Day: September 17, 2019

  • नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘

        शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्‍याचा डबा बनवून मुलांना‌ तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..”

        धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्‍याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी रात्री भरून ठेवता जा बरं दोघेही. मुलांचं आवरून त्यांना बस मध्ये बसवून शुभदा आली तसच नवरोबा म्हणाले, “अगं काल झोपण्यापूर्वी बघत बसलेलो ती फाइल कुठे आहे माझी..इथेच तर होती..” शुभदा जाऊन बघते तर उशीखाली फाइल सापडली. ती त्याच्या हातात फाइल देत म्हणाली, ” रात्री आवरून ठेवायला काय होते हो..अस सकाळी सकाळी गडबडीत हे कुठेय ते कुठेय…मी काय काय बघायचं..समोरची उशी सुद्धा उचलून बघत नाही…नुसता वैताग माझ्या जीवाला..”

    त्यावर महाशय तिला म्हणाले, “अगं आता मी ऑफिसला गेल्यावर तुला आरामचं असतो ना..मग सकाळी जरा धावपळ झाली तर इतकं काय चिडायचं..”

    आराम आणि मला…शुभदा‌ ते ऐकताच स्वतःशीच हसत पुटपुटली, “दिवसभर किती काम पुरतात हे ह्यांना कसं कळणार ना… वरून म्हणायला मोकळे की तू आता आधी सारखी उत्साही राहीली नाहीस… हसतखेळत वावरत नाहीस..माझं मलाच ठाऊक किती दमून जाते मी सगळं आवरता आवरता..”

    शेवटी सगळं विसरून हसतमुखाने नवरोबांना हातात‌ डबा देत बाय केले आणि मनात काही तरी विचार करत आरशासमोर जाऊन ती उभी राहिली.
    जरा वेळ स्वतः ला आरश्यात निरखून पाहिले तेव्हा तिला जाणवलं की पूर्वी काळ्याभोर भुरभुरणार्‍या केसांमुळे पहिल्या भेटीतच आपल्यावर भाळलेले आपले पती देव आता हा जरा पांढर्‍या झालेल्या विस्कटलेल्या केसांचा अंबाडा बघून काय विचार करत असणार.
    लग्न झाल्यावर मला बघताच तुझ्यापुढे चंद्र फिका म्हणणारा माझा हा नवरा माझ्या खोल गेलेल्या डोळ्याभोवती आलेले काळसर वर्तुळ बघून काय कौतुक करणार.
    मुलं झाल्यापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही. नवरा वेळोवेळी सांगायचा, स्वतः कडे जरा लक्ष दे, स्वतः साठी वेळ काढ, केसांना कलर कर, पार्लर मध्ये जाऊन फेशियल कर पण मी मात्र त्यांच्यावर उलट चिडचिड करायची. शेवटी त्याने म्हणणे बंद केले. वरून मीच त्याला म्हणायला लागली की तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही… पूर्वीसारखा कौतुक तर कित्येक दिवसांपासून ऐकलंच नाही त्याच्या तोंडून. ह्यासाठी दोष त्याला देत आले पण चूक माझीही आहेच ना.

      सगळ्यांची जबाबदारी सांभाळत स्वतः कडे दुर्लक्ष करत गेले मी. आता तर मुलंही मोठी झालीत. त्यांचं ते सहज करू शकतात.

    काही तरी मनात ठरवून तिने फोन हातात घेतला, पार्लर वालीला घरी बोलावले. मस्त पैकी फेशियल करून केसांना कलर करवून घेतला.
    सुटलेल्या पोटावरून हात फिरवत लगेच जवळच्या योगा क्लास ची चौकशी करत क्लास जॉइन करण्याचे ठरविले.

    मुले घरी आली तसंच आईचं जरा वेगळं रूप त्यांना जाणवलं. नेहमी सगळं हातात देणारी आई आज आपलं आपल्याला सगळं आवरायला सांगते बघताच मुलेही जरा गोंधळली पण मुकाट्याने आपापली कामे आवरून दोघेही मुले डायनिंग टेबल वर येऊन बसत आईच्या गोड बदलाचे निरीक्षण करत होती.

    मुलगा आईला म्हणाला , “आई आज काय खास… हेअर कलर छान दिसतोय बरं का…”
    तिनेही थॅंक्यू म्हणत गोड स्माइल दिली आणि म्हणाली, ” आता तुम्ही दोघेही मोठे झालात की नाही..मग मला‌ जरा माझ्यासाठी वेळ काढायला हवा ना..नाही तर मग तुम्हाला मित्र मैत्रिणी विचारातील अरे ही तुझी आई की आजी…”
    त्यावर तिघेही खिदिखिदी हसले आणि आईने समोर ठेवलेले रुचकर सॅंडवीच दोघांनीही फस्त केले.

      आता हळूहळू शुभदाने दोन्ही मुलांना स्वतः ची लहानसहान कामे स्वतः करण्याची सवय लावली. त्यामुळे जरा का होईना तिची तारांबळ उडणे कमी झाले. घराची जबाबदारी सांभाळत शक्य तितके स्वतः साठी वेळ काढत ती स्वतः कडे लक्ष द्यायला लागली. सकाळी मुलांना शाळेच्या बस मध्ये बसवून नवर्‍याचे आवरून दिले की नियमीत योगा करणे, वेळेत नाश्ता , जेवण सगळं कसं तिने ठरविल्याप्रमाणे सुरू केले. त्यामुळे तिची चिडचिड बरीच कमी झाली. शुभदाच्या पती राजांना तिच्यातला हा बदल खूप आवडला. पूर्वी ज्या शुभदाच्या प्रेमात पडलो ती शुभदा आता नव्याने त्याच्या आयुष्यात परतली होती. जबाबदारीच्या ओझ्याखाली, मुलांच्या संगोपनात अडकल्याने दोघांनाही एकमेकांसाठी खास असा काही वेळच मिळत नव्हता, त्यामुळे नात्यात एक दुरावा दोघांनाही जाणवत होता पण आता शुभदा मधल्या तिच्यातल्या ‘ ती ‘ ने नव्याने जन्म घेत हा दुरावा‌ दूर केला. दोघा राजा राणीचे नाते नव्याने बहरत गेले.

      खरंच प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो. घरदार, मुलंबाळं, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होत जाते. मग तिची होणारी चिडचिड ही सहाजिकच आहे, ही चिडचिड व्हायला मग कुठलेही लहानसहान कारण पुरेसे असते. नवरोबांना वाटते बायको आता पूर्वी सारखी राहीली नाही तर बायकोला वाटतो नवरोबा आता बदलले पण सत्य हे आहे की जबाबदारी सांभाळत परिस्थिती बदलली असते. मग छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड, वादावादी सुरू.
    अशा या संसाराच्या वाटेवर शक्य तो वेळ स्वतः साठी काढत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, एकमेकांना शक्य तेव्हा वेळ दिला तर नात्यातला गोडवा वाढतच जातो.

      चला तर मग आपल्यातल्या ‘ मी ‘ ला शोधून स्वतः साठी वेळ काढा आणि हसतखेळत आयुष्य जगा.?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तू दुर्गा…तू रणरागिणी… ( एक प्रेरणादायी सत्यकथा )

    आरती दिसायला साधारण, मध्यम बांधा, सावळा वर्ण, अभ्यासात हुशार, मनमिळाऊ स्वभावाची. वडील लहानपणीच देवाघरी गेले त्यामुळे आई आणि दोन मोठ्या भावांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली.
    दोन्ही भाऊ नोकरीला लागले तसेच योग्य स्थळ बघून आईने दोन्ही मुलांचे लग्न आटोपले. दोघेही नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात‌, आपापल्या संसारात व्यस्त. त्यावेळी आरती कॉलेजमध्ये होती. दोन्ही भाऊ आपापल्या संसारात गुंतल्याने आई आणि आरती दोघींचेच विश्व. दिवाळीच्या सुट्टीत चार दिवस पाहुणे म्हणून भाऊ, भावजया, भाचे कंपनी यायची आणि पुढे वर्षभर त्यांच्या आठवणी मनात साठवून जगायचं असंच काहीसं झालं होतं आरतीच्या आईचं.

    मुळात शांत स्वभाव त्यामुळे मुला सुनांवर ओझे नको म्हणून त्या काही त्यांना कुठल्याच बाबतीत काही बोलेना. बाबांची पेन्शन शिवाय दादांच्या महिन्याला येणार्‍या पॉकेट मनी मधून दोघी मायलेकी घरखर्च करायच्या. त्यातही वहिनीच्या लपून छपून दादा पैसे पाठवतो असं कळाल्यावर तर आरतीला अजूनच वाईट वाटे.

    आता आरती वयात आली होती आईला वाटे आपल्या डोळ्यासमोर पोरीचे हात पिवळे झाले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळं. त्यांनी आरती जवळ तिच्या लग्नाविषयी बोलून पण दाखविले पण प्रत्येक वेळी तिचं उत्तर ठरलेलं, “मला नाही करायचं लग्न..तुला एकटीला सोडून मला नाही जायचं सासरी..”

    आपण सासरी गेलो तर आईचं कसं होणार या विचाराने लग्न न करण्याचा निश्चय आरतीने केला, कारण भाऊ भावजय आईला सोबत घेऊन जाणार नाही याची तिला एव्हाना खात्री पटली होती. इकडे आईला वाटे आपण आहोत तोपर्यंत ठिक पण आपण गेल्यावर आरती एकटी आयुष्य कसं जगणार? भाऊ भावजय आरतीला प्रेम देत तिला सांभाळणार की नाही? आरतीच्या लग्न न करण्याच्या निश्चयाने भाऊ सुद्धा तिला त्याविषयी फार काही आग्रह करत नसे.

    दोघीही आपापल्या हट्टाला चिकटून. आरतीला एक छोटीशी नोकरी मिळाली होती, नोकरी आणि आई असं तिचं विश्व बनलेलं. भराभर दिवस , वर्षे जात होते.
    अशातच एकदा आईची तब्येत खराब झाली आणि तिला कॅन्सर असल्याचे कळाले. आईचे उपचार सुरू असले तरी तिच्या जगण्याची शक्यता कमी आहे हे डॉक्टरांकडून सुरवातीलाच कळाले होते.

    आता तर आरतीने आपला निश्चय अजूनच पक्का केला. आईची सेवा करायची आणि ती हयात आहे तितके दिवस आनंदात घालवायचं असं ठरवलं. नोकरी सोडून आरतीने लहान मुलांच्या ट्युशन घ्यायला सुरुवात केली. घरीच ट्युशन घेताना आई कडेही लक्ष देता यायचे आणि थोडी फार कमाई सुद्धा व्हायची. भाऊ भावजय अधूनमधून भेटायला येत असे. आई म्हणायची आरती तू माझ्या डोळ्यांदेखत लग्न कर पण आरती काही मानत नव्हती. तू माझी काळजी करू नकोस म्हणत तीच आईची समजूत काढत होती.
    असेच कसंबसं एक वर्ष‌ गेलं आणि आई आरतीला सोडून कायमची निघून गेली.

    आई कुठल्याही क्षणी आपल्याला सोडून जाऊ शकते हे माहीत असले तरी ती गेल्यावर ते वास्तव स्विकारण्याची हिम्मत आरती मध्ये नव्हती. आईच्या जाण्याने ती पोरकी झाली होती, पूर्णपणे एकटी पडली होती, मनातून पार खचून गेली होती. आईच्या कितीतरी आठवणी तिच्या मनात जिवंत होत्या.
    आई गेल्यावर आरतीला मोठा भाऊ आग्रह करत सोबत घेऊन गेला पण भावाच्या संसारात आपली अडचण होतेय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवले. दोन भाऊ आहेत मग दुसर्‍यानेही बहिणीचा जरा भार उचलावा अशी भावजयीची प्रतिक्रिया कानावर पडताच आरतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या राहत्या घरी आईच्या आठवणीने एक एक क्षण कठीण म्हणून आरतीने होस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गावचे राहते घर भाड्याने दिले आणि पूर्वी नोकरीला होती त्या मालकाशी बोलून नोकरी परत मिळविली.

    आरती पूर्णपणे एकटी पडली होती. कधीतरी भाऊ भेटून जायचे, सोबत चल म्हणायचे पण तुमच्यावर भार नको मी इथेच बरी म्हणत ती आयुष्य जगत होती. असं खडतर आयुष्य जगताना पस्तीशीच्या उंबरठ्यावर असलेली आरती चाळीशी पलिकडची दिसायला लागली, स्वतः कडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. भाऊ म्हणायचे अजून वेळ गेलेली नाही, तू लग्न कर पण प्रेम, भावना सगळ्या गोष्टींचा विचार तिने कधी केलाच नव्हता आणि आता तर तिने मनातून सगळे भाव पुसून टाकले होते. तारूण्यात मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी काही तरी जाणवत असेलही पण जबाबदारी पुढे तिने ते कधी अनुभवण्याचा विचार केला नव्हताच.
    आई गेल्यावर एकटेपणाची भावना मनात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविण्याचा विचारही तिच्या मनात आलेला पण आई नेहमी सांगायची, ” मी गेल्यावर खचून जाऊ नकोस, तू दुर्गा आहेस, तूच रणरागिणी आहेस…”
    आईचे शब्द आठवून मनातल्या वाईट विचारांना लाथ मारत ती नव्याने जगायचा प्रयत्न करत होती. होस्टेलमध्ये बर्‍याच पिडीत महिला, शिकणाऱ्या अनाथ मुली होत्या. त्यांच्याकडे बघत आरती विचार करायची, ” आपल्या वयाच्या पस्तीशी पर्यंत का होईना पण आईचं प्रेम लाभलं.. दूर का असेना पण भाऊ म्हणायला भाऊ सुद्धा आहेत…कधी फोन वर चौकशी तर करतात.. इतरांच्या मानाने आपण सुखीचं आहोत..”
    कशीबशी मनाची समजूत काढत ती नोकरी करत आयुष्य जगत होती. गरजूंना शक्य ती मदत करत समाजसेवा करण्याचा निर्णय तिने घेतला आणि पुढचे आयुष्य असंच समाजसेवेत अर्पण करण्याचे मनोमन ठरविले.

    हा लेख सत्य परिस्थिती वर आधारित असून काही भाग काल्पनिक आहे.
    आरती सारखं आयुष्य जगणार्‍या स्त्रिया म्हणजे खरंच रणरागिणी आहेत.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    मी लिहीलेला हा लेख माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    नावाशिवाय लेख शेअर करणे हा कॉपीराइट भंग केल्याप्रकरणी गुन्हा ठरू शकतो.

    © अश्विनी कपाळे गोळे