फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)

Love Stories

ठरल्याप्रमाणे प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत अजिंक्य च्या गावी आली. गाडी गावाजवळ पोहोचताच प्रचिती च्या चेहर्‍यावर आनंदाची लहर उमटली. तो हिरवागार निसर्ग, अंगाला अलगद स्पर्शून जाणारा गार वारा ती परत एकदा अनुभवत होती.

डॅड – “काय मस्त वाटतंय ना इकडे.. कितीतरी वर्षांनी या मोकळ्या हवेत फिरल्या सारखं वाटतंय.. आमचं बालपण अशाच वातावरणात गेलेलं‌‌..धमाल मज्जा करायचो आम्ही..”

प्रचिती – “डॅड, खरंच मस्त वाटतंय..मी इकडे एक आठवडा होते ना तेव्हा तर वेडी झालेले सगळं बघून.. माझ्यासाठी तर पहिलाच अनुभव होता तो… इकडे ना जवळच मस्त डोंगररांगा, नदी सुद्धा आहे.. अजिंक्य आणि मी दररोज जायचो तिकडे..जाम मज्जा यायची..”

ते ऐकताच मॉम ने प्रचिती कडे जरा रागातच बघितले. तशीच प्रचिती मॉम ची नजर चुकवत गाडीच्या बाहेर बघू लागली.

प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत गावी येतेय याची अजिंक्य ला जराही कल्पना नव्हती. दोघांचं बोलणं इतक्यात बंदच होतं. बघता बघता तिघेही अजिंक्य च्या फार्म हाऊसवर पोहोचले. अजिंक्य शेतात काहीतरी काम करत होता. घराजवळ कुणाची गाडी आली हे बघायला तो त्यांच्या फार्म हाऊस कडे येऊ लागला.

सुंदर रंगिबेरंगी फुलांची शेती, टुमदार दुमजली फार्म हाऊस बघताच मॉम च्या तोंडातून नकळत शब्द निघाले, “व्वा काय मस्त प्लेस आहे..अगदी एखाद्या मराठी चित्रपटात बघितल्या सारखं वाटतंय..”

प्रचिती ला ते ऐकताच मनातून आनंद झाला. मॉम आणि प्रचिती गाडीतून बाहेर उतरल्या. डॅड ने बाजुला असलेल्या भल्या मोठ्या झाडाखाली गाडी पार्क केली. तितक्यात रेश्मा घराबाहेर आली आणि प्रचिती ला बघताच अगदी पळतच येऊन तिला मिठी मारत म्हणाली, “प्रचिती ताई.. तुम्ही… असं अचानक.. म्हणजे दादा काही बोलला नाही तुम्ही येणार आहे ते..पण सरप्राइज आवडलं बरं का आम्हाला…या ना..हे आई बाबा का तुमचे..”

प्रचिती ने मॉम डॅड ला रेश्मा सोबत ओळख करून दिली.

रेश्मा ने तिघांचे हसतमुखाने स्वागत करत आईला हाक मारली. कोण आलंय बघायला आई दारात आली आणि प्रचिती आई बाबांसोबत आलेली बघताच त्या म्हणाल्या, “रेश्मा जा आरतीचे ताट आण देवघरातून पटकन..”

अजिंक्य च्या आईने तिघांचे ओवाळून स्वागत केले. मागोमाग अजिंक्य आला आणि तिघांना असं अचानक आलेलं बघून अगदी स्तब्ध होऊन नुसताच प्रचिती कडे बघत राहीला.

प्रचिती – “मॉम डॅड..हा अजिंक्य…”

दोघांनी वळून त्याला बघितले. उंच पुरा पिळदार शरीरयष्टी असलेला अजिंक्य दिसायला अगदी राजबिंडा.. मॉम डॅड ने त्याला बघताच त्याने वाकून दोघांना नमस्कार केला. अजिंक्य ने त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर बसायला सांगितले. रेश्मा थंडगार पाणी घेऊन येत म्हणाली, “छान गरमागरम चहा बनवते मी.. तुम्ही निवांत बसा..”

असं अचानक आलेल्या आणि फारशी ओळख नसलेल्या पाहुण्यांचे इतके उत्साहाने होणारे स्वागत बघून मॉम डॅड ला मनातून आनंद झाला.
तुम्ही तिघेही फ्रेश व्हा म्हणत आईने लगेच नाश्त्याची तयारी केली. तिघेही फ्रेश होऊन आले तसाच सगळ्यांनी एकत्र बसून गरमागरम नाश्ता, कडक चहा घेतला. जरा औपचारिक गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांच्या ओघात रेश्मा म्हणाली, “प्रचिती ताई मुंबईला गेल्यापासून आमचा अजिंक्य दादा फार शांत शांत झाला बघा…”

त्यावर प्रचिती जरा लाजली आणि अजिंक्य म्हणाला, “असं काही नाही..जरा कामात बिझी होतो…पण आमची रेश्मा फार खोडकर आहे…अगदी माझ्यावर लक्ष ठेवून असते बघा.. ”

त्यावर सगळे हसायला लागले.

डॅड – “प्रचिती मुंबईत आल्यावर ही जागा खूप मिस करतं होती, खूप कौतुक केले तिने इथल्या निसर्गसौंदर्याचे.. मग आम्ही ठरवलं आता सगळेच जाऊया काही दिवस राहायला.. म्हणून असं अचानक आलो आम्ही..”

आई – “बरं झालं.. आम्हालाही प्रचिती ची आठवण यायची ती परत गेल्यावर..खरंच छान वाटलं तुम्ही इकडे आलेले बघून.. निवांत रहा..काही संकोच वाटू देऊ नका..”

मॉम – “हो नक्कीच..चला अजिंक्य ची फुलांची शेती बघून येऊया का?”

अजिंक्य मॉम डॅड ला घेऊन शेताकडे निघाला.. मागोमाग प्रचिती आणि रेश्मा सुद्धा गेल्या. इतकी सुंदर रंगीबेरंगी फुले, त्याच्या निगराणी साठी केलेले शेड, पाण्याची योग्य व्यवस्था बघून मॉम डॅड इंप्रेस झाले. फिरत फिरत सगळे नदीकाठी गेले. निळेशार आकाश, कोवळे ऊन, नदीकिनारी वाहणारा वारा अगदी मन प्रसन्न करत होता. मॉम किती फ्रेश दिसतेय सगळं बघून असा विचार प्रचिती च्या मनात आला.

सायंकाळी सगळे अंगणात बसून गप्पा मारत होते, आजूबाजूच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकून मॉम म्हणाली, “किती मस्त वाटतंय ना…मी जन्मापासून शहरात राहीले, त्यामुळे हा सगळा अनुभव कधी घ्यायलाच मिळाला नाही‌ ”

रात्रीच्या जेवणात आईने मस्त चुलीवरच्या भाकरीचा बेत ठरवला. अंगणात चुल पेटवून रेश्माच्या मदतीने छान स्वयंपाक केला. आकाशात लुकलुकणारे चांदणे, चंद्रप्रकाश ,मन प्रफुल्लित करत होता. अंगणात बसूनच निसर्गाच्या सान्निध्यात सगळ्यांनी मस्त जेवण केले.

सकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉक ला गेल्यावर मॉम डॅड अगदीच आनंदी वाटत होते.

रेश्मा हळूच प्रचिती ला म्हणाली, “ताई, तुम्ही आल्यापासून दादा आणि तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत.. सगळं ठीक आहे ना..”

प्रचिती – “हो.. मॉम डॅड असल्यामुळे कदाचीत आम्हाला बोलायला चान्स मिळाला नाही.. डोन्ट वरी..”

असंच सगळं अनुभवत दोन दिवस कसे निघून गेले मॉम डॅड ला कळालं सुद्धा नाही.

तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर रेश्मा आणि प्रचिती घराबाहेर अंगणात फिरायला गेल्या. प्रचिती तिथे नाही हे बघताच,
मॉम अजिंक्य आणि त्याच्या आईला म्हणाली, “खरं सांगायचं तर आम्ही अचानक इकडे आलो यामुळे तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल पण प्रचिती अजिंक्य मध्ये फार गुंतली आहे. ती तिकडे आल्यावर फार वेगळी वागायला‌ लागली आहे…असा बदल तिच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा बघितला. हेच नाही तर तिने हे सुद्धा मान्य केले की तिचं अजिंक्य वर प्रेम आहे…”

हे ऐकल्यावर अजिंक्य ला काय बोलावं सुचेना. आईने त्याचे बदललेले भाव बघितले आणि म्हणाली, “ताई, खरं तर रेश्मा म्हणाली तसंच अजिंक्य सुद्धा हल्ली फार गप्प गप्प असतो..प्रचिती येऊन गेल्या पासून त्याचं वागणं बदललं. रेश्मा कडून मला कळालं की त्याला प्रचिती आवडते. प्रचिती आम्हाला सुद्धा लळा लावून गेली, खूप गोड मुलगी आहे ती पण तुम्ही शहरात राहणारे, तिला या वातावरणाची सवय नाही त्यामुळे त्याला मी समजावलं की प्रचिती विषयी असा विचार करू नकोस..”

डॅड – “अजिंक्य, तुझ्या मनात काय आहे तू सांग मोकळेपणाने..तुम्हा दोघांचं मत जाणून घेणं खूप महत्वाचं आहे…”

अजिंक्य जरा घाबरतच म्हणाला, “काका, खरं सांगायचं तर मला प्रचिती पहिल्या नजरेत बघताक्षणी आवडली पण मी माझ्या मनाला आवरलं. नंतर आठवडाभर आम्ही एकत्र काम केलं, प्रचिती ला आजूबाजूचा परिसर बघायला सोबत घेऊन गेलो, तिचं प्रेमळ, लोभस , हुशार, जरा अल्लड पण तितकाच आत्मविश्वास असलेलं व्यक्तीमत्व बघून या एकत्र घालवलेल्या अगदी एका आठवड्यात मी तिच्या प्रेमात पडलो. ती मुळात आहेच अशी की कुणालाही अगदी सहज आवडेल. पण मला हे तिला कधीच सांगायचे नव्हतं, तिच्या मनात काय आहे हे मला माहीत नव्हतं. प्रॅक्टिकल विचार केला तर आम्हा दोघांची परिस्थिती खूप वेगळी आहे हे मला कळत होतं पण नकळत मी गुंतलो तिच्यात.. प्रचिती मुळे टिव्हीवर माझी मुलाखत आलेली बघून भावनेच्या भरात अचानक त्या दिवशी तिला लव्ह यू म्हणालो पण मला खूप अपराधी भावना आलेली मनात.. नंतर विचार केला की हे नातं इथेच थांबवूया..तिचा फोन घ्यायचं मी बंद केलं..वाटलं, वेळ गेला की प्रचिती मला सहज विसरून जाईल आणि मी तिच्या आठवणी मनात साठवून हळूहळू यातून बाहेर पडेन..”

अजिंक्य चा स्पष्टपणा, प्रचिती विषयीच्या त्याच्या भावना बघून डॅड म्हणाले, “किती निर्मळ मन आहे रे तुझं…अगदी सहज बोलून गेलास मनातलं सगळं…मला आवडला तुझा सच्चेपणा..”

मॉम – “अजिंक्य, असं अचानक बोलायचं बंद केलं की सगळं ठीक होतं का… मनातून आवडलेल्या व्यक्तीला असं सहज विसरता येतं का… आयुष्य आनंदात घालवायला ना मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीची साथ असणं खूप गरजेचं असतं, पैशाने वस्तू विकत घेता येतात पण प्रेम नाही…प्रचिती ला आम्ही समजावलं, तुला विसरून जा म्हणत एखादा श्रीमंत मुलगा शोधून तिचं लग्न लावून दिलं तर ती कधीच आनंदात राहू शकणार नाही..याची खात्री आहे आम्हाला..त्या दिवशी तिने जेव्हा तुझ्यावर प्रेम आहे हे मान्य केले तेव्हा मी खूप चिडले पण तिचे डॅड तिच्याशी बोलायला खोलीत गेले तेव्हा मागोमाग मीही गेले, लपूनच दोघांचं बोलणं ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं की प्रचिती ने तिचं करीअर, भविष्य या सगळ्याचा नीट विचार करून अजिंक्य सोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्हाला तुला भेटायचं होतं, इथलं सगळं बघून नंतर तिचा निर्णय योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यायची होती म्हणून आम्ही तिघेही इथे आलो. इथे आल्यापासून बघतोय आम्ही, प्रचिती आणि अजिंक्य एकमेकांशी जराही बोलले नाही.. पण दोघांच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट दिसत आहे. प्रचिती इकडे आल्यापासून अगदी आनंदात आहे, मोकळेपणाने वावरत आहे. आमच्यासाठी ती आनंदी असणे हीच खरी कमाई आहे आणि तिचा आनंद हा अजिंक्य च्या सहवासात आहे याची खात्री पटली आता. तुम्ही सगळे खूप प्रेमळ आहात, प्रचिती ला आमच्यापेक्षा जास्त जपणार यात काही शंका नाही. अजिंक्य लग्न करशील प्रचिती सोबत..?”

प्रचिती आणि रेश्मा घरात येताच प्रचिती ने मॉम चे बोलणे ऐकले तशीच ती म्हणाली, “मॉम.. खरंच..तुला काही हरकत नाही आमच्या नात्याविषयी..”

मॉम – “नाही..मला मान्य आहे तुमचं प्रेम पण आता अजिंक्य आणि त्याच्या घरी तू पसंत असणार तर पुढे काय ते ठरवू..”

आई – “अहो असं काय म्हणताय…प्रचिती सारख्या गोड मुलीला कोण नाही म्हणणार..काय अजिंक्य?”

अजिंक्य जरा‌ लाजतच म्हणाला, “हो..मला काही हरकत नाही..”

रेश्मा आनंदात नाचायला लागली , “दादा…मला तर आधीच कळलं होतं तुझं गुपित…आता प्रचिती ला वहिनी म्हणणार मग मी..ताई नाही..”

प्रचिती अजिंक्य ला म्हणाली, “पण अजिंक्य ने मुळात मला अजून प्रपोज कुठे केलंय…”

अजिंक्य हळूच उठला आणि बाजुच्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवलेले लालचुटुक गुलाबाचे फुल हातात घेऊन प्रचिती कडे आला, तिच्या समोर गुडघ्यावर बसून म्हणाला,

मला ना नेहमी स्वप्न पडायचे त्यात एक सुंदरी माझ्या फुलांच्या शेतात बागडताना दिसायची, आनंदाने मला बघत मनसोक्त हसायची आणि मी तिच्याकडे बघून घायाळ व्हायचो..मी तिला फुलराणी म्हणायचो..
ती स्वप्नातली राणी तू आहेस प्रचिती…

तूच माझ्या स्वप्नाची राणी
तूच माझी प्रेमकहाणी,
भास तुझा फुलांफुलात
तूच माझी फुलराणी…
तूच माझी फुलराणी…

विल यू मॅरी मी….प्लीज… प्रचिती मॅडम…”

त्यावर डॅड म्हणाले, “क्या बात है अजिंक्य….तुम शायर भी हो…”

प्रचिती ने गोड हसत फुल हातात घेऊन मानेनेच होकार दिला आणि लाजून अजिंक्यच्या मिठीत शिरली.

अजिंक्य – “मॅडम, सगळे आहेत इकडे…”

ती लाजून चूर होत धावत शेताकडे गेली तसंच मॉम डॅड म्हणाले ,” चक्क लाजली ही…चला तर ताई, आता लग्नाची तयारी करायला हरकत नाही…”

सगळे आनंदाने हसत नव्या नात्याचा आनंद साजरा करत होते. सगळ्यांची नजर चुकवत अजिंक्य प्रचिती च्या पाठोपाठ शेताकडे गेला. प्रचिती शेतात अगदी त्याच्या स्वप्नातल्या फुलराणी सारखी आनंदात बागडताना दिसली.

तिच्या जवळ जाऊन तिचा हातात घेत अजिंक्य म्हणाला, “आय लव्ह यू प्रचिती…”

प्रचिती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, “आय लव्ह यू टू…”

दोघांच्या या प्रेमाला सारी रंगिबेरंगी फुले जणू साक्ष देत होती.

समाप्त..!!!

कथा कशी वाटली ते जरूर कळवा. 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed