- “निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली.
निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला मिळतं निवांत.. ”
“निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?”
“मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे करत आहोत आपण..मला मूळात लग्नच करायचं नाहीये ”
“निधी, असं किती दिवस त्याच आठवणी मनात घेऊन लग्नाला नकार देत राहणार आहेस बाळा.. आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून काहीतरी शिकवण घेत पुढे जायचं असतं..सगळेच मुलं काही वाईट नसतात..”
“मम्मा प्लीज आज परत तो विषय नको..” – निधी उठून बसत म्हणाली.
“ओके बाबा, सॉरी..पण लवकर तयार हो..”
मानेनेच होकार देत निधी बाथरूममध्ये निघून गेली.
निधीची आई मात्र तिच्या काळजीने मनातच पुटपुटत म्हणाली, “हा योग जुळून येऊ दे देवा.. भूतकाळ आधीच माहीत असूनही मुलाकडचे तयार झाले..आता एकदा सगळं जुळून आलं की निधीची समजूत काढता येईल..होईल तयार ती लग्नाला..”
निधीच्या विचारात गुंतली असताना बाबांची हाक ऐकताच आई विचारातून बाहेर आली.
“आले हा..” म्हणत आई खोलीतून बाहेर गेली.
निधी दिसायला सुंदर, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज, आकर्षक व्यक्तीमत्व असलेली श्रीमंत घरातील आई वडीलांना एकुलती एक मुलगी. अगदीच लाडा कौतुकात ती लहानाची मोठी झाली. डिग्री नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. तिथे तिची ओळख वेदांत सोबत झाली. परदेशात आपली भाषा बोलणारा वेदांत भेटल्याने तिची त्याच्याशी मस्त गट्टी जमली. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री झाली. विकेंड ला सोबत फिरणे, शॉपिंग, पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन सगळं अगदी सोबत करायचे दोघेही. निधीला वेदांतचा सहवास हळूहळू आवडायला लागला होता. वेदांतच्या मनातही निधी विषयी प्रेम होतेच पण त्याने ते व्यक्त केले नव्हते. न राहावून शेवटी निधीने तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आणि दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
दोघेही प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. दोन वर्षे एकत्र असताना ते मनाने तर जवळ आलेच पण नकळत शरीरनेही एकरूप झाले. आता मायदेशी परतल्यावर घरी लग्नाचं बोलायचं आणि संसार थाटायचा असं दोघांचं ठरलेलं.
निधी ने तर तिच्या मम्मा पप्पांना व्हिडिओ कॉल वर वेदांत विषयी सगळं काही सांगितलं सुद्धा. निधीच्या घरचं वातावरण अगदीच फ्रेंडली त्यामुळे त्यात काही वावगं असं त्यांना वाटलं नाही पण मम्मा मात्र सारखं तिला म्हणायची, “निधी बेटा, बॉयफ्रेंड आहे हे ठीक आहे पण काही चुकीचं करून बसू नकोस..”
त्यावर निधी म्हणायची, “कम ऑन मम्मा.. मी काय लहान बाळ आहे का.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर..आता परत आलो ना की लग्नाचं ठरवूया म्हणतोय वेदांत..”
“आपली मुलगी तशी बोल्ड आहे..माणसांची योग्य पारख तिला आहे..आता ती अल्लड नाही..आपणच उगाच काळजी करतोय बहुतेक..” असा विचार करत स्वतः ची समजूत काढत मम्मा शांत बसायची.
वेदांतच्या घरी मात्र अजून निधी विषयी काही माहिती नव्हते. घरी परत गेल्यावर मी सगळ्यांशी बोलून आपल्या नात्याविषयी सांगतो..त्यांना काही प्रोब्लेम नसणार आहे असं वेदांत अगदी आत्मविश्वासाने सांगायचा.
बघता बघता दोन वर्षे संपले आणि दोघेही मायदेशी परतले. दोघेही वेगवेगळ्या शहरात राहायला त्यामुळे आता फक्त फोन, व्हिडिओ कॉल यावरच भेट व्हायची. निधी त्याला सारखं विचारायची, “वेदांत तू घरी बोललास का आपल्या विषयी..”
त्यावर वेदांत म्हणायचा, “निधी, एकदा नोकरी हातात आली ना की लगेच सगळी बोलणी करुया.. तुझ्या घरी सुद्धा तुझा हात मागायला असं विना नोकरी कसं यायचं ना.. बसं काही दिवस थांब..”
निधीचेही नोकरीचे प्रयत्न सुरू होतेच पण वेदांत पासून दूर राहणे तिला फार अवघड होत चाललं होतं. दोन वर्षांच्या सहवासात त्याची जणू सवय झाली होती.
एक दिवस वेदांतचा सकाळीच कॉल आला..त्याला मोठ्या कंपनीची ऑफर मिळाली होती, परत परदेशात प्रोजेक्ट साठी जावं लागणार आहे असं त्यानं सांगितलं.
ते ऐकून निधी अगदी आनंदाने नाचायला लागली. “वेदांत आता घरी बोलू शकतोस तू… लगेच लग्न करायचं असं नाही पण आपल्या विषयी कल्पना तरी देऊ त्यांना..”
“निधी, किती उतावीळ झाली आहेस तू…आता कुठे नोकरीची ऑफर मिळाली..बोलूया लवकरच घरी..धीर धर जरा..” असं वेदांत म्हणाला तेव्हा निधी मनोमन फार दुखावली.
“आपण दिवसेंदिवस वेदांत मध्ये गुंतत जातोय पण हा मात्र सगळं खूप सहज बोलून मोकळा होतो आहे.. वेदांत धोका तर देणार नाही ना.. नाही.. नाही.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर…असा नाही करणार तो… त्याला जरा वेळ द्यायला हवा… “अशी स्वतः ची समजूत काढत निधीने ठरवले की आता काही दिवस तरी त्याला या विषयी काही विचारायला नको.
निधीचे मम्मा पप्पा पण तिला अधूनमधून वेदांत विषयी विचारत म्हणायचे, “वेदांतला एकदा तरी घरी बोलावून घे..आम्हाला भेटायचं आहे त्याला… तुमचं पुढे काय ठरलं जरा बोलायला हवं ना..”
त्यावर निधी “हो..हो..” म्हणत वेळ निभावून न्यायची.
दिवसेंदिवस आता दोघांचं फोनवर बोलणं सुद्धा कमी होत चाललं होतं. निधीच्या मनात शंकाकुशंका यायला लागल्या होत्या.
बराच विचार करून निधी मम्मा पप्पांना म्हणाली, ” पप्पा, आपण जायचं का वेदांत कडे…तो सध्या त्याच्या नव्या नोकरीत, व्हिजा वगैरे मध्ये बिझी आहे..आपण भेटायला जाऊ..त्याला सरप्राइज देऊ..मला पत्ता माहीत आहेच..”
“चालेल..काही हरकत नाही..” – पप्पा.
क्रमशः
कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊
© अश्विनी कपाळे गोळे