ती : (सगळे कप्पे पुर्ण पणे भरून असलेल्या कपाटात बघून) अरे, मी आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही.तो : (गमतीच्या सुरात चिडवत) अगं इतकं काय त्यात, माझे कपडे घालून जा आॅफिसला.
ती : गप्प बस तू. खरंच अरे आॅफीसला घालायला कपडेच नाही मला.
तो : (आश्चर्याने कपाटात डोकावून) इतके तर आहेत, घाल ना काही तरी.
ती : तेच ते घालून कंटाळा आलाय रे. हा बघ टॉप, दोन वर्षांपूर्वी घेतलेला आपण..आठवतोय. हा ड्रेस आपल्या लग्नापूर्वीचा..हा तू आवडीने वाढदिवसाला भेट दिलेला, मला खूप आवडला म्हणून सारखाच घातला.. आणि हा…
तो : ( पुढे काही बोलण्याच्या आधी) अगं बस..बस…तू ह्यातला एखादा घाल आता. आपण घेऊ तुला नवीन ड्रेस.
ती : (बराच विचार करून एक ड्रेस हातात घेऊन) लग्नापूर्वी मी किती शॉपिंग करायची. आता तर काहीच नाही.
तो : अगं मग घे ना कपडे, मी कुठे नाही म्हणतो तुला.
ती: अरे सध्या वेळ तरी आहे का शाॅपींगला जायला. आॅफीसचे काम लवकर आटोपले की कधी एकदा घरी येते आणि बाळाला घेते असं होतं मला. कधी जाऊ शाॅपींगला.
विकेंडला तर गर्दी मध्ये कुठे जायला नको वाटते.
तो: आॅनलाइन शाॅपींग कर मग. इतकं काय त्यात. वेळ मिळाला की Myntra, Amazon ला बघ काय आवडेल ते घे बिंदास. पण आता लवकर आवर उशीर झाला आहे आपल्याला निघायला.
ती: ( मनात विचार करत) अरे हो, आॅनलाइन शाॅपींग तर कधीही करू शकते मी. मला आधी कसं नसेल सुचलं.
कितीही कपडे असेल तरीही आज काय बरं घालावे, माझ्या जवळ तर कपडेच नाही असा प्रश्र्न कित्येक स्त्रियांना नेहमीच पडतो. अशा क्वचितच स्त्रिया असतील ज्यांना कपड्यांची , वेगवेगळ्या चपलांची, दागिन्यांची आवड नसेल. त्यात मला कपड्यांचे फार वेड. सगळ्या प्रकारचे, विभिन्न रंगाचे कपडे आपल्या जवळ असावे म्हणून आधी पासूनच वाटते.
शाॅपींग माॅल मध्ये जाऊन एकाच ठिकाणी नवरा बायको मुलं, घरासाठी सगळी खरेदी करता येते त्यामुळे सगळीकडे शोधत फिरण्याचा त्रास वाचतो. पण शाॅपींग माॅल्स मुळे तर हल्ली सगळ्यांना ब्रॅंडेड वस्तूंचे एक वेड लागले आहे, माझंही असंच काहीसं. त्यात तिथल्या आकर्षक आॅफर आणि प्रत्येक वेळी नविन पॅटर्न वगेरे मुळे कधी नको असेल तरीही काहीतरी घ्यावे वाटतेच. ड्रेस काही वेळा घातला की त्याचा लवकरच कंटाळा येणार, तोच तो पॅटर्न पण बोअर होणार.
काही कपड्यांचे तर नशिब असे पण असते जे घेताना आवडले पण नंतर एक दोन वेळा घातल्यावर नको वाटते. साडी घालायला क्वचितच चान्स मिळाला तरी आपल्या जवळ छान छान साड्यांचे कलेक्शन मात्र असायलाच हवे, कधी वेळप्रसंगी मग साडी घालायचा योग आला की कसं जास्त विचार करायला लागत नाही.
आॅनलाइन शाॅपींग आणि त्यावरील आॅफर मुळे तर कधी नको असेल तरीही शाॅपींग केली जाते. मग एखादा नवीन ड्रेस घालून बाहेर गेल्यावर अगदी सेम ड्रेस कुणी घातलेला दिसला की मनात विचार येतो, हा ड्रेस, पॅटर्न जरा कॉमन झालंय, काही तरी वेगळा घेऊ. परत मग शाॅपींग सुरू. दसरा, दिवाळी, ख्रिसमस च्या आॅफरची तर बरेच जण वाट बघत असतात. आँनलाईन शाॅपींग मुळे गर्दीत, पावसात, लहान मुलांना घेऊन येण्या जाण्याचा वेळ, त्रास वाचतो त्यामुळे घरबसल्या खरेदी सोयीची वाटते. शिवाय आवडले नाहीच तर परत करता येतेच.
मुलांची खरेदी असो किंवा नवर्याची सोबत आपली थोडी का होईना पण खरेदी ठरलेलीच. मग कपाटात ठेवायला जागा कमी पडते पण प्रत्येक वेळी ड्रेस घालताना हा प्रश्र्न पडतोच की आज मी काय घालू, माझ्या जवळ कपडेच नाही.
तुमचही असंच काही होतं का नक्की शेअर करा कमेंट्स मध्ये.
– अश्विनी कपाळे गोळे