Tag: प्रेमकथा

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३

    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे.

    दादाने अजितचा फोटो नंबर मिळवून त्याला कॉल केला आणि भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलावले, हेही सांगितले की याविषयी संपदाला काही कळायला नको. दादाच्या फोन नंतर अजित जरा घाबरलेला, त्याला बर्‍याच शंका मनात येऊ लागल्या, दादाला आमचं प्रेम प्रकरण माहीत झालं असेल आणि चिडून मला दम द्यायला तर बोलावलं नसेल ना, माझं सैराट मधल्या प्रिंस दादा सारखा तर वागणार नाही ना संपदाचा दादा अशे अनेक बरेवाईट विचार अजितला हैराण करू लागले. संपदाची परिक्षा संपेपर्यंत तिला त्रास द्यायला नको, डिस्टर्ब करायला नको म्हणून तिच्याशी मोजकेच बोलणे सुरू होते.
    जे होईल ते होईल पण आता दादाला भेटायचं, त्यांना संपदाचा हात लग्नासाठी मागायचा असं ठरवून ठरल्याप्रमाणे अजित दादाला भेटायला गेला.
    एका छोट्याशा हॉटेल मध्ये दोघे भेटणार होते, अजित पोहोचला आणि दादाला कॉल केला तर तो आधीच पोहोचला होता, एका टेबलावर अजितची वाट बघत होता. अजित जरा संकोचाने जवळ गेला, भेटला आणि दोघांनी मस्त चहा कॉफी मागवली. दादाने अजितचा गोंधळ ओळखला, त्याला शांत करत म्हणाला, ” अरे , तू इतका संकोचाने बोलू नकोस, मी सहज भेटायला आलो आहे. काळजी करू नकोस, मला तुझ्यावर राग वगैरे नाही. आता माझ्या बहिणीची आवड कशी आहे, मलाही कळायला नको का..? तू हवं तर एक मित्र म्हणून बोल माझ्याशी..”
    दादाच्या बोलण्याने अजितला जरा धीर आला.. पुढे अजित विषयी जाणून घेण्यासाठी दादाने गप्पा सुरू केल्या. अजितच्या प्रत्येक वाक्यात संपदा विषयीचं प्रेम दादाला जाणवतं होतं. आपल्या बहिणीची निवड योग्य आहे याची दादाला खात्री होत होती. दादाने अजितला विचारले, “तुझे आई बाबा संपदाला स्विकारतील का, जर त्यांना मान्य नसेल तर काय..”
    अजित त्यावर म्हणाला, ” माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक, माझं मन आतापर्यंत त्यांनी खूप जपलं, माझ्या आवडीनुसार शिक्षण, नोकरी, इतर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हा या लग्नाला नकार देतील असं वाटत नाही मला, आणि संपदा इतकी गुणी मुलगी आहे, गोड स्वभाव, निरागस आहे ती, तिला भेटल्यावर माझे आई बाबा नाही म्हणतील असं वाटतं नाही मला..तरी जर ते तयार नसतीलच तर मी खरंच पूर्ण प्रयत्न करेन त्यांची समजूत काढण्याचा.. काही झालं तरी संपदा शिवाय आयुष्य मी नाही जगू शकत दादा.. आमचं लग्न नाही झालं तर तिच्या जागी मी कुणाचाही आयुष्यभर स्विकार करणार नाही..लग्नच करणार नाही..”
    दादाला अजितचे बोलणे फिल्मी वाटत असले तरी त्यामागच्या भावना मात्र खर्‍या आहे हे जाणवले. लवकरच संपदाची परीक्षा संपली की आमच्या घरी मी तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी बोलतो असं दादाने म्हणताच अजित आनंदी झाला. मीही आई बाबांना याविषयी कल्पना देतो आणि पुढे घरच्यांना भेटायचं ठरवूया असंही अजितने सांगितलं. सगळं सूरळीत होत पर्यंत या विषयी संपदाला कळायला नको असं दादाने अजितला सांगितले.

    दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला, अजितला आता एक आशेचा किरण दिसला. काही दिवसांतच अजितने घरी संपदा विषयी सांगितले, आई बाबांना अजितच्या वागण्यातून संशय आला होता पण तो स्वतः हून सांगेपर्यंत काही विचारायचे नाही असं त्यांचं ठरलं होतं. आई बाबांनी संपदा विषयी सगळी चौकशी केली, फोटो बघितला. संपदाच्या घरच्यांनी पुढाकार घेतला तर आमची काही हरकत नाही हेही सांगितले. ते ऐकताच अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई बाबा इतक्या सहज तयार झाले म्हणताच अजितला सुखद धक्का बसला. आता प्रश्न होता संपदाच्या घरच्यांचा, त्यांनी पुढाकार घेतला तर संपदा कायमची माझी होणार म्हणून अजित नकळत अनेक स्वप्न रंगवायला लागला.
    इकडे दादाने आईला याविषयी कल्पना दिली पण असं प्रेमविवाह आपल्या कुटुंबात कुणाचाच नाही रे.. नातलग काय म्हणतील म्हणत आईने विषयाला वेगळं वळण दिलं. बाबांना हे मान्य होणार नाही, प्रेमविवाह तोही आंतरजातीय..नको आपण बाबांना नको सांगायला..उगाच चिडतील ते..संपदा समजदार आहे.. समजून सांगू आपण तिला असं म्हणत आईने अप्रत्यक्षपणे या लग्नाला नकार दिला.
    दादा आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, ” आई, अगं अजितला भेटलो मी, चांगला मुलगा आहे तो.. शिवाय संपदावर खूप प्रेम आहे त्याच..सुखात राहील आपली चिऊ.. बाबांशी बोलून तर बघू.. आंतरजातीय विवाह म्हणजे काही गुन्हा नाही.. संपदाला कुणीही पसंत करेन पण ती त्याचा मनापासून स्विकार करेल असं वाटत नाही मला..आई बाबांना दुखवायचे नाही म्हणून तडजोड करत लग्न करेन ती पण प्रेम करेलच असं नाही..अजितला विसरणे कठीण जाईल तिला.. इतक्यात तू बघितले असशील कशी गप्प गप्प असते ती..अजित विषयी घरी कसं सांगायचं याच विचाराने हैराण झाली आहे ती.. शेवटी तिचं सुख महत्वाचं..आपण सगळी चौकशी करून अजितच्या घरच्यांना भेटून सगळ्यांना मान्य असेल तर दोघांचा विचार करून लग्न लावून द्यायला काय हरकत आहे. नातलग बोलतील ते किती दिवस.. जातीतल्या मुलाशी लग्न केले तरी काही ना काही उणीव काढून सुद्धा बोलतातच.. इतरांच्या बोलण्याचा विचार बाजूला ठेवून एकदा संपदाचा विचार कर आई..तू हो म्हणालीस तर बाबांशी बोलू आपण..”
    दादाचं बोलणं संपते तितक्यात बाबांचा मागून आवाज आला, “माझी मुलं इतकी मोठी झाली कळालेच नाही रे मला..मी तुम्हा दोघांचं सगळं बोलणं ऐकलं..माझी मुलं चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची खात्री होती मला..संपदा असं अचानक कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं, मी अजूनही लहानच समजत आलो तुम्हा दोघांना..तू आईला जसं समजून सांगितलं त्यावरून बहिणींचं आयुष्य सुखी करण्यासाठीची तुझी धडपड, तिच्या विषयीचं प्रेम बघून मला खरंच अभिमान वाटला आज तुझा..” बाबांचं बोलणं ऐकून दादा बाबांच्या मिठीत शिरला..बाबा तुम्ही परवानगी द्याल ना संपदा अजितच्या लग्नाला..
    संपदा आपल्याला हट्ट करून लग्न लावून द्या असं कधीच म्हणणार नाही..पण मला तिची घालमेल कळत होती बाबा.. म्हणून मी अजितला भेटलो.. नकार द्यावा असा नाहीच तो..घरी बोलणार आहे तो संपदा विषयी..बाबा आता सगळं तुमच्यावर अवलंबून आहे..
    बाबा यावर जास्त काही बोलले नाही..संपदा ची परीक्षा संपली की बघू..अजितच्या घरी तयार असतील तर आपण विचार करू म्हणाले.
    काही वेळाने अजितचा दादाला फोन आला, त्यांचे आई बाबा लग्नाला तयार आहे हे मोठ्या आनंदाने त्याने सांगितले. आता सगळे वाट बघत होते संपदा ची परीक्षा संपण्याची. अजितच्या घरी काही अडचण नाही हे दादाने बाबांच्या कानावर टाकले.
    शेवटचा पेपर संपल्यावर संपदा घरी आली, पुढे अकाऊंटींग मध्ये करीयर करण्याविषयीची इच्छा बाबांना तिने बोलून दाखवली. आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे असं बाबांनी म्हंटल्यावर तिला हायसे वाटले.
    बाबांनी संपदा जवळ अजितचा विषय काढला, तिला ऐकताच धक्का बसला, बाबांच्या मिठीत शिरून ती रडकुंडीला आली.. काय बोलावे तिला काही कळेना.. बाबांनी तिला विचारले, “अजित सोबत लग्न करण्याविषयी काय मत आहे तुझं..”
    “बाबा, तुम्हाला कसं कळलं.. म्हणजे मी सांगणार होतेच पण…..बाबा तुम्ही रागावले का माझ्यावर….” असं तुटक तुटक बोलत संपदा गोंधळली..
    दादा‌ आणि आई तिथे होतेच..बाबा हसून म्हणाले, ” अगं, रागवत नाही आहे.. विचारतोय मी तुला.. लगेच लग्न करायचं नाही म्हणत पण तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला..”
    संपदा स्वतःला सावरत कसंबसं बोलून गेली,” बाबा‌, अजित आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे.. त्याने लग्नासाठी मागणी घातली होती पण तुम्ही तयार असाल तरच हो म्हणेल मी असंच सांगितलं मी त्याला..मला तुम्हाला दुखवायचं नाही बाबा..”
    बाबा म्हणाले, “तुला पुढे तुझं करिअर करायचं आहे.. स्वतः च्या पायावर उभं राहायचं आहे.. पुढे कधी चुकून वाईट प्रसंग आलाच तर स्वावलंबी असणं गरजेचं आहे.. लग्नाचं म्हणशील तर मी अजितच्या घरच्यांना भेटायला तयार आहे..”
    बाबांचं म्हणनं ऐकताच सगळ्यांना आनंद झाला..
    दादाने अजित विषयी घरी कसं कळाल याची पूर्ण गोष्ट संपदाला सांगितली..
    अजित आणि दादा यांनी दोन्ही कुटुंबे एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठरविला.. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरी सगळे त्यांच्या लग्नाला तयार झाले..संपदाला शिक्षण, करिअर याबाबतीत आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अजितच्या घरच्यांनी बोलून दाखवले.
    आपण सगळं स्वप्न तर बघत नाही ना‌ असा भास अजित आणि संपदाला होत होता.
    इतक्या सहजपणे सगळं जुळून येणं म्हणजे नशिबच असं दोघांनाही वाटत होतं.
    दादा नसता तर आपण कधीच बाबांशी या विषयावर बोलू शकलो नसतो असं संपदाच्या मनात आलं, दादामुळे अजित आयुष्यभरासाठी आपला होणार, दादाचे आभार मानावे की काय करावं संपदाला सुचत नव्हतं.. दाराकडे पाहून त्याच्या मिठीत शिरून तिचे आनंदाश्रु भराभर वाहू लागले..त्यावर तिला दादा भाऊक होत म्हणाला, “अगं वेडाबाई, आज लग्नाची बोलणी आहे.. सासरी जायला वेळ आहे अजून..आता पासून रडते की काय..सांगू का अजितला..संपदाला नाही यायचं तुझ्या घरी म्हणून..??”
    दादाच्या बोलण्याने रडतच हसू आलं तिला..अजितने ही दादाला मिठी मारत मनापासून आभार मानले..दादा माझ्या आयुष्यात इतका सुंदर दिवस तुमच्यामुळे आला असं म्हणताना अजितचे डोळे आनंदाने पाणावले होते..

    अशा प्रकारे दोघांच्या प्रेमकथेचा गोड शेवट आणि संसाराकडे सुंदर वाटचाल सुरू झाली..

    ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा ??

    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १

    संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची.
    अजितची गाडी बंद पडल्याने तोही आज बसने ऑफिसमध्ये जायला‌ निघाला. सकाळच्या वेळी बस मध्ये बरीच गर्दी असल्याने बरेच जण उभेच होते. अजितला काही वेळाने जागा मिळाली आणि तो लगेच त्या जागी जाऊन बसला. पुढच्या स्टॉप वरून एक वृद्ध आजोबा बस मध्ये चढले पण गर्दी मुळे  बसायला जागा नसल्याने काठीचा आधार घेत कुठे जागा मिळते का याचा अंदाज घेत सर्वत्र नजर फिरवू लागले, तितक्यात संपदा आजोबांजवळ आली, तिने आजोबांना जागा करून दिली. त्याच क्षणी अजितची नजर संपदावर पडली, तिचं मदतीला धावून जाणं, तिचं ते मोहक रूप पाहून अजितची नजर काही केल्या संपदा वरून हटत नव्हती.
    अजित हा आई वडिलांना एकुलता एक, सधन कुटुंबात वाढलेला, नुकताच नोकरीला लागला. दिसायला देखणा, उंच बांधा, स्टायलीश राहणीमान. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर फिदा पण हा कुणाला भाव द्यायचा नाही. मित्रांनी चिडवले की म्हणायचा , “अरे, वो मेरे टाइप की नहीं..” त्याच असं म्हणनं होतं की बघता क्षणी असं वाटलं पाहिजे, “तुम्हे जमी पे बुलाया‌ गया है मेरे लिये..”
    संपदा अगदी अजितच्या विरूद्ध पण अजितला तिला बघताच मनात गाणं सुरू झालं, “देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार..”
    संपदाच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत असताना अजितला आजुबाजूला काय चाललंय काही भान नव्हते. संपदाचा स्टॉप आला आणि ती उतरली ‌तसाच अजित भानावर आला.
    ऑफिसमध्ये सतत संपदाचा चेहरा त्याच्या डोळ्यापुढे येत होता. कामात नेहमी प्रमाणे लक्ष लागत नव्हते. आपल्याला असं कधीच वाटलं नाही, आज पर्यंत इतक्या सुंदर सुंदर मुलींनी प्रपोज केले, मैत्री साठी स्वतः पुढाकार घेतला पण आपल्याला कुणा विषयी काही वाटले नाही. मुली इतक्या भाव देतात म्हणून टाइमपास व्हायचा, मज्जा वाटायची पण आज त्या बस मधल्या मुलीला बघून वेगळंच वाटत आहे. कोण असेल ती, इतका का विचार करतोय मी तिचा अशा मनस्थितीत अजितचा पूर्ण दिवस गेला. सायंकाळी मित्रा सोबत घरी परत गेला.संपदाला बघण्याच्या ओढीने दुसऱ्या दिवशी परत अजित बसनेच ऑफिसला निघाला. आज ती येयील की नाही हेही त्याला निश्चित माहीत नव्हते पण पुन्हा ती दिसल्यावर त्याला मनोमन आनंद झाला. त्या वीस मिनीटांच्या प्रवासात त्याच लक्ष फक्त संपदा कडे होते. संपदाच्याही ते लक्षात आले. नकळत अधून मधून दोघांची नजरानजर व्हायची.
    असाच बसने जाण्याचा कार्यक्रम आठवडाभर चालला. एक दिवस योगायोगाने दोघांना आजुबाजूला बसायला जागा मिळाली. अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला(मन में लड्डू फुटा..)
    जरा वेळ इकडे तिकडे उगाच बघत अजितने बोलण्यासाठी पुढाकार घेतला, “हाय, मी अजित..”
    त्यावर संपदा जरा लाजत, “हाय..”
    अजित ( जरा घाबरून ‌दबक्या आवाजात)- तुम्ही दररोज जाता का बसने.. काही दिवसांपासून मी येतोय तर तुम्ही दररोज दिसता म्हणून विचारलं..”
    संपदा – हो..मी गेली दोन वर्षे बसनेच जाते कॉलेजला..
    असा हाय हॅलो वरून संवाद सुरू झाला. अजित संपदाला भेटायला म्हणून रोज गाडी असूनही बसने प्रवास करायला लागला. कधी हाय हॅलो तर कधी संधी मिळाली तर थोडंफार बोलणं सुरु झालं. काही दिवसांनी दोघांची मैत्री झाली, फोन नंबर एकमेकांसोबत शेअर झाले. अजितला संपदा आवडायला लागली, तिला न बघता, तिच्याशी न बोलता त्याचा दिवसच अपूर्ण वाटू लागला. ती दिसणार नाही म्हणून रविवार नकोसा वाटायचा.
    एक दिवस अजितने संपदाला कॉफी साठी विचारले, बरेच आढेवेढे घेत शेवटी ती कॉलेज नंतर यायला तयार झाली. अजितने ऑफिसमधले काम लवकर संपवले आणि तो वेळेच्या आधीच तिला घ्यायला कॉलेज जवळ पोहोचला. समोरून संपदा येताना‌ दिसली, तिची लांबसडक वेणी उजव्या खांद्यावरून समोर आलेली, लाल पांढरा सलवार कमीज, डोळ्यातलं ते तेज, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघताच अजितची परत‌ एकदा विकेट उडाली. त्याची नजर एकटक तिच्याकडे होती,  स्वप्नातली अप्सरा जणू आपल्या जवळ येत आहे असा भास क्षणभर त्याला झाला. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणाली आणि अजित भानावर आला.

    क्रमशः

    पुढचा प्रवास पुढच्या भागात.. तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • पहिली भेट

    तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का. 

    अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या प्रस्तावानुसार पहील्यांदाच एकमेकांना भेटणार होते. भेटीनंतर दोघांचं मत लक्षात घेऊन घरचे लग्नासाठी पुढच सगळ ठरवणार होते. 

    ती एक शांत,सालस,हुशार, सुस्वभावी, निरागस मुलगी. नोकरीसाठी कुटुंबापासून दूर, घरी सर्वांची लाडकी. 

    ती सकाळ नेहमीपेक्षा जरा वेगळी, मनात गोंधळ असला तरी एक वेगळीच उत्सुकता,थोड दडपण सुद्वा होतचं.

    ठरल्याप्रमाणे दोघे काॅफीशाॅप मधे आले. आधी फोटो पाहीला असल्यामुळे एकमेकांना ओळखायला वेळ लागला नव्हता.

    तो एक देखणा, प्रेमऴ , समजदार, मेहनती मुलगा. त्याची वर्तणूक आणि बोलणं बघून तीच्या या मनावरचं दडपण कमी झालं. काॅफीसोबत गप्पा रंगत गेल्या आणि एक एक करून मनात असलेल्या प्रश्र्नांची उत्तर मिळत गेले. दोघांनी एकमेकांची ओळख, नोकरी, छंद यावर बराच वेळ चर्चा केली. वेळ कसा गेला कळत नव्हतं. 

    नंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला पण मनात मात्र एकच प्रश्न, पुढे काय करायचे. तिच्या अपेक्षेत बसणारा असल्याने तिला तो तसा पहिल्या भेटीतच आवडला पण आयुष्याचा जोडीदार असा एका भेटीत निवडायचा का, या‌ विचाराने ती गोंधळली शिवाय तिच्या बद्दल त्यांचं मत अजून कळलेलं नव्हतं. त्याच्या मनाची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती. घरचे सुद्धा दोघांचं मत ऐकायला उत्सुक होते, पण असे एका भेटीत सगळं कसं ठरवायचं म्हणून तीने विचार करायला जरा वेळ घेतला. 

    रात्री अचानक फोन वर त्याचा मॅसेज आला, आपण पुन्हा एकदा भेटायचे का. अगदी तिच्या मनातलं तो बोलला पण खरंच भेटाव का, असं योग्य आहे का, या विचाराने मनात पुन्हा गोंधळ उडाला.

    पुढे काही दिवस एकमेकांशी बोलून, भेटून मग काय ते ठरवायचे असं ठरलं. घरच्यांनी सुद्धा ते मान्य केले.

    हळूहळू ते एकमेकांना ओळखायला लागले, मनात एक वेगळीच भावना निर्माण होत गेली, एकमेकांची कधी ओढ लागली कळत नव्हतं. आता घरच्यांनी एकत्र येऊन पुढचं ठरवायला हरकत नाही असं दोघांनी ठरवलं. त्याच्या घरचे तिला आणि तिच्या घरचे त्याला भेटणे अजून बाकी होते.

    दोघांच्या कुटुंबानं एकत्र भेटायचं ठरलं, सगळं अनुकूल असल्याने दोघांचं मत लक्षात घेऊन घरच्यांनी पुढे सगळं ठरवलं. सगळे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले. काही महिन्यानंतर लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या मनात आनंद, आतुरता, एकमेकांची ओढ सुरू झाली. लग्नाआधी बराच वेळ आपल्याला एकमेकांना ओळखायला मिळणार या विचाराने दोघेही आनंदात होते. 

    त्यांच्यातले संवाद, एकमेकांना ओळखून घेण्याची, आवडीनिवडी जाणून घेण्याची उत्सुकता दोघांसाठी खुप सुंदर अनुभव होता. हळूच कधी तिच्या मनात यायच , आता आहे तसंच पुढे राहिलं ना, आपला निर्णय योग्य आहे ना. दोघांच्या घरी आनंदाने लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.

    त्याची तिच्याविषयीची काळजी, त्याचा समजुतदारपणा, अधूनमधून त्याचे सर्प्राईज, पुढच्या आयुष्याबद्दल दोघांची चर्चा यावरून तिला तिचा निर्णय योग्य असल्याची खात्री होत गेली. दोघांसाठीही हा अनुभव खुप सुखद होता. एकमेकांची ओढ वाढत होती, मन जुळत होते, दोघांमधलं प्रेम वाढायला लागलं. दोघांचे प्रेमळ स्वप्न वास्तव्यात आलेले होते. एखद्या पुस्तकात वाचल्यासारखे आयुष्यात एकदाच येणारे , नेहमी लक्षात राहील असे हे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. प्रेम वाढत होतं. 

    लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. दोघेही आनंदात होते. ती त्याच्यासाठी सर्वकाही सोडून नविन घरात जाणार होती, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होती. त्यासाठी त्यांनी खुप स्वप्न रंगवली. लहानपणापासून आई वडिलांच्या लडात वाढलेली ती आता सासरी जाणार होती, तिथे सगळे कशे असतील, पुढचं आयुष्य कसं असेल अशा प्रश्नांनी तिच्या मनात आता जागा घेतली. आपलं घर सोडून आता नवीन घरात जायची वेळ जवळ येऊ लागली तसतशी ती हळवी होत गेली. सासरी गेली तरी माहेर कधी परकं होणार नव्हतं मात्र लहानपणापासूनच्या आठवणी, भावंडासोबतच्या गमतीजमती, आई वडिलांचं प्रेम असं सगळं तिच्या मनात येवून ती हळवी होत होती. 

    त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून ती पाऊल पुढे टाकत होती. पुढचं संपुर्ण आयुष्य आता दोघांना एकत्र घालवायच होतं. 

    लग्नाचा दिवस आला, आज ते दोघे एका वेगळ्या बंधनात बांधले गेले. सप्तपदीच्या सात वचनांनी त्यांच्या नविन आयुष्याला सुरुवात झालीे. आता एक जन्मोजन्मीच अतुट नातं त्यांच्यात निर्माण झालं. आयुष्यभर दोघांच असंच जिवापाड प्रेम कायम राहावं अशा आशेने त्यांनी संसाराला सुरुवात झाली. 


    Ashvini Kapale Goley

  • प्रेमकथा

    अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी बेशुद्ध पडली होती. मागुन येणारी एक गाडी सुद्धा मदतीला थांबली. त्यांच्या मदतीने तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. अर्णव खुप घाबरला होता. तो रात्री तिच्याजवळच थांबला. ती अजून शुद्धिवर आली नव्हती. ती दुसरी कुणी नसुन त्याची कॉलेज मधली मैत्रीण आभा होती. आभा दिसायला सुंदर, आकर्षक, हुशार, आत्मविश्वासी, बिंदास, श्रीमंत घरची एकुलती एक लाडकी, मोकळ्या मनाची. काॅलेजला दोघे सोबतच शिकायला होते. अर्णव गरीब घरातील साधा, शांत, मेहनती, लाजाळू स्वभावाचा मुलगा. त्याला आभा पहिल्या भेटीपासूनच खूप आवडायची.तो तिच्यावर खुप प्रेम करायचा पण कधी तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले नव्हते. त्याला भीती होती की आभाला हे आवडले नाही तर दोघांची मैत्री संपेल शिवाय तो लाजाळू स्वभावाचा. कॉलेज संपल्यावर काही कारणाने दोघे फार काही संपर्कात नव्हते पण अजूनही तो तिला विसरला नव्हता. दोघांच्या अशा अपघाती भेटीमुळे तो हैराण झाला होता. रात्री इतक्या उशिरा ती कुठे निघाली‌ होती. तिला काय झाले असेल असा विचार करत तो तिच्या जवळ ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसला होता. रात्र कशी गेली त्याला कळाले नाही.काही तासानंतर ती शुद्धिवर आली. समोर अर्णवला बघून तिला आश्चर्य वाटले. ती हाॅस्पीटलमधे कशी आली, काय झाले हे तिला काही आठवत नव्हते. त्याने तिला नंतर सगळं सांगतो असं म्हणतं धीर दिला आणि तिच्या घरी कळवावे म्हणुन घरचा फोन नंबर वगैरे विचारला. काही न बोलता ती फक्त रडू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक निराशा, अस्वस्थता पसरली. त्याला काही कळेना. तितक्यात डॉक्टर तपासणी करायला आले. काही औषधे लिहून दिली, कशी घ्यायची ते समजून दिली. आता तीला घरी घेऊन जायला हरकत नाही असं सांगितलं. त्याने तिचा घरचा पत्ता विचारला, ती पुन्हा रडू लागली, माझं या जगात कुणीच नाही, मी कुठे जाणार मला माहित नाही. ते ऐकून त्याला काही समजत नव्हतं की काय झालं, आभा अशी का बोलत आहे. काहितरी वाईट झाल्याची जाणीव त्याला झाली. तीला आपल्या घरी घेऊन जायचे त्याने ठरवले, तसा प्रस्ताव तिने नाकारला. तो आई-वडीलांसोबत राहायचा, ती खूप साधी माणसं, गरीब परिस्थितीतून वर आलेलं कुटुंब. अर्णवच्या नोकरी मुळे आता सगळं छान झालेलं होतं. तिला घरी घेऊन जायला आई बाबांची हरकत नसावी हे त्याला माहीत होते. बराच वेळ तिची समजूत काढून तो तिला घेऊन घरी जायला निघाला. रात्री काय झाले ते वाटेतच त्यानं तिला सांगितले.

    ती स्तब्ध होऊन फक्त ऐकत होती. 

    त्याच्या मनात तिच्याविषयी अनेक प्रश्न गोंधळ घालत होते. ती जरा बरी झाली की मग विचारावं असे म्हणतं त्यानं स्वतःला धीर दिला. 

    दोघे घरी आले, त्याने घडलेली हकीकत आई बाबांना सांगितली. ती सावरेपर्यंत आपण तिची काळजी घेऊ असं आईकडुन ऐकाल्यावर त्याला खूप समाधान वाटले. ती आधीची आभा राहिली नव्हती. तीला खुप मोठा धक्का बसला आहे याची जाणीव त्याला झाली होती. ती अबोलपणे एकटक कुठे बघत राहायची. अर्णव आणि त्याच्या घरचे तिची सगळी काळजी घेत होते. ती अजुनही सावरली नव्हती. अर्णवची तिच्याविषयीची काळजी, त्याचं प्रेम त्याच्या आईला जाणवत होतं. तिला हसवण्याचे, सावरण्याचे सगळे प्रयत्न तो करत होता. 

    एका रात्री अचानक ती दचकून जागी झाली आणि रडू लागली. ते सगळे जागे झाले. ती खूप घाबरलेली होती. अर्णवच्या आईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. त्या प्रेमळ स्पर्शाने ती मोकळी झाली, तिला पाझर फुटला आणि ती घडलेली हकीकत सांगू लागली.

    आभा नोकरीवर असताना तिच्या आई वडिलांसोबत काही दिवस सुटृीचा आनंद घ्यायला कोकणात जायला निघाले होते. काही दिवस आनंदात घालवून परत येताना भयंकर अपघात झाला, आभा कशीबशी वाचली पण तिचे आई-वडील जागेवरच गेले. त्यांच्या अशा जाण्याने ती खूप हादरली होती, पुर्णपणे एकटी झाली होती. जीवनातला आनंद एका क्षणात नियतीने हिरावून घेतला होता.

    स्वतःला कसंबसं सावरून ती नोकरी करत होती. मित्र-मैत्रिणी मध्ये ती आता जास्त रमत नव्हती. 

    अशा परिस्थितीत आॅफीसमधला एक मित्र तेजस, हा तिला आधार देत होता. कामात तिचं लक्ष लागत नव्हतं ,मनस्थिती ठिक नसल्याने कामात तिच्याकडुन झालेल्या चुका त्याने सांभाळून घेतल्या होत्या. तो तिला आधार देत असल्याने ती त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायची. त्याच्या सहवासात ती एकटेपण विसरून जायची. 

    एक दिवस त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. त्याची झालेली मदत, काळजी अशी एकूण परिस्थिती पाहून ती लग्नाला तयार झाली. त्यांच्यामुळे आपण सावरलो या भावनेने ती त्याच्यात गुंतली, प्रेमात पडली. दोघांनी लग्न केले. ती आनंदात होती. सगळें छान चालले होते.

    काही दिवसांनी तो काही कामानिमित्त बाहेर गेला, एक आठवड्यानंतर येणार‌ होता. पण तो गेल्यानंतर त्याचा फोन नाही, दहा दिवस झाले अजून तो आला नाही. ती घाबरली, बरेवाईट विचार तिच्या मनात येऊ लागले. 

    काय करायचे तिला काही सुचत नव्हते. 

    आॅफीसमधून माहिती काढली तेव्हा कळले की तो दोन आठवडे रजेवर गेला आहे. तो खोटं का बोलला‌ तिला कळत नव्हतं. 

    आॅफीसच्या कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. ती घरी गेली, त्याचं कपाट उघडून काही माहिती मिळेल या हेतूने कपाटात सगळं शोधू लागली. त्यात तिला एक फोटो सापडला. तो बघून पुन्हा ती हादरली. तो त्याच्या लग्नाचा फोटो होता, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं. त्याने तिला फसवले होते. तिच्यासाठी हा जीवनातला दुसरा मोठा धक्का होता. 

    त्याची रजा संपल्यावर तो परत आला. तीने त्याला जाब विचारला, ती त्याच्यावर भयंकर संतापली होती. आभाला सगळं कळलं असं त्याच्या लक्षात आलं, त्यानी सांगितलं, त्याचं आधीच लग्न झालेलं होतं, शिवाय त्याला तीन वर्षांचा एक मुलगा सुद्धा होता. आभाला खोटं सांगून तो त्यांना भेटायला गावी गेला होता. आभा सोबत त्याने फक्त तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन हव्यासापोटी लग्न केले होते, तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला होता.

    हे ऐकून ती हादरली, त्यांच्या लग्नाचा काही पुरावा नसल्याने ती काही करू शकत नव्हती. ती हतबल झाली होती. त्या रात्री ती स्वतःला संपवायला निघाली होती पण नियतीने तिची अर्णव सोबत गाठ घातली. हे सगळं ऐकून अर्णव आणि त्याच्या आई बाबाला धक्काच बसला.

    अर्णवच्या आईने तिला धीर दिला, तिची समजूत काढली, तिला शांत केले. तू एकटी नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत, अर्णव धीर देत बोलला. 

    अर्णवचं आजही आभावर तितकंच प्रेम होतं. त्याच्या आईलाही ते माहीत होतं. आभा हळूहळू सावरू लागली पण तीचा आत्मविश्वास खुप कमी झाला होता. कुणावरही तिचा विश्वास राहिलेला नव्हता.अशा परीस्थितीत अर्णवच्या कुटुंबाने तिला सावरले होते. त्यांची काळजी,प्रेम तिला जगण्याची नवी उमेद देत होते. अर्णवने अजूनही त्याच्या प्रेमाबद्दल तिला काही सांगितले नव्हते. 

    काही दिवसांनी तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आणि गिफ्ट म्हणून त्याने त्याची काॅलेजला असताना लिहिलेली डायरी दिली. घरी आल्यावर तीने ती डायरी वाचली, त्यात त्याने आभावरच्या प्रेमाबद्दल लिहिले होते.

    तिच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते. त्याचं तिच्यावर खुप प्रेम होतं आणि आहे हे तिला जाणवलं. अर्णवने केलेल्या मदतीत कुठलाच स्वार्थ नाही हे तिला कळाले होते. 

    अर्णवला त्याचं खरं प्रेम आयुष्यात आल्यामुळे तो खूप आनंदी होता. आपल्यावर इतका जिवापाड , निरागस, निस्वार्थी भावनेने प्रेम करणारा अर्णव आयुष्यात आल्यामुळे ती सुखावली होती. तीने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं पण नियतीने तिच्यावर जिवापाड प्रेम करणा-या अर्णवला तिच्या आयुष्यात आणले होते. अर्णवच्या प्रेमाने तिला जिंकलं होतं.