Tag: लहान मुले

  • इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा

    तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”
    आई म्हणाली “बरं, तुला हवा तो क्लास लावून देते, आता वेळ आहे तुझ्याकडे. शिकून होईल आणि वेळही जाईल तुझा. सध्या खूप काम आहे गंं, सुट्टी नाही मिळणार मला. तरी बघूया काही दिवसांनी, तोपर्यंत तू स्विमींग, डान्सिंग, जे काही शिकायचे ते शिकून घे.”
    तनूचा इवलासा चेहरा पाहून आईला मनातून वाईट वाटले आणि मनात विचार आला की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीची किती आतुरतेने वाट बघायचो आपणं, किती मज्जा करायचो.
    सुट्टी सुरू झाली की मामाच्या गावाला कधी कधी जाणार ही‌ घाई असायची, कारण तिथे मज्जा सुद्धा तशीच यायची. सगळे भावंडे एकत्र येणार, मामा मामी, मावशी ‌काका, आजी आजोबां कडून मस्त लाड पुरवले जायचे. सकाळ‌ पासून रात्र कशी झाली कळायला वेळ नसायचा. सगळी भावंडं एकत्र जमली की‌ नुसतीच मज्जा. एकमेकांच्या खोड्या काढत, मनसोक्त खेळत,‌ छान छान खाऊन कुठे दिवस जायचा कळत नव्हतं.
    विहीरीत पोहायला जायचं, ज्यांना अजून पोहता येत नाही त्यांच्या पाठीला भोपळा किंवा जूना‌ टायर बांधून मामा,‌मोठी भावंडे पोहायला शिकवायचे. मनसोक्त पोहून झालं की‌ मस्त भूक लागायची मग मामींच्या ,‌आजीच्या हातचे नवनवीन पदार्थ, शेतातल्या ताज्या कैरी,‌आंबे अगदी नैसर्गिक रित्या आलेले सगळं खाण्याचा मोह आवरायचा नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत अंगणात, घरात इकडे तिकडे भटकायच, मनसोक्त खेळत मज्जा मस्ती करायची. त्यात भर दुपारी सायकलवरून कुल्फी वाला, आइस कॅंडी वाला यायचा मग सगळी बच्चे कंपनी त्याच्या भोवती गोळा, मला‌ ही कुल्फी, मला‌ लाल आइस कॅंडी, मला‌ हे मला‌ ते…काय मज्जा यायची नाही त्यात. कधी मग भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे‌ लग्न, त्यात आजी मग खाऊ बनवून देणार, कधी कबड्डी, कधी खो-खो, घरभर पळत लपाछपी, मातीचा खेळ, लगोरी अगदी उत्साहात खेळ रंगाचे. कधी बैलगाडीची सफर असायची. पूर्ण वर्षभराचा‌ रिचार्ज केल्यासारखे वाटायचे. भावंडांची भांडणे, त्यांचं प्रेम , चिडवाचीडवी यामुळे त्यांचं नातंही तितकंच घट्ट व्हायचं.
    खाण्या पिण्याची मज्जा, खेळण्यातील मौजमस्ती, मोठ्यांचा एक वेगळाच अनुभव, गप्पा गोष्टी, पापड , शेवया , वाळवणी पदार्थ बनवायची त्यांची वेगळी मज्जा.
    रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर किंवा अंगणात गादी टाकून सगळे झोपायचो आणि आकाशातील तार्‍यांची मज्जा बघायची, चंद्राची लपाछपी‌ बघायची, आजी मग छान छान गोष्टी सांगणार ते ऐकत झोपायचो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात.
    ही सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं. त्यात घरी कुणाचं लग्न‌ जर असेल मग तर विचारायलाच नको, सगळीकडे आनंदीआनंद…
    भेटीसाठी होऊन एकत्र वेळ घालवून नात्यांमधला गोडवा टिकून राहायचा, सुखदुःख वाटले जायचे, एकमेकांची ओढ वाटायची.
    हल्ली शहरांमध्ये नोकरी करताना‌, शहर असो किंवा ग्रामीण भाग ही सगळी मज्जा कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. आई‌ वडील इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग इंटरनेट‌ मुलांचा‌ मित्र बनतो, मोबाईल, टिव्ही, व्हिडिओ गेम यामुळे मामाच्या गावाला जी मज्जा यायची ती खरंच  हरवली आहे. नात्यात एक दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब, फोन वरून औपचारिक बोलून ती आधी सारखी आपुलकी, नात्यातला‌ जिव्हाळा कुठे तरी हरवला आहे. आई‌ वडीलांना‌ वेळ नसतो मग‌ मुलांना‌ मनासारखी सुट्टी अनुभवता येत नाही. या वेळी समर‌ कॅम्प, या वेळी हा क्लास असा अगदी टाइमटेबल ठरलेला असतो, त्यात जो‌ वेळ मिळेल तो मग इंटरनेटवर गेम, टिव्ही,‌मोबाइल. यामुळे मग मुलांनाही नात्यात ओढ वाटत नाही, आई बाबा कामात, भावंडे असली तरी मोबाईल गेम मध्ये व्यस्त. सुट्टीच्या दिवशी फार फार तर सिनेमा, माॅलमध्ये फिरायला जायचं. काही दिवस सुट्टी मिळालीच तर मग जवळपास कुठे फिरून यायचं अशी हल्ली सुट्टी संपते पण त्यात पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा नसते.
    खरंच वाईट वाटत‌ं ना विचार करून. म्हणूनच मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवून त्यांना वेळ देण्याची गरज आहे, आजोळी काही दिवस घालवले, घरातल्या घरात न राहता बाहेर मनसोक्त खेळू दिले, मुलांना जबरदस्तीने व्यस्त ठेवण्यासाठी क्लास न लावता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देऊन हवं ते शिकू दिले, आवडीची‌ गोष्टींची पुस्तकं दिली तर त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लक्षात राहील. ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    तुमच्या लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा

    शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..????”.
    आई मनात पुटपुटली “तुमची मज्जा..आमची सजा..?..बरं आता मस्त फ्रेश होऊन ये..आराम कर जरा‌ वेळ..”
    नेहमी फ्रेश हो म्हणत ‌अर्धा तास जायचा, आज‌ मात्र पाच मिनिटांत मॅडम कपडे बदलून फ्रेश होऊन तयार.
    निधी- “आई, माझा‌ व्हिडिओ गेम कुठे आहे गंं, तू म्हणाली होतीस परिक्षा संपली की काढू.”
    आई – “अगं, आताच घरी आलीस, जरा खाऊन घे, आराम कर..दोन‌ महिने आहेत खेळायला.”
    निधी – ” नको आज आम्हाला शाळेत स्नॅक्स होता ना, भूक नाही.. झोप पण नाही आली..सांग ना‌ कुठे आहे व्हिडिओ गेम.. “
    आई – ” बाबा आल्यावर काढायला‌ सांगते रात्री..आता‌ नको..”
    निधी – “असं ‌काय करतेस गं, तूच म्हणाली होती परिक्षा संपली की काढू..बरं मग मी रिमा कडे जाऊ खेळायला..”
    आई‌ – ” अगं, सायंकाळी जा‌ खेळायला..आता‌ जरा आराम कर..”
    निधी – ” काय गं आई‌ ..हे नको ते नको.. सुट्टीची मजा घेऊ‌ दे मला. “
    नंतर निधी‌ टिव्हीवर कार्टून बघत बसलेली…
    आई – ” निधी जरा आवाज कमी करशील का टिव्ही चा..”
    आईच्या डोक्यात विचार आला.. आजच सुट्टी सुरू झाली की इतका गोंधळ.. पुढचे दोन महिने काही खरं नाही..
    रात्री बाबा घरी आल्यावर तर विचारायलाच नको..आई‌ जेवायला‌ आज हे बनव.. नाश्त्याला ते बनव.. सकाळी आईची‌ ड्युटी स्विमींग ला‌ घेऊन जाणे..नंतर घरकाम..बाहेर उन्हामुळे ‌दिवसभर घरात टिव्हीचा, व्हिडिओ गेमचा आवाज..सोबत कुणी ना कुणी मित्र मैत्रिणी..मग निधीच्या खाण्या पिण्याच्या डिमांड.. एक मिनिट दुपारी आराम नाही..
    पूर्ण घर डोक्यावर घेऊन निधी सुट्टीचा‌ पुरेपूर आनंद घेत होती.
    सायंकाळी पाच वाजले की‌ एक सेकंद इकडे तिकडे न होऊ देता खेळायला बाहेर.. नंतर सात वाजले तरी घरात यायचं नावं नाही..
    घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण झाले की बाबांसोबत मस्ती.. दोघांची बडबड..बाबा दिवसभर घरी नसतात‌ मग आल्यावर काय करू नी काय नको…आई मात्र कधी एकदा जाऊन झोपते अशा विचारात..
    निधी शाळेत गेली की ‌आईला‌ जरा‌ स्वतः साठी वेळ मिळायचा.. घरातील काम आवरले जायचे..आता‌ मात्र दिवसभर आईचे काम काही संपत नाहीत.. त्यात निधी मॅडम‌ रात्री सुद्धा लवकर झोपायचे नावं घेत नाही..आई गोष्टी सांग ना..आताच काय झोपते..बाबा चला ना हे खेळू..ते खेळू..मग निधी आणि बाबांचा लुडो‌, बुद्धीबळ, सापसिडी तर कधी पेंटिंग ‌असा काही ना‌ काही कार्यक्रम उशीरा पर्यंत सुरू.. आईनेही झोपायचे नाही..?
    बाबांनी मग काही दिवस सुट्टी घेतली आणि फिरायला जायचा बेत आखला, तर आठवडाभर आधी निधीची तयारी..आतुरता..तिथे गेल्यावर असं करायचं तसं करायचं.. प्लॅनिंग ची मोठीं यादी तयार आणि आईने ती यादी दररोज ऐकायची.
    आई बिचारी मनात विचार करत बसायची , का शाळेला‌ इतक्या सुट्ट्या देतात.. घरात किती पसारा झालाय.. मैत्रिणींना ही भेटले नाही मी इतक्यात..सगळा वेळ निधीच्या मागे.. निधीची परिक्षा संपली आणि माझी सुरू झाली..?

    निधीच्या आई सारखी सगळ्या आयांची परिक्षा असते, मुलांची उडालेली झोप आणि अर्थातच आईची सुद्धा..दिवस भर घरात गोंधळ.. टिव्हीचा आवाज.. भावंडांची भांडणे.. अरे शांत बसा, भांडू नका अशी आईची कमेंटरी ..नोकरी करणारी आई असेल तर वेगळी काळजी..डे केअर अथवा मावशी जवळ सोडून जात‌ असेल तर सुचनांची यादी.. आईने सुट्टी घ्यावी म्हणून मुलांची चिडचिड..खाण्या पिण्याच्या डिमांड..हा क्लास तो क्लास.. नेऊन सोडा.. घेऊन या.. रात्री उशिरापर्यंत मस्ती.. आणि बरंच काही.. बिचारी थकलेली‌ आई?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..

    “आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता.
    आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.”
    अमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे नेहमी. विनय माझ्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करतो. नंतर पाहिजे तेव्हा सापडत नाही मला. मी नाही देणार, त्याची खेळणी का नाही खेळत तो. आता मी गिटार प्रॅक्टीस करतोय तर त्यालाही तेच पाहिजे आहे.”
    विनय आणि अमन, दोघे भावंडे. विनय अगदी तीन वर्षांचा तर अमन‌ बारा वर्षांचा. अमन समजूतदार , जरा अबोल तर विनय खूप मस्तीखोर. हळूच अमनच्या खोड्या काढायचा आणि काही न झाल्यासारखा दूर पळायचा. दोघांमध्ये जास्त अंतर असल्याने नेहमी दोघांचे भांडण झाले की नेहमी अमनला ओरडा खावा लागायचा, तू मोठा आहेस, विनय अजून लहान आहे, त्याला समजून घे. विनयला वाटायचं आपण काही केले तरी आई बाबा दादाला रागावतात, मग हळूहळू तो या गोष्टीचा बालीश पणे फायदा घ्यायचा.
    सारखं आई बाबांचा ओरडा खाऊन अमन मनातल्या मनात विनयचा राग करायला लागला, त्याला वाटायचं अमन खोड्या करतो आणि ओरडा मी खातो, विनय झाल्यापासून आई बाबा विनय वरच प्रेम करतात‌, काही झाले की मलाच ओरडतात, माझ्यावर आता आई बाबा प्रेमच करत नाही. ही भावना हळूहळू अमनच्या मनात घर करत होती.
    आई बाबांना वाटायचे इतर भावंडा प्रमाणे हे दोघेही भांडतात पण नेहमी अमनला रागविल्याने तो मनात सलते विचार करायला लागला. एकदा बाबा घरी आले तेव्हा दोघेही अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर दोघांचे भांडण बघून घरात येताच बाबा अमनवर ओरडले ” अमन‌ हे काय चाललंय, किती भांडता दोघे, लहान आहेस का तू आता,  उगाच कशाला विनयला त्रास देतो, इतका मोठा झाला तरी अगदी लहान असल्यासारखा वागतो.”
    बाबा रागाच्या भरात बोलून गेले पण अमनच्या मनाला ते खूप खोलवर लागलं. तो त्याच्या खोलीत जाऊन दार बंद करून रडत बसला.
    आईलाही त्याच असं वागणं बघुन अजूनच राग आला, खोलीचं दार वाजवत आई म्हणाली “अमन हा काय वेडेपणा, दार का लावून घेतलंस. उघड दार पटकन आणि ये बाहेर.”
    अमनने रडतच दार उघडले आणि आई-बाबांना रडतच म्हणाला “मी तुमचाच मुलगा आहे ना नक्की… काही झालं की मलाच ओरडता तुम्ही दोघे..विनय किती कुरापती करतो, खोड्या काढतो त्यालाही कधीच रागवत नाही..मला नाही राहायचं इथे..मला हॉस्टेलवर ठेवा मी नको असेल तुम्हाला तर..माझ्यावर कुणाचं प्रेमच नाही..”
    अमनच्या अशा बोलण्याने, वागण्याने आई बाबांना धक्का बसला. बाबांना वाईटही वाटले की आपण असं ओरडायला नको होतं, जरा समजून सांगायला पाहिजे होतं.
    बाबांनी अमनला जवळ घेतले आणि त्याला समजावत म्हणाले ” अमन बेटा, असा का म्हणतो आहेस तू.. अरे आमचं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे..तू इतका समजूतदार आहेस तरी असं म्हणतोय..फक्त तू मोठा आहेस आणि विनय अजून लहान आहे तेव्हा त्याच्याशी नुसतं भांडण न करता दादा म्हणून ते त्याला हक्काने समजून सांग..तू असं चिडलास तर विनय तुझं अनुकरण करून तोही चिडेल.. हट्ट करेल.. त्याच्याशी चिडून न‌‌‌ बोलता, नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणार नाही. मी दमून आलो रे घरी आणि तुम्ही अशे आरडाओरड करताना बघून माझी चिडचिड होणारच ना.. आणि तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला वाढदिवसाला गिटार गिफ्ट दिली असती का..तुला pets आवडतात म्हणून तर आपण टफी (Tuffy – त्यांच्या घरचा पाळीव कुत्रा) घेऊन आलो ना घरी. तेव्हा असा विचार परत करायचा नाहीस..हस बघू आता..”
    आईनेही अमनची समजूत काढली. त्याला पटवून दिले की आई बाबांचं प्रेम हे सारखंच असतं.
    झालेल्या प्रसंगावरून आई बाबांनाही त्यांची चूक लक्षात आली, आपण अमन मोठा आहे तेव्हा त्यानेच समजून घ्यावे, विनय लहान आहे त्याला तितकं कळत नाही म्हणून अमन कडून अपेक्षा ठेवत गेलो पण यामुळे विनय अजून हट्टी आणि खोडकर झाला असून अमनला इतका मोठा गैरसमज झाला , तो दुखावला गेला याचे दोघांनाही वाईट वाटले.
    यापुढे हा लहान हा मोठा असा विचार न करता दोघांनाही चूका‌ केल्यास समजून सांगायच्या असे आई बाबांनी ठरवले शिवाय अशी वेळ परत यायला नको याची पुरेपूर काळजी घेतली.

    भावंडं म्हंटले की छोट्या छोट्या खोड्या काढणे, भांडणे हे आलेच पण त्यावरून मुलांमध्ये एकमेकांविषयी राग, घरात आपल्यावर कुणाचं प्रेम नाही कारण मलाच नेहमी रागावतात ही भावना जास्त प्रमाणात निर्माण झाली तर ते धोक्याचे ठरते. मुलं वयात यायला लागली की त्यांच्यातील शारीरिक मानसिक बदल समजून घेत वर्तणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.

    • अश्विनी कपाळे गोळे
  • ADHD- पाल्यांमधील एक समस्या

    एखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”.
    ADHD नक्की काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.
    ही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरा सुरू करणे, गोष्टी लगेच विसरून जाणे, Hyperactive असणे , Restless होणे अशातच कुणी समजून घेत नसेल तर आक्रमक, नकारात्मक होणे ही लक्षणे दिसून येतात. ही स्थिती साधारणतः बालपणापात सुरू होऊन किशोर वयातपर्यंत  दिसून येते. बालक असताना सगळी मुले आजुबाजूच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, मस्ती करतात, एकाग्र नसतात पण जसजसे मुलं मोठी होतात तसं हे सगळं कमी होऊ लागते. काही मुलांमध्ये मात्र अती चंचलता, एकाग्रतेची कमी वयानुसार वाढत जाते. काहींना अभ्यासात रस नसतो पण खेळण्याची अथवा इतर कुठल्या गोष्टीची आवड असते. अशा वेळी काळजीचं कारण नाही पण कुठल्याच गोष्टीत मन रमत नसेल तर ADHD ची लक्षणे असू शकतात तेव्हा त्यानूसार काळजी घेणे गरजेचे असते. ही एक मानसिक स्थिती असते, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांव्दारे काऊन्सलिंग करून घेतले तर मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते.

    ADHD होण्याची कारणे-

    १. आनुवंशिकता
    २. पर्यावरण – गर्भावस्थेत आई अल्कोहोल प्राशन करत असेल तर fetal alcohol spectrum disorders होऊन मुलांमध्ये ADHD ची लक्षणे दिसून येतात.
    ३. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास – मुलांचा विकास नीट झाला नसेल तरी ही लक्षणे दिसून येतात.

    काही पाल्य अतिशय चंचल आहे, अभ्यासात किंवा कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रीत करु शकत नाही, रांगेत उभं राहिल्यावर आपला नंबर येईपर्यंत थांबत नाही, अशी लक्षणं सर्वसाधारणपणे प्रत्येक मुलांमध्ये पाहायला मिळतात. पण ही लक्षणं जास्त प्रमाणात आढळल्यास चिंतेची बाब ठरु शकते. असा स्वभाव असल्याने पाल्यांना शिक्षकांकडून तसेच पालकांकडून चुकीच्या अथवा असंवेदनशील वर्तणुकीला सामोरे जावे लागते. मुलं चंचल आहे, आपलं ऐकत नाही, वर्गात लक्ष नाही म्हणून सतत रागवले कि मुलांमधील चिडखोरपणा, आक्रमकता जास्त प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मुलांना काऊन्सेलिंग द्वारे कंट्रोल करता येते, म्हणूनच २०१७ मध्ये शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक शाळेत’काऊन्सलिंग सेल’असणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं.
    मुलं अती प्रमाणात चंचल असतील, एकाग्रता नसेल तर अशा मुलांना प्रेमाने समजून सांगणे खूप गरजेचे आहे. पालकांना अशा परिस्थितीत खूप त्रास होतो पण चिडचिड न करता योग्य वेळ देऊन मुलांना समजून सांगणे, त्यांच्या आवडत्या गोष्टींमध्ये त्यांना एकाग्र व्हायला मदत करणे खूप आवश्यक आहे, त्यात आई मुलांना सगळ्यात जवळची असल्याने आईने मुलांना समजून घेणे, प्रेमाने हाताळणे महत्वाचे असते, सोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काऊन्सलिंग करून घेणे फायदेशीर ठरते.

    याविषयी अधिक माहिती असल्यास नक्की शेअर करा.

    • अश्विनी कपाळे गोळे