कृष्ण प्रेमी राधिका

Love Stories

नदी किनारी असलेल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातील मंदिरात राधा कृष्णाच्या मुर्तीवर कोवळी सुर्य किरणे पडल्याने ती मुर्ती अजूनच उठून दिसत होती. एक‌ वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर भासत होते.

सकाळचा मंद गार वारा, पक्षांची किलबिल आणि मंदिरच्या परिसरातालील प्रसन्न वातावरण आणि अधूनमधून होणारा घंटानाद अनुभवत राधिकाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक वेगळीच छटा उमटली होती…आजचा दिवसही तिच्यासाठी खास होता. या खास दिवशी मैत्रीणी सोबत ती सकाळीच मंदिरात आली. मंदिराच्या पायर्‍या चढताना श्रीकृष्णाच्या मुर्तीवर पडलेली तिची नजर तिथेच स्थिरावली. अधूनमधून मंदिरात येणे जाणे व्हायचेच पण दरवर्षी वाढदिवसाला ती या मंदिरात न चुकता यायची तसंच आजही आलेली. डोळे मिटून हात जोडून काही क्षण शांतपणे ती तशीच उभी त्या मुर्ती पुढे उभी राहून ती म्हणाली,
“देवा, न मागता सगळं सुख माझ्या पदरात भरभरून दिलंय तू..असाच आशिर्वाद कायम पाठीशी असू दे..”

गावच्या प्रतिष्ठित अन् श्रीमंत घराणे म्हणजेच सरदेसाई कुटुंब. गावाच्या जवळपासच त्यांची मोठी फॅक्टरी, भरपूर सुपीक शेतजमीन, गावाच्या मधोमध छान टुमदार वाडा, घरकामाला नोकरचाकर. आजी आजोबा, आई बाबा, काका काकू आणि चार भावंडे त्यात ही एकटीच लाडाची लेक .
सरदेसाईंची राधिका दिसायला सुंदर, हुशार, उंच सुडौल बांधा, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे‌ तेज..
कॉमर्स ग्रॅज्युएशन पूर्ण करून ती घरच्या फॅक्टरीत अकाउंट सेक्शन सांभाळायला मदत करायची.

एकत्र कुटुंबात वाढलेली, घरी धार्मिक वातावरण, सगळ्यांच्याच विचारात, राहण्यात अगदी साधेपणा त्यामुळे आपसूकच तिच्यातही तो गुण होताच. बालपणी आजीकडून श्रीकृष्णाच्या बाललीला ऐकून तिची श्रीकृष्णावर श्रद्धा जडली होती.

राधिका ने एक पेढ्याचा पुडा प्रसादासाठी पुजारी काकांच्या हाती दिला.
तो त्यांनी देवापुढे ठेवून पाणी फिरवत त्यातला एक पेढा राधिकाच्या हातावर आणि एक पेढा तिच्या सोबत असलेल्या श्वेताच्या हातात देत म्हणाले, ” तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा..”
” धन्यवाद काका..” म्हणत राधिका परत जायला मागे फिरली आणि तिची नजर समोरून येणाऱ्या एका चेहऱ्यावर स्थिरावली.

त्याच्या चेहऱ्यावर अगदी तेच तेज होते जे सकाळच्या कोवळ्या किरणांमुळे श्रीकृष्णाच्या मुर्तीकडे बघून जाणवले होते. एकटक त्याला बघत राधिका पुढेपुढे जात होती.
“कोण आहे हा..किती तेज आहे ह्याच्या चेहऱ्यावर..अगदी‌ त्या श्रीकृष्णा सारखे..गावात नवा चेहरा वाटतोय…पण कुणी का असेना, मी का असं बघतेय त्याला..” असं ती स्वतःशीच हसत मनातच पुटपुटली.

त्याला बघतच ती मंदिरा बाहेर पडली पण त्याच्या चेहरा मात्र तिच्या डोळ्यांपुढे अजूनही स्पष्ट दिसत होता. तिने हळूच मागे वळून पाहिले तर त्याची पाठमोरी आकृती तिला दिसली. उंचपुरा,पिळदार शरीरयष्टी असलेला तो हात जोडून श्रीकृष्णा पुढे उभा होता.

राधिका घरी आली, सगळ्यांचा भरभरून आशीर्वाद घेऊन ती फॅक्टरी वर जायला निघाली.

“राधिका, अगं आज ते एका‌ नव्या कॉन्ट्रॅक्ट साठी काही लोकं येत आहेत आपल्या फॅक्टरी वर..मला आणि दादाला नेमकं एका कामासाठी बाहेर जावं लागेल.. दुपारपर्यंत येतो परत.. त्यापूर्वी ते आलेच तर जरा सांभाळून घे..तसे काका आहेतच मदतीला तुला..”  बाबांनी तिला सांगितले.

“हो बाबा..काही काळजी करू नका..” म्हणत राधिका फॅक्टरी वर आली. सगळे डॉक्युमेंटस् , रिपोर्ट वगैरे नीट आहे की नाही हे बघण्यात ती व्यस्त झाली तोच काही वेळाने कुणीतरी धावत येऊन म्हणाले,
“राधिका मॅडम, बाहेर कुणी साहेब लोकं आलेत..काका साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे त्यांच्या केबीन मध्ये अकाउंट रिपोर्ट ची फाईल घेऊन..” एक कर्मचारी राधिकाला सांगायला आला.

“हो तुम्ही व्हा पुढे मी आलेच..” म्हणत राधिकाने आधीच तयार ठेवलेली फाईल उचलली आणि ती काकांच्या केबिन मध्ये गेली.

तिथे जाऊन बघते तर काय कॉन्ट्रॅक्ट साठी आलेल्या दोघांपैकी एकजण म्हणजे तोच होता जो सकाळी मंदिराच्या आवारात तिला दिसला, कृष्ण रुपी चेहरा‌‌.

त्याला बघताच का कुणास ठाऊक पण ती क्षणभर जरा गोंधळली आणि कसंबसं चेहऱ्यावर स्मित करत “गूड मॉर्निंग” म्हणाली.

काकांनी ओळख करून देत फॅक्टरी विषयीची एकंदरीत माहिती त्या दोघांना दिली‌. राधिका मात्र नेहमी प्रमाणे कामात लक्षच लागत नव्हते. तिने अकाउंट रिपोर्ट दाखवत सगळं समजून सांगितले पण मन मात्र आज स्थिर नव्हते.

हा कोण आहे, ह्याला समोर बघून मनात का असं वाटतंय तिला कळत नव्हते.

“छान.. एकंदरीत खूप छान व्यवस्थापन आहे तुमच्या फॅक्टरी चे..” तो बोलला आणि ते ऐकून तिने त्याला थ्यॅंक्यू म्हणत त्यांच्याकडे बघितले आणि दोघांची नजरानजर झाली.

“तुमचं गाव सुद्धा खूप छान आहे.. निसर्गरम्य..फार प्रसन्न वातावरण आहे..” तो पुढे बोलला.

“हो..तुम्ही आहात ना आज इकडे, आमच्या शेतावर सुद्धा जाऊ.. आधुनिक प्रकाराने छान मेंटेन केलेली शेती आहे..आवडेल तुम्हाला..” काका म्हणाले.

” हो नक्कीच..” तो‌ बोलला.

काकांनी ह्याचे काय बरं नाव सांगितले राधिका मनातच विचार करत बोलली‌‌. खरं तर त्याला अचानक असं समोर बघून पुढचे काही क्षण कोण काय बोलत होते तिचे लक्षच लागले नव्हते त्यामुळे त्याचे नावही तिला अजून कळाले नव्हते.

“राधिका, तू आणि चेतन जातेस का सरांच्या सोबत शेती दाखवायला? ” काकांनी राधिकाला विचारले.

“हो काका.‌..जाईन मी..”- राधिका.

चेतन म्हणजेच राधिकाचा भाऊ..काकांचा मुलगा..तोही शिक्षण करतच फॅक्टरीच्या कामात मदत करायला यायचा.
चेतनने ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितली आणि नाश्ता , चहा वगैरे करून चौघेही‌ शेतीकडे जायला‌ निघाले.

वाटेतच राधिका चेतनला हळूच म्हणाली, “चेतू, ह्यांचे नाव विचार ना..मला लक्षातच नाहीये..”

चेतन ते ऐकून जरा हसला आणि म्हणाला, “सर.. तुमचे नाव काय..मी जरा चहा नाश्ता अरेंज करण्यासाठी बाहेर होतो त्यामुळे आपला परिचय नीट झाला नाही..” चेतन.

“अरे सर नको म्हणूस..नावानेच बोल..मी विजय आणि हा माझा सहकारी अनीश..”

ते ऐकताच राधिका स्वतःला बोलत म्हणाली ,” अच्छा तर ह्याचे नाव अनीश.. आणि अनीश हे तर कृष्णाचेच एक नाव आहे..”

चौघेही शेतावर पोहोचले. राधिका जरा गप्प गप्प होती. ते बघून चेतन‌ म्हणाला, “तायडे..आज काय इतकी शांत आहेस..कशाचा विचार करतेय..”

“कुठे काय..काही तर नाही..” म्हणत तिने वेळ मारली पण तिचे मन मात्र कुठेतरी हरवले होते.

चेतन शेती विषयी माहिती सांगत पुढे जात होता. विजय , अनीश आणि राधिका पाठोपाठ होते‌.

“फार छान शेती आहे तुमची..वाह, तिकडे डोंगर सुद्धा आहे..काय मस्त वाटतंय इथे..” अनीश राधिका कडे बघत म्हणाला.

” हो… इथलं वातावरण खरंच खूप छान आहे.. गावाच्या दुसऱ्या बाजूला नदी आहे, नदीकिनारी कृष्णाचे मंदिर.. सकाळी तुम्ही गेलात ना तिकडे..तेच..” राधिका अचानक बोलून गेली.

“तुम्हाला कसं कळालं मी तिकडे गेलेलो.. म्हणजे माझा पाठलाग करत होतात की काय…पण आपण तर त्यापूर्वी भेटलो नव्हतो मग तरी कसं कळालं तुम्हाला…” अनीश राधिकाला म्हणाला तोच राधिका पार गोंधळून गेली.

“ते…मी… सकाळी आलेले ना तिकडे तेव्हा बघितले तुम्हाला… म्हणजे नवीन चेहरा..” राधिका कसंबसं बोलू लागली.

” विजयला पण बघितले असेल ना..” अनीश पुढे बोलला.

“हं…विजय…हा ..हो बहुतेक ते पण होते न सोबत..” राधिका परत गोंधळलेल्या अवस्थेत बोलली.

अनीशने राधिकाच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव अलगद टिपले आणि गालातच हसत त्याने तिला बघितले‌.

तिचा नितळ प्रफुल्लित चेहरा, साधेसे आणि नीट राहणीमान..उंच सरळ बांधा..तो क्षणभर तिला बघतच राहिला.

बराच वेळ शेतावर फिरून चौघेही राधिकाच्या घरी जायला निघाले. वाटेतच चेतन म्हणाला,
“जेवणाची सगळी तयारी आज घरीच केलेली आहे..आज राधा ताईचा वाढदिवस सुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा आलात त्यानिमित्ताने खास बेत आहे आज..”

“ओह आज तुमचा वाढदिवस आहे … वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला..” विजय म्हणाला.

“वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा राधिका…”- अनीश‌.

“थ्यॅंकयू ..” म्हणत राधिकाने अनीश कडे बघितले आणि नजरानजर होताच ती जरा लाजली. तिचे लाजरे भाव अनीश एकटक बघतच राहिला.

विजयने अचानक एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली आणि पाच मिनिटांत आलोच म्हणत ते बाजुला काहीतरी शोधत बाहेर पडले.. परत येताच अनीश आणि विजय राधिकाच्या हातात मिठाई देत म्हणाले , “तुमच्या मार्केट मध्ये केक शॉप काही दिसले नाही बुवा.. म्हणून वाढदिवस निमित्त मी गोड भेट समजा आमच्या कडून..”

वाड्यावर येताच दोघेही फ्रेश होऊन जेवायला बसले , सोबतच राधिकाच्या घरची काही मंडळी होतीच. जेवणात पारंपरिक पद्धतीचा छान गोडाधोडाचा बेत होता. दोघांनीही जेवणाचा छान  आनंद घेतला तितक्यात कामानिमित्त बाहेर गेलेलै बाब सुद्धा परत आले.
“आता जरा‌ वेळ आराम करा..तीन वाजता वगैरे फॅक्टरी वर जाऊ आणि मग पुढची मीटिंग करू..” बाबा त्यांना म्हणाले.

“हो..आता इतकं जेवण झाल्यावर जरा आराम करावाच लागेल..” विजय त्यावर बोलला.

चेतनने दोघांना आरामाची खोली दाखवली. घरात इतके लोकं, नोकर चाकर ह्या सगळ्यांची नजर चुकवत अनीशने राधिकाला एकांतात गाठले आणि एका पानात गुंडाळून आणलेला सुगंधित मोगर्‍याचा गजरा तिला देत म्हणाला, “वाढदिवसाची ही छोटीशी भेट..”

गजर्‍याचा पुडा हातात देत अनीश खोलीत निघून गेला. राधिकाच्या चेहऱ्यावर मात्र नकळत आनंदाची लहर पसरली. तिने हळूच त्या गजर्‍याचा सु़गंध घेत तिच्या काळ्याभोर केसांत तो गजरा माळला.

कॉन्ट्रॅक्ट विषयी सगळी प्रोसेस झाल्यावर दुसऱ्या दिवशी ते दोघेही परत जाणार होते..आता परत अनीश भेटणार की नाही हेही तिला माहीत नव्हते
पण अनीश विषयी आपण इतका विचार का करतोय हे मात्र राधिकाला कळतच नव्हते.

ठरल्या प्रमाणे काम संपवून दोघेही परत जायला निघाले. राधिकाच्या चेहऱ्यावर जरा निराशा जाणवत होती. अनीशला ते कळून चुकले होते.

“भेटू लवकरच…” असं तो जाताना बोलला‌ पण तो असं का म्हणाला हे राधिका साठी एक कोडं होतं.

नेहमी प्रमाणे रोजचे रुटीन सुरू होते पण राधिका मात्र अनीशला भेटल्या क्षणापासून जरा हरवल्या सारखी वाटत होती. त्याचा तो प्रथमदर्शनी नजरेस पडलेला चेहरा, ते तेज तिला स्पष्ट आठवत होते…

पुढचे काही दिवस असेच त्याच्या विचारात , त्या कमी क्षणांच्या सहवासाच्या आठवणीत गेले. एक दिवस बाबा तिला म्हणाले, ” राधिका , तुझ्यासाठी जे स्थळ आले होते न.. त्यांना तुला‌ बघायला यायचं आहे..उद्या आले तर चालेल का..असा फोन आलेला..मला वाटते भेटून घ्यायला हरकत नाही..तू तशी उद्या तयारीत रहा..”

लग्नासाठी स्थळ आणि ते बघायला येणार म्हंटल्यावर राधिकाला जरा दडपण आले‌.‌..तिच्या मनात अनीश घर करून बसला होता..पण असं एका दिवसात त्याच्यात मी गुंतले असं कुणाला आणि कसं सांगाणार‌.. तेव्हा मनाला आवर घालत उद्यासाठी तयार होण्याशिवाय पर्याय नाही हा विचार करत राधिकाने मान हलवली.

रात्रभर राधिकाच्या मनात अनीशचेच विचार आणि डोळ्यापुढे त्याचाच चेहरा दिसत होता. असं आधी कधीच कुणाविषयी वाटलं नाही.. ह्याच्यात असं काय आहे..त्याची काही माहिती नसताना का असा माझ्या मनात डोकावतो आहे हा..ह्या विचाराने राधिका अस्वस्थ झाली. त्याच विचारात तिचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी घरात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होती. राधिकाने मनातल्या विचारांना आवरत दिर्घ श्वास घेतला आणि दारात छानशी रांगोळी रेखाटली. पाहुणे तासाभरात येतील असं बाबांनी सांगितल्यावर तयार व्हायला ती खोलीत आली आणि तिथे येताच तिला मोगर्‍याच्या गजर्‍याचा सु़गंध आला. टेबलावर ठेवलेला तो गजरा हातात घेऊन तिने डोळे मिटून त्याचा सुगंध अनुभवला तोच त्या दिवशी लपून छपून अनीशने गजरा दिलेला तो क्षण आठवत अनीशचा चेहरा परत तिच्या डोळ्यांपुढे आला‌.

गजरा बाजुला ठेवून तिने कपाट उघडले, मोतिया रंगाची लाल सोनेरी काठांची साडी नेसली,  त्यावर नाजूक मोत्यांचा हार, कानात कुड्या, हातात मोत्याच्या बांगड्या, कपाळावर इवलीशी लालचुटुक टिकली…राधिका छान तयार झाली. चेहऱ्यावर मात्र अजूनही जरा निरशेची लहर पसरली होती.

एव्हाना बाहेर पाहुणे आले होते. राधिकने खोलीच्या खिडकीतून हळूच डोकावून पाहिले पण सगळीच जेष्ठ मंडळी तिच्या नजरेस पडली‌.
काही वेळाने आई आता काकू तिला बाहेर घेऊन जायला आल्या. त्यांच्या सोबत ती बाहेर पाहुण्यांसमोर गेली. सगळ्यांची ओळख वगैरे झाल्यावर मुलाचे वडील म्हणाले. जरा एक अर्जंट काम असल्याने मुलाला उशीर झाला…तो बस पोहोचतच आहे..तितक्यात दारातून आवाज आला..

“नमस्कार…मी आत येऊ का..?”

त्या ओळखीच्या आवाजाने राधिकाने पटकन पुढे बघितले तर तो अनीश होता.

त्याला बघून राधिका पार गोंधळून गेली. हा आता इथे कसा… नक्की काय चाललंय तिला कळत नव्हते.

त्याला बघून मुलाचे बाबा म्हणाले…” अनीश, आलास..ये ना..आम्ही वाटच बघत होतो..”

त्याला बघून खरं तर राधिकाच्या घरी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

” अनीश .. म्हणजे त्या दिवशी कामासाठी आलेले तेच..” काका त्याला बघत म्हणाले.

“खरं तर मला माफ करा…मी त्या दिवशी सांगितले नाही..पण मला जेव्हा कळाले की माझ्यासाठी ज्या मुलीचे स्थळ आले आहे तिथेच माझा मित्र विजय कामानिमित्त जातोय.. योगायोगाने तिच्याच घरच्या फॅक्टरीच्या कामासाठी..तेव्हा मी मुद्दाम त्याच्या  सोबत आलेलो..तिला अप्रत्यक्षपणे भेटता यावे म्हणून… कारण एका भेटीत तेही काही क्षण बघून लग्नाचा निर्णय घेणे खरंच कठीण आहे ना…पण त्या दिवशी मी आलो, तुम्हा सगळ्यांना, राधिकाला भेटलो…ह्या सगळ्यामुळे मला लग्नाचा निर्णय कदाचित सोपे होईल हाच उद्देश होता…तुम्हाला हे ऐकून राग येऊ शकतो माझा.. त्याबद्दल खरंच सॉरी‌‌…” अनीश आत येताच बोलला.

ते ऐकताच पुढचे काही क्षण सगळेच शांत झाले‌. राधिकाच्या चेहऱ्यावरचे भाव जरा बदलले. अनीशच्या वागण्याचा राग यावा की ज्याच्या विचाराने मी अस्वस्थ झालेली तोच अशाप्रकारे समोर आल्यावर आनंदी व्हावे हे तिला कळत नव्हते.

“अनीश अरे काय हे…मला तरी सांगायचे ना.. असं वागल्या वर आता पुढे काय बोलावं आम्ही..” अनीशचे बाबा त्याला बोलले.

“खरं तर अनीशचे म्हणणे बरोबरच आहे.. हल्लीच्या काळात मुलांना त्यांचा जोडीदार निवडताना त्यांच्या अपेक्षा, इच्छा आकांक्षा लक्षात घ्यायला हवे…अनीश तू बस ना..तुझा हेतू वाईट नव्हता…” राधिकाचे बाबा पुढे म्हणाले.

“धन्यवाद काका.. मला समजून घेतले तुम्ही.‌.आणि बाबा खरंच सॉरी…”-  अनीश.

“बरं आता ते जाऊ द्या.. तुम्ही दोघे एकमेकांना भेटून बोलून घ्या..त्या दिवशी कामानिमित्त भेटलात..आता लग्नाच्या दृष्टीने जरा भेटा.. तुम्हा दोघांच्या निर्णयावर पुढचं पाऊल ठरवू आपण..काय म्हणता देशमुख साहेब..” राधिकाचे बाबा अनीशच्या वडिलांना म्हणाले.

“हो नक्कीच..” अनीशचे बाबा त्यावर म्हणाले.

अनीश आत राधिका बाजूच्या खोलीत एकमेकांशी बोलायला जाऊन बसले. राधिकाला आता काय बोलावं काहीच कळेना… एखादं स्वप्न बघते आहे की काय अशी काहीशी तिची अवस्था झालेली. तिचा गोंधळलेला चेहरा बघून अनीश म्हणाला, “राधिका, गजरा माळायला विसरलीस..?”

“गजरा…तुला कसं माहीत.. म्हणजे माझ्या खोलीत तो गजरा..?” राधिका केसांना हात लावत बोलली.

“हो..चेतनच्या मदतीने मीच तो गजरा पाठवला होता तुझ्यासाठी..” अनीश.

ते ऐकताच राधिका लाजली आणि म्हणाली, ” हो..खरंच विसरले मी गजरा माळायला…”

“कदाचित त्याच्या सुगंधात हरवली असणार ना माझ्या आठवणीत आणि मग विसरली..” अनीश.

“तुला कसं कळालं…?” राधिका आश्चर्याने म्हणाली.

मी त्या दिवशीच तुझे भाव टिपले… मंदिरात खरं तर योगायोगाने भेट झाली आपली पण तू मंदिरात मला बघितले..एकटक बघत होतीस..अगदी वळून सुद्धा बघितले….माझेही लक्ष होते तुझ्याकडे पण मी तसे भासवले नव्हते तुला..तुझा फोटो मी आधी बघितला होता त्यामुळे मी ओळखले होते तुला… आणि खरं सांगायचं तर मंदिरात पहिल्यांदा तुला बघितले आणि त्या क्षणीच तू मला आवडली..

त्याच्या बोलण्याने राधिका लाजून चूर झाली. तिचे अंतर्मन आनंदाने बहरून आले.. त्याच्या नजरेला नजर मिळवत ती म्हणाली, ” माझी श्रीकृष्णावर खूप श्रद्धा आहे..त्या दिवशी तुम्हाला मंदिरात बघितले तेव्हा अगदी त्या कृष्णासारखे तेज तुमच्या चेहऱ्यावर जाणवले मला..तुम्ही कोण आहात माहित नसतानाही माझे मन नकळत तुमच्या विचारात हरवले… यापूर्वी कधीच असे वाटले नव्हते जे भाव माझ्या मनाला तुम्हाला पहिल्या बघताच जाणवले… आणि योगायोग बघा ना.
मी राधिका आणि तुम्ही अनीश… कृष्णाचे एक नाव..” राधिका अचानक सगळं बोलून गेली.

“कदाचित तुझ्या मनातील श्रद्धेमुळे श्रीकृष्णाने आपली भेट त्याच्याच साक्षीने घडवून आणली..”- अनीश.

ते ऐकताच राधिकाच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. दोघेही क्षणभर एकमेकांच्या नजरेत हरवले.

“मग माझ्या विषयी काहीही माहिती नसताना मी जोडीदार म्हणून आवडेल का तुला…?” अनीश‌.

“बाबा सगळी माहिती काढल्याशिवाय माझ्यासाठी पाहुण्यांना घरी बोलावणार नाही ह्याची खात्री आहे मला.. आणि आपली भेट घडवून आणणार्‍या श्रीकृष्णावरही विश्वास आहे माझा..” राधिका.

ते ऐकताच अनीशने हळूच खिशातून मोगर्‍याचा गजर्‍याचा पुडा काढला राधिकाच्या केसांवर स्वतःच्या हाताने गजरा माळत तो म्हणाला, ” आजही इकडे येण्यापूर्वी त्याच मंदिरात जाऊन आलो मी.. आयुष्यभर तुझी साथ मला मिळू दे हीच प्रार्थना केली आणि तिथूनच हा गजरा खास तुझ्यासाठी आणलाय…आपल्या भेटीची , प्रेमाच्या वाटेवर पाऊल टाकतानाची पहिली भेट म्हणून..”

अनीशच्या येण्याने राधिका मनोमन सुखावली‌.
त्या दिवशी जाताना “लवकरच भेटू..” असं अनीश का म्हणाला याचा अर्थ आज तिला कळाला.

“प्रथमदर्शनी पाहताच मनात घर करून बसलेल्या अनीशला आयुष्यात आणले आणि प्रेमरूपी सुखाचा वर्षाव माझ्या आयुष्यात केलास त्याबद्दल खरंच खूप आभार…” राधिका डोळे मिटून आनंदी मनाने श्रीकृष्णाला म्हणाली.

दोघांची ही प्रेमकथा तुम्हाला कशी‌ वाटली ते जरूर कळवा.

©® अश्विनी कपाळे -गोळे

Tags:

Comments are closed