ठरल्याप्रमाणे निधी येत्या विकेंड ला मम्मा पप्पांसोबत वेदांतच्या घरी जायला निघाली.
तब्बल तीन महिन्यांनी वेदांतला भेटणार म्हणून निधी जाम खुश होती. कधी एकदा त्याला भेटते असं काहीसं झालेलं तिला.
बारा तासांच्या प्रवासानंतर तिघेही वेदांत राहतो त्या शहरात पोहोचले. सायंकाळ झाली होती त्यामुळे हॉटेलवर रूम बुक करून तिघांनी तिथे रात्रभर मुक्काम केला आणि दुसर्या दिवशी सकाळी लवकरच फ्रेश होऊन वेदांत च्या घरी जायला निघाले.
थोड्याच वेळात तिघेही वेदांत च्या घरी पोहोचले. दारावरची वेदांतच्या बाबांच्या नावाची पाटी व
बघतच निधीने दारावरची बेल वाजवली.
निधीचे मन आता अजूनच बेचैन झाले होते..वेदांतला बघताच मिठी मारावी असं काहीसं तिच्या मनात येत असतानाच वेदांत ने दार उघडले.
निधीला असं अचानक थेट घरी आलेलं बघताच त्याचा चेहरा पडला. दचकतच तो म्हणाला, “तू…इथे…अशी अचानक..”
“सरप्राइज.. मम्मा पप्पा पण आलेत.. बरं आत बोलवणार की दारातच विचारपूस करणार आहेस..”
“या ना.. प्लीज..” वेदांत टेंशन च्या सुरात बोलला.
वेदांत च्या घरी कोणत्या तरी कार्यक्रमाची धामधूम सुरू होती. बर्याच पाहुणे मंडळींची वर्दळ बघून निधी जरा गोंधळात पडली. ती मनात विचार करू लागली, “वेदांत च्या घरी नक्की काय चाललंय..इतक्यात हा फारसा बोलत पण नव्हता फोन वर.. आणि काही कार्यक्रम आहे असंही काही बोलला नाही..”
तितक्यात वेदांत आईला घेऊन आला.
निधी सोबत ओळख करून देत म्हणाला, “आई ही निधी, आम्ही एकत्र शिकायला होतो US ला..हे तिचे आई बाबा.. अर्थातच मी सुद्धा त्यांना आज पहिल्यांदाच भेटतोय..”
वेदांत ची आई लगेचच म्हणाली, “अरे व्वा..बरं झालं आलात.. सगळं कसं अचानक गडबडीत ठरल्यामुळे वेदांत च्या इतर मित्र मैत्रिणींना लग्नात यायला जमणार नव्हतं.. तुम्ही आलात ते खरंच फार बरं झालं..”
ते ऐकताच निधी अडखळत म्हणाली, “लग्न..? कुणाचं…?”
“अगं, कुणाचं काय..वेदांतचं..उद्या लग्न आहे ना त्याचं..आता प्रोजेक्ट साठी परदेशात जाणार..मग परत सुट्टी नाही म्हणत वर्ष वर्ष येणार की नाही कुणास ठाउक म्हणून आताच करायचं ठरवलं आम्ही..तसं लग्न कधीच जुळवून ठेवलं होतं.. हा आला ना इकडे परत त्याआधी आम्ही ह्याच्या साठी मुलगी शोधली होती..वेदांतला आवडणार याची खात्री होतीच आम्हाला..”
वेदांतच्या आईचं बोलणं ऐकून निधीच्या काळजाचा ठोकाच चुकला. निधीच्या मम्मा पप्पांना सुद्धा हे ऐकताच धक्का बसला. निधीचे पप्पा वेदांत कडे रागाच्या भरात एकटक बघत होते.. पुढे काहीतरी बोलणार तितक्यात निधीने पप्पांचा हात धरला आणि म्हणाली, “पप्पा, आपण निघूया लगेच…”
निधी पाणावल्या डोळ्यांनी धपाधप पावलं टाकत वेदांतच्या घराबाहेर पडली. मम्मा पप्पा पाठोपाठ येत म्हणाले, “निधी..निधी.. थांब..आपण जाब तरी विचारू वेदांतला.. तुमचं प्रेम होतं ना एकमेकांवर..मग हा असा कसा धोका देऊ शकतो..आम्हाला खात्री आहे त्याने तुझ्याविषयी घरी काहीच सांगितलं नाहीये..आम्ही बोलतो त्याच्या आई वडीलांशी..”
निधी मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
निधी आणि तिचे आई बाबा असे अचानक निघून गेल्यामुळे वेदांतच्या आईला काय झालंय काही कळालं नव्हतं. मुळात त्यांना निधी आणि वेदांत विषयी काही माहितीच नव्हते.
घरच्यांची नजर चुकवत वेदांत घराबाहेर आला आणि निधी जवळ येत म्हणाला, “निधी..आय एम सॉरी… माझं ऐकून तर घे..”
वेदांतला समोर बघताच निधीने जोरात त्याच्या कानाखाली वाजवली.
” आता काय ऐकून घ्यायचं तुझं.. अरे तुझ्यावर मनापासून प्रेम केलं मी..आणि तू…धोकेबाज.. खोटारडा…इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं..”
वेदांत- “निधी अगं आई बाबांनी सगळं आधीच ठरवून ठेवलं..मी आपल्याविषयी सांगणार होतो पण कुणी माझं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.. श्वेता, जिच्याशी माझं लग्न ठरवलं तिच्यात नकार देण्यासारखं काहीच नाही असं आधीच सांगितलं होतं मला.. पुढे काय आणि कसं बोलायचं नाही कळालं मला..मला माफ कर..”
“चूक माझीच आहे रे..मी तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवला..प्रेम केलं.. तुझ्यासोबत भविष्याचे स्वप्न रंगवले..पण तुझी लायकीच नाही..आता मनात आणलं ना तर सगळ्यांसमोर सत्य सांगून मी तुझं लग्न मोडू शकते पण मी तुझ्यासारखी नाहीये…आता त्या श्वेताचा तरी विश्वास असा मोडू नकोस म्हणजे झालं.. आणि हो.. परत मला तुझं हे तोंड दाखवू नकोस..”
इतकं बोलून निधी आई बाबांसोबत मागे वळून न बघता निघून आली.
निधीला या गोष्टीचा मोठा धक्का बसला. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याने असा विश्वास घात केला ही गोष्ट तिला सहनच होत नव्हती.. तिकडे वेदांत मात्र झालं ते विसरून संसारात रमला होता.
निधी ने एकदा सहजच त्याचं फेसबुक प्रोफाईल उघडून बघितलं. श्वेता सोबतचे त्याचे बरेच फोटो त्याने शेअर केले तिला दिसले. निधीचा आपसूकच बांध फुटला…त्या रात्री परत एकदा ती नुसतीच रडत होती..दोष नक्की कुणाचा याचा विचार करत होती..
निधीच्या बाबांनी तर वेदांत विषयी पोलिसांत फसवणूक केल्याची तक्रार करू असा निश्चय सुद्धा केला पण निधीने त्यांना अडवले.
या गोष्टीला आता सहा महिने होत आले तरी निधी अजून सावरलेली नाही हे बघून आई बाबा सुद्धा काळजीत होते.
एक दिवस मनात काहीतरी विचार करून निधीने ठरवलं की आता वेदांत चा विषय बंद..आता त्यातून बाहेर पडायला हवे. आई बाबांनी तिला या सगळ्यात खूप समजून घेतले, चूक कुणाची होती वगैरे विचार न करता आता यातून बाहेर पडत नविन आयुष्य जगायचं आहे हे वेळोवेळी निधीच्या लक्षात आणून दिले. मनातल्या जखमा मनात लपवत निधीने नविन आयुष्याकडे वाटचाल सुरू केली.
निधी ने मेहनत करून चांगली नोकरी मिळवली. कामात गुंतल्या मुळे आता हळूहळू ती या सगळ्यातून बाहेर पडली पण तिचा प्रेम, लग्न यावरचा विश्वास कधीच उडाला होता.
निधीच्या मम्मा पप्पाची मात्र निधीसाठी योग्य मुलगा शोधण्याची धडपड सुरू झाली होती.
मुलगी परदेशात शिकायला होती, तिथे प्रियकर होता..मग त्याने धोका दिला अशा अनेक चर्चा नातलग, शेजारीपाजारी यांच्यात व्हायच्या. निधीच्या मम्मा पप्पांना याची कल्पना होतीच त्यामुळे येणाऱ्या स्थळाला अंधारात न ठेवता सगळं खरं काय ते सांगायचं आणि त्यांना याविषयी काही हरकत नसेल तरच त्या स्थळाचा विचार करायचा असं निधीच्या घरी ठरलं. निधी मात्र लग्न करायलाच तयार नव्हती.
तरीही मम्मा पप्पा म्हणतात म्हणून कधीतरी एखाद्या स्थळाला सामोरे जायची.
आजही असंच एक स्थळ निधी साठी आलेलं. तिला बघण्याचा कार्यक्रम ठरला होता आणि निधीच्या मम्माच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता.
क्रमशः
कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊
अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed