Category: Social issues

  • नकारात्मक विचार….जीवघेणे परिणाम- भाग १

    अनन्या आज खूप आनंदात होती, काय करू कुणाला सांगू अशा अवस्थेत  तिने आईला फोन केला ” हॅलो आई, काय करते आहे, कामात होतीस का… बरं ऐक मला तुझ्याशी बोलायचं आहे… म्हणजे तुला काही तरी सांगायचे आहे…आई…आई…. अगं तू आजी होणार आहे”, आताच आम्ही डाॅक्टरांकडे जाऊन आलो.. आई मी आज खूप खुश आहे..”.
    हे ऐकून आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले, “अनन्या अगं किती गोड बातमी दिली तू…मी लवकरच येते तुला भेटायला.. काळजी घे बाळा… आणि हो, तुम्हा दोघांचेही अभिनंदन..”
    फोन ठेवताच सासूबाईंना अनन्याने गोड बातमी दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला.. लग्नानंतर सात वर्षांनी अनन्या आणि राघवच्या आयुष्यात एक बाळ येण्याची चाहूल लागली होती. राघवही खूप आनंदात होता, त्याने अनन्याला अलगद मिठीत घेतले आणि कपाळावर चुंबन घेत आनंद व्यक्त केला. आता स्वतःची नीट काळजी घ्या राणीसाहेब, दगदग करू नका असं म्हणतं अनन्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अनन्याला खूप प्रसन्न वाटले.
    अनन्या घरीच ट्युशन्स घ्यायची, राघव एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा.  दोघांचा प्रेमविवाह. अनन्या दिसायला अतिशय सुंदर, हुशार पण जरा चिडखोर, रागीट, आई वडिलांची एकुलती एक  त्यामुळे थोडी हट्टी मुलगी. राघव एकत्र कुटुंबात वाढलेला, नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत असला तरी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा शांत, समजुतदार मुलगा. कॉलेजमध्ये असताना अनन्या सोबत ओळख होती नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झाले आणि मग‌ लग्न. लग्नाला दोन वर्षे  झाले तसेच बाळ होण्या साठी दोघेही प्रयत्नशील होते सोबतच दवाखाना सुरू. आज लग्नाच्या सात वर्षांनी त्यांच्या जीवनात गोड बातमी आली. दोघांच्याही घरी सगळे लाड पुरवत होते, अनन्या स्वत: ची व्यवस्थित काळजी घेत होती. जेवण, आराम, फिरणं सगळं अगदी वेळेत. तिला राग येऊ नये, तिची चिडचिड होऊ नये याची पुरेपूर काळजी राघव घेत होता. असेच पाच महिने पूर्ण झाले. राघवनी नवीन घर खरेदी केले होते आणि त्याचा ताबा आता त्याला मिळणार होता. बाळाचं आगमन नवीन घरात होईल म्हणून दोघेही खूष. सामान नवीन घरात शिफ्ट करताना दगदग  नको म्हणून अनन्याला राघवने काही दिवस आई कडे ठेवले. घरच्यांच्या मदतीने नवीन घर सजवले.
    अनन्या नवीन घरात जायला खूप उत्सुक होती, ती घरी परत येताना राघवने तिचं छान सरप्राइज वेलकम केले. घरात तिच्या आवडीचे टेरेस गार्डन, रूममध्ये बाळाचे फोटो, दारात फुलांची रांगोळी, तोरणं शिवाय घरगुती वास्तुशांतीची पुजा आयोजित केली. सगळं अगदी आनंदाने पार पडले.
    नवीन ठिकाणी अजून जास्त ओळख नसल्याने आणि बाळ होणार म्हणून आता अनन्याने काही दिवस ट्युशन घ्यायचं बंद केले. सायंकाळी सोसायटीच्या आवारात अनन्या फेरफटका मारायला जाऊ लागली, त्यामुळे हळूहळू तिची ओळख होतं गेली.
    एक दिवस एका स्त्रीने तिला विचारले की ” तुम्ही नवीन रहायला आल्या का, कुठल्या मजल्यावर..”
    अनन्याने आनंदात उत्तर दिले ” हो, पाचव्या मजल्यावर, ५०५ मध्ये.”
    ते ऐकताच ती स्त्री घाबरून म्हणाली “५०५ मध्ये, जरा जपून हा.. त्यात तुम्ही गरोदर”.
    अनन्या दचकून म्हणाली” असं काय म्हणताय तुम्ही? काय झालं”.
    तिने अडखळत उत्तर दिले ” विशेष काही नाही पण असं ऐकलं आहे की आधी हे घर कुणी तरी बूक केले होते एका तुमच्या सारख्या जोडप्याने पण घराची खरेदी पक्की करून येताना त्यांचा अपघात झाला आणि ती गेली..तो अपंग झाला.. आणि मग त्यांनी ती खरेदी रद्द केली.. तेव्हा पासून ते घर घेण्याचे सगळे टाळायचे…तू काळजी करू नकोस.. होईल सगळं नीट.. वास्तुशांती केली ना..?” 
    त्या स्त्रीचे बोलणे ऐकून अनन्या हादरली.. घाबरून घरात जायला दचकली…ते ऐकल्यापासून तिच्या मनात सतत नकारात्मक विचार यायला सुरु झाले.. काही वाईट होणार नाही ना म्हणून सतत विचार करायला लावली.. अचानक झोपेतून दचकून जागी व्हायची.
    राघवला मात्र याची काही कल्पना नव्हती.
    अनन्याच्या वागण्यात बदल होत आहे हे राघवला जाणवलं. तिला विचारायचा प्रयत्न केला पण ती फक्त म्हणाली ” सगळं नीट होईल ना रे राघव.. काही संकट येणार नाही ना.. मला भीती वाटते..”
    राघव अनन्याला खूप समजावून सांगत होता की काही होणार नाही… आपल्याला बाळ होणार आहे..तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.. अनन्या अशी का वागते … गोंधळलेली का असते हे त्याला कळत नव्हतं..
    शेवटी तीन चार दिवस मनात गुंतागुंत निर्माण झाल्यावर अनन्याने झालेला प्रकार राघवला सांगितला.
    राघव ने तिची खूप समजूत काढली की हे सगळे आपण घर घेण्यापूर्वी झाले शिवाय त्यांनी फक्त घर बूक केले होते.. राहायला आले नव्हते..जे झाले तो एक अपघात होता शिवाय हे कितपत खरे आहे हे माहीत नसताना तू स्वत:ला अशा अवस्थेत त्रास करून घेऊ नकोस, तेही कुणाच्या सांगण्यावरून..तू याविषयी काही विचार करू नकोस. आपल्या आयुष्यात आनंदाचे दिवस आहेत ते एंजॉय कर…हवं असल्यास आईला आपण बोलावून घेऊ म्हणजे तुला एकटं वाटणार नाही.
    अनन्याला प्रसन्न वाटावं म्हणून शक्य तितका वेळ राघव तिला द्यायचा.. तिच्या आईला त्याने बोलावून घेतले.. आता सातवा महिना सुरू झाला.. अनन्या मात्र नकारात्मक विचारात गुंतलेली असायची.. सगळे आपापल्या परीने तिची समजूत काढून आनंदात ठेवायचा प्रयत्न करत होते पण अनन्याला नकारात्मक विचारांनी घेरले होते. जरा काही दुखले की ती टोकाचा विचार करायला लागत होती.. गरोदर असताना आनंदात राहणे किती गरजेचे आहे हे आई, राघव शिवाय डॉक्टर तिला समजून सांगत होते.. नकारात्मकता बाळासाठी तसेच अनन्या साठी घातक ठरू शकते हे सगळयांना लक्षात आले होते.
    अनन्याला यातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता..

    यातून अनन्या बाहेर पडणार की नाही.. त्याचा काय परिणाम होईल हे पुढील भागात पाहू.
    ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे..
    पुढचा भाग लवकरच… गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • संसाराचे ब्रेकअप

    संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच..
    आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..”
    होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता संजय. अजयची बडबड ऐकून त्यावर फारसं प्रत्युत्तर न देता गुपचूप तो ऐकून घेत होता. न राहवून काही वेळाने अजयने त्याला विचारले तेव्हा बराच वेळ काही नाही झालं म्हणणारा संजय शेवटी म्हणाला,”त्याच्यामुळे आज तुझ्या वहिनीचे आणि माझे भांडण झाले रे..नकोच तो मला आता आयुष्यात..म्हणजे डोक्याला ताप नसेल..”
    अजयला मात्र काही कळालं नाही..”अरे..तो कोण.. कशामुळे भांडण झालं..नीट सांगशील का तू..”
    संजय – “अरे तो रे.. मोबाईल.. त्याच्यामुळेच आमची जास्त भांडणे होतात..आज तर सकाळीच भांडण ?..नकोच मला‌ मोबाईल..”
    अजय जरा चक्रावून गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, “मोबाईलमुळे भांडणं..मला तू नीट सांग यार.. काय बोलतोय काही कळत नाही..”
    संजय – “अरे, काल रात्री ही‌ लवकर झोपली, मी आपला वेबसिरीज बघत बसलेलो मोबाईलवर..?हिने आवाज दिला असेल मधेच जाग आल्यावर..किती वेळ झालाय झोपा आता असं म्हणत , तर मला काही हेडफोन्स मुळे कळाल नाही.. झालं ना..मला‌‌ सकाळी म्हणाली तुम्ही रात्री कुणाशी चाटींग करत होते.. माझ्याकडे लक्ष नव्हतं..मी किती आवाज दिले तरी चेहऱ्यावर हास्य आणून चाटींग करत होतात.. माझ्याशी बोलायला वेळ नसतो.. घरी आले की मोबाईलवर असता सारखे.. वरून हद्द म्हणजे आजपर्यंत माझा फोटो डिपी‌ वर ठेवला नाही म्हणे तुम्ही.. फेसबुकवर टाकला नाही.. तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही.. नंतर तर चक्क संशय घेतला आणि म्हणाली, तुमची नक्कीच गर्लफ्रेंड आहे..तिला कळू नये तुमचं लग्न झालेलं म्हणून तुम्ही माझा फोटो लावत नाही डिपी ला..रडायला लागली राव स्वतःच संशय घेऊन..
    समजून घ्यायला तयार नव्हती.. शेवटी तिचा माझा सोबतचा फोटो ठेवलाय व्हॉट्स ॲप’ला डिपी.. चूक नसताना सॉरी म्हणालो.. कशीबशी समजूत काढली आणि आलो ऑफिसला.”
    हे सगळं ऐकून अजयला खूप हसू आलं..?? तो हसू आवरत म्हणाला,”डिपी न‌ ठेवण्यावरून भांडण..?? काय रे..तू घाबरून ठेवला मग डिपी दोघांचा फोटो ??”
    संजय – ” हसून घे.. तुझं लग्न झालं ना‌ कि मग कळेल तुला.. अरे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर काहीतरी शायरी पोस्ट केलेली मी… एव्हाना विसरलो होतो.. मॅडम ने वाचली एकदा आणि मागेच लागली विचारायला की कुणासाठी लिहीलेली तुम्ही शायरी.. माझ्या आधी कुणी होती का वगैरे..मी सारखं डिपी बदल.. फोटो अपलोड करणार्‍यातला नाही रे.. जास्तच काय तर वेबसिरीज नाही तर गेम..किती सांगितलं हिला पण पटतच नाही..इतरांचे कपल फोटो, रोमॅंटिक स्टेटस बघितले की आमचं भांडण ठरलेलंच.”
    अजयला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले.. मोबाईल मुळे संसारात इतके गैरसमज होतात याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

    तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना..पण खरं आहे हे.. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली “लग्नापासून एकदाही पतीने पत्नीचा फोटो डिपी न ठेवल्याने पत्नीने चक्क महिला सहायता कक्षाकडे पतीची तक्रार केली.” पोलिसांनाही ऐकून धक्काच बसला.. समुपदेशन करून दोघांची समजूत काढली गेली आणि पतीने व्हॉट्स ॲपवर पत्नी सोबतचा फोटो डिपी ठेवण्याचे मान्य केले तेव्हा दोघांमधला वाद मिटला. पोलिसांनी हेही सांगितले की हल्ली पती पत्नी यांच्यात जास्तीत जास्त वाद हे मोबाईल मुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींवरून संसाराच्या ब्रेकअप चे कारण हे मोबाईल असल्याने बरेचदा समुपदेशन करून वाद मिटतात तर कधी संशयावरून टोकाला जातात.
    मुलांमधील मोबाईलचे वेड आणि त्यामुळे होणारे पालकांचे भांडण यांचंही बरंच प्रमाण आहे..पण आता पती पत्नी यांच्या संसारात मोबाईल, सोशल मीडिया मुळे ब्रेकअप होण्याची वेळ येते म्हणजे विचार करण्याजोगे आहे..
    मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा असा अतिरेक करत जोडिदाराच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमक करणे चुकीचे नाही का?
    नात्यात एक स्पेस असणं, एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया, मोबाईल मुळे इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना करून नात्यात फूट पाडणे खरंच अयोग्य आहे. मोबाईल, इंटरनेट मुळे आपण अपडेटेड राहतो, नवनवीन गोष्टींची माहिती मिळते, जगभरात कनेक्टेड राहतो.. अशे फायदे अनेक आहेत पण त्यांच्या गैरवापर अथवा अतिरेकामुळे संसाराचे ब्रेकअप होत असेल तर वेळीच सावरायला हवे. संसारातील विश्वास जपायला हवा, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे, परिस्थिती वेगळी तेव्हा इतरांशी तुलना करून वाद निर्माण झाले तर आयुष्य सुखी होण्याऐवजी नात्यात फूट पडायला सुरुवात होईल.

    तुमचं याविषयी मत मांडायला विसरू नका ?? नकळत तुमच्या संसारात असंच मोबाईल, सोशल मीडिया मुळे गैरसमज होत असतील तर वेळीच सावरा.?? संवाद साधा.. गैरसमज दूर करा…??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

    सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच रिक्षा पकडून डॉक्टरांकडे निघाली. डॉक्टरांनी  तपासणी केली तर अंगात खूप जास्त ताप होता शिवाय तिला अशक्तपणा मुळे गरगरायला लागले होते.
    घरी आल्यावर जेवण करायला स्वयंपाक घरात गेली तर लगेच तिच्या कानावर शब्द पडले ” आज एका कामाला हात लावला नाही, सगळं मला‌ एकटीला करावं लागलं.” सुमित्राने कसे बसे दोन घास खाऊन औषध घेतले आणि जाऊन अंथरूणावर पडली तोच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिच्या मनात विचार आला, ” आपण घरी सगळ्यांसाठी किती झिजलो, कुणालाही गरज असो सुमित्रा तयार आणि आज आपल्यावर वेळ आली तर तब्येतीची साधी चौकशी नाही. वरून अपमानास्पद बोलून मोकळे होतात सगळे. आता बस झाल्या इतरांच्या सेवा, आता मी स्वतः साठी जगणार.. स्वतः ची काळजी घेणार.”
    सुमित्रा एकोणीस वर्षांची असताना लग्न करून बापूरावांच्या आयुष्यात आली. बापूराव प्रतिष्ठित घरातले , एकत्र कुटुंबात राहणारे. तिचं सौंदर्य बघता बापूराव तिला कुठे ठेवू कुठे नाही असे अगदी फुलाप्रमाणे जपायचे. नव्या नवरीचे नवलाईचे नवं दिवस संपले आणि ती जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकली. कुणालाही कुठल्या कामासाठी नाही म्हणने सुमित्राला जमत नव्हते. कुटुंबात कुठलाही सोहळा असो , कुणाचं आजारपण असो किंवा बाळंतपण असो सुमित्रा मदतीसाठी तत्पर असायची. अशा स्वभावामुळे सगळे तिची वाहवा करायचे शिवाय बापूरावांची मान अख्ख्या कुटुंबात वाढलेला बायकोच्या वाहवा मुळे अगदी ताठ असायची. सगळ्यांचं करता करता घरासाठी राबत असताना सुमित्रा आणि बापूरावांच्या नात्यात मात्र फूट कशी पडली सुमित्राला कळालेही नाही. त्यात भर म्हणजे कित्येक प्रयत्न केले तरी सुमित्राला आईपण काही लाभत नव्हते. सासूबाई ह्या त्या देवस्थानात नवस बोलायच्या, दवाखान्याच्या चकरा सुरूच पण सुमित्रा कडून आनंदाची बातमी काही मिळत नव्हती. असं करता करता लग्नाला सहा वर्षे झाली. गावातील लोक, नातलग नावं ठेवायला लागली. मग सासूबाईंनी सूर काढला बापूरावांच्या दुसऱ्या लग्नाचा, बघता बघता लवकरच अगदी मुलगी शोधून लग्न करायची तयारीच झाली. सुमित्राला ते ऐकून धक्का बसला, तिने आई वडीलांना सांगितले, त्यांची परिस्थिती जेमतेम, ते म्हणाले “अजून लहान बहीणींचे लग्न व्हायचे आहे तेव्हा तू कायमची माहेरी आली तर लोक काय म्हणतील शिवाय बहिणीच्या लग्नात अडथळा येयील.” क्षणभरात माहेरही तिच्यासाठी परकं झालं.
    सुमित्राच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. कुणालाही नाही म्हणने तर तिचा स्वभावच नव्हता. बापूरावांनी दुसरं लग्न करून सवत घरी आणली. लग्नानंतर दोन महिन्यांत तिला दिवस गेले, मग काय सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतले, तिचे लाड पुरवले जाऊ लागले. सुमित्रा दिवसभर राब राब राबून घर सांभाळायची पण कुणीही तिच्या कडे फारसे लक्ष देत नव्हते. एखाद्या मोलकरीणी  सारखी तिची अवस्था झाली होती. बापूराव सुद्धा साधं कधी प्रेमाने बोलत नव्हते, कामापुरते काम ठेवायचे. सुमित्रा रोज रडायची, आयुष्य संपवायचा विचार करायची पण काही उपयोग नव्हता.
    तिच्या सवतीचे दोन बाळंतपण तिनेच केले. अजूनही कुटुंबात कुणाला मदतीची गरज पडली की बापूराव तिला त्यांच्या घरी नेऊन सोडायचे. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन सगळ्यांचे बाळंतपण, म्हातारपणी सेवा,. लग्न असो किंवा कुठलाही सोहळा समारंभ , सगळं ओझं सुमित्रा वरच असायचं. तिची सवत सुद्धा तिला मोलकरीण समजून राबवून घ्यायची. घरात जिव्हाळा, प्रेम देणार कुणीच उरलं नव्हतं. जिथे नवराच आपला राहीला नाही तर इतरांकडून काय अपेक्षा असं समजून सुमित्रा जगत होती, माहेरी सुद्धा एक पाहुणीच. अशातच वयाची पन्नाशी जवळ आली, तब्येत आधी सारखी धडधाकट राहीली नव्हती, पण कुटुंबात अपेक्षा मात्र संपल्या नव्हत्या.  असंच आज अंगात इतका ताप असूनही साधी विचारपूस तर नाही पण कामात मदत केली नाही म्हणून तिची सवत तिला कुरकुर करत होती. औषधी घेऊन जरा वेळ सुमित्राला झोप लागली.
    काही वेळाने जाग आली तर कानावर शब्द पडले ” सुमित्रा आहे ना, पाठवा की तिला.”
    ते ऐकताच सुमित्रा बाहेर आली तर बापूराव,त्यांच्या आई आणि सवत बोलत होते. सुमित्राला बघताच सासूबाई म्हणाल्या “सुमित्रा, लहान काकी दवाखान्यात भरती आहे, तुला त्यांच्या जवळ जावं लागेल. एक जण बाई माणूस पाहिजे त्यांच्या सेवेत.”
    त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सुमित्रा म्हणाली “मी जाणार नाही, माझ्या अंगात इतका ताप, अशक्तपणा, तुम्हा कुणाला माझी अवस्था कळत नाही, माझा फक्त गरजेच्या वेळी वापर केला इतके वर्ष तुम्ही. पण आता बस..मला नाही जमणार जायला. हे तसं तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता माझे डोळे उघडले. सूनेच्या नात्याने कर्तव्य म्हणून मी राबत गेले पण आता बस.. नाही जमणार मला.”
    सगळे सुमित्राच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. सुमित्राचे हे रुप सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. उशीरा का होईना पण नाही म्हणण्याच्या कलेत सुमित्रा नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत होती, स्वतः साठी जगण्याची नवी उमेद तिच्या मनात नव्याने जागी झाली होती.

    अशा अनेक सुमित्रा आज समाजात आहेत ज्यांना नाही म्हणता येत नाही आणि म्हणून मग सगळे फायदा घेतात. अशावेळी घरात कुणालाच आपुलकी नसेल तर त्याचा किती त्रास होतो हे सहन करणार्‍यालाच माहीत असते म्हणूनच योग्य वेळी नाही म्हणने खुप गरजेचे असते.

    लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही. लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिच्या सौंदर्याचे कोड

    रीमा आई वडीलांना एकुलती एक मुलगी, गव्हाळ वर्ण असलेली पण नाकी डोळी नीटस, उंच बांधा, आकर्षक शरीरयष्टी, काळेभोर लांबसडक केस, जरा मेकअप केला की एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकेल असं तिचं सौंदर्य. पण या सौंदर्यावर ‘कोड’ पसरलं आणि परिस्थिती बदलली.

    रीमा लहानपणापासून नृत्य कलेत तरबेज. जणू नृत्य आणि मॉडेलिंग तिला जन्मताच मिळालेली देणगी. कुठलाही क्लास न लावताच टिव्हीवर बघून, इंटरनेटवर बघून ती स्वतः नृत्य शिकली. भरतनाट्यम असो वा हिपहॉप , तिला कुणीही मागे टाकू शकत नव्हते. त्यामुळे लहानपणापासूनच अनेक कार्यक्रमांमध्ये तिला बक्षिस मिळाले. वयाच्या अगदी पाचव्या वर्षी ती टिव्हीवर एका डान्स शो मध्ये झळकली. शाळेत इयत्ता तिसरीत असताना तिच्या पोटावर एक डाग दिसायला लागला. डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळाले की तो एक त्वचारोग आहे ‘कोड’ म्हणून ओळखला जाणारा. ते ऐकताच रीमाच्या आई बाबांना काळजी वाटली. शरीरावर इतरत्र कुठेही ते पसरायला नको म्हणून विविध शहरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू झाले. पण ते कोड मात्र आता चेहऱ्यावर सुद्धा दिसायला लागले. रिमाचे मैदानी खेळ बंद झाले कारण सूर्यकिरणांमुळे पुन्हा त्याची ‘रिअॅक्शन’ यायची.
    शाळेतही रिमाला मित्र मैत्रिणी सोबत खेळायला घेत नसे. तिच्या आजूबाजूला बसायला टाळत असे, त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून सतत शाळा बदलायला लागत होती. नातेवाईक सुद्धा घरी यायला टाळायचे, रीमाला आई बाबांना कार्यक्रमात बोलवायला टाळायचे, त्यांना वाटायचं रिमामुळे अख्ख्या खानदानाला लोकं नाकबोट लावतील, आमच्या मुला मुलींच्या लग्नासाठी अडचणी येतील. आई बाबांनी मात्र या गोष्टींची पर्वा केली नाही उलट रिमाला खूप हिम्मत दिली, नृत्य कला मागे पडायला नको म्हणून बाबा अनेक स्पर्धांमध्ये तिचे नाव नोंदवायचे, तिला नृत्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कोड शरीरावर सर्वत्र पसरले नसले तरी चेहऱ्यावर, पोटावर असलेले कोडाचे डाग मात्र जायला मार्ग मिळत नव्हता.
    असाच शाळा बदलत बदलत शाळेचा प्रवास संपला आणि कॉलेज सुरू झाले. कॉलेजमध्ये परिस्थिती वेगळी नव्हती. तिचं सौंदर्य अप्रतिम असलं तरी कोड असल्याने तिला बर्‍याच गोष्टी पाहून वंचित ठेवले जायचे. सहसा कुणी मैत्री करायला टाळायचे, तिला आता ह्या गोष्टींची सवय झाली होती.
    रीमा हार मानणारी नव्हती , तिने गॅदरींग मध्ये आपल्या नृत्याविष्काराने, मॉडेलिंग मधल्या अदा , कौशल्य यामुळे अख्या कॉलेजमध्ये वाहवा मिळवली. हळूहळू तिचा मित्र परिवार वाढला.
    मॉडेलिंग हे रिमाचे लहानपणापासून स्वप्न होते, पण मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्य अतिशय महत्त्वाचा घटक आहे तेव्हा आपल्या चेह-यावर असलेल्या कोड मुळे आता आपलं स्वप्न हे स्वप्नच राहिल असं तिला वाटत होतं.
    तिचे कौशल्य बघून आई बाबा तिला नेहमी प्रोत्साहन देत असे. मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू प्रयत्न करणे सोडू नकोस असं नेहमीच तिला सांगत असे.
    तिने फॅशन शोमध्ये मॉडेलिंग साठी लागणारे फोटो शूट करून घेतले, अनेक फॅशन डिझायनर ला तिचे फोटो पाठवले. कुणा कडूनही काही प्रतिसाद येत नव्हता. रीमा जरा उदास झाली पण हिम्मत हारली नाही, प्रयत्न करत राहीली. काही महिन्यांनी तिला एका फॅशन शो साठी ऑडीशनला बोलावले गेले, तिची परफेक्ट फिगर, मॉडेलिंग कौशल्य यामुळे तिने तिथे ऑडीशनला आलेल्या प्रत्येक मॉडेलला मागे टाकलं. एका प्रख्यात फॅशन डिझायनरच्या ब्रॅंड साठी तो फॅशन शो होता आणि रिमा त्यासाठी सिलेक्ट झाली. रीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचं लहानपणापासूनचं स्वप्न आता सत्यात उतरणार होते.
    ठरल्याप्रमाणे फॅशन शो झाला, त्यातले रीमाचे फोटो भराभर इंटरनेटवर पसरले. जगभरात ती प्रसिद्ध झाली. ज्या ब्रॅंड साठी तिने हा शो केला होता त्यांचीही जगभर प्रसिद्धी झाली. त्यानंतर अनेक ऑफर्स येऊ लागल्या.
    मॉडेलिंग मध्ये करीयर करायचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. सोबतच स्वतः ची एक डान्स अकॅडमी तिने नृत्य कौशल्याच्या जोरावर सुरू केली त्यातही तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.
    एका मोठ्या डान्स शो साठी तिला परीक्षक म्हणून निमंत्रित केले तेव्हा तिथल्या मुलाखतीत तिने स्वतःच्या जीवनातील प्रवास सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आई बाबांची मान अभिमानाने उंचावली.
    परिस्थितीवर मात करून कौशल्याच्या आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी रिमा जगभरात अनेकांचे प्रेरणास्थान बनली.

    कोड येणे हे नैसर्गिक आहे शरीरात काही कारणांमुळे झालेल्या बदलामुळे कोड येते, अशा‌ वेळी त्या व्यक्तीला तसेच घरच्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. लग्नाच्या वेळी अडचणी येतात कारण बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व दिले जाते. पण अशा व्यक्ती बरोबर बोलायला टाळणे, संबंध तोडणे, त्यांच्या पासून दूर राहणे मात्र अयोग्य नाही का.

    कॅनडातील विनी हार्लोने केलेले फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. कोड असलेली ही मॉडेल, तिचे फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल झाले आहे. यातूनच प्रेरीत होवून मी लिहीलेली रीमाची ही एक काल्पनिक कथा आहे.

    कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि याविषयी तुमचं मत मांडायला विसरू नका.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • कपड्यांवरून व्यक्तीमत्व ठरविणे- योग्य की अयोग्य

    “अय्या हीच का मोना, पंजाबी ड्रेस घालून आली लग्नात. होणार्‍या सासरची मंडळी भेटतील तर साडी नेसून जावं इतकं कसं कळत नसेल तिला. तुझी सून आतापासूनच मर्यादा ओलांडत आहे बघ रमा. तू तर म्हणाली होती की मुलगी संस्कारी घरातील आहे म्हणून. ” सुजयच्या काकू त्याच्या आईला म्हणाल्या.

    सुजयच्या आईला ते ऐकून जरा अपमानास्पद वाटले. त्यांनी मोना ची घरी सगळ्यांशी ओळख करून दिली पण मनात मात्र काकूंचे‌ वाक्य सतत बोचत होते. न राहवून त्यांनी मोनाला म्हंटले “अगं तू आमच्या घरची होणारी सून आहेस. साडी नेसून आली असती तर बरं झालं असतं, काय म्हणतील आता सगळे, लग्नाआधीच नावं ठेवायला सुरुवात होईल आता तुला आणि सोबतच मला.”

    मोनाला ते ऐकून वाईट वाटले, त्यावर ती दबक्या आवाजात म्हणाली, “आई माझ्याकडे साडी ब्लाऊज तयार नव्हते. अचानकच लग्नाला यायचं ठरलं ना शिवाय मला दिवसभर साडी मध्ये सुचले नसते काहीच म्हणून ड्रेस घातला.”

    सुजयच्या आई त्यावर काही न बोलता निघून गेल्या. घरी आल्यावर सुजयला ह्याविषयी त्यांनी सुनावले “आजकालच्या मुलींना कपड्यांचं भान नसतं, कुठे काय घालायचं कळतं नाही. लग्न व्हायच्या आधीच मला म्हणते साडी सांभाळायला दिवसभर सुचलं नसतं म्हणून. आम्ही नेसतोच ना नेहमी साडी, आम्हाला कसं जमतं साडी नेसून सगळं काम. कारणं आहेत नुसती.आता सगळे नातेवाईक नावं ठेवतील त्याचं काय”.

    तर गोष्ट अशी आहे की मोना म्हणजे सुजयच्या बाबांच्या मित्राची मुलगी, दिसायला आकर्षक, हुशार, आत्मविश्वासू. सुजयला ती खूप आवडायची, दोघांच्याही घरी लग्नाची काही अजून तयारी नव्हती पण जुळवून ठेवायला काय हरकत म्हणून सुजयच्या बाबांनी त्यांच्या मित्राकडे मोना आणि सुजयच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. दोघांचेही कुटुंब पुण्यात स्थायिक झालेले, जरा मॉडर्न विचारांचे. दोघांच्याही घरी तशी काही हरकत नव्हती. अचानकच लग्न ठरले, साखरपुडा आणि लग्नाचे मुहूर्त चार महिन्यांनंतरचे होते. पुढच्याच तीन दिवसांत सुजयच्या नातेवाईकांकडे एक लग्न होते आणि त्यात सुजयच्या आईने आग्रहाने मोनाला बोलावून घेतले, कुटुंबात सर्वांशी ओळख करून देण्याच्या उद्देशाने. अचानकच सगळे ठरल्यामुळे मोना जवळ साडी, ब्लाऊज काहीच तयार नव्हते. ती छान गुलाबी रंगाचा पार्टी विअर पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. तिचा उंच बांधा, गोरा रंग, त्यात तिच्या लांबसडक केसांची हेअरस्टाईल सोबतच हलकासा मेकअप त्यामुळे ती अजूनच आकर्षक दिसत होती. तिला आज बघून सुजय अजूनच तिचा तिच्या प्रेमात पडला. सुजयच्या आईने तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले पण काकूंनी साडी नेसून आली नाही म्हणताच आईचं मत बदललं.

    असं कपड्यांवरून कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवणे कितपत योग्य आहे. मोना नोकरी करणारी स्वतंत्र विचारांची, आई वडिलांनी तिला कधी कपड्यांच्या बाबतीत बंधन लादली नाहीत, कपड्यांवरून संस्कार ठरत नाही असे त्यांचे परखड मत होते, मोना समजुतदार होती, स्पष्टवक्ती होती. आई वडिलांचा तिच्यावर विश्वास होता आणि हे सगळे सुजयच्या घरच्यांच्या आधीच माहीत होते. लग्न ठरेपर्यंत त्याच्या आईला ह्या गोष्टीचा प्रोब्लेम नव्हता पण आता ती आपली सून होणार म्हणून त्यांच्या अपेक्षा बदलल्या होत्या त्याही नातेवाईक काय म्हणतील म्हणून.

    असाच अजून एक किस्सा, नविन लग्न झाल्यावर आम्ही राहायचो तिथल्या घरमालकीण काकूंचा. काकू नेहमी नववारी साडीत असायच्या आणि त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला ती शोभून दिसायची. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आणि खाली घरमालक सोबतच बाजूला अजून एक कुटुंब भाड्याने राहायचे. काकूंची आणि माझी भेट दररोज सकाळी ,६ वाजता व्हायची. ती वेळ म्हणजे माझी आॉफिसला जाण्याची आणि त्यांची माॅर्निंग वाॅकला जाण्याची. त्या काही न बोलता फक्त माझ्या स्मितहास्यावर एक स्मितहास्य करायच्या. आमचं दोघांचं राहणीमान, आॅफिसमुळे दिसणारी धावपळ शिवाय मॉडर्न कपडे बघून काकूंना वाटायचे की मी घरी जेवण कधी बनवतच नाही, मला बनवायलाही येत नाही असं. एकदा घाईघाईने निघाले आणि टिफीन विसरले, मागोमाग नवरोजी आले टिफीन बॅग घेऊन तेव्हा काकूंनी आश्र्चर्यचकित होऊन विचारले “अगं, इतक्या लवकर सकाळी उठून तू टिफीन बनवला?” मी म्हणाले ” हो काकू, रोज दोघांचाही टिफीन बनवून निघते मी.” त्यावर त्या म्हणाल्या”अगं, मला वाटायचे तुला काही बनवता येत नाही, बाहेरच जेवत असाल तुम्ही. आमची सुनबाई तर अजून उठलीही नाही तू स्वयंपाक करून सगळं आवरून ६ वाजता ऑफिसला निघाली, खरंच विश्वास बसत नाही आहे गंं माझा. मी असं समजायचे की शिकलेल्या, नोकरी करणारर्‍या, जीन्स घालणार्‍या मुलींना घरची जबाबदारी, संसार नीट जमत नसेल पण तुला बघुन माझा गैरसमज दूर झाला बघ.” काकूंच्या बोलण्यावरून मनात विचार आला ” रहाणीमान, कपडे यावरून एखाद्याचं व्यक्तीमत्व ठरवणे खरंच योग्य आहे का.

    ती माॅडर्न कपडे घालते , टिकली लावत नाही, मंगळसूत्र, जोडवे घालत नाही, अशा अनेक गोष्टींवरून व्यक्तीमत्व ठरवणे, सत्य परिस्थिती माहीत नसताना व्यक्तीला समजून न घेता नावं ठेवणे कितपत योग्य आहे.

    कसे राहावे, काय घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्त्येकाच्या घरच्यांच्या आवडीनिवडीनुसार , परीस्थितीवर ते अवलंबून आहे. वरवर पाहता कुणाला हिणवणे, संस्कार काढणे खरंच खूप चुकीचं आहे.

    कुठल्या वेळी काय घालायचं, कुठल्या पोषाखात आपण कम्फरटेबल आहोत हा विचार करून स्वत: त्या व्यक्तीला ते कळत असेल तर इतरांनी त्यावर चर्चा करणे खरंच योग्य नाही.

    याविषयी प्रत्त्येकाचे मत वेगळे असू शकतात. कुणालाही दुखावण्याचा हेतू नसून केवळ कपड्यांवरून कुणाचेही व्यक्तीमत्व, संस्कार ठरवणे अयोग्य आहे हाच मूळ उद्देश.
    तुमचे याविषयीचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा.
    © लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. पोस्ट शेअर करताना नावासकट शेअर करावी.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • नात्यात स्पेस का हवी? हवी का?

    रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस, जाते मी आंघोळीला.”

    पूजा आंघोळ करायला जाताच आईने तिचा फोन बघितला तर “enter password” बघताच आईचा पारा चढला , आईच्या डोक्यात शंकाकुशंका सुरू, असं काय पर्सनल असतं फोन मध्ये की फोनला पासवर्ड ठेवावा लागतो. आईची चिडचिड सुरू झाली. बाबांना लगेच अंदाज आला की काही तरी बिघडले. पूजा बाहेर येताच आई ओरडली “पूजा इतकं काय फोनला चिकटून असतेस गं, आणि पासवर्ड कशाला, काय लपवतेस तू. आता कुणाशी चाटींग करत होतीस हसून हसून. मला आता लगेच तुझा फोन बघायचा आहे, पासवर्ड टाक आणि दाखव मला”

    पूजा आईच्या अशा बोलण्यानं पूजा दुखावली गेली हे बाबांना जाणवलं.

    बाबा आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, आई मात्र खूप चिडून म्हणाली” तुम्हाला कसं कळत नाही, मुलगी वयात आलेली, कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी असतात मान्य आहे पण पासवर्ड ठेवावा लागतो असं काय लपवते फोन मध्ये. आपल्यालाही कळायला पाहिजे.”

    पूजा म्हणाली अगं आई तू असं काय बोलते आहेस, तुला वाटतं तसं काही नाही, आम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांच्या गमतीजमती करतो, चिडवाचिडवी करतो बाकी काही नाही.”

    बाबा आईला समजावून सांगत होते की अगं आपली मुलगी आता मोठी झाली, तिलाही तिची एक स्पेस असू दे. मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. शिवाय ती आपली एकुलती एक, भावंडे नाहीत तर मित्र मैत्रिणींसोबत मन मोकळे जगू दे तिला. असं चिडून ओरडून बोलण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिची मैत्रीण बनली तर ती नक्कीच तुझ्यापासून काही लपवणार नाही. असं मुलांवर संशय घेणे योग्य नाही. “

    आईला लगेच आपली चूक कळून आली, मुलांवर संस्कार करणे, लक्ष देणे याबरोबरच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची स्पेस देणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. तिने पूजाला जवळ घेतले आणि दोघिंच्याही डोळ्यात अश्रू आले.

    ********************

    सोनल आणि पंकज, नवीन लग्न झालेलं जोडपं, दोघेही नोकरी करणारे. पंकजच एकत्र कुटुंब, आई वडील, भाऊ वहिनी, व एक पुतण्या आणि आता हे दोघे. लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशात गेले, एकमेकांसोबत छान वेळ घालवला. घरी आल्यावर दोघेही नोकरी, घर , रोजच्या जीवनात व्यस्त. सोनल घरात नवीन असल्याने घर आणि नोकरी सांभाळताना तिची खूप धावपळ उडायची. दिवसभर दोघं घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरून थकून जायची. पंकजने जरा वेळ जवळ बसावं, बोलावं असं तिला वाटायचे पण घरात सगळ्यांना वेळ देताना दोघांना एकत्र वेळच मिळत नव्हता. काही महिने असेच सुरू राहिले पण नंतर सोनलची चिडचिड व्हायची. दोघांना जरा स्पेस मिळावी यासाठी सुट्टीच्या दिवशी जरा आपण बाहेर जाऊन यावं असं पंकजला ती बोलताच तो म्हणायचा अगं आपण दोघेच जाणं योग्य वाटणार नाही. आपण एकाच घरात तर असतो, आता स्पेस मिळत नाही म्हणून तू का चिडचिड करते. आता वेगळं काय करायचं, इतके दिवस सगळे सोबत फिरायला जातो आपण, आता दोघेच गेलो तर काय म्हणतील घरी सगळे. नवरा बायकोच्या नात्यात एक स्पेस नसेल तर चिडचिड ही होतेच पण पंकजला मात्र ते कळत नव्हते. दोघांमध्ये मग शुल्लक कारणावरून वाद व्हायचे, सोनल तिच्या परीने पंकजला समजवण्याचा प्रयत्न करायची पण पंकजा गैरसमज व्हायचा, त्याला वाटायचे सोनलला माझ्या घरचे नको आहेत. दोघांमधील संवाद कमी होत चालला होता.

    एकदा सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बाहेर गावी जायचे होते पण पंकजची तब्येत ठीक नसल्याने तो घरी थांबला आणि अर्थातच सोनल त्यांच्यासोबत होती घरी. तिने त्याच्या आवडीचा मेनू जेवणात बनवला, दोघांनी मिळून जेवण केले, सोनलने त्याला औषध दिले आणि आराम करायला तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याला आज खूप वेगळं वाटलं. तिची त्यांच्याबद्दलची काळजी त्याला जवळून जाणवली, सोनल सोबत कित्येक दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यवर त्याला खूप प्रसन्न वाटले. आपण सोनलला खूप दुखावल्ं हे त्या दिवशी त्याला आपसूकच कळले. घरात दोघेच खूप दिवसांनी एकत्र होते, ती जास्त काही न बोलता ती सतत आपल्याला जरा स्पेस हवी असं सारखं का म्हणत होती हे आज त्याला जाणवलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून सॉरी म्हणाला, यानंतर नक्की तुला वेळ देईल, आपल्या नात्याला एक स्पेस किती आवश्यक आहे हे मला आज समजल सोनल असं म्हणतं तिला यानंतर कधी दुखावणार नाही असं गोड प्रॉमिस केलं.

    इतर नाती जपताना नवरा बायको मधली स्पेस जपणं खूप आवश्यक असते, मुलांच्या, आई-वडिल , नातेवाईक, घरदार, नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनी एकमेकांना समजून घेणे, संवाद कमी न होऊ देणे खरंच खूप गरजेचे आहे.

    **************************

    काही महिन्यांपूर्वी ”बधाई हो” सिनेमा बघितला, खूप विचार करायला लावणारा सिनेमा. मुलं मोठी झाली, आणि त्यांची लग्न की आई वडिलांना ही एक स्पेस असावी, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ असावं, त्यात काही वाईट तर नाही. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यातला गोडवा वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात. उतारवयात त्यांच्या प्रेमाला समाज वेगळ्या दृष्टीने बघतो पण प्रत्त्येक नात्यात एक स्पेस आवश्यक आहे आणि त्यात वय मॅटर करत नाही.

    ****************

    ऑफिसच्या पार्टीत सगळे खूप मजेत हास्य विनोद करत होते पण अमन मात्र अस्वस्थ, शांत बसला होता कारण त्यांची बायको त्याला सतत फोन करून कुठे आहात, सोबत पार्टीत कोण आहे, किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्न विचारून त्याला ऑकवर्ड करत होती. त्याने आधीच तिला पार्टीची कल्पना देऊनही ती संशयी स्वभावाची असल्याने ती त्याला फोन करत होती. अमन नीट पार्टीत एंजॉय करू शकत नव्हता, शिवाय त्याला तिच्यापासून नेहमीसाठी वेगळं व्हायचे विचार यायला लागले. अशा प्रकारे संशय घेऊन नवर्‍याच्या स्पेस वर आक्रमण केले तर त्याचा नकारात्मक परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो.

    प्रत्येकाच्या प्रायव्हसीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. नातेसंबंधात त्याची जाणीव असायला हवी. दुसर्‍याला आलेली पत्रे वाचणे, मेसेजेस वाचणे, कपड्यांचा वस्तुंचा न विचारता वापर करणे, डायरी वाघाने, पर्स/खिसे तपासणे या गोष्टी इतरांच्या प्रायव्हसी वर आक्रमण करतात. विनाकारण चौकशी, खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ, नको असलेले सल्ले देणे, अशा गोष्टी सुद्धा यातच मोडतात. अशावेळी “त्यात काय एवढं, मी सहज बोलून गेले” असं म्हनण्यापेक्षा जरा स्पेस ठेवून परवानगीने हे केले तर मतभेद होत नाही.

    महत्वाचे म्हणजे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात त्या सार्वजनिक करू नये.

    कधी कधी नातेसंबंधांतली माणसे आपल्याला ग्रुहीत धरतात, ‘तुला काही करायचे ते कर पण तू ते सगळं सांभाळून कर’‌ असे सांगताना ‘आम्ही तडजोड करणार नाही’ हे त्यामागे लपलेले असते. अशावेळी दिवस भरायला थोडा वेळ निश्चित करून स्वतः साठी तो वेळ वापरावा, या वेळेत स्वतः चे छंद जोपासावे, व्यायाम करावा, फिरून यावे, आवडीचे काम करावे, विश्रांती घ्यावी, यामध्ये सातत्य राखले की इतरांना त्यांची सवय होते आणि आपण स्वतःसाठी स्पेस निर्माण करता येते.

    नात्यात स्पेस आवश्यक आहे की नाही याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • तिमीरातूनी तेजाकडे..भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की शामरावांनी आत्महत्या केल्यावर सुमित्राला संसाराचा गाडा चालवताना अनेक खस्ता खाव्या लागल्या त्यात काही वर्षांनी आजीही गेली. होती नव्हती ती जमिन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. सुमित्रा आता दोन मुलांना घेऊन दुसर्‍यांकडे शेतीचे, कुणाच्या घरचे घरकाम करून संसार चालवत होती.
    गणेश म्हणजेच सुमित्राच्या मुलाला आईच्या कष्टाची जाणीव होती. आई मी शाळेत जाण्यापेक्षा तुला कामात  मदत करतो असं तो म्हणायचा पण आईची इच्छा होती ती मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, मोठं व्हावं, नावं कमवावं. तरीही शाळा , अभ्यास करून सुट्टीच्या दिवशी घरातील कामात, लहान बहिणीला सांभाळून इतर कामात तो आईला मदत करायचा.
    अशा परिस्थितीत एकटी बाई बघून गावात अनेकांचे वाईट अनुभव सुमित्राला यायचे. मदतीचा हात पुढे करत तिचा फायदा घेऊ बघणारे अनेक जण तिला भेटले पण सुमित्रा स्वाभिमानी होती. एकटी आहे म्हणून कुणापुढे न झुकता वाईट हेतूनेने कुणी जवळ येऊ पाहत असेल तर त्याची खरडपट्टी काढल्याशिवाय शांत बसायची नाही, ते त्या परिस्थितीत गरजेचे होते. मेहनत करून ती दोन मुलांना सांभाळत होती, त्यांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे तिचे स्वप्न होते.
    अशातच गणेश बारावी उत्तीर्ण झाला, मागोमाग दुर्गाचे सुद्धा शिक्षण सुरू होतेच. बारावीनंतर गणेश ने कृषी क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकला, गावातील इतर शेतकऱ्यांना आपल्या घरच्या सारखी वेळ येऊ नये म्हणून शक्य ती मदत करायची, आधुनिक तंत्रज्ञान शिकवायचे हे गणेशचे ध्येय होते.
    गावातील एकाची शेती गणेशने वर्ष भर सांभाळायला घेतली, जमिनीची सुपीकता समजून घेऊन सिमला मिरचीचे पिक घेण्याची तयारी केली, योग्य ती काळजी घेऊन सिमला मिरचीचे उत्पन्न घेतले. जवळपास कुठेच हे पिक नसल्याने त्याला चांगला नफा मिळाला. गावातील अनेक लोक त्याच्या घरी शेती विषयक सल्ला घ्यायला येवू लागले. गणेशच्या मदतीने कुणी वेगवेगळ्या भाज्या, हळद अशा प्रकारचे उत्पादन करू लागले. म्हणायला सोपे असले तरी शेती म्हंटलं की मेहनत ही आलीच शिवाय निसर्गाची साथ हवीच. तरी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून योग्य ती काळजी घेत गावात शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ होत होती शिवाय योग्य ठिकाणी योग्य दरात विकून शेतकऱ्यांना मेहनतीचा पैसा मिळावा‌ म्हणून गणेश पुरेपूर प्रयत्न करत होता.  सोबतच थोडे फार कर्ज काढून त्याने शेती विकत घेतली, त्यात ऋतू नुसार सुपिकता लक्षात घेऊन वेगवेगळे पिक घेतले.
    कित्येक वाईट दिवस बघितल्यावर आता गणेशची परिस्थिती सुधारली होती, आईला गणेशचा खूप अभिमान वाटायचा.
    मागोमाग दुर्गा बारावी झाली, पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पुढे गावातील शाळेत शिक्षिका व्हायचं, गावातील मुलांना सुशिक्षित करायचं हे तिचं गोड स्वप्न होतं.
    आता सुमित्राच्या कष्टाचे फळ तिला गुणी मुलांच्या स्वरूपात मिळाले होते. गावात गणेशची एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण झाली होती, कुणाला काही मदत लागली, कुठलीही अडचण आली तरी गणेश त्यांच्यासाठी धावून जायचा. शेतीविषयक सल्ल्यासाठी तर सतत गणेशला भेटायला कुणी ना कुणी येणारे असायचे. गणेशने तालुक्याला अर्ज देऊन, सरकारी कार्यालयात चकरा मारत गावात कालवे तयार करवून घेतले, नदी वरून पाइपलाइन टाकून शेतांमध्ये पाण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्याच्या या कार्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी सुद्धा त्याचा सल्ला घ्यायला येवू लागले.
    एक सुशिक्षित, मेहनती, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सधन शेतकरी म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. आईला त्याच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान वाटला.
    गणेशने झोपडीच्या जागी छोटंसं घर बांधलं, मेहनतीने कर्ज फेडण्यासाठी गेलेली जमिन परत मिळवली. आईने खूप कष्ट केले पण त्याचे खर्‍या अर्थाने चीज झाले.
    जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने गणेशचा सत्कार आयोजित केला तेव्हा या सत्काराची खरी मानकरी माझी आई आहे, सगळं श्रेय आईला जाते हे तो अभिमानाने सांगत होता. आम्ही खूप हलाखीची परिस्थिती अनुभवली आहे.
    तिमीरातूनी तेजाकडे येण्याचा आमचा हा प्रवास आईमुळे, तिच्या मेहनती मुळे शक्य झाला हे सांगताच सुमित्रा बाईंसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.

    कथेतील परिस्थिती ही आपल्या देशात सत्य परिस्थिती आहे. कर्ज बाजारी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते. म्हणायला सोपे असले तरी अशा हलाखीच्या परिस्थितीत मेहनत करून एकटीने मुलांना सबल, सुशिक्षित बनविणे खरंच कौतुकास्पद आहे.
    शेतकऱ्यांची परिस्थिती ही विचार करण्यासारखी आहे. शिक्षणा अभावी दलाल अथवा इतर कुणाकडून शेतकर्‍यांची फसवणूक होते, योग्य दर, हक्काचा मेहनतीचा पैसा त्यांना मिळत नाही. अशा वेळी गणेश सारखा  प्रमाणिक सल्लागार, मदत करणारा कुणी असेल तर त्याचे खरंच केले तितके कौतुक कमीच आहे.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • तिमीरातूनी तेजाकडे..भाग १

    पाच वर्षांचा गणेश आणि इवल्याशा सव्वा वर्षाच्या दुर्गाला सुमित्राच्या पदरात टाकून शामरावांनी आत्महत्या केली.
    जेमतेम दोन एकर शेती, त्यात ही पिके पाहिजे तशी आली नाही, डोक्यावर कर्ज. कसं बसं दोन वेळा पोटात अन्न जाई. शेताजवळ एका झोपडीत गणेश, दुर्गा, शामराव, सुमित्रा आणि म्हातारी आजी राहायचे. शामराव अचानक गेल्याने घरावर संकट कोसळले. सुमित्रा झाल्या प्रकाराने हादरली, काय करावे काही सुचेना. आजी आणि पदरात लहान मुलं अशा वेळी संसार कसा सांभाळावा या विचाराने सुमित्राला रात्र रात्र झोप लागेना. कुणाकडून मदतीची अपेक्षा नव्हतीच. भेटायला येणारा प्रत्येक जण सांत्वन करीत असे पण शेवटी ज्याचे त्यालाच बघावे लागते.
    सुमित्रा मनातून खचून गेली असली तरी डोळ्यापुढे दोन लेकरांना बघून पदर खोचायला पाहिजे हे तिने ओळखले. शामरावांना ती शेतीच्या कामात मदत करत असे पण एकटीने गाडा सांभाळायचा म्हणजे कठीणच.
    गावच्या सरपंचांनी मदत करून सरकारकडून लाख रुपयांची मदत जाहीर केली. तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारत कसे बसे ते लाख रुपये पदरात आले‌ पण कर्ज ही डोक्यावर होतेच. बघता बघता पावसाळ्याची चाहूल लागली. गणेश ला गावच्या शाळेत दाखल केले.
    सुमित्रा ने दोन एकर पैकी एक एकर जमीन कर्ज फेडण्यासाठी विकली. उरलेल्या एक एकरात पालेभाज्या, फुलांची लागवड केली. आलेली पालेभाजी बाजारात विकून थोडा फार पैसा मिळायला सुरुवात झाली. गाडी जरा रुळावर येत आहे असं चिन्ह दिसत असतानाच मुसळधार पावसामुळे होतं नव्हतं सगळं वाहून गेल. सुमित्रा पुन्हा एकदा काळजीत पडली पण हिम्मत हारली नाही.
    पावसाचा खेळ सुरू होताच पण शक्य ते प्रयत्न करत वांगी, मिरची, टमाटर, पालक, कोथिंबीर, भेंडी अशा‌ अनेक भाज्या शेतातून घ्यायला सुरुवात केली.
    झेंडूच्या फुल झाडांची लागवड केली, श्रावण महिन्या पासून व्रत, सणवार असल्याने फुलांची मागणी चांगली असते तेव्हा भाज्या आणि झेंडूच्या फुलांची जोरावर कसं बसं घर चालवलं. वेळ मिळेल तसा आजूबाजूच्या शेतावर कामाला जायची. मुलगा गणेश आणि आजीच्या मदतीने तालुक्यातील बाजारात भाज्या , फुल विकायची. दुर्गा लहान असल्याने तिला सांभाळून घर चालवताना, संसाराचा गाडा चालवताना सुमित्राला खूप खस्ता खाव्या लागल्या. मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडही सुरू. अशातच म्हातारी आजी आजारी पडली आणि देवाघरी गेली. नाही म्हंटले तरी दुर्गाला सांभाळून बाजारात फुले, भाजी विकायला आजीची चांगली मदत व्हायची.
    आजीच्या जाण्याने पुन्हा एकदा सुमित्रा पोरकी झाली. गणेश त्यावेळी चौथ्या वर्गात होता. आता घरी सगळी जबाबदारी सुमित्रा वर पडली. गणेशला आईची धावपळ दिसत होती, जमेल तशी मदत तो करायचा. अशातच त्यावर्षी ओल्या दुष्काळाने हाती काही लागले नाही आणि होती नव्हती ती एक एकर जमीन सुद्धा विकावी लागली. आता दुसर्‍यांच्या शेतात मिळेल ते काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय सुमित्रा करू लागली पण काम ठराविक वेळीच मिळायचे तेव्हा इतर वेळी कुणापुढे हात पसरायला वेळ येवू नये म्हणून मिळालेल्या पैशातून जरा बचतही करावी लागे. दोन लहान मुलांना घेऊन एकटीने जगणं सोपं नाही हे तिला क्षणोक्षणी जाणवत होते.

    क्रमशः

    कथेतील परिस्थिती ही आपल्या देशात सत्य परिस्थिती आहे. कर्ज बाजारी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते.
    सुमित्रा मुलांचा भार सांभाळत त्यांचे आयुष्य सुखी करण्यासाठी जी धडपड करते, त्याची ही कहाणी.

    पुढे सुमित्रा संसार, मुलांची जबाबदारी कशी सांभाळते हे लवकरच जाणून घेऊया पुढच्या भागात.

    © अश्विनी कपाळे गोळे