कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघणारच होती तितक्यात मोहन म्हणजेच तिचा पती तिची वाट अडवून म्हणाला, “माहेरी जायला निघाली आहेस खरी पण रिकाम्या हाताने परत येणार असशील तर मुळीच घरी येऊ नकोस. भावांकडून घराचा हिस्सा घेतल्याशिवाय परत आलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही. ”

नलिनीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मोहनचे बोलणे ऐकून त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ती गपगुमान माहेरी जायला निघाली. वाटेत तिचे अश्रू अनावर झाले आणि ती भूतकाळात हरवली.

नलिनी सुखवस्तू कुटुंबात लाडाकौतुकात वाढलेली. आई वडील दोघेही नोकरी करायचे. तीन भावंडे, त्यात ही सगळ्यात लहान. दोन्ही भावांची आणि आई वडिलांची लाडकी लेक. नलिनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिच्या आईचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आईच्या अशाप्रकारे अचानक झालेल्या निधनामुळे अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, नलिनी चे वडील पूर्णपणे खचून गेलेले. मुलांचे शिक्षण पूर्ण होतंच आलेले होते.
“आता लवकरच तिन्ही मुलांचा थाटलेला आनंदी संसार बघितला की आपले आयुष्य मार्गी लागले म्हणून समजा. ” असं मोठ्या उत्साहाने म्हणणारी आई बाबांना सोडून गेल्यावर हा संसार एकट्याने कसा सांभाळावा हाच प्रश्न बाबांना पडलेला.
त्यातून स्वतः ला कसंबसं सावरून बाबांनी मुलांना धीर देत आईची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात नलिनीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले. मुलेही आता शिक्षण पूर्ण करून काही तरी कामधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. बाबांनी दोन्ही मुलांना लहानसहान व्यवसायात गुंतवले. आता नलिनी साठी साजेसा मुलगा मिळाला की तिचं लग्न लावून द्यायच म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होणार असाच काहीसा विचार केलेला नलिनीच्या बाबांनी. बाबा आणि दोन्ही भावांनी नलिनी साठी वर संशोधन सुरू केले. आई गेल्यापासून नलिनीला फार एकटेपणा जाणवायचा. भाऊ आणि बाबा वेळेनुसार आपापल्या आयुष्यात गुंतलेले पण नलिनी मात्र आईच्या आठवणीने दररोज रडायची. बाबांना तिची अवस्था कळत होती. तिची शक्य ती काळजी घेत, भरभरून प्रेम देत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करत होते पण म्हणतात ना आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असंच काहीसं झालेलं.

आता नलिनीला तिच्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा मिळावा , तिने संसारात रमून आनंदी राहावं हीच बाबांची इच्छा होती. पण झालं मात्र काही तरी वेगळंच.

नलिनी साठी बरेच स्थळ बघितल्यावर मोहनचे स्थळ आले. वरवर बघता एकंदरीत छान वाटलेले आणि मोहन सोबत नलिनी चे लग्न झाले. लग्नानंतर नव्यानवलाईचे नऊ दिवस संपले तसेच मोहनने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. मोहन व्यवसाय करायचा तेव्हा नफा तोटा आलाच पण कधी फार काही नुकसान झालेच तर त्याची फार चिडचिड व्हायची मग सगळा राग तो नलिनी वर काढायचा. दारूच्या नशेत तिच्यावर हातही उचलायचा. आईच्या मायेला पोरक्या झालेल्या नलिनीच्या नशिबात सासरीही सुख नव्हतेच. वडीलांना सांगितले तर त्यांना काळजी वाटेल म्हणून तिने वडीलांना याबाबत सुरवातीला काही सांगितले नाही. पण दिवसेंदिवस मोहन तिला फार त्रास द्यायला लागला. तुझ्या माहेरचे माझा मानपान करत नाहीत, दिवाळसणाला काही दागिना नाही केला म्हणून तिला सतत टोमणे मारायचा. मोहन सारख्या लोभी व्यक्तीला सासर कडून मोठमोठ्या अपेक्षा असायच्या पण आई नसताना बाबा कसं घर सांभाळत आहेत हे नलिनी बघत आलेली त्यामुळे ती माहेरी कुणालाही मोहन विषयी काही सांगत नव्हती. अशातच तिला दिवस गेले आणि लवकरच ती एका मुलाची आई झाली. गरोदरपणात सुद्धा मोहन‌ असाच वागला. माहेरी आई नसताना तिचे बाळंतपण कोण करणार याचा जराही विचार न करता त्याने तिला माहेरी नेऊन ठेवले. बाबांनी कामवाल्या मावशीच्या मदतीने तिची नीट काळजी घेतली. भाऊ सुद्धा सोबतीला होतेच. या दरम्यान नलिनीच्या माहेरी येऊन मोहन उगाच काहीतरी तमाशा करायला लागला. तेव्हा तिच्या दोन्ही भावांनी त्याला चांगलाच दम दिला पण नलिनी मध्ये पडून तिने मोहनला परत जायला सांगितले. बाळंतपणानंतर सासरी गेल्यावर तिची एकटिची चांगलीच तारांबळ उडत होती. सासुबाई वयस्कर त्यामुळे त्यांची काही मदत होणे शक्य नव्हते. बाळ, घर आणि मोहनचा असा चिडखोर स्वभाव , त्याचा छळ सहन करणे असंच तिचं आयुष्य झालेलं.

माहेरी आता बाबांनी दोन्ही भावांची लग्न उरकले. दोघेही भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झालेले. बाबा असताना‌ ती हक्काने माहेरी जाऊन राहायची. चार दिवस का होईना पण सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात यायचे. काही वर्षांतच आजारपणाने बाबा देवाघरी गेले आणि तिचं माहेर संपल्या सारखे झाले. दोन्ही भाऊ वहीनी संसारात गुंतल्याने तिच्याकडे कुणी फारसे लक्ष देत नव्हते. भावाकडे पाहुणी म्हणून आली तरी दोन‌ दिवसांपेक्षा जास्त तिला आता राहावं वाटत नव्हतं. सासरचे, नवर्‍याचे प्रश्न भावाजवळ मांडले की वहिनीला आवडत नव्हते. त्या म्हणायच्या आपला संसार आपण बघावा, आम्हाला मध्ये घेऊ नये. भावाचे मन दुखत असले तरी वहिनी पुढे दोघेही काही बोलेना.
एकदा तर मोहनने तिला दारू पिऊन मारहाण केली आणि घराबाहेर काढले. रडत रडत ती माहेरी आली . मोठ्या भावाला झाला प्रकार सांगितला तर तो म्हणाला, “नलू, आता हे नेहमीचं झालंय. एक तर तू त्याला सोडून दे नाही तर तुझं तू बघून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसाच हा मोहन काही केल्या सुधारत नाही. आम्हाला सांगून काय फायदा, तुझ्या नशिबात हेच असेल. सहनशक्ती नसेल तर आत्महत्या कर पण सारखं तेच रडगाणे गाऊ नको. ”

भावाचे हे असे बोलणे ऐकल्यावर ती मनोमन खुप दुःखी झाली. एके काळी याच घरात लाडात , मोठ्या तोर्‍यात वावरणारी मी. आज मला माझ्याच या घरांत हा दादा आत्महत्येचा सल्ला देतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. अश्रू ढसाढसा वाहत होते पण तोंडातून शब्द निघत नव्हता. आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी ती मोहन‌कडे परतली.
सख्खा भाऊ असा बोलतोय मग इतर नातलगांना सांगून काय फायदा म्हणत ती आहे त्या परिस्थितीला सामोरे जात होती.

परत तेच मोहनचे टोमणे, मारझोड सहन‌ करत तिचा संसार सुरू होता. मुलगा भराभर मोठा होत होता. त्याच्यासाठी का होईना आपण जगायला हवं म्हणून ती सगळं सहन करत होती.
आपली जरा आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने लहान मुलांना शिकवणी, खाणावळ चालवणे यांसारखे उद्योग करण्याचा प्रयत्न केला पण मोहनने त्यावर पाणी फेरले. कुणाचा जराही पाठींबा नसताना स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे तिचे प्रयत्न असफल झाले.
भाऊ वहीणीचे इतके सगळे बरेवाईट अनुभव आले तरी बहीणीची माया म्हणून ती दर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला माहेरी जायची. वरवर का होईना पण एक दिवस तरी भाऊ बहिणीच्या नात्यात तिला गोडवा जाणवायचा. परिस्थिती वाईट आहे, आपले भाऊ वाईट नाही असाच विचार ती करायची. माहेरी आली की बालपणीच्या आठवणीत क्षणभर रमून जायची आणि आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमन करून भरल्या डोळ्यांनी सासरी परत जायची.

अशातच नलिनीचा मुलगा बारा वर्षांचा झालेला. आता मोहन‌चा व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नव्हता. त्याने नलिनीच्या मागे एक वेगळाच तगादा लावला. तो‌ तिला म्हणायचा की तुझ्या माहेरी आता आई वडिल तर नाहीत तेव्हा आहे ती मालमत्तेच्या वाटण्या करून तू तुझा हिस्सा माग.
तिन्ही भावंडांचे लग्न, शिक्षण , वडिलांचे आजारपण यात होते नव्हते ते पैसे गेले याची तिला जाणीव होती. होते फक्त त्यांचे राहते घर. त्यातही भावांचे मन दुखावून काहीही हिस्सा वगैरे नको होता पण मोहन मात्र हात धुवून तिच्या मागे लागलेला. मोहनला नाही म्हंटले की तो तिला मारझोड करत शिवीगाळ करायचा. या अशा वातावरणात मुलाला ठेवले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करून मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिने मुलाला होस्टेलमध्ये ठेवले होते.
दिवाळी झाल्यावर मुलगा होस्टेलमध्ये परत गेला आणि नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघाली.

ती मालमत्तेच्या वाटण्या, हिस्सा मागणे याविषयी भावांना काही एक बोलणार नव्हती. दोन दिवस आनंदात माहेरी राहून परत यायचे, मोहन‌ला काय करायचं ते करू दे पण मला हे दोन दिवस मिळणारं माहेरपण जपायला हवे. उगाच पैशावरून भाऊ बहिणीच्या नात्यात फूट नको असेच तिने मनोमन ठरवले होते.

रिक्षावाला म्हणाला, “ताई, इथेच उतरायचं ना तुम्हाला. ”
त्याच्या बोलण्याने ती विचारांमधून बाहेर आली, रिक्षातून उतरून घरात जाताना परत एकदा त्याच बालपणीच्या आठवणीत क्षणभर हरवली.

समाप्त!

अशी ही नलिनीच्या आयुष्याची व्यथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
खरंच आई वडील असेपर्यंत हक्काने वावरता येणारे माहेर त्यांच्या नसल्याने पोरके झाले की मनाची काय अवस्था होत असेल याचा अनुभव नलिनी प्रमाणे अनेक भगिनींना येतो.
अशा बर्‍याच मुली आपल्या आजूबाजूला आहेत ज्या मोहन सारख्या नवर्‍याचा छळ सहन करत संसाराचा गाडा चालवताना दिसतात. पैशासाठी, हुंड्यासाठी बराच त्रास सहन करतात.
छळ सहन करायला नको म्हणून अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी धडपड करताना कधी कधी मार्ग सापडत नाही. अशा वेळी आहे त्या परिस्थितीला शरण जातात.
यासाठी आई‌ वडिलांनी मुलींना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे, अन्याय सहन‌ न करता परिस्थितीशी लढायला शिकविणे खूप गरजेचे आहे.

याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

© अश्विनी कपाळे गोळे