Tag: भयकथा

  • भुताटकी इमारत ( भयकथा)

    मदन नोकरीच्या शोधात पुण्यात आलेला. सुरवातीला एक खोली मित्रांसोबत शेअर करून काटकसरीने वर्ष काढलं. आता मात्र चांगली नोकरी मिळाली आणि आई बाबांना आता पुण्यातच घेऊन यायचं असं त्याचं ठरलं. आई बाबा इकडे येणार म्हंटल्यावर अर्थातच घराची शोधाशोध सुरू झाली. जिथून ऑफिस फार लांब पडणार नाही अशा एरिया मध्ये घर बघावं असा विचार करून त्याने घर शोधायला सुरुवात केली. सुट्टीच्या दिवशी आता बजेटमध्ये बसेल असा घर/ फ्लॅट शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरत होता.

    अशातच एक दिवस त्याच्या नजरेत पडली एक सोसायटी. मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेली ही सोसायटी बाहेरून अगदी राजवाड्यासारखे आर्किटेक्चर असलेली, साधारण तीन चार वर्षांपूर्वीच तयार झालेली असावी असा अंदाज बिल्डिंग बघताच येत होता. मदन चे लक्ष या सोसायटीकडे गेले आणि तो आपली टू व्हीलर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करून रस्ता ओलांडून सोसायटी गेटच्या दिशेने चौकशी करायला जाऊ लागला. बिल्डिंगच्या आजुबाजूला बरीच हिरवीगार झाडे होती, आवारात पालापाचोळा पडलेला, दुरून एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासणारी ही सोसायटी मदनला जवळून बघताच जरा भयाण वाटली. गेटच्या आत चिटपाखरूही दिसत नव्हते पण गेटवर खुर्ची टाकून एक पन्नाशीच्या वयातील सिक्युरिटी गार्ड हातात काठी घेऊन बसलेले. मदन त्यांच्या दिशेने आला आणि म्हणाला,
    “नमस्कार, या सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट आहे का भाड्याने मिळेल असा..?”

    सिक्युरिटी गार्ड हसून उत्तरला, “भाड्याने फ्लॅट..या सोसायटीमध्ये.. नाही रे बाबा…इथे कुणीच राहत नाही.. अख्खी सोसायटी रिकामी आहे.. फ्लॅट तर आहेत पण राहण्याची हिंमत कुणातही नाही इथे…”

    गार्डच्या बोलण्याने मदन जरा गोंधळला आणि म्हणाला, “म्हणजे..मला काही कळालं नाही..इतकी सुंदर सोसायटी, तीही अगदी मोक्याच्या ठिकाणी आणि पूर्ण रिकामी.. म्हणजे काही प्रोब्लेम आहे का?”

    गार्ड आजुबाजूला नजर फिरवत म्हणाला, “हो..इथे भूत आहे भूत..दिवसा तरी मी असतो पण रात्री तर चिटपाखरूही फिरकत नाही इकडे.. ”

    मदन त्यावर हसला आणि म्हणाला, “भूत…..काही तरीच काय हो..भूत वगैरे काही नसतं बघा..उगाच मनात येईल ते सांगू नका..सरळ सांगा ना फ्लॅट उपलब्ध नाही म्हणून..”

    गार्ड त्यावर म्हणाला, “हे बघ पोरा..मला काही हौस नाही उगाच काहीतरी सांगण्याची..तुझा विश्वास नसेल तर नको ठेवू पण जे काही मी सांगतोय ना ते खरं आहे..तुला कुणी तरी दिसतंय का इथं बघ ना जरा.. खूप मोठी स्टोरी आहे या सोसायटीची…”

    मदनला अजूनही गार्ड च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. “बरं..भूत आहे तर मग तुम्ही कसे काय इथे? सोसायटी तर रिकामी आहे ना मग तुमची उगाच ड्युटी का इथे..”

    गार्ड – “बंद सोसायटी बघून चोरट्यांनी, सट्टा जुगार वाल्यांनी भरदिवसा इथं अड्डा बनवायला नको म्हणून मी असतो सायंकाळी सहा वाजेपर्यंत..पण त्यानंतर कानाला खडा.. पोटापाण्यासाठी दिवसभर ड्युटीवर यावं लागतं..”

    गार्ड चे उत्तर ऐकून मदन परत जायला निघाला. रात्री रूमवर आल्यावर घडलेला सगळा प्रकार त्याने मित्राला हसत हसत सांगितला तर त्यावर मित्र म्हणाला ,”अरे मदन, हसू नकोस..ती सोसायटी खरंच भुताटकी आहे..मी ऐकलंय त्या सोसायटी विषयी बरंच काही पण नक्की काय स्टोरी आहे हे काही माहित नाही..”

    मित्राचे बोलणे ऐकून मात्र मदनला हा भूत प्रकार, ही बंद सोसायटी फार इंटरेस्टिंग वाटली. आता या सोसायटीची स्टोरी माहिती करून घ्यायला हवी असा विचार करून उद्या परत त्या गार्ड ला भेटायचं त्याने ठरवलं. रात्रभर सतत ती राजवाड्या प्रमाणे भासणारी बंद सोसायटी त्याच्या नजरेसमोर येत होती, डोक्यात गार्ड चे शब्द , भूत.. अख्खी सोसायटी रिकामी..बंद..हे सगळे विचार काही गोंधळ घालत होते.. मदनने कशीबशी रात्र काढली.

    दुसऱ्या दिवशी सकाळीच मदन त्या सोसायटी जवळ गेला. सिक्युरिटी गार्ड गेटच्या आतला परिसर स्वच्छ करत होता. मदन ने बंद गेट जवळून त्यांना हाक मारली, “दादा.. ओळखलं का? मी काल आलेलो बघा..जरा बोलायचं होतं हो..”

    गार्ड ने हातातला झाडू बाजूला ठेवला आणि म्हणाला, “अरे आज परत इकडे..तेही सकाळीच..बोल काय म्हणतोस..”

    मदन – “काल तुम्ही सांगितलं ना या सोसायटी विषयी..भूत..अख्खी सोसायटी रिकामी.. यामागे काही तरी मोठी स्टोरी आहे म्हणालात..मला ना ते सगळं जाणून घ्यायचंय हो..काल रात्री सतत हाच विचार सुरू होता डोक्यात..प्लीज मला सांगा ना काय स्टोरी आहे या बंद सोसायटीच्या मागे..”

    गार्ड – “अरे बाळा, काल तर विश्वास नव्हता तुझा..हसत होतास माझ्या बोलण्यावर..पण मला सांग, कशासाठी जाणून घ्यायचं आहे सगळं..?”

    मदन – “दादा, खरं सांगायचं म्हणजे माझा ना भूत वगैरे वर विश्वास नाही हो पण काल ही सोसायटी बघितली..दुरून अगदी राजवाडा वाटणारी ही सुंदर सोसायटी अशी अख्खी रिकामी, बंद कशी काय असू शकते हा विचार माझ्या डोक्यातून काही केल्या जात नाहीये.. मित्रांकडून सुद्धा कळाले की या सोसायटीची मोठी स्टोरी आहे म्हणून.. तेव्हापासून तर अजूनच वेड लागलंय मला..प्लीज सांगा ना..”

    गार्ड – “बरं बरं सांगतो सगळं पण मी जे सांगतोय ते कुणाला सांगू नकोस.. माझ्याही पोटापाण्याचा प्रश्न आहे.. बिल्डर मलाच रस्त्यावर आणेल जर त्यांना कळालं की मी कुण्या परक्या व्यक्तीला सोसायटी विषयी सांगितलं तर माझी नोकरी जाईल..”

    मदन – “नाही सांगत मी कुणाला पण मला प्लीज सांगा आता तुम्ही सगळं..”

    गार्ड गेटमधून बाहेर आला आणि मदनची अस्वस्थता बघून म्हणाला, “फार हट्टी आहेस रे पोरा.. थांब बाजुच्या टपरीवरून दोन चहा आणतो..बस इथे.. बसून बोलूया..”

    गेटजवळ असलेल्या झाडाभोवतीच्या ओट्यावर मदन बसला. गार्ड लगेच चहाचे दोन कप हातात घेऊन येत आला आणि मदनला एक कप देत सोसायटीची स्टोरी सांगू लागला,

    “तर गोष्ट अशी आहे की, दोन‌ वर्षांपूर्वी ही राजवाड्यासारखी सोसायटी उभी झाली.. बांधकाम सुरू होते तेव्हापासून मी इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. कधी दिवसा तर कधी रात्री माझी इथे ड्युटी. इमारत तयार झाली तसेच मोठ्या आनंदाने अनेक कुटुंबे इथे राहायला आले. बर्‍याच जणांनी धुमधडाक्यात वास्तुशांती वगैरे केली. सगळे आपापलं नवं घर सजविण्यात गुंतलेले. कुणी उत्साहाने फर्निचर बनवून घेतले तर कुणी लाखोंचे इंटेरियर करवून घेतले. अशातच काही महिने निघून गेले.
    एका रात्री माझी नाईट ड्युटी होती. पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात विजा चमकत होत्या, विजांचा गडगडाट त्या रात्रीच्या शांततेचा भंग करत होता.  अचानक लाइट गेली, सोसायटी मधील काही इमरजन्सी लाइट सोडले तर सगळीकडे किर्र अंधार. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजत आलेले. मी छत्री हातात घेतली आणि सोसायटीच्या आवारात पहारा देण्यासाठी राऊंड वर निघणार तोच एक किंचाळी कानावर पडली सोबतच धपकन काही तरी पडल्याचा आवाज सुद्धा आला.  पावसाळी रात्रीच्या त्या भयाण वातावरणात अशी अचानक किंचाळी ऐकून मी सुद्धा घाबरलो पण देवाचा धावा करत धपाधप पावले टाकत नेमकं काय झालंय याचा अंदाज घ्यायला बिल्डिंग भोवती जायला लागलो. मागच्या बाजूला जाऊन बघतो तर काय, कुणीतरी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला.. भळाभळा रक्त वाहत होते, उघडे डोळे स्थीर नजर ठेवून एकटक कुठेतरी बघत होते. एकंदरीत चित्र बघून मला पार घाम फुटला, भितीने हातपाय थरथरत होते. धावतच गेटवर आलो आणि सोसायटीच्या सेक्रेटरी ला इंटरकॉम वरून फोन लावला. पुढच्या काही मिनीटात त्यांच्यासह सोसायटी मधले बरेच जण खाली आले.
    एम्बुलन्स ला बोलावले गेले पण ती व्यक्ती कधीच हे जग सोडून गेलेली.

    ती मृत व्यक्ती म्हणजेच नवव्या मजल्यावर राहणारा सुधीर. सुधीर इथे एकटाच राहायचा. अतिशय उत्साही व्यक्तीमत्व असलेला हा तरुण दररोज न चुकता सकाळी सहा वाजता खाली दिसायचा. कधी मॉर्निंग वॉक करायला तर कधी व्यायाम व्हावा म्हणून सायकल चालवायचा. नंतर जिम मध्ये बराच वेळ व्यायाम वगैरे करून मग घरी परत जायचा. त्याची माझी दररोज सकाळी न चुकता गाठ पडायची आणि गुड मॉर्निंग म्हंटल्याशिवाय, कसे आहात वगैरे विचारपूस केल्याशिवाय तो दिसल्यावर कधीही न बोलता जायचा नाही. दररोज डोळ्यांसमोर बघितलेला हा माझ्या मुला समान सुधीर नवव्या मजल्यावरून रात्री उशिरा असा अचानक खाली कसा काय पडला याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. कुणी म्हणे त्याने आत्महत्या केली तर कुणी म्हणे अपघात झाला, पाय घसरून वगैरे तोल गेला असावा. नंतर तर कळालं की हा घातपात होता. त्याचा आणि बिल्डरचा बराच मोठा वाद होता, केस का काय सुरू होती कोर्टात. त्या वैमनस्यातून घातपात घडवून आणला अशीही चर्चा झाली पण नक्की काही पुरावा मिळाला नाही बघ.

    तो शरीराने तर गेला पण त्याचा आत्मा इथेच भटकत असतो. त्याच्या अशा अपघाती मृत्यूनंतर सोसायटीत भितीचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा खाली यायला जायला सगळे घाबरू लागले. इतकंच काय तर बर्‍याच जणांना तो मृत्यूनंतर सुद्धा दिसायचा. नववा मजला तर आठवडाभरात रिकामा झाला. भितीपोटी त्याच्या आजूबाजूचे लोक घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. त्यानंतर बर्‍याच जणांना तो दिसला. एकदा पहाटे दुसऱ्या मजल्यावरील नेने काकांना तो सोसायटीच्या आवारात सायकल फिरवत असलेला दिसला. काकांना भितीमुळे इतका मोठा धक्का बसला की ते दुसऱ्या मुलाकडे राहायला गेले. सुरवातीला काकांवर कुणी विश्वास ठेवला नाही पण हळूहळू बर्‍याच जणांनी त्याला बघितलं. कधी तो जॉगिंग करताना दिसायचा तर कधी गाडीवरून येताना, कधी सायकलवर तर जिम मध्ये. महिन्या दोन महिन्यात अख्खी सोसायटी रिकामी झाली. सगळे आपलं घर सोडून दुसरीकडे राहायला निघून गेले. घराचे लोन, हफ्ते सगळं सुरू.. आवडीने उत्साहाने सजवलेले हक्काचे घर सोडून लोकं दुसरीकडे भाड्याने राहायला गेले. त्यानंतर कुणी इथे कमी किंमतीत सुद्धा घर विकत घेतले नाही ना भाड्याने घर घेतले. वर्ष होऊन गेलं पण ही सोसायटी बंद पडून आहे. मी सुरवातीला रात्री सुद्धा असायचो पण मलाही तो दिसला. पूर्वी कितीही चांगला माणूस असला तरी मृत्यूनंतर तो दिसल्यावर भिती वाटणारच ना..तसा मी सुध्दा घाबरलो.. त्याने मृत्यूनंतर कुणाला त्रास दिला नाही पण त्याच्या अशा दिसण्याने लोकं जाम घाबरून गेली. अख्खी सोसायटी रिकामी झाली.
    म्हणून आता फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतो मी इथे. ”

    मदन सगळं ऐकूनच जाम घाबरला. दबक्या आवाजात त्याने विचारले, ” घातपात घडवून आणला म्हणजे नक्की काय झालेले..बिल्डर सोबत कशावरून वाद होता सुधीर चा? मग त्याचा घातपात असेल तर काहीच पुरावा नाही मिळाला?”

    गार्ड म्हणाला, “खरं तर ही सोसायटी ज्या जागेवर उभी आहे ना, ती जागा सुधीरच्या वडिलांची‌. पूर्वी त्यांचे लहानसे घर होते इथे आणि आजुबाजूला शेती. मोक्याची जागा म्हणून बिल्डरने त्यांच्या मागे लागून ही जागा मिळविण्यासाठी बराच प्रयत्न केला पण सुधीरचे बाबा काही जागा द्यायला तयार नव्हते. काही दिवसांनी सुधीरच्या आईला कॅन्सर झाल्याचे कळाले, मग उपचारासाठी पैसा हवा होता म्हणून सुधीरच्या बाबांनी फार काही विचार न करता ही जागा बिल्डरला दिली पण त्यांना मात्र बिल्डरने फसवले. जितकी किंमत होती त्याच्या अर्धे सुद्धा पैसे दिले नाही. एक फ्लॅट त्यांना राहायला दिला नवव्या मजल्यावर, जिथे सुधीर राहायचा तोच फ्लॅट. या दरम्यान सुधीर शिक्षणासाठी बाहेर होता शिवाय आईचे आजारपण, ऑपरेशन त्यामुळे त्याला या व्यवसायातील गोष्टी काही माहीत नव्हत्या. बिल्डरने सुधीरच्या वडीलांच्या सह्या घेऊन कमी किंमतीत ही जागा हडप केल्याची गोष्ट सुधीरला कळाली तेव्हा त्याने कोर्टात केस टाकली. इकडे उपचार करूनहु काही फायदा झाला नाही, काही महिन्यांत त्याच्या आईला स्वर्गवास झाला. बाबांना फसवणूक झाल्याचे कळाले शिवाय आई गेल्याचा धक्का, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली. तेही वर्षभरात हे जग सोडून गेले. सुधीर त्यांना एकटाच मुलगा होता. आई बाबा गेल्यावर तो खूप खचला पण बिल्डरने केलेल्या फसवणूकीचा बदला घ्यायचा असं त्याचं ठरलेलं होतं. पण अचानक त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्याने मृत्यूनंतर बिल्डरचा बदला घेतला बघ.. या सोसायटीतुल करोडो रुपये किंमतीची घरे बंदच आहे. बिल्डरची बदनामी झाली, लोकांनी बिल्डर वर केस करून घराची किंमत परत मागितली. अजूनही तो बिल्डर अनेक केस लढतो आहे कोर्टात. फसवून हडप केलेल्या या जागेवर सोसायटी तर उभी आहे पण इथे राज्य मात्र सुधीर करतो आहे, तेही ह्यात नसताना..ते म्हणतात ना, अतृप्त आत्मा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भटकत असतो तसाच हा प्रकार..”

    मदनचे मन सगळं काही ऐकून सुन्न झाले. सुधीरच्या आत्म्याला शांती मिळो असं नकळत तो मनोमन बोलून गेला. गार्ड परत गेट उघडून सोसायटीच्या आत आपल्या ड्युटीवर निघून गेला.

    समाप्त!!

     

    © अश्विनी कपाळे गोळे

  • रहस्य त्या तीव्र वळणावरचे.. ( रहस्यकथा )

    लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही पतीराजांच्या आजोळी गेलेलो.
    राज्य महामार्गाला लागूनच वसलेले एक गाव, महामार्गाच्या आजूबाजूला शेती, जवळच वस्ती. आजोळी घरच्या शेतात मोठमोठ्या विहीरी, गर्द हिरवी आंब्याची झाडे, जवळच नविन झालेलं एक भलं मोठं धरण असा निसर्गरम्य परिसर. मोठ्या उत्सुकतेने आम्ही सगळे घरापासून दुचाकींवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेलो. लहानपणापासून राहणं, शिक्षण हे बर्‍यापैकी शहरी वातावरणात झाल्याने इतक्या वर्षांनी शेतात फिरायला जायचा मोठा उत्साह होता मनात. शेतात सगळीकडे मनसोक्त फिरून, रानमेवा गोळा करून परतीला निघालो. शेताच्या रस्त्यात महामार्गावर एक तीव्र वळण होते. परतीच्या वाटेवर वळणाच्या आधी अंदाजे पाचशे मीटरवर एका बाबांची ( पूर्वी त्या गावात असलेले एक साधू ) समाधी होती. परत येताना त्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय परत यायचे नाही असं जातानाच घरून सांगितले गेले होते. काय बरं कारण असेल , असं आवर्जून सांगण्यामागे असा विचार मनात आलेला.
    परत येताना सगळेच बाबांच्या समाधीवर थांबून दर्शन घेतले आणि पुढे घरी जायला‌ आम्ही निघालो. दर्शन घेतानाच मला घरच्यांकडून कळाले की जो कुणी या समाधीचे दर्शन न घेता पुढे जातो त्याचा हमखास वळणावर अपघात होतो. गावातील कित्येक लोकांनी त्या वळणावर जीव गमावला आहे. ऐकून जरा विचित्र वाटले,‌पण पुढे प्रत्येकाने एक एक किस्सा सांगायला सुरुवात केली. एक किस्सा असा की, एकाने दर्शन घेतले नाही आणि तसाच पुढे गेला तर भरदिवसा वळणाच्या जवळच माकडाने झाडावरून त्याच्या दुचाकीवर उडी टाकली आणि तो इसम जागेवरच ठार झाला. मागून येणाऱ्या एका ट्रकवाल्याने तो अपघात पाहिला आणि गावकऱ्यांना कळवले. पण माकडाचे उडी मारणे आणि त्या दुचाकीचे येणे हा एक वाईट योगायोग असू शकतो ना.. असं मनात आलं. असो..
    गावात सगळ्यांना त्या वळणाचा एक धाक होता, त्या वळणावर मृत्यू झालेल्यांचे आत्मे भक्ष शोधतात पण बाबांचे दर्शन घेतले की बाबा त्या आत्म्यांपासून  संरक्षण करतात असा गावकऱ्यांचा विश्वास होता. 
    त्या वळणाचे अनेक किस्से ऐकल्यावर एखाद्याला खरंच विश्र्वास बसेल असं सगळे सांगत होते. ऐकून भयानक वाटले आणि विचारचक्र सुरू झाले की काय रहस्य असेल त्या वळणाचे, बाबांच्या समाधीचे.??
    घरी आल्यावर त्याच चर्चा सुरू होत्या तेव्हा कळाले की हे सगळे अपघात रात्रीच्या वेळी होतात (आत्मा रात्री भक्ष शोधतो), त्यामुळे सहसा रात्री त्या वळणावरून यायला गावकरी घाबरतात, शक्यतो टाळतात. माकडाच्या त्या अपघातानंतर तर बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय येतच नाही.चुकून पुढे आले तरी मागे जाऊन दर्शन घेऊन परत जातात. हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले, काय प्रकार असेल हा, काय रे रहस्य असेल हे विचारचक्र सुरू. ??
    काही दिवसांनी गावावरून आम्ही परत आलो तेव्हा पतीराजांना त्या वळणाच्या रहस्याविषयी विचारले तेव्हा कळाले, तो महामार्ग असल्याने गाड्यांची वर्दळ सतत असतेच शिवाय भरधाव वेगाने गाड्या जातात. बरंच अंतर सरळ रस्ता असताना मध्येच अचानक हे वळण लागतं तेव्हा बर्‍याच वाहकांना वळणाचा अंदाज येत नसावा.  महामार्गावर रात्री काळाकुट्ट अंधार, त्यात ते तीव्र वळण त्यामुळे भरधाव वेगाने येताना वळणाचा अंदाज आला नाही की रात्री बरेच अपघात त्याठिकाणी होतं आले आहेत. योगायोगाने वळणाच्या आधी पाचशे मीटरवर  बाबांची समाधी, मग समाधीवर थांबून पुढे निघालं की सुरवातीला गाडीचा वेग जरा कमी असतो आणि ते तीव्र वळण सावधपणे पार केलं जातं. हे वास्तविक कारण आहे पण गावकऱ्यांनी या बाबांच्या समाधीचं आणि वळणाचं एक रहस्य निर्माण करून अफवा‌ पसरविल्या. अफवांमुळे का होईना पण ज्यांना माहीत आहे ते वाहक समाधीवर थांबून पुढे निघतात आणि परत निघताच सुरवातीला गाडीचा वेग कमी असल्याने अपघात टळतात.
    वैज्ञानिक रित्या विचार केला तेव्हा त्या वळणाचे रहस्य उमगले.

    जुन्या अनेक अंधश्रद्धा लोकं अजूनही पाळतात, पण प्रत्येक अंधश्रद्धेच्या मागे एक वैज्ञानिक कारण हे असतेच. असंच हे वळणाचे रहस्य आहे.

    तुमच्या माहितीत अशे रहस्य असलेले किस्से असतील तर नक्कीच कमेंट मध्ये शेअर करा.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • भूलभुलैया ( लघुकथा )

    गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळ एक बाग होती,‌तिथे दहा राऊंड मारले की योगा‌ करून सात वाजता घरी परत असा हा मॉर्निंग वॉक चा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी मात्र काही तरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता, “अहाहा! किती रम्य वातावरण आहे.”?? असं मनात पुटपुटत ती बागेच्या दिशेने निघाली. सोसायटी आणि बागेच्या मधल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला हिरवी झाडे, सकाळी फिरणार्‍यांची वर्दळ असायची.
    आज सोसायटीच्या गेट बाहेर येताच गौरीला ते रम्य वातावरण जरा‌‌ भयानक झालेलं जाणवलं. ?झाडांवर पक्ष्यांची किलबिल नसून वादळ आल्यावर असतो तसा झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून निघणारा आवाज जाणवला. इतक्या अलगद वार्‍याने असा भयानक आवाज कसा याचं तिला आश्चर्य वाटलं पण दुर्लक्ष करून ती पुढे निघाली. एक किलोमीटर अंतरावर असलेली बाग आज जरा‌ जास्तच दूर आहे असं वाटायला लागलं, शिवाय रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आज असं काय वाटतं आहे, किती भयाण शांतता पसरली आहे असं मनात विचार करत ती चालत होती.. कितीतरी दूर गेली तरी बाग‌ काही येत नव्हती. घड्याळात पाहिलं तर सहाच वाजलेले. असं कसं होऊ शकतं, मी सहा वाजता घरून निघाली आणि अर्धा तास तरी चालत आहे पण बाग कशी येत नाही, घड्याळ सुरू असूनही सहाच कशे वाजलेत. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर त्यातही सहाच वाजलेले. आज कुणीच फिरायला कसं आलं नसेल. अशा विचारात ती चालत होती, जरा थकवा आला पण घाबरल्या मुळे थांबण्याची हिम्मत होत नव्हती. आता पुढे न जाता घरी परत जाऊया असा विचार करून ती मागे फिरली तर मागे वेगळंच चित्र. ती ज्या रस्त्याने आली तो हा रस्ता नव्हताच, एक कच्चा रस्ता ज्याच्या आजूबाजूला जीर्ण वृक्ष, अंधूक प्रकाश, शंभर मीटर पेक्षा पुढे दृष्टी जाणार नाही इतकाच प्रकाश, वार्‍याचा तो भयानक आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत होती.
    आता गौरी अजूनच घाबरली, काय करावं काही सुचत नव्हतं. घरी फोन करून नवर्‍याला‌ बोलावून घेऊ असा विचार करून फोन बघते तर फोन मध्ये नेटवर्क कव्हरेज नव्हतं. आता गौरीची धडधड वाढली, ती झाल्या प्रकाराने अक्षरशः रडकुंडीला आली. पुढे जावं की मागे तिला काही सुचत नव्हते.
    दोन पावलं पुढे जायची परत मागे यायची. अजूनही घड्याळ बघितले तर सहाच वाजलेले होते. हा काय प्रकार आहे, कशी बाहेर पडणार मी आता‌ विचारात असतानाच नवर्‍याने तिला हलवून उठवले आणि म्हणाला, ” गौरी, सहा वाजलेत, फिरायला जायचं नसेल तर अलार्म तरी बंद कर. कधी पासून वाजतोय तो. “
    गौरी दचकून उठली, घामाघूम झाली होती ती. उठल्यावर तिला जाणवलं की जे काही अनुभवलं ते एक भयानक स्वप्न होतं, बाजूला ठेवलेले घड्याळ बघितले तर सहा वाजले होते. अलार्म बंद करून मोबाईल बघितला, त्यातही सहाच वाजलेले होते. जे काही बघितले, स्वप्नात अनुभवले ते आठवून आज मात्र मॉर्निंग वॉक ला जायची गौरीची हिम्मत होत नव्हती.?

    कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ? कथा वाचल्या बद्दल धन्यवाद ?

    आपला अभिप्राय नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • एक वाडा झपाटलेला ( भयकथा)

    संपतराव पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित माणूस, गावाच्या मधोमध भला मोठा वाडा, कामाला चोवीस तास गडी माणसं, इतक्या मोठ्या वाड्यात संपतराव, पत्नी सीमा, दहा वर्षांची मुलगी शालिनी , लहान भाऊ गणेश आणि खाटेवर आजारी संपतरावांची आई राहायचे. सोबतीला आई साहेबांच्या सेवेत कमला असायचीच.
    गावात त्यांची शेती होती आणि गणेश शेतीच्या कामाचा हिशोब बघायचा, सीमा वाड्यावर काय हवं नको, गडी माणसांचा पगार असं सगळं गृहखाते बघायची.
    आता संपतरावांना गणेशाच्या लग्नाचे वेध लागले होते, आपल्या कुटुंबाला शोभेल अशा घराण्यातील मुलीच्या ते शोधात होते. वाड्यावर जशी गणेशच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा पासून सगळ्यांना काही ना काही विचित्र जाणवत होते. एकदा रात्री सीमाला उशीरा पर्यंत झोप लागत नव्हती. तिला वाड्याच्या मधोमध असलेल्या अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला, तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर कुणीच दिसले नाही. परत जाऊन झोपली तर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. वाड्यात तर लहान बाळ नाही मग हा आवाज कुणाचा. सीमा जरा घाबरली, तिने संपतरावांना‌ उठवले. संपतरावांनाही त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. दोघांनी बाळूला हाक मारली, बाळू म्हणजेच वाड्याच्या अंगणात आउटहाऊस मध्ये राहणारा गडी. बाळू धावतच बाहेर आला, लाइट लावून सगळ्यांनी आजूबाजूला बघितले पण कुणीच नव्हते. नंतर सगळे जाऊन झोपले की परत बाळाच्या रडण्याचा आवाज आला. काही केल्या सीमाला झोप लागत नव्हती.
    दुसऱ्या दिवशी सीमाच्या मनात सतत विचार येत होता की रात्री कुणाचा आवाज असेल, शिवाय कुणी तरी चालण्याचा भासही झाला होता. काय प्रकार आहे हा.. परत रात्री उशिरा जेवण झाल्यावर अंगणात फेरफटका मारताना सीमाला कुणी तरी आपल्या मागे उभं असल्याचा भास झाला. मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते, परत समोर वळताच एक केस मोकळे असलेला, कपाळावर मोठं लाल कुंकू, भले मोठे डोळे एकटक सीमा कडे बघत असलेला चेहरा दिसला. सीमा घाबरून ओरडली, चक्कर येऊन पडली.
    सीमाच्या ओरडण्याने सगळे धावत बाहेर आले, काही वेळाने सीमा शुद्धीवर आली, घाबरलेल्या अवस्थेत तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. कोण बाई होती ती, का अशी बघत होती अशा अनेक प्रश्नांनी सीमाला भंडावून सोडले. गणेशने डॉक्टरांना बोलावले, त्यांनी सीमाला आराम करायला सांगितला.
    औषधी घेऊन सीमा झोपली. काही वेळाने झोपेतच तिला जाणवले की कुणी तरी अंगावरचे पांघरुण ओढत आहे, सीमाने झोपेतच पांघरूण परत अंगावर घेतले. पुन्हा कुणी तरी पांघरूण ओढायला लागले, सीमा आता घाबरली, घाबरतच डोळे उघडले तर परत तोच चेहरा दिसला आणि क्षणात अदृश्य झाला.. सीमाला घाम फुटला, तोंडातून शब्द निघत नव्हता, घाबरून ती इकडे तिकडे बघायला लागली. तितक्यात तिची मुलगी शालिनी तिथे आली, “आई, काय झालं तुला.. अशी का करते आहे..आई रात्री कोण होतं तुझ्या सोबत अंगणात..”
    सीमा घाबरून शालिनी कडे बघत म्हणाली “म्हणजे तुलाही दिसली‌ ती…”
    शालिनी म्हणाली, “मला अंधारात कोण आहे दिसत नव्हते पण तुझ्या सोबत एक बाई फिरताना दिसत होती.. कोण होती ती..”
    सीमा आता‌ अजूनच घाबरली.. मनात विचार करू लागली..कुणी तरी आपला‌ पाठलाग करत आहे.. तेही साधंसुधं कुणी नाही..भूत पिशाच्च बाधा आहे हा… माझ्या कडून काय पाहिजे असेल..का दिसत असेल मला..
    नंतर रोज रात्री अंगणात कुणाच्या तरी चालण्याचा भास.. लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागले..कुणाला कधी आपल्या मागे कुणी उभे असल्याचे जाणवायचे तर कधी किंचाळी ऐकू यायची. काय होते आहे कळत नव्हतं.
    संपतरावांनाही आता भिती वाटत होती, त्यांनी गणेशला‌ खोलीत बोलावले आणि वाडयात पूजा ,शांती करण्याचा विचार ऐकवला. उद्याच पंडीतजींना बोलावून पूजा करून घ्यायची असं ठरलं, तितक्यात जोरात वारा सुटला, वाड्याच्या दारं खिडक्या जोराजोरात वाजू लागल्या, एक भयंकर विकट हास्य ऐकू येवू लागले.. अचानक वातावरण बदलले.. शालिनी धावत येऊन आईच्या कुशीत शिरली.. तिकडे आजी ओरडायला लागली पण ती काय बोलते आहे कळत नव्हतं.. जणू कुणी आजीचा गळा‌ दाबत आहे असा आवाज येत होता.. सगळे पळत आजीच्या खोलीत गेले तर आजीच्या सेवेत असलेली कमला बेशुद्ध पडली होती आणि आजी गळा आवळल्या सारखा झाल्याने तडफडत होती… कुणालाही काही कळण्याच्या आत आजीने जीव सोडला..परत ते विचित्र हास्य ऐकू आले.. हळूहळू बंद झाले.. वाड्यातले सगळे जण झाल्या प्रकाराने घाबरून गेले होते आणि आजीच्या जाण्याने सगळे हादरले होते..
    सकाळी आजीच्या जाण्याची बातमी भरभर गावात पसरली..पूर्ण गाव वाड्या बाहेर जमले.. अंत्य संस्कार आटोपले..कमला अजूनही धक्क्यातून सावराली नव्हती..न‌ राहावून तिने सीमाला सांगितले, “ताई, काल कुणी तरी मोकळे केस.. विचित्र हास्य असलेली बाई आजीच्या खोलीत आली होती..चेहरा काही दिसत नव्हता. काही केल्या बटन‌ दाबूनही लाइट लागत नव्हता..वारा‌ इतका‌ होता की दारा खिडक्यांच्या आवाजाने माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत नव्हता…मला जोरात काही तरी झटका बसला आणि मी खाली पडली..ती बाई आजी जवळ जाऊन सूड घेणार सूड घेणार म्हणत होती…तिनेच आजीला मारलं.. “
    सीमाला काही सुचत नव्हते..काय प्रकार आहे हा..कुणाचा सूड..कशाचा बदला..कोण आहे ती बाई… सगळे विधी आटोपून घरी आल्यावर सीमाने आणि कमलाने संपतरावांच्या कानावर ही गोष्ट टाकली..ते ऐकताच संपतराव घाबरले.. गणेशला बोलावून दोघे काही तरी बोलायला लागले..
    आता संध्याकाळ झाली की वाड्यात सगळ्यांना भिती वाटत होती…
    परत रात्री अंगणात चालण्याचा आवाज.. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.. मधेच ते भयानक हास्य ऐकू यायचे.. रात्रभर सगळे एका खोलीत बसून राहिले.. कुणालाही डोळा लागला नाही.. सकाळी गणेशने पंडित बोलावून वाड्याची शांती करायचे ठरवले..परत भर दिवसा तो सुसाट वारा सुटला.. वाड्याच्या खिडक्या उघड बंद होत आवाज करू लागल्या… सगळीकडे धूळ पसरली….
    काही वेळाने वातावरण परत शांत झाले.. पंडितजींनी सगळा प्रकार अनूभवताच प्रश्न केला, “घरात कुणाच्या हाताने काही विपरीत घडले का.. कुणी तरी अदृश्य पणे वास करत आहे वाड्यात.. वाडा झपाटलेला आहे त्या शक्तीने..आज‌ रात्री पूजा करून शांती करू नाही तर सगळ्यांच्या जीवाला धोका आहे..”
    त्यावर गणेश आणि संपतराव म्हणाले “काही विपरीत घडले नाही.. तुम्ही पूजेची तयारी करा..”
    ठरल्याप्रमाणे रात्री पूजेची तयारी झाली..
    एक‌ मोठा हवन‌ पेटविला गेला.. वाड्यात सगळीकडे एक सुरक्षा रेषा आखली गेली..सगळ्यांच्या हातात सुरक्षेसाठी एक एक मंतरलेला धागा बांधला गेला.. एकंदरीत सगळ्यांना भिती वाटत होती.. काही वेळ मंत्र,हवन करून आत्म्याला बोलावणे करणारे मंत्र पंडितजींनी म्हणायला सुरुवात केली, परत तो सुसाट वारा, दार खिडक्यांच्या आदळण्याचा आवाज आला..विकट हास्य ऐकू येऊ लागले..सूड घेणार..सोडणार नाही म्हणून एक किंचाळी ऐकू आली..त्या किंचाळी ने गणेश आणि संपतराव घाबरले.. एकमेकांकडे बघू लागले.. पंडितजी मंत्र म्हणत त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू लागले..प्रश्न करत म्हणाले”कोण आहेस तू..कुणाचा सूड घेण्यासाठी आलीस इथे.. काय पाहिजे तुला.. “
    परत एक विकट हास्य ऐकू आले.. गणेशला गळा आवळल्या सारखे वाटायला लागले..त्याने हातात पाहिजे तर सुरक्षा धागा सुटून बाजूला पडला होता..सोड मला सोड.. गणेश विनवण्या करू लागला.. पंडितजी त्या आत्म्याला वश करण्यासाठी प्रयत्न करत होते पण फायदा होत नव्हता.. तेव्हा पंडीतजी म्हणाले “गणेश काही पाप घडलं असेल तर कबूली दे, तुझा जीव धोक्यात आहे..”
    संपतराव सुद्धा पार घाबरले.. गणेश कसाबसा गळा सोडवत म्हणाला, “कुसूम मला‌ माफ कर…मी पाप केलं आहे..जीव नको घेऊ माझा….”
    ते ऐकताच सगळं वातावरण बदललं.. कोण ही कुसूम सगळ्यांना प्रश्न पडला..
    पंडीतजींच्या सांगण्यावरून गणेश सगळं प्रायश्चित्त करत बोलू लागला.
    कुसूम ही गावातील एक तरूणी, शेतात कामाला यायची, गणेश शेतीचे सगळे व्यवस्थापन बघायचा..एकदा‌ कुसूम ला पैशाची अडचण होती..तिची आई आजारी होती, तेव्हा तिने गणेश जवळ मागणी केली.. गणेशने तिला मदत केली.. नंतर काही कारण काढून तिला‌ शेतातल्या दोन खोल्यांच्या घरात बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली.. परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्यावर आपल्या शरीराची भूक भागवण्याचा प्रकार सुरू केला… तिला आईच्या उपचारासाठी पैसे द्यायचा…ती बिचारी गरीब घरची, बदनामीच्या भितीने गप्प राहिली..एक‌ दिवस संपतराव शेतावर आले, त्यांना हा प्रकार कळाला.. आधी गणेशकडे रागाने बघितले आणि नंतर त्यांनीही तिचा फायदा घेतला..ती झाल्या प्रकाराने हादरली, परत शेतात यायचं तिनं बंद केलं, तिच्या आईचं आजारपणामुळे निधन झालं, तेव्हा गणेश आणि संपतराव तिला भेटायला गेले तेव्हा कळाले की कुसूम गरोदर आहे.. कुसूम संपतरावांना‌ म्हणाली, “माझं गणेश सोबत लग्न लावून द्या, झालं गेलं विसरून मी नांदायला तयार आहे.. शिवाय माझ्या पोटात तुमच्या घराण्याचा अंश वाढत आहे..”
    आम्ही यावर विचार करतो असं सांगून दोघे निघाले. कुसूम मुळे आपली बदनामी होणार तेव्हा तिचा काटा काढायचा असा बेत आखला. तिला शेतातल्या घरी बोलावले, ती‌ एका आशेवर त्या ठिकाणी आली. दोघांनी मात्र तिचा काटा‌ काढला, तिचा गळा आवळून खून केला, शेताजवळच एका ठिकाणी तिचा मृतदेह दफन केला. गावात अशी बदनामी झाली की आईचं निधन होताच कुसूम कुणातरी सोबत पळून गेली.. या गोष्टीला सहा महिने सुद्धा झाले नव्हते तोच इकडे वाड्यावर गणेशच्या लग्नाची गोष्ट सुरू झाली आणि कुसुमचा आत्मा बदला‌ घेण्यासाठी वाड्यात आला.. सत्य ऐकताच सीमाला मोठा धक्का बसला.. ती रडतच म्हणाली “कुसूम तुला न्याय मिळणार.. अपराध्यांना शिक्षा मिळेल..तू कुणाचा जीव घेऊ नकोस.. माझ्यावर विश्वास ठेव..”
    सगळं वातावरण शांत झालं, सीमाने पोलीसांना बोलावले,‌ गणेश आणि संपतरावांना अटक झाली. कुसूमचा‌ दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यावर विधी युक्त अंत्य संस्कार केले गेले.
    गणेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर संपतरावांना दहा वर्षांचा तुरुंगवास.
    आता वाड्यात सीमा, शालिनी, कमला आणि गडी माणसं असायचे. सगळा व्यवहार सीमाच बघायची. आता कुणालाही काही भास होत नव्हता, त्या झपाटलेल्या वाड्यात वास करणार्‍या आत्म्याला शांती, मुक्ती मिळाली होती.

    ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कुठल्या गोष्टीशी काही संबंध वाटल्यास केवळ योगायोग समजावा ?
    भयकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न तेव्हा मत मांडायला विसरू नका ?

    अश्विनी कपाळे गोळे