सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.
तापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.
आता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा, छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”
आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”
ते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “स्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”
सीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.
सायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”
या क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही.
सीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.
अमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.
दुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.
अमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.
तो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”
आज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच. शेवटी सासर आहे हे.. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..
सीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता
कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.
दुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.
आता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.
सासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. ?
तर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. ?
पटतंय ना….
मग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?
लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.
© अश्विनी कपाळे गोळे