Category: Uncategorized

  • गण्या (काल्पनिक हास्य कथा)

    मोजक्याच वस्तीचे एक लहानसे गाव होते, गावात सगळ्यांचा लाडका असा एक गण्या नामक तरूण राहायचा. त्याचं नाव गणेश पण सगळे लाडाने गण्या म्हणायचे. हा गण्या होता सांगकाम्या, जरा मंद बुद्धीचा शिवाय रातांधळा. गण्या अगदी लहान असताना वडील देवाघरी गेल्याने आई आणि गण्या दोघेच घरी असायचे. गावालगत असलेल्या दोन एकर शेतात मेहनत करून गण्याच्या आईने त्याला लहानाचे मोठे केले. गण्या जरा मंदबुद्धी त्यात वडील नाही म्हंटल्यावर आईला त्याला वाढवताना चांगलीच कसरत करावी लागली.

    मोठा झाला तसा गण्या आईला शेतीच्या कामात मदत करायचा. आता तो वयात आला तसा त्याच्या आईला गण्याच्या लग्नाची काळजी वाटत होती. आपण गेल्यावर गण्या एकटा कसा राहणार या विचाराने आई हैराण. गावात कुणाकडून तरी कळाले की जवळच्या गावात एक मुलगी आहे, पण ती मुकी आहे. आईने माहीती काढली आणि गण्या च्या लग्नाचा प्रस्ताव मुलीकडे पाठविला गेला.

    मुलगी तशी गुणी, हसरा चेहरा, निरागस रुप, बोलता येत नसल्याने कुणीही काही बोलले की फक्त हसायची, ऊ..आ..करायची. बोलता येत नसल्याने तिचं लग्न काही ठरत नव्हतं त्यामुळे गण्या विषयी सत्य माहीत असूनही त्याला मुलीकडच्यांनी पसंत केले.

    नातलगांच्या मदतीने गण्याचे तिच्याशी लग्न लावून दिले गेले.

    आई त्याला संसारात कसं वागायचं सांगत असे,पण गण्या मात्र कधी स्वतःच डोकं लावून पंचाईत करून घ्यायचा😃

    एकदा लग्नानंतर गण्याला सासुरवाडीला बोलावले गेले, गण्या बायकोला घेऊन तिथे गेला. गण्याच्या वागण्यामुळे सासरी त्याचा मान कमी होऊ नये म्हणून आईने त्याला बर्‍याच सुचना दिल्या.

    ठरल्याप्रमाणे गण्या सासुरवाडीला पोहोचला. सासूबाई पाणी घेऊन आल्या पण गण्या काही बैठकीत दिसत नव्हता, सासुबाईनी आवाज दिला “जावई बापू, कुठे आहात? पाणी आणलं होतं” तितक्यात आवाज आला “कुहुकुहू कुहूकुहू”.

    सासूबाई आवाज ऐकून इकडे तिकडे आवाजाच्या दिशेने बघते तर जावई बापू बैठकीत ठेवलेल्या चार फूट कपाटाच्या वर जाऊन बसलेले , कारण गण्याला आईने सांगितले होते, तू त्या घरचा जावई आहे तेव्हा जमिनीवर बसू नको, जरा उंचावर दिवाण किंवा उंच ठिकाणी बस. बैठकीत दोन खुर्च्या आणि एक कपाट होते, मग कपाट खुर्ची पेक्षा उंच म्हणून तो कपाटावर बसला, त्यात आईने हेही सांगितले होते की सासूबाई सासर्‍यां सोबत मोठ्याने ओरडत बोलू नको तर नाजूक आवाजात बोल मग गण्या कोकीळेच्या सुरात कुहुकुहू करत होता.

    असो, सासुबाईंने आश्चर्याने गाण्याकडे बघितले, खाली उतरायला लावले आणि खुर्चीत बसवले. लाकडी खुर्चीत गण्या मांडी घालून बसला ( कारण आईने जरा ऐटीत बसायला सांगितलं होतं ) आणि पाणी प्यायला. तितक्यात सासरेबुवा आले तसाच आईने सांगितल्याप्रमाणे त्यांचा आशीर्वाद घ्यायला गण्या उठायला लागला, मांडी घालून बसल्याने एका पायाचा गुडघा खुर्चीच्या हातात अडकला, काढायचा प्रयत्न करताना गण्या खुर्चीसह सासरे बुवांच्या पायाजवळ जाऊन पडला.

    कितीही सांभाळावे म्हंटलं तरी गण्याची आल्या पासून सारखीच अशी फजिती झाली होती.

    पाहता पाहता सायंकाळ झाली, सहा नंतर गण्याला काहीच दिसत नसे, जन्मताच रातांधळेपणा.

    सासूबाईने ताट वाढले , गण्या आणि सासरे बुवा जेवायला बसल्यावर गण्याला मात्र ताटातले काही दिसत नव्हते. घ्या बापू, सुरू करा म्हणताच गण्याने ताटाचा अंदाज घेतला आणि जेवायला सुरुवात केली. मध्येच चूकून एखादा घास सासरे बुवांच्या ताटातून खाल्ल्या जायचा हे त्याला कळतही नव्हते. शेवटी वैतागून सासरे बुवा जरा लांब सरकून बसले आणि जेवण केले. जेवतानाही सासूबाई आग्रह करायच्या की खीर पूरी खा हा जावईबापू, हो हो म्हणत जे हाती येईल ते संपवत गण्या जेवला,  धक्क्याने पेल्यातील पाणीही सांडले(घरी रात्री आई गण्याला स्वतः हाताने खावू घालायची त्यामुळे आज त्याची चांगली फजिती झाली.)

    रात्री गण्याची झोपण्याची व्यवस्था दिवाणखान्यात केली होती. गण्या आडवा झाला तसाच डाराडूर झोपी गेला. मध्यरात्री गण्याला जाग आली तसाच लघवीला जाण्यासाठी तो उठला. बाहेर अंगणात न्हाणीघर आहे हे त्याला माहित होते पण आता अंधारात शोधायचं कसं म्हणून आजुबाजूला तो काहीतरी चाचपडत होता. तितक्यात एक दोरखंड त्याच्या हाती लागला. गण्या ने लगेच आपले सुपीक डोके चालवले. दोरखंडाचे एक टोक त्याने पलंगाच्या पायाला बांधले आणि दुसरे टोक कमरेला, म्हणजे अंगणातील न्हाणीघरातून परत येताना दोरखंडाच्या मदतीने सहज पलंगावर येता येईल असा त्याचा विचार होता. गण्या दार उघडून दोरखंडाच्या मदतीने अंगणात गेला आणि न्हाणीघर शोधत असताना तो चुकून गाई म्हशींच्या गोठ्यात शिरला .‌..गण्याच्या हाताचा स्पर्श एका म्हशीला होताच म्हशीने जोरात लाथ मारली आणि गण्या मागे फेकला गेला , नशिब बाजुच्या विहीरीत जाऊन नाही पडला….जोरदार धक्क्याने गोठ्याबाहेर पडला तसाच गण्या मोठ्याने किंचाळत ओरडला, “अगआय…गं…..मेलो…..रे…..देवा…”
    त्याच्या ओरडण्याने सासरे जागे झाले आणि बघतात तर जावईबापू पलंगावर नाहीत… पलंगाच्या पायाला बांधलेला दोरखंड बघून दोरखंडाच्या दिशेने सासरे बुवा अंगणात गेले आणि बघतात तर काय गण्या कमरेला हात लावून अंगणात आडवा पडलेला…सासरे बुवांनी त्याला उचलले, न्हाणीघरात घेऊन गेले आणि नंतर सुखरूप पलंगावर आणून झोपवले.
    सासरे बुवा म्हणाले, “अहो बापू, लघवीला जायचं तर मला हाक मारायची ना…उगाच म्हशीचा मार खाल्ला तुम्ही…”
    गण्या त्यावर काहीही बोलला नाही.

    दोघांच्या आवाजाने सासूबाई आणि गाण्याची बायको सुद्धा जाग्या झाल्या. जावईबापूंना काही लागलं वगैरे तर नाही ना याची खात्री करून परत सगळे झोपी गेले.

    रात्री कसाबसा झोपून सकाळी तो परत जायला निघाला. मुलीला दोन दिवस माहेरी राहू द्या, मी नंतर पोहोचवून देईल असं सासर्‍यांनी सांगितल्यावर गण्या नाश्ता करून पायवाटेने परत एकटाच घरी जायला निघाला. वाटेत त्याच्या कानावर शब्द पडले “जे झालं ते खुप चांगलं झालं, असं नेहमीच होवो”.

    गण्याला ते शब्द मजेशीर वाटले मग गण्या ते पुटपुटत पुढे निघाला. समोरून कुणाची तरी अंत्य यात्रा येत होती. गण्याचे बोलणं ऐकून त्यातला एक जण थबकला आणि म्हणाला काय म्हणालास 😡

    गण्या भोळा भाबडा, तो जोरात बोलला  “जे झालं ते खुप चांगलं झालं, असं नेहमीच होवो”.

    ते ऐकताच त्या अंत्ययात्रेतील काही लोकांनी त्याला चांगला दम दिला आणि म्हणाले असं बोलला तर बघ. अरे जे झालं ते खुप वाईट झालं, असं कधी न होवो.

    मग गण्या हे नवीन वाक्य पुटपुटत पुढे निघाला तर काही अंतरावर पोहोचताच त्याला एका लग्नाची वरात भेटली, गण्या ला वाटलं आता त्यांना आपण चांगलं बोललो तर बरं वाटेल तेव्हा तो हसत म्हणाला “असं कधी न होवो, जे झालं ते खुप वाईट झालं.” वरातीत असं अशुभ बोलला म्हणून गण्याला वरातीतल्या लोकांनी चांगला चोप दिला 👊👊

    गण्या कसा बसा घरी पोहोचला. आईला बिलगुन रडु लागला, म्हणाला ” आय, आता म्या कधीबी सासरवाडीला जाणार नाय. लय फजिती झाली बग…” 😄😄😄😄😄😆😆😆

    समाप्त!!!

    कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजन म्हणून वाचावी.

    कथेविषयी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

  • आठवणी पावसाच्या… बालपणीच्या…

    “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा…
    पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा…”

    हे बालगीत ऐकण्यात अख्खं बालपण गेलं. आजही पावसाळ्याचे वेध लागले की हिच कविता मनात कुठेतरी गुणगुणायला होते, आता तर माझ्या लहान मुलीमुळे परत एकदा त्या बालपणात शिरून हि कविता ऐकायला, बघायला मज्जा येते.

     रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस आला की येणारा मातीचा तो सुगंध, त्याला कशाचीही तोड नाही. बालपणी पहिला पाऊस बघताच म्हणावं वाटायचं,

    ” ये आई , मला पावसांत जाउं दे …
    एकदाच ग भिजुनी मजला चिंब चिंब होउं दे…..
    मेघ कसे हे गडगड करिती , विजा नभांतुन मला  खुणविती….
    त्यांच्यासंगे अंगणांत मज खुप खुप नाचुं दे….”

    पहिला पाऊस आला की अगदी वातावरणाला शांत करत एक प्रसन्न सुवास दरवळत असतो.

      पावसाचं आणि आठवणींचं एक वेगळंच नातं आहे ना, कुणाला आठवतं पहिलं प्रेम तर कुणाला शिरतं बालपणीच्या आठवणीत.

      पाऊस आला की डोळ्यापुढे येतात गरमागरम भजी, पोटॅटो वेजेस, गाडी वर मिळणारं मक्याचं कणिस म्हणजेच बुट्टा आणि कडक चहा, काॅफी. त्यात आपली जवळची व्यक्ती सोबत असेल तर त्यात एक वेगळीच मजा. मनात मग गुणगुणायला होतं,

    “आला आला वारा संगे पावसाच्या धारा…
    पाठवणी करा सया निघाल्या सासुरा…”

      बालपणी पाऊस म्हंटलं की शाळेत अगदी मज्जाच मज्जा. शिक्षकांच्या शिकविण्याकडे कुणाचही लक्ष लागत नसे, वर्गातून बाहेर पाऊसाचं निरीक्षण करण्यात वेगळाच आनंद मिळायचा. मग वर्गाच्या बाहेर वर्‍हांड्यात उभे राहून तळहातावर पावसात पाणी टिपण्याचा प्रयत्न आनंदाने सुरू. शाळेतून घरी जाताना पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी होती. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत वह्या पुस्तके गुंडाळून पाठीवरच्या दप्तरात ठेवायचे म्हणजे ते भिजण्याची काळजी नको आणि मग छत्री असूनही बिनधास्त पाणी उडवत घरी जाण्याचा आनंद म्हणजे अगदी दुर्लभ अनुभव.

    भिजून घरी गेल्यावर आईने रागवले की लाडात येऊन पटापट कपडे बदलत आई जवळ काही तरी छान पदार्थ बनवण्यासाठी आग्रह करायचा आणि आईला रागावली असली तरी भिजून अंगात थंडी भरली असेल म्हणत असला तरी मस्त गरमागरम काहीतरी खाऊ आई बनवायची ते खाण्याची मजा काही औरच.

    शाळा कॉलेज मध्ये असताना सकाळी संततधार पाऊस असला की सुट्टी नक्कीच ठरलेली. मग दिवसभर घरातल्या घरात बसून झोपून का असेना.
    त्यात मग मस्त गाणी कानावर पडली की आनंदी आनंद.

    पावसात ट्रेकिंगची मज्जा म्हणजे स्वर्गसुख. निसर्गाच खुललेलं सौंदर्य बघायला भटकंती करण्यात वेगळीच मजा.
    तारुण्यात पावसाची वेगळीच ओढ, मित्र मैत्रिणी सोबत मस्त कुठे तरी फिरण्याचा बेत आखून मनसोक्त भिजायचे, मज्जा मस्ती करायची. एखादा ट्रेकिंग ग्रुप जॉईन करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला जायचं, धबधब्याखाली भिजायचं आणि त्या आठवणी फोटो सोबतच मनात टिपून ठेवायच्या.

    आता कधी पाऊस आल्यावर आॅफिसला दांडी मारली की अगदी शाळेची आठवण येते. त्यात मात्र तो आधी सारखा आनंद नाही शिवाय जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर पावसाची मज्जा घेण्याचा जणू विसरच पडला आहे. बाहेर चिकचिक आहे तेव्हा सुट्टी असली तरी घरातच बसलेले बरे असं काहीसं झालंय आता पण तरीही पहिला पाऊस पडताच मनोमन  एक समाधान हे मिळतेच.

    नवविवाहित जोडप्याला तर पहिला पाऊस अतिशय रोमांचक अनुभव असतो. अविस्मरणीय दिवस असतात ते.

    काहींना पावसात आपलं प्रेम आठवतं. त्याच्या/तिच्या गोड प्रेमळ आठवणी. कुणी विरह आठवून रडकुंडीला येत जणू पावसाच्या निमीत्ताने रडून मन मोकळं करतं.

      बळीराजा तर पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, त्यांचं अख्खं आयुष्य या निसर्गावर तर अवलंबून असतं. सुरवातीला पाऊस हवाहवासा वाटतो पण पेरणी झाल्यावर अतिवृष्टी झाली की त्याच्या मनाला हुरहूर लागून राहते. काही ठिकाणी महापूर येत संसार मोडतात, स्थलांतर होतं तर कधी कुणाला जीव गमवावा लागतो. कुणी पावसाचा आनंद घेत उत्साहात असतो तर कुणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची काळजी करत.

      लहानपणी पावसाची मज्जा वाटायची पण आता मात्र पाउस आला की आॅफिसमधून लवकर काम संपवून निघण्याची गडबड कारण पाऊस आला की ट्राफीक जाम, सगळीकडे पाणीच पाणी, मग घरी पोहोचायला उशीर, या सगळ्यात पावसाचा आनंद घेणे बाजूला राहून जाते. पाऊस आला की इलेक्ट्रिसिटी बंद, अगदी ठरलेली गम्मत. मग घाईघाईने इलेक्ट्रिसिटी असे पर्यंत घरातील महत्वाची कामे आवरण्याची लगबग त्यात कपडे वाळविण्याची काळजी.

    वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पावसाच्या वेगवेगळ्या आठवणी मनात आपसूकच कोरल्या जातात. कधी एकटं बसून चहा कॉफी घेत पाऊस बघत बसलं की आठवतात या सगळ्या पावसातील गमतीजमती आणि मग चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आपसूकच उमटतं. 

    तुमच्या आयुष्यात पावसातल्या अशा आठवणी असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा.

    – अश्विनी कपाळे गोळे

  • फसवणूक…( एक सत्य कथा )

    काही महीना पूर्वीची गोष्ट, सकाळी उठल्यावर फोन बघितला तर एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता की “तू आज फ्री आहेस का. मी तुला भेटायला यायचे म्हणते. “मेसेज वाचल्यावर मला आनंद गगनात मावेनासा झाला कारण तब्बल सहा वर्षांनी आज आम्ही भेटणार होतो. बाळ झाल्यामुळे मी तशी घरीच असायची, लगेच तिला रिप्लाय केला “अगं नक्की ये. मी घरीच आहे, वाट पाहते मी, ये लवकर , एकटीच येत आहे की जीजू, बाळ कुणी सोबत आहे आणि हा जेवायला घरीच या मग तुम्ही सगळे”

    थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला “ओके. १२:३०-१ पर्यंत येते. मी एकटीच येत आहे.”

    इतक्या वर्षांनी मैत्रिण भेटणार म्हणून उत्साहात पटापट आवरून घेतले. कधी एकदा तिला भेटते अशी मनस्थिती झाली. लक्ष सतत घड्याळाकडे. बाळाचं आवरून बाळ झोपी गेले आणि मी तिच्या येण्याची वाट पाहत होते.

    ठरल्याप्रमाणे ती आली आणि एकमेकींना बघून डोळ्यात आनंदाश्रु आले.

    मी विचारले “मुलाला घेऊन आली असतीस तर मला त्याला भेटता आले असते, त्यावर ती म्हणाली “अगं मी त्याला आईकडे म्हणजेच माझ्या माहेरी ठेवले आहे त्याला. महीन्यातून एकदा भेटुन येते, खूप आठवण आली की मग मध्ये कधीही जाते. मी नोकरी शोधत आहे, चांगली नोकरी मिळाली की मुलाला इकडे घेऊन येयील.”

    तिचं हे उत्तर ऐकून मला जरा विचित्र वाटले. पुढे काही बोलण्याआधीच ती म्हणाली “मला खूप भूक लागली आहे, आपण आधी जेवण करू नंतर गप्पा मारत बसू.”

    पटापट जेवणाची तयारी करून जेवायला बसलो तेव्हा सहज मी विचारले”जिजू काय म्हणतात” .

    ती म्हणाली ” आम्ही सोबत राहत नाही, आता दोन वर्षे होतील.”

    हे ऐकून मला धक्काच बसला.

    कारण विचारले असता कळाले की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिले, त्याने लग्न केले फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी, घर सांभाळायला बायको मिळेल म्हणून. शिवाय शारीरिक भूक भागवायला अजून एक हक्काची व्यक्ती मिळणार होती. तो फक्त हव्यासापोटी तिला जवळ घेत असे, प्रेमाचे शब्द तर दुर पण काही बोलायलाही त्याला वेळ नसे. सुरवातीच्या दिवसात तिला त्याच्या प्रेयसी बद्दल माहिती नव्हते पण दररोज त्याचे उशिरा येणे, सुट्टिच्या दिवशीही कामाचं कारण सांगून दिवसभर बाहेर असणे तिला विचार करायला भाग पाडत होते. त्याच्या कपाटाला हात लावलेला त्याला चालायचे नाही, बाहेर पडताना कपाट लॉक करून चावी घेऊन तो बाहेर पडायचा. तिने नोकरी करू‌ नये असं त्याला वाटायचं म्हणून तिला गुंतवून ठेवण्यासाठी तिची इच्छा नसतानाही तिला आई होण्यास भाग पाडले. कधीही तिला बाहेर फिरायला घेऊन गेला नाही तर मित्र मैत्रिणींना तिची ओळखही करून दिली नाही. घरातून बाहेर पडू नये म्हणून घरात एक रुपयाही ठेवत नसे, घराची चावी घरी ठेवत नसे.

    या सगळ्यात लग्ना नंतरच्या काही महीन्यातच जेव्हा तिला ती आई होणार ते कळाले तेव्हा काही काळ तिला वाटले की बाळ नकोच पण या सगळ्यात होणा-या बाळाची काय चूक शिवाय बाळ झाले की हा बदलेल म्हणून तिने बाळ होऊ देण्याचे ठरवले. आई होण्याचा आनंद नऊ महीने अनुभवतानाच तिला त्याच्या प्रेयसी बद्दल कळाले आणि तिला मोठा धक्का बसला, त्याला विचारले असता त्याने या सगळ्याची कबूली दिली पण घरी याविषयी सांगितले तर जीवे मारायची धमकी दिली. ती गरोदर होती शिवाय आई-वडीलांना सांगितले तर सगळे काळजी करतील, लहान बहीणीचे काय होणार या विचाराने ती सगळं सहन करत राहिली.

    गरोदरपणातही तिला वेळेत डाॅक्टरकडे घेऊन जात नसे, फळं, आवडीचा खाऊ तर‌ दूरच. त्याला काही बोलले की सरळ मारायला धावायचा.

    नविन लग्न झाल्यावर मुलींचे किती स्वप्न असतात, प्रेम यात सगळ्यात महत्वाचे असते पण तिला त्याचे प्रेम कधी अनूभवायलाच मिळाले नाही. लग्न झाल्यावर मुंबईसारख्या शहरात ती एकटी पडली होती. गरोदरपणात प्रवास करायचा नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितले यामुळे सतत घरात बसून, कुणी बोलायला नाही अशा परीस्थितीत नऊ महिने काढले. नववा महिना संपत येत असताना तिची आई तिच्या जवळ राहायला आली. त्याआधी अधूनमधून कुणी घरचे भेटायला आले तरी चेहर्यावरील दुःख लपवुन ती आदर सत्कार करायची. आई जवळ मन‌ मोकळे करावे असे तिला खूपदा वाटले पण सगळ्यांना काळजी लागून राहिल म्हणून ती गप्प बसायची. आता आई बाळ होई पर्यंत जवळ असल्याने हळूहळू आईच्या लक्षात आले की दोघांच नातं दिसतं तसं नाही, आपली मुलगी काही तरी लपवते आहे. शेवटी आईचं मन ते, आईने खूप विचारल्यावर मुलीचा बांध फुटला, वर्ष भर सहन केलेला अन्याय, दुःख तिने आईला सांगितले. लवकरच बाळाचें आगमन झाले , बाळाला बघून त्याच्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आईलाही लागून होती पण त्याला बाप झाल्याचा काही आनंद तितका झालेला नव्हता. औपचारिकता म्हणून तो सोबत होता. मुलाला जवळ सुद्धा घ्यायला टाळाटाळ करायचा. सासू सासर्‍यांना तिच्या आईने दोघांच्या नात्याविषयी सांगितले तर त्यांची भूमिका म्हणजे आम्हाला काही माहिती नाही आणि तो आमचं ऐकत नाही.

    अशा परिस्थितीत स्त्रीने काय करावे?

    तिच्या आईबाबांनी या सगळ्यात तिला खूप साथ दिली. तिला माहेरी घेऊन गेले शिवाय खंबीर पणे लढायला शिकवले. बाळ एक वर्षाचं झालं तेव्हा तिने काही कोर्सेस करून नोकरी शोधायला सुरुवात केली. मुलाला तिने आई वडिलांजवळ ठेवले. आलेल्या परीस्थितीशी झुंज देत पुढे जात राहायचे हे तिला आईने शिकवले, तिचा आत्मविश्वास वाढवला.

    लवकरच तिला चांगली नोकरी मिळाली आणि झालेल्या अन्यायावर मात करून तिने आपलं आणि मुलाचं आयुष्य सुखी बनवण्याचा प्रयत्नाला सुरवात केली. मला तिचा खरंच खूप अभिमान वाटतो.

    स्त्रीने जीवनात खंबीर होण्याची खरंच खूप गरज आहे. अन्याय सहन न करता आवाज उठवणे गरजेचे आहे. अत्याचाराला बळी न पडता, स्वत: साठी उभे राहिले तर अन्याय नक्कीच कमी होईल.

    यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे