संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच..
आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..”
होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता संजय. अजयची बडबड ऐकून त्यावर फारसं प्रत्युत्तर न देता गुपचूप तो ऐकून घेत होता. न राहवून काही वेळाने अजयने त्याला विचारले तेव्हा बराच वेळ काही नाही झालं म्हणणारा संजय शेवटी म्हणाला,”त्याच्यामुळे आज तुझ्या वहिनीचे आणि माझे भांडण झाले रे..नकोच तो मला आता आयुष्यात..म्हणजे डोक्याला ताप नसेल..”
अजयला मात्र काही कळालं नाही..”अरे..तो कोण.. कशामुळे भांडण झालं..नीट सांगशील का तू..”
संजय – “अरे तो रे.. मोबाईल.. त्याच्यामुळेच आमची जास्त भांडणे होतात..आज तर सकाळीच भांडण ?..नकोच मला मोबाईल..”
अजय जरा चक्रावून गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, “मोबाईलमुळे भांडणं..मला तू नीट सांग यार.. काय बोलतोय काही कळत नाही..”
संजय – “अरे, काल रात्री ही लवकर झोपली, मी आपला वेबसिरीज बघत बसलेलो मोबाईलवर..?हिने आवाज दिला असेल मधेच जाग आल्यावर..किती वेळ झालाय झोपा आता असं म्हणत , तर मला काही हेडफोन्स मुळे कळाल नाही.. झालं ना..मला सकाळी म्हणाली तुम्ही रात्री कुणाशी चाटींग करत होते.. माझ्याकडे लक्ष नव्हतं..मी किती आवाज दिले तरी चेहऱ्यावर हास्य आणून चाटींग करत होतात.. माझ्याशी बोलायला वेळ नसतो.. घरी आले की मोबाईलवर असता सारखे.. वरून हद्द म्हणजे आजपर्यंत माझा फोटो डिपी वर ठेवला नाही म्हणे तुम्ही.. फेसबुकवर टाकला नाही.. तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही.. नंतर तर चक्क संशय घेतला आणि म्हणाली, तुमची नक्कीच गर्लफ्रेंड आहे..तिला कळू नये तुमचं लग्न झालेलं म्हणून तुम्ही माझा फोटो लावत नाही डिपी ला..रडायला लागली राव स्वतःच संशय घेऊन..
समजून घ्यायला तयार नव्हती.. शेवटी तिचा माझा सोबतचा फोटो ठेवलाय व्हॉट्स ॲप’ला डिपी.. चूक नसताना सॉरी म्हणालो.. कशीबशी समजूत काढली आणि आलो ऑफिसला.”
हे सगळं ऐकून अजयला खूप हसू आलं..?? तो हसू आवरत म्हणाला,”डिपी न ठेवण्यावरून भांडण..?? काय रे..तू घाबरून ठेवला मग डिपी दोघांचा फोटो ??”
संजय – ” हसून घे.. तुझं लग्न झालं ना कि मग कळेल तुला.. अरे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर काहीतरी शायरी पोस्ट केलेली मी… एव्हाना विसरलो होतो.. मॅडम ने वाचली एकदा आणि मागेच लागली विचारायला की कुणासाठी लिहीलेली तुम्ही शायरी.. माझ्या आधी कुणी होती का वगैरे..मी सारखं डिपी बदल.. फोटो अपलोड करणार्यातला नाही रे.. जास्तच काय तर वेबसिरीज नाही तर गेम..किती सांगितलं हिला पण पटतच नाही..इतरांचे कपल फोटो, रोमॅंटिक स्टेटस बघितले की आमचं भांडण ठरलेलंच.”
अजयला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले.. मोबाईल मुळे संसारात इतके गैरसमज होतात याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.
तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना..पण खरं आहे हे.. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली “लग्नापासून एकदाही पतीने पत्नीचा फोटो डिपी न ठेवल्याने पत्नीने चक्क महिला सहायता कक्षाकडे पतीची तक्रार केली.” पोलिसांनाही ऐकून धक्काच बसला.. समुपदेशन करून दोघांची समजूत काढली गेली आणि पतीने व्हॉट्स ॲपवर पत्नी सोबतचा फोटो डिपी ठेवण्याचे मान्य केले तेव्हा दोघांमधला वाद मिटला. पोलिसांनी हेही सांगितले की हल्ली पती पत्नी यांच्यात जास्तीत जास्त वाद हे मोबाईल मुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींवरून संसाराच्या ब्रेकअप चे कारण हे मोबाईल असल्याने बरेचदा समुपदेशन करून वाद मिटतात तर कधी संशयावरून टोकाला जातात.
मुलांमधील मोबाईलचे वेड आणि त्यामुळे होणारे पालकांचे भांडण यांचंही बरंच प्रमाण आहे..पण आता पती पत्नी यांच्या संसारात मोबाईल, सोशल मीडिया मुळे ब्रेकअप होण्याची वेळ येते म्हणजे विचार करण्याजोगे आहे..
मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा असा अतिरेक करत जोडिदाराच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमक करणे चुकीचे नाही का?
नात्यात एक स्पेस असणं, एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया, मोबाईल मुळे इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना करून नात्यात फूट पाडणे खरंच अयोग्य आहे. मोबाईल, इंटरनेट मुळे आपण अपडेटेड राहतो, नवनवीन गोष्टींची माहिती मिळते, जगभरात कनेक्टेड राहतो.. अशे फायदे अनेक आहेत पण त्यांच्या गैरवापर अथवा अतिरेकामुळे संसाराचे ब्रेकअप होत असेल तर वेळीच सावरायला हवे. संसारातील विश्वास जपायला हवा, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे, परिस्थिती वेगळी तेव्हा इतरांशी तुलना करून वाद निर्माण झाले तर आयुष्य सुखी होण्याऐवजी नात्यात फूट पडायला सुरुवात होईल.
तुमचं याविषयी मत मांडायला विसरू नका ?? नकळत तुमच्या संसारात असंच मोबाईल, सोशल मीडिया मुळे गैरसमज होत असतील तर वेळीच सावरा.?? संवाद साधा.. गैरसमज दूर करा…??
© अश्विनी कपाळे गोळे