितलं दादाचं गुपित..”

अजिंक्य फोनला काही उत्तर देत नाही म्हणून इकडे प्रचिती अस्वस्थ झाली, तिची उगाच चिडचिड व्हायला लागली. अशातच काही दिवस निघून गेले पण प्रचिती फार अपसेट राहायची‌.
तिच्या मॉम डॅड ला तिचे बदललेले वागणे बघून काही कळत नव्हते. प्रचिती सोबत आता नीट बोलायला हवे, तिच्या मनाची अवस्था समजून घ्यायला हवी म्हणत मॉम तिला म्हणाली, “प्रचिती, काय झालंय..तू हल्ली फार वेगळी वागते आहेस..काही प्रोब्लेम आहे का?”

प्रचिती – “मॉम..तू खरं बोलत होतीस…आय थिंक आय एम इन लव्ह विथ मिस्टर अजिंक्य..”

मॉम – “काय.. प्रचिती..पण तू म्हणाली होतीस ना तुमच्यात असं काही नाही.. तुमची ओळख फक्त एका आठवड्याची..इतक्यात प्रेम होतं का खरंच..”

प्रचिती – “मला सगळं कळतंय मम्मा पण आय मिस हिम.‌.तो खरंच खूप वेगळा आहे, त्याचा सहवास ना खरंच न विसरता येणारा आहे…आणि प्रेम काही ठरवून करतात का…माझे किती मित्र आहेत इकडे, त्यात काहींनी मला प्रपोज पण केलेलं पण मला असं आधी कधीच कुणाविषयी वाटलं नाही… खरं सांगू मम्मा त्याच्याही मनात माझ्याविषयी काहीतरी नक्कीच आहे पण तो बोलत नाही.. कदाचित त्याला भिती वाटते.. त्या दिवशी टिव्हीवर त्याचा इंटरव्ह्यू आला ना नंतर त्याला मी कॉल केला..तो खूप आनंदी होता.. भावनेच्या भरात मला लव्ह यू म्हणाला..मला खूप छान‌ वाटल पण त्याला कदाचित अपराधी भावना आलेली मनात‌‌.. नंतर माझ्याशी बोलायचं बंद केलंय त्याने.. म्हणून चिडचिड होतेय माझी…”

मॉम – “प्रचिती.. अगं पण भविष्याचा विचार कर..तू आयुष्यभर राहू शकणार का तिथे..हे सगळं क्षणिक सुख असतं..तुला सवय नाहीये त्या वातावरणाची..”

प्रचिती – “मॉम..तूच म्हणतेस ना गं की खरं सुख हे पैशाने विकत घेता येत नाही.. प्रेम आणि आपली माणसं सोबत असली तर कुठल्याही परिस्थितीत आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो म्हणून… मुंबईत किंवा कुठल्याही मोठ्या शहरात राहणारा मुलगा शोधून मी लग्न केलं आणि आमचं नाही पटलं तर मग काय…”

मॉम – “प्रचिती, तू इतकी मोठी झालीस हे कळालच नाही गं मला..पण माझं मन अजूनही मानत नाहीये..मुळात तू अशाप्रकारे कुणाच्या प्रेमात पडशील हे पटतच नाहीये मला..डॅड आले की बोलूया नीट..प्लीज अशी उदास नको राहू..”

प्रचिती च्या मॉम ला सगळं ऐकून फार संताप आला. रात्री घडलेला प्रकार मॉम ने डॅड ला सांगितला. तेव्हा त्यांनाही जरा विचित्र वाटले पण प्रचिती अजिंक्य कडे जाऊन आल्यापासून तिची बदललेली वागणूक त्यांना आधीच कळाली होती.

डॅड – “मला वाटतं प्रचिती ची निवड ही योग्यच असेल..ती हुशार आहे, समजुतदार आहे तेव्हा डोळे मिटून ती कुणावर विश्वास ठेवणार असं नाही वाटतं मला..राहीला प्रश्न तिच्या करीअर चा, ग्रामीण भागात राहण्याचा..पण याचा सुद्धा काही तरी विचार तिने केला असेलच…मी प्रचिती सोबत बोलतो आणि तिला काही हो नाही म्हणण्या आधी आपण एकदा अजिंक्य ला भेटायला त्याच्या गावी जाऊ..तिथे राहून सगळं बघून नंतर काय ते ठरवू..”

ठिक आहे म्हणत मॉम झोपली. डॅड प्रचिती च्या खोलीत गेले तर ती लॅपटॉप वर काहीतरी करत होती.

“प्रचिती, बेटा झोपली नाही अजून..”

“डॅड तुम्ही…”

“हो..जरा बोलायचं आहे तुझ्याशी..”

“बोला ना..”

“तू काय ठरवलं आहेस करिअर विषयी.. भविष्या विषयी..”

“डॅड, भविष्य म्हणाल तर अजिंक्य…करीअर तर माझं ठरलं आहे…मला प्रोफेसर व्हायचंय.. अजिंक्य सोबत लग्न केलं तरी ते शक्य आहे..तो जिथे राहतो त्या जिल्ह्यात मोठे कृषी विद्यापीठ आहे..तिथे नोकरीची संधी नक्कीच आहे..माझी आवड सुद्धा आहे त्यात…आता तरी मला इतकंच कळतंय..पण मॉम ला हे मान्य नाहीये ना..”

डॅड – ” प्रचिती, आपण पुढच्या आठवड्यात अजिंक्य कडे जाऊया..तिथे काही दिवस राहून, अजिंक्य ला भेटून नंतर काय ते ठरवायचं..ओके? पण जर आम्हा दोघांना काही प्रोब्लेम वाटला तर मात्र अजिंक्य ला विसरावे लागेल तुला..”

ते ऐकताच प्रचिती ने रडतच डॅडला मिठी मारली आणि म्हणाली, “ओके डॅड.. प्रॉमिस..”

क्रमशः

कथा मोठी असल्याने भागांमध्ये लिहीत आहे. कथेचा पुढचा भाग लवकरच.

कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली की नाही हे नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed