Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा

Love Stories

निधी फ्रेश होऊन चहा नाश्ता करत असतानाच पाहुण्यांचा फोन आला. “अर्धा तासात आम्ही पोहोचतो” असं पाहुणे मंडळींकडून कळताच मम्मा पप्पांची घाई सुरू झाली. सगळी अरेंज मेंट नीट झाली आहे ना याची खात्री करून घेत मम्मा निधीला म्हणाली, “निधी आता तू तयार हो..काही मदत लागली तर आवाज दे मला..”

 

निधीला मात्र जराही उत्साह वाटत नव्हता. मम्मा पप्पा चे मन राखायला म्हणून ती तयारीला लागली. मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला, त्यावर मॅचिंग नाजुकसे कानातले घातले, हलकासा मेकअप करून कपाळावर इवलिशी टिकली लावली. केस नेहमीप्रमाणे मोकळेच ठेवत आरशासमोर उभे राहून क्षणभर स्वतःला न्याहाळत निधी मनातच पुटपुटली, “वाह निधी, तू तो कमाल लग रहीं…इतके दिवस स्वतःकडे लक्षच दिलं नाही मी..”

 

“निधी.. अगं तयार झालीस का?” असा मम्मा चा आवाज येताच ती भानावर आली.

 

“हो मम्मा..झालंय माझं..” म्हणत मागे वळून बघितलं तितक्यात मम्मा खोलीत आली आणि निधीला बघताच म्हणाली, “किती सुंदर दिसत आहेस निधी तू या ड्रेस मध्ये..माझीच नजर लागणार बहुतेक तुला आज..”

 

“काहीही काय गं मम्मा..” -निधी.

 

गाडीच्या हॉर्न चा आवाज आला आणि मम्मा म्हणाली, “आलेत बहुतेक पाहुणे..निधी तू थांब खोलीतच..मी तुला बोलावते मग ते बाहेर..ठीक आहे..चल ऑल द बेस्ट..”

 

निधी स्वतः शीच बोलू लागली, “ऑल द बेस्ट काय म्हणते मम्मा..माझी काय परीक्षा आहे की काय..?

तसं बघायचं म्हंटलं तर एक प्रकारची परिक्षा आहेच म्हणा..वधू परिक्षा.. श्या..मला नाही आवडत हे सगळं प्रदर्शन….जाऊ दे आता हे सगळं विचार करत बसायची वेळ नाही..कोण महाशय आलेत मला बघायला जरा बघावं डोकावून…”

 

असं पुटपुटत निधी खिडकीजवळ आली आणि पण सगळे प्रयत्न व्यर्थ…तिला काही त्याची झलक दिसलीच नाही.

 

तिने बेडवर ठेवलेला तिचा फोन हातात घेऊन सेल्फी काढले, नंतर फोन बघतच बाजुच्या टेबलवर ठेवलेली पाण्याची बाटली हातात घेऊन पाणी प्यायली. काही वेळाने मम्मा निधीला बोलवायला आली.

ड्रेस नीट करत परत एकदा केसांवर हात फिरवत निधी ने आरशात बघितले आणि मम्मा सोबत हॉल मध्ये जायला लागली.

 

हॉलमध्ये तिला‌ बघायला आलेला सुजय, त्याचे आई वडील आणि एक बहीण‌ असे चौघे जण निधी येताना दिसताच एकटक तिला बघतच राहिले. त्यांच्याकडे निधीने एक नजर फिरवली आणि सगळे आपल्याला बघताहेत हे लक्षात येताच ती जरा लाजतच स्मित हास्य करत समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. तिची स्माइल , ते घायाळ करणारे सौंदर्य बघताच सुजयची नजर तिच्यावर स्थिरावली.

 

“मी तुमची ओळख करून देतो..” असं निधीचे पप्पा म्हणाले तसाच सुजय भानावर आला. निधीच्या पप्पांनी निधी आणि सुजयच्या कुटुंबाची ओळख करून दिली. जरा वेळ सगळ्यांशी बोलून झाल्यावर सगळ्यांनी सुजय आणि निधीला एकांतात बोलायला टेरेस गार्डन मध्ये पाठवले.

 

चौफेर फुलझाडांनी सजवलेल्या टेरेस गार्डन मध्ये मधोमध दोन खुर्च्या आणि एक टेबल ठेवलेला होता. त्यावर दोघांसाठी कॉफी ठेवलेली होती. निधीने कॉफी कप मध्ये ओतून घेत एक कप सुजय ला दिला आणि एक कप स्वतःच्या हातात घेतला.

 

सुजय कप हातात घेत “थ्यॅंक्यू..” म्हणाला. त्यावर निधी ने नुसतेच स्मित केले.

 

सुजय – “अशा वेळी नेमकं काय बोलावं कळत नाही ना….माझी ही कांदेपोहे कार्यक्रमाची पहिलीच वेळ आहे…आणि कदाचित शेवटची…”

 

निधी- “शेवटची..?”

 

सुजय- “जर तू मला पसंत केलं तर‌ शेवटची…”

 

निधी – “अच्छा.. आणि मी नाही म्हणाले तर…”

 

सुजय त्यावर हसला आणि म्हणाला, “तो‌ विचार केलाच नाही मी..मी तुझा फोटो बघितला त्यावेळीच का कोण जाणे पण वाटलं हीच ती, जिच्या शोधात मी आहे…”

 

निधी – “असं एकदा बघून आयुष्यभरासाठी निवड करता येते का खरंच..”

 

सुजय – “मला असंच वाटायचं..एका भेटीत कसं काय जोडीदार निवडायचा..खरं तर माझं ठरलं होतं की जी मुलगी आवडेल तिच्याशी आधी मैत्री करायची आणि मग एकमेकांना ओळखून नंतरच लग्नाचा विचार करायचा पण तुझ्या बाबतीत खरंच असं वाटलं नाही.. तुझ्याविषयी आई बाबांनी सांगितलं, फोटो बघितला तेव्हापासून वाटलं तुला खूप आधीपासून ओळखतो आहे..”

 

निधी‌ जरा आश्चर्याने म्हणाली, “तुला माझ्या भूतकाळाविषयी काही प्रोब्लेम नाहीये? आय वॉज इन रिलेशनशिप…वॉज डिपली इन लव्ह विथ समवन..”

 

सुजय – “आय नो…आय डोन्ट हॅव एनी प्रोब्लेम…प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच कुणीतरी खास.. मलाही अशीच एक मुलगी खूप आवडायची पण तिला मी हे सांगण्यापूर्वी माझ्याच एका मित्राने तिला प्रपोज केले, ते‌ दोघेही आनंदात आहे.. त्यांना तर हेही माहीत नाही की माझ्या मनात असं काही होतं..प्रेम काही ठरवून करत नाही आपण आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे सुद्धा आयुष्यभर एकत्र असतील असही नसतं..कधी तर प्रेमविवाह झाल्यावर पटत नाही म्हणून वेगळे होतात मग सगळे म्हणतात प्रेमविवाह केला की असंच होतं वगैरे…असो..तू विश्वासाने घरी सांगितलं, आम्हालाही कल्पना दिली पण सगळे असं करतात असं नाही.. प्रेम केलं म्हणजे एखादा गुन्हा केला असं नाही ना.. भूतकाळ होता..”

 

निधी त्याचं बोलणं ऐकून स्तब्ध झाली. सुजय बोलला ते खरंच विचार करण्यासारखं आहे..इतका प्रॅक्टिकल विचार आपण का करत नाही असंही तिला वाटलं.

 

निधी – “अजून एक सांगायचं आहे, आम्ही फक्त प्रेमात नव्हतो तर एकमेकांच्या खूप जवळ सुद्धा आलो होतो…”

 

सुजय- “हम्म.. याविषयी मी एकच सांगेन जर आपलं लग्न झालं तर त्यानंतर आपल्यात या गोष्टी घडताना तुला आधीच्या आठवणींचा त्रास होणार नसेल तर मला काहीच हरकत नाही. सॉरी..जरा जास्त बोलून गेलो असेल तर माफ कर पण मी खरंच तुला तुझ्या भूतकाळाविषयी कधीच काही विचारणार नाही..माझी एकच अपेक्षा असेल की तू सुद्धा वर्तमान आणि भविष्य याचाच विचार करावा..तरीही घडलेल्या गोष्टींमुळे कधी काही त्रास झालाच तर बिनधास्त मन मोकळं करावं पण त्यात गुंतून राहू नये. बाकी निर्णय तुझ्यावर अवलंबून आहे..”

 

निधी – “इतका कसा काय समजुतदार आहेस तू… म्हणजे मला इंप्रेस करायला तर म्हणाला नाही ना..”

 

सुजय जरा हसत म्हणाला, “नो..नो..मुळीच नाही.. इंप्रेस करायला नाही..मी फक्त माझी अपेक्षा सांगितली…बाय द वे, तुझा स्पष्टवक्तेपणा आवडला मला..मी सुद्धा असाच आहे म्हणजे जे वाटतं ते बोलून मोकळं व्हायचं..उगाच मनात साठवून ठेवत कुढत जगायचं नाही अशा विचारांचा..”

 

निधी – “मलाही आवडला तुला‌ असा बिनधास्त स्वभाव…पण खरं सांगू मला ना अजूनही भिती वाटते रिलेशनशिप, प्रेम या गोष्टींची… ”

 

सुजय जरा मस्करी करत म्हणाला  ” आता तर मलाही भिती वाटायला लागली आहे तुझी..मी तुला बघतक्षणी पसंत केले.. मला हवी अगदी तशीच तू आहेस पण आता तू मला नकार‌ दिला तर माझं काय हा विचार मात्र केलाच नव्हता मी..आता तसा विचार मनात आला तरी भिती वाटत आहे..”

 

त्यावर दोघेही हसले.

 

निधी – “मला‌ जरा वेळ दे विचार करायला… खरं सांगू तुझ्यात नकार देण्यासारखं काहीच नाही पण तरीही मला जरा वेळ हवा आहे..”

 

सुजय – “हो‌ नक्कीच..मी तुला लगेच होकार, नकार दे असं म्हणतच नाहीये.. आणि हो, कुणाच्याही दडपणाखाली येऊन निर्णय घेऊ नकोस..मला तू आवडली तेव्हा तुला मी आवडायला पाहिजेच असंही नाही..तुझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुला आहे..सॉरी मी फार लेक्चर वगैरे दिलं असेल तर..”

 

निधी हसतच म्हणाली, “थ्यॅंक्यू…”

 

 

 

क्रमशः

 

 

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

 

© अश्विनी कपाळे गोळे

 

Comments are closed