Tag: laghu Katha

  • प्रीत तुझी माझी

    सुर्य मावळतीला आला होता..

     

    तांबड्या रंगाच्या छटा क्षितीजावर पसरल्या होत्या..

     

    निळाशार समुद्र या क्षणी अजूनच सुंदर भासत होता..

     

    गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता अन् लाटांचा आवाज मन प्रसन्न करत होता..

     

    मानसीचं मन मात्र आज कशातच रमत नव्हतं. ती एकटीच त्या सुर्याकडे बघत कुठेतरी हरवली होती. पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या..मन अस्वस्थ झालं होतं. तिच्या मनात विचार आला, “किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर..ऑफिस नंतर कितीतरी वेळा असंच या समुद्र किनार्‍यावर एकांतात बसून स्वप्न रंगवायचो‌. इथेच बसून तासंतास माझं कौतुक करणारा माझा रोहन आज लग्नाचा वाढदिवस सुद्धा विसरला. गेल्या सहा महिन्यांत नुसताच दुरावा..नुसतीच जबाबदारी.. श्या..”

     

     

     

    आज मानसी आणि रोहनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. दोघांचा प्रेमविवाह घरच्यांच्या साक्षीने वर्षभरापूर्वी पार पडला होता. लग्नानंतर दोन‌ महीने कसे गेले कळालेच नाही अन् लगेच रोहनला युरोपची संधी मिळाली. भविष्याचा विचार करून रोहनने संधी स्विकारली. नोकरीला काही महिने झाले की मानसीला सोबत घेऊन जायचे असा विचार करून तो व्हिसा च्या तयारीला लागला. मानसीची नोकरी इकडे सुरू होती, सोबतीला रोहनचे आई वडील असल्याने सुरवातीला मानसीला एकटेपणा फारसा जाणवला नाही पण नंतर रोहनच्या ओढीने ती अस्वस्थ व्हायची. सहा महिन्यांपूर्वी रोहन एकदा भेटायला आलेला पण तो एक आठवडा अगदी भर्रकन संपला.

     

    फोन, मेसेजेस, व्हिडिओ कॉल वरच काय ते बोलून व्हायचं. त्यातही गेल्या दोन दिवसांपासून रोहन सोबत काहीच संपर्क झाला नव्हता. दुसऱ्या शहरात कॉन्फरन्सला जातोय तेव्हा पुढचे काही दिवस फोन नाही करू शकणार इतकंच काय ते त्याने सांगितलं होतं.

     

    मानसीला वाटलं कितीही काम आलं तरी आज रोहनचा फोन नक्कीच येईल विश करायला..पण सायंकाळ होत आली तरी त्याचा साधा मेसेज सुद्धा आला नव्हता. मानसीने सकाळी फोन केला तर तो ही बंदच होता.

     

    दिवसभर ऑफिसमध्ये सुद्धा तिचं लक्ष लागलं नाही..बर्‍याच जणांनी विश करायला फोन मेसेजेस केले पण ज्याच्या शुभेच्छांची ती आतुरतेने वाट बघत होती त्याला आजचा दिवस लक्षातच नव्हता. रोहन चे आई बाबा सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेले. आजचा स्पेशल दिवस पण सोबतीला आज कुणीही नाही या विचाराने मानसी हळवी झाली. ऑफिस नंतर एकटीच किनार्‍यावर बसून हळव्या मनाला आवरत भूतकाळातील क्षणांना आठवू लागली.

     

     

    ” अतिशय हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला रोहन ज्याने याच मावळत्या सुर्याच्या साक्षीने मला लग्नासाठी मागणी घातली होती अन् मी ही त्याला इथेच होकार दिला होता.”  हे आठवून ती स्वतःशीच हसली अन् दोघांनी या किनाऱ्यावर एकत्र घालवलेले क्षण एक एक करत तिच्या नजरेसमोर यायला लागले.

     

     

    “त्या दिवशी इथेच याच वेळी रोहनने माझा हात पहिल्यांदाच हातात घेतला होता.. त्याच्या स्पर्शाने अंगावर रोमांचक काटा आलेला अजूनही आठवतोय..” तो क्षण आठवत असतानाच वार्‍याची मंद झुळूक मानसीला स्पर्शून गेली जणू मी ही त्या क्षणाची साक्षीदार आहे हे सांगून गेली.

     

     

    मानसी परत विचारात हरवली..

     

    “असंच एकदा मी इथे उदास बसलेली असताना त्याने माझे चेहऱ्यावर भुरभुरणारे केस अलगद बाजूला करत माझा चेहरा हातात घेऊन किती प्रेमाने विचारपूस केली होती..त्या क्षणी रोहनचे माझ्यावरचे प्रेम अगदी स्पष्ट जाणवत होते..

     

    दोघांच्या घरून लग्नाला होकार मिळाल्यावर रोहनने मारलेली पहिली मिठी..

     

    त्याने माझ्यावरच्या प्रेमाची दिलेली कबुली..”

     

    असे कितीतरी क्षण तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले.

     

    अनावर झालेल्या अश्रूंचा बांध फुटला अन् ते चटकन गालावर ओघळले.

     

    मानसीने अलगद आपले अश्रू पुसत क्षणभर दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले. लाटांचा खळखळाट कानावर पडत होता अन् अचानक कुणीतरी तिच्या चेहऱ्यावर भुरभुरणारी केसांची बट अलगद मागे केली..त्या ओळखीच्या स्पर्शाने ती दचकली..पटकन डोळे उघडून ताडकन उभी राहिली तर समोर रोहन होता.

     

     

    हे कसं शक्य आहे..नक्कीच आपल्याला भास होतोय म्हणत ती एकटक त्याचा हसरा आकर्षक चेहरा न्याहाळत उभी राहिली.

     

     

    क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिच्या आवडत्या जरबेराच्या फुलांचा गुच्छ फिल्मी स्टाईल मध्ये गुडघ्यावर बसून तिच्यासमोर धरला आणि म्हणाला, “हॅपी ऍनिवर्सरी माय लव्ह..”

     

    मानसीला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता. ती अडखळत म्हणाली, “रोहन..तू खरंच आलाय.. म्हणजे तुला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे..”

     

    “असा कसा विसरेन मी..तुला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून कॉन्फरन्स ला जातोय सांगून जरा खोटं बोललो.. पण खूप खूप सॉरी..इकडे यायच्या गडबडीत होतो.. म्हणून तुझ्याशी बोलून झालं नाही..आणि आता आलोय ते तुला माझ्या सोबत घेऊन जायला..”

     

    सगळं ऐकून मानसीच्या अश्रूंची जागा आनंदाश्रु ने घेतली. फुलांचा गुच्छ हातात घेऊन ती त्याच्या मिठीत शिरली. रोहनने तिचा चेहरा अलगद हातात घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला, “आय मिस्ड यू सो मच..”

     

    मानसीने अश्रू आवरत त्याच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली ,” आय मिस्ड यू टू.. हॅपी ऍनिवर्सरी रोहन..आय लव्ह यू…”

     

    रोहन तिच्या सुंदर, नाजूक चेहर्‍यावर हात फिरवत म्हणाला, “आय लव्ह यू टू..आणि परत एकदा सॉरी.. आजच्या स्पेशल दिवशी मी तुला रडवले..”

     

    “इट्स ओके… आपल्या खास क्षणांची उजळणी करत बसलेले मी तुझ्या आठवणीत… आणि तू इतकं भारी सरप्राइज दिलंय ना आज..मी शब्दांत सांगू शकत नाही‌ये माझा या क्षणीचा आनंद..” – मानसी.

     

    “तू बोलली नाहीस तरी मला सगळं स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर” – रोहन.

     

    रोहनने खिशातून एक नाजुक डायमंड रिंग काढली आणि मानसीच्या बोटात घातली. हळूच तिच्या हाताचे चुंबन घेत म्हणाला, “मला पुढच्या पाच वर्षांसाठी तिकडे कामाचं अप्रूव्हल मिळालं आहे..आता पुढच्या काही दिवसांत तुझ्या व्हिसाचे काम करून सोबतच परत जाऊ..आता नाही अशी वाट बघायला लावणार मी तुला..”

     

    दोघांनीही परत एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांनाही हा स्पर्श, ही मिठी हवीहवीशी वाटत होती.  कितीतरी महिन्यांचा हा दुरावा आज जणू संपला होता.

     

    रोहन हळूच मानसीच्या कानात म्हणाला, “आता नको हा दुरावा‌.. पुढचं सेलिब्रेशन घरी जाऊन करूयात..”

     

    मानसीने लाजतच त्याच्या हातात आपला हात दिला आणि मानेनेच हो म्हणत त्याच्या सोबत घरी जायला निघाली.

     

    पाठीमागे सुर्य जणू समुद्रात गुडूप व्हायला लागला होता. आजच्या खास रोमॅंटिक क्षणाचा परत एकदा तो साक्षीदार झाला होता.

     

     

    समाप्त..!!!

     

     

    © अश्विनी कपाळे गोळे

     

     

    अशी ही दोघांच्या प्रेमाची गोड कथा तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा.

     

     

     

     

     

     

     

     

     

  • Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा

    निधी फ्रेश होऊन चहा नाश्ता करत असतानाच पाहुण्यांचा फोन आला. “अर्धा तासात आम्ही पोहोचतो” असं पाहुणे मंडळींकडून कळताच मम्मा पप्पांची घाई सुरू झाली. सगळी अरेंज मेंट नीट झाली आहे ना याची खात्री करून घेत मम्मा निधीला म्हणाली, “निधी आता तू तयार हो..काही मदत लागली तर आवाज दे मला..”

     

    निधीला मात्र जराही उत्साह वाटत नव्हता. मम्मा पप्पा चे मन राखायला म्हणून ती तयारीला लागली. मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला, त्यावर मॅचिंग नाजुकसे कानातले घातले, हलकासा मेकअप करून कपाळावर इवलिशी टिकली लावली. केस नेहमीप्रमाणे मोकळेच ठेवत आरशासमोर उभे राहून क्षणभर स्वतःला न्याहाळत निधी मनातच पुटपुटली, “वाह निधी, तू तो कमाल लग रहीं…इतके दिवस स्वतःकडे लक्षच दिलं नाही मी..”

     

    “निधी.. अगं तयार झालीस का?” असा मम्मा चा आवाज येताच ती भानावर आली.

     

    “हो मम्मा..झालंय माझं..” म्हणत मागे वळून बघितलं तितक्यात मम्मा खोलीत आली आणि निधीला बघताच म्हणाली, “किती सुंदर दिसत आहेस निधी तू या ड्रेस मध्ये..माझीच नजर लागणार बहुतेक तुला आज..”

     

    “काहीही काय गं मम्मा..” -निधी.

     

    गाडीच्या हॉर्न चा आवाज आला आणि मम्मा म्हणाली, “आलेत बहुतेक पाहुणे..निधी तू थांब खोलीतच..मी तुला बोलावते मग ते बाहेर..ठीक आहे..चल ऑल द बेस्ट..”

     

    निधी स्वतः शीच बोलू लागली, “ऑल द बेस्ट काय म्हणते मम्मा..माझी काय परीक्षा आहे की काय..?

    तसं बघायचं म्हंटलं तर एक प्रकारची परिक्षा आहेच म्हणा..वधू परिक्षा.. श्या..मला नाही आवडत हे सगळं प्रदर्शन….जाऊ दे आता हे सगळं विचार करत बसायची वेळ नाही..कोण महाशय आलेत मला बघायला जरा बघावं डोकावून…”

     

    असं पुटपुटत निधी खिडकीजवळ आली आणि पण सगळे प्रयत्न व्यर्थ…तिला काही त्याची झलक दिसलीच नाही.

     

    तिने बेडवर ठेवलेला तिचा फोन हातात घेऊन सेल्फी काढले, नंतर फोन बघतच बाजुच्या टेबलवर ठेवलेली पाण्याची बाटली हातात घेऊन पाणी प्यायली. काही वेळाने मम्मा निधीला बोलवायला आली.

    ड्रेस नीट करत परत एकदा केसांवर हात फिरवत निधी ने आरशात बघितले आणि मम्मा सोबत हॉल मध्ये जायला लागली.

     

    हॉलमध्ये तिला‌ बघायला आलेला सुजय, त्याचे आई वडील आणि एक बहीण‌ असे चौघे जण निधी येताना दिसताच एकटक तिला बघतच राहिले. त्यांच्याकडे निधीने एक नजर फिरवली आणि सगळे आपल्याला बघताहेत हे लक्षात येताच ती जरा लाजतच स्मित हास्य करत समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. तिची स्माइल , ते घायाळ करणारे सौंदर्य बघताच सुजयची नजर तिच्यावर स्थिरावली.

     

    “मी तुमची ओळख करून देतो..” असं निधीचे पप्पा म्हणाले तसाच सुजय भानावर आला. निधीच्या पप्पांनी निधी आणि सुजयच्या कुटुंबाची ओळख करून दिली. जरा वेळ सगळ्यांशी बोलून झाल्यावर सगळ्यांनी सुजय आणि निधीला एकांतात बोलायला टेरेस गार्डन मध्ये पाठवले.

     

    चौफेर फुलझाडांनी सजवलेल्या टेरेस गार्डन मध्ये मधोमध दोन खुर्च्या आणि एक टेबल ठेवलेला होता. त्यावर दोघांसाठी कॉफी ठेवलेली होती. निधीने कॉफी कप मध्ये ओतून घेत एक कप सुजय ला दिला आणि एक कप स्वतःच्या हातात घेतला.

     

    सुजय कप हातात घेत “थ्यॅंक्यू..” म्हणाला. त्यावर निधी ने नुसतेच स्मित केले.

     

    सुजय – “अशा वेळी नेमकं काय बोलावं कळत नाही ना….माझी ही कांदेपोहे कार्यक्रमाची पहिलीच वेळ आहे…आणि कदाचित शेवटची…”

     

    निधी- “शेवटची..?”

     

    सुजय- “जर तू मला पसंत केलं तर‌ शेवटची…”

     

    निधी – “अच्छा.. आणि मी नाही म्हणाले तर…”

     

    सुजय त्यावर हसला आणि म्हणाला, “तो‌ विचार केलाच नाही मी..मी तुझा फोटो बघितला त्यावेळीच का कोण जाणे पण वाटलं हीच ती, जिच्या शोधात मी आहे…”

     

    निधी – “असं एकदा बघून आयुष्यभरासाठी निवड करता येते का खरंच..”

     

    सुजय – “मला असंच वाटायचं..एका भेटीत कसं काय जोडीदार निवडायचा..खरं तर माझं ठरलं होतं की जी मुलगी आवडेल तिच्याशी आधी मैत्री करायची आणि मग एकमेकांना ओळखून नंतरच लग्नाचा विचार करायचा पण तुझ्या बाबतीत खरंच असं वाटलं नाही.. तुझ्याविषयी आई बाबांनी सांगितलं, फोटो बघितला तेव्हापासून वाटलं तुला खूप आधीपासून ओळखतो आहे..”

     

    निधी‌ जरा आश्चर्याने म्हणाली, “तुला माझ्या भूतकाळाविषयी काही प्रोब्लेम नाहीये? आय वॉज इन रिलेशनशिप…वॉज डिपली इन लव्ह विथ समवन..”

     

    सुजय – “आय नो…आय डोन्ट हॅव एनी प्रोब्लेम…प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच कुणीतरी खास.. मलाही अशीच एक मुलगी खूप आवडायची पण तिला मी हे सांगण्यापूर्वी माझ्याच एका मित्राने तिला प्रपोज केले, ते‌ दोघेही आनंदात आहे.. त्यांना तर हेही माहीत नाही की माझ्या मनात असं काही होतं..प्रेम काही ठरवून करत नाही आपण आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे सुद्धा आयुष्यभर एकत्र असतील असही नसतं..कधी तर प्रेमविवाह झाल्यावर पटत नाही म्हणून वेगळे होतात मग सगळे म्हणतात प्रेमविवाह केला की असंच होतं वगैरे…असो..तू विश्वासाने घरी सांगितलं, आम्हालाही कल्पना दिली पण सगळे असं करतात असं नाही.. प्रेम केलं म्हणजे एखादा गुन्हा केला असं नाही ना.. भूतकाळ होता..”

     

    निधी त्याचं बोलणं ऐकून स्तब्ध झाली. सुजय बोलला ते खरंच विचार करण्यासारखं आहे..इतका प्रॅक्टिकल विचार आपण का करत नाही असंही तिला वाटलं.

     

    निधी – “अजून एक सांगायचं आहे, आम्ही फक्त प्रेमात नव्हतो तर एकमेकांच्या खूप जवळ सुद्धा आलो होतो…”

     

    सुजय- “हम्म.. याविषयी मी एकच सांगेन जर आपलं लग्न झालं तर त्यानंतर आपल्यात या गोष्टी घडताना तुला आधीच्या आठवणींचा त्रास होणार नसेल तर मला काहीच हरकत नाही. सॉरी..जरा जास्त बोलून गेलो असेल तर माफ कर पण मी खरंच तुला तुझ्या भूतकाळाविषयी कधीच काही विचारणार नाही..माझी एकच अपेक्षा असेल की तू सुद्धा वर्तमान आणि भविष्य याचाच विचार करावा..तरीही घडलेल्या गोष्टींमुळे कधी काही त्रास झालाच तर बिनधास्त मन मोकळं करावं पण त्यात गुंतून राहू नये. बाकी निर्णय तुझ्यावर अवलंबून आहे..”

     

    निधी – “इतका कसा काय समजुतदार आहेस तू… म्हणजे मला इंप्रेस करायला तर म्हणाला नाही ना..”

     

    सुजय जरा हसत म्हणाला, “नो..नो..मुळीच नाही.. इंप्रेस करायला नाही..मी फक्त माझी अपेक्षा सांगितली…बाय द वे, तुझा स्पष्टवक्तेपणा आवडला मला..मी सुद्धा असाच आहे म्हणजे जे वाटतं ते बोलून मोकळं व्हायचं..उगाच मनात साठवून ठेवत कुढत जगायचं नाही अशा विचारांचा..”

     

    निधी – “मलाही आवडला तुला‌ असा बिनधास्त स्वभाव…पण खरं सांगू मला ना अजूनही भिती वाटते रिलेशनशिप, प्रेम या गोष्टींची… ”

     

    सुजय जरा मस्करी करत म्हणाला  ” आता तर मलाही भिती वाटायला लागली आहे तुझी..मी तुला बघतक्षणी पसंत केले.. मला हवी अगदी तशीच तू आहेस पण आता तू मला नकार‌ दिला तर माझं काय हा विचार मात्र केलाच नव्हता मी..आता तसा विचार मनात आला तरी भिती वाटत आहे..”

     

    त्यावर दोघेही हसले.

     

    निधी – “मला‌ जरा वेळ दे विचार करायला… खरं सांगू तुझ्यात नकार देण्यासारखं काहीच नाही पण तरीही मला जरा वेळ हवा आहे..”

     

    सुजय – “हो‌ नक्कीच..मी तुला लगेच होकार, नकार दे असं म्हणतच नाहीये.. आणि हो, कुणाच्याही दडपणाखाली येऊन निर्णय घेऊ नकोस..मला तू आवडली तेव्हा तुला मी आवडायला पाहिजेच असंही नाही..तुझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुला आहे..सॉरी मी फार लेक्चर वगैरे दिलं असेल तर..”

     

    निधी हसतच म्हणाली, “थ्यॅंक्यू…”

     

     

     

    क्रमशः

     

     

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

     

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला

    • “निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली.

     

    निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला‌ मिळतं निवांत.. ”

     

    “निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?”

     

    “मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे करत आहोत आपण..मला मूळात लग्नच करायचं नाहीये ”

     

    “निधी, असं किती दिवस त्याच आठवणी मनात घेऊन लग्नाला नकार देत राहणार आहेस बाळा.. आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून काहीतरी शिकवण घेत पुढे जायचं असतं..सगळेच मुलं काही वाईट नसतात..”

     

    “मम्मा प्लीज आज परत तो विषय नको..” – निधी उठून बसत म्हणाली.

     

    “ओके बाबा, सॉरी..पण लवकर तयार हो..”

     

    मानेनेच होकार देत निधी बाथरूममध्ये निघून गेली.

     

    निधीची आई मात्र तिच्या काळजीने मनातच पुटपुटत म्हणाली, “हा योग जुळून येऊ दे देवा.. भूतकाळ आधीच माहीत असूनही मुलाकडचे तयार झाले..आता एकदा सगळं जुळून आलं की निधीची समजूत काढता येईल..होईल तयार ती लग्नाला..”

     

    निधीच्या विचारात गुंतली असताना बाबांची हाक ऐकताच आई विचारातून बाहेर आली.

     

    “आले हा..” म्हणत आई खोलीतून बाहेर गेली.

     

    निधी दिसायला सुंदर, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज, आकर्षक व्यक्तीमत्व असलेली श्रीमंत घरातील आई वडीलांना एकुलती एक मुलगी. अगदीच लाडा कौतुकात ती लहानाची मोठी झाली. डिग्री नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. तिथे तिची ओळख वेदांत सोबत झाली. परदेशात आपली भाषा बोलणारा वेदांत भेटल्याने तिची त्याच्याशी मस्त गट्टी जमली. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री झाली. विकेंड ला सोबत फिरणे, शॉपिंग, पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन सगळं अगदी सोबत करायचे दोघेही. निधीला वेदांतचा सहवास हळूहळू आवडायला लागला होता. वेदांतच्या मनातही निधी विषयी प्रेम होतेच पण त्याने ते व्यक्त केले नव्हते. न राहावून शेवटी निधीने तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आणि दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

    दोघेही प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. दोन वर्षे एकत्र असताना‌ ते मनाने तर जवळ आलेच पण नकळत शरीरनेही एकरूप झाले. आता मायदेशी परतल्यावर घरी लग्नाचं बोलायचं आणि संसार थाटायचा असं दोघांचं ठरलेलं.

    निधी ने तर तिच्या मम्मा पप्पांना व्हिडिओ कॉल वर वेदांत विषयी सगळं काही सांगितलं सुद्धा. निधीच्या घरचं वातावरण अगदीच फ्रेंडली त्यामुळे त्यात काही वावगं असं त्यांना वाटलं नाही पण मम्मा मात्र सारखं तिला म्हणायची, “निधी बेटा, बॉयफ्रेंड आहे हे ठीक आहे पण काही चुकीचं करून बसू नकोस..”

     

    त्यावर निधी म्हणायची, “कम ऑन मम्मा.. मी काय लहान बाळ आहे का.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर..आता परत आलो ना की लग्नाचं ठरवूया म्हणतोय वेदांत..”

     

    “आपली मुलगी तशी बोल्ड आहे..माणसांची योग्य पारख तिला आहे..आता ती अल्लड नाही..आपणच उगाच काळजी करतोय बहुतेक..” असा विचार करत स्वतः ची समजूत काढत मम्मा शांत बसायची.

     

    वेदांतच्या घरी मात्र अजून निधी विषयी काही माहिती नव्हते. घरी परत गेल्यावर मी सगळ्यांशी बोलून आपल्या नात्याविषयी सांगतो..त्यांना काही प्रोब्लेम नसणार आहे असं वेदांत अगदी आत्मविश्वासाने सांगायचा.

     

    बघता बघता दोन वर्षे संपले आणि दोघेही मायदेशी परतले. दोघेही वेगवेगळ्या शहरात राहायला‌ त्यामुळे आता फक्त फोन, व्हिडिओ कॉल यावरच भेट व्हायची.  निधी त्याला सारखं विचारायची, “वेदांत तू घरी बोललास का आपल्या विषयी..”

    त्यावर वेदांत म्हणायचा, “निधी, एकदा‌ नोकरी हातात आली ना की लगेच सगळी बोलणी करुया.. तुझ्या घरी सुद्धा तुझा हात मागायला असं विना नोकरी कसं यायचं ना.. बसं काही दिवस थांब..”

     

    निधीचेही नोकरीचे प्रयत्न सुरू होतेच पण वेदांत पासून दूर राहणे तिला फार अवघड होत चाललं होतं. दोन‌ वर्षांच्या सहवासात त्याची जणू सवय झाली होती.

    एक दिवस वेदांतचा सकाळीच कॉल आला..त्याला मोठ्या कंपनीची ऑफर मिळाली होती, परत परदेशात प्रोजेक्ट साठी जावं लागणार आहे असं त्यानं सांगितलं.

     

    ते ऐकून निधी अगदी आनंदाने नाचायला लागली. “वेदांत आता घरी बोलू शकतोस तू… लगेच लग्न करायचं असं नाही पण आपल्या विषयी कल्पना तरी देऊ त्यांना..”

     

    “निधी, किती उतावीळ झाली आहेस तू…आता कुठे नोकरीची ऑफर मिळाली..बोलूया लवकरच घरी..धीर धर जरा..” असं वेदांत म्हणाला तेव्हा निधी मनोमन फार दुखावली.

     

    “आपण दिवसेंदिवस वेदांत मध्ये गुंतत जातोय पण हा मात्र सगळं खूप सहज बोलून मोकळा होतो आहे.. वेदांत धोका तर‌ देणार नाही ना.. नाही.. नाही.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर…असा नाही करणार तो… त्याला जरा‌ वेळ द्यायला हवा… “अशी स्वतः ची समजूत काढत निधीने ठरवले की आता काही दिवस तरी त्याला या विषयी काही विचारायला नको.

     

    निधीचे मम्मा पप्पा पण तिला अधूनमधून वेदांत विषयी विचारत म्हणायचे, “वेदांतला एकदा तरी घरी बोलावून घे..आम्हाला भेटायचं आहे त्याला… तुमचं पुढे काय ठरलं जरा बोलायला हवं ना..”

     

    त्यावर निधी “हो..हो..” म्हणत वेळ निभावून न्यायची.

     

    दिवसेंदिवस आता दोघांचं फोनवर बोलणं सुद्धा कमी होत चाललं होतं. निधीच्या मनात शंकाकुशंका यायला लागल्या होत्या.

     

    बराच विचार करून निधी‌ मम्मा पप्पांना म्हणाली, ” पप्पा, आपण जायचं का वेदांत कडे…तो सध्या त्याच्या नव्या नोकरीत, व्हिजा वगैरे मध्ये बिझी आहे..आपण भेटायला जाऊ..त्याला सरप्राइज देऊ..मला पत्ता माहीत आहेच..”

     

    “चालेल..काही हरकत नाही..” – पप्पा.

     

     

    क्रमशः

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • संसाराचे ब्रेकअप

    संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच..
    आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..”
    होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता संजय. अजयची बडबड ऐकून त्यावर फारसं प्रत्युत्तर न देता गुपचूप तो ऐकून घेत होता. न राहवून काही वेळाने अजयने त्याला विचारले तेव्हा बराच वेळ काही नाही झालं म्हणणारा संजय शेवटी म्हणाला,”त्याच्यामुळे आज तुझ्या वहिनीचे आणि माझे भांडण झाले रे..नकोच तो मला आता आयुष्यात..म्हणजे डोक्याला ताप नसेल..”
    अजयला मात्र काही कळालं नाही..”अरे..तो कोण.. कशामुळे भांडण झालं..नीट सांगशील का तू..”
    संजय – “अरे तो रे.. मोबाईल.. त्याच्यामुळेच आमची जास्त भांडणे होतात..आज तर सकाळीच भांडण ?..नकोच मला‌ मोबाईल..”
    अजय जरा चक्रावून गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला, “मोबाईलमुळे भांडणं..मला तू नीट सांग यार.. काय बोलतोय काही कळत नाही..”
    संजय – “अरे, काल रात्री ही‌ लवकर झोपली, मी आपला वेबसिरीज बघत बसलेलो मोबाईलवर..?हिने आवाज दिला असेल मधेच जाग आल्यावर..किती वेळ झालाय झोपा आता असं म्हणत , तर मला काही हेडफोन्स मुळे कळाल नाही.. झालं ना..मला‌‌ सकाळी म्हणाली तुम्ही रात्री कुणाशी चाटींग करत होते.. माझ्याकडे लक्ष नव्हतं..मी किती आवाज दिले तरी चेहऱ्यावर हास्य आणून चाटींग करत होतात.. माझ्याशी बोलायला वेळ नसतो.. घरी आले की मोबाईलवर असता सारखे.. वरून हद्द म्हणजे आजपर्यंत माझा फोटो डिपी‌ वर ठेवला नाही म्हणे तुम्ही.. फेसबुकवर टाकला नाही.. तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही.. नंतर तर चक्क संशय घेतला आणि म्हणाली, तुमची नक्कीच गर्लफ्रेंड आहे..तिला कळू नये तुमचं लग्न झालेलं म्हणून तुम्ही माझा फोटो लावत नाही डिपी ला..रडायला लागली राव स्वतःच संशय घेऊन..
    समजून घ्यायला तयार नव्हती.. शेवटी तिचा माझा सोबतचा फोटो ठेवलाय व्हॉट्स ॲप’ला डिपी.. चूक नसताना सॉरी म्हणालो.. कशीबशी समजूत काढली आणि आलो ऑफिसला.”
    हे सगळं ऐकून अजयला खूप हसू आलं..?? तो हसू आवरत म्हणाला,”डिपी न‌ ठेवण्यावरून भांडण..?? काय रे..तू घाबरून ठेवला मग डिपी दोघांचा फोटो ??”
    संजय – ” हसून घे.. तुझं लग्न झालं ना‌ कि मग कळेल तुला.. अरे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर काहीतरी शायरी पोस्ट केलेली मी… एव्हाना विसरलो होतो.. मॅडम ने वाचली एकदा आणि मागेच लागली विचारायला की कुणासाठी लिहीलेली तुम्ही शायरी.. माझ्या आधी कुणी होती का वगैरे..मी सारखं डिपी बदल.. फोटो अपलोड करणार्‍यातला नाही रे.. जास्तच काय तर वेबसिरीज नाही तर गेम..किती सांगितलं हिला पण पटतच नाही..इतरांचे कपल फोटो, रोमॅंटिक स्टेटस बघितले की आमचं भांडण ठरलेलंच.”
    अजयला हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटले.. मोबाईल मुळे संसारात इतके गैरसमज होतात याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.

    तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना..पण खरं आहे हे.. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली “लग्नापासून एकदाही पतीने पत्नीचा फोटो डिपी न ठेवल्याने पत्नीने चक्क महिला सहायता कक्षाकडे पतीची तक्रार केली.” पोलिसांनाही ऐकून धक्काच बसला.. समुपदेशन करून दोघांची समजूत काढली गेली आणि पतीने व्हॉट्स ॲपवर पत्नी सोबतचा फोटो डिपी ठेवण्याचे मान्य केले तेव्हा दोघांमधला वाद मिटला. पोलिसांनी हेही सांगितले की हल्ली पती पत्नी यांच्यात जास्तीत जास्त वाद हे मोबाईल मुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींवरून संसाराच्या ब्रेकअप चे कारण हे मोबाईल असल्याने बरेचदा समुपदेशन करून वाद मिटतात तर कधी संशयावरून टोकाला जातात.
    मुलांमधील मोबाईलचे वेड आणि त्यामुळे होणारे पालकांचे भांडण यांचंही बरंच प्रमाण आहे..पण आता पती पत्नी यांच्या संसारात मोबाईल, सोशल मीडिया मुळे ब्रेकअप होण्याची वेळ येते म्हणजे विचार करण्याजोगे आहे..
    मोबाईल, सोशल मीडिया हे सगळं आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा असा अतिरेक करत जोडिदाराच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमक करणे चुकीचे नाही का?
    नात्यात एक स्पेस असणं, एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया, मोबाईल मुळे इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना करून नात्यात फूट पाडणे खरंच अयोग्य आहे. मोबाईल, इंटरनेट मुळे आपण अपडेटेड राहतो, नवनवीन गोष्टींची माहिती मिळते, जगभरात कनेक्टेड राहतो.. अशे फायदे अनेक आहेत पण त्यांच्या गैरवापर अथवा अतिरेकामुळे संसाराचे ब्रेकअप होत असेल तर वेळीच सावरायला हवे. संसारातील विश्वास जपायला हवा, प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे, परिस्थिती वेगळी तेव्हा इतरांशी तुलना करून वाद निर्माण झाले तर आयुष्य सुखी होण्याऐवजी नात्यात फूट पडायला सुरुवात होईल.

    तुमचं याविषयी मत मांडायला विसरू नका ?? नकळत तुमच्या संसारात असंच मोबाईल, सोशल मीडिया मुळे गैरसमज होत असतील तर वेळीच सावरा.?? संवाद साधा.. गैरसमज दूर करा…??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

    सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच रिक्षा पकडून डॉक्टरांकडे निघाली. डॉक्टरांनी  तपासणी केली तर अंगात खूप जास्त ताप होता शिवाय तिला अशक्तपणा मुळे गरगरायला लागले होते.
    घरी आल्यावर जेवण करायला स्वयंपाक घरात गेली तर लगेच तिच्या कानावर शब्द पडले ” आज एका कामाला हात लावला नाही, सगळं मला‌ एकटीला करावं लागलं.” सुमित्राने कसे बसे दोन घास खाऊन औषध घेतले आणि जाऊन अंथरूणावर पडली तोच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिच्या मनात विचार आला, ” आपण घरी सगळ्यांसाठी किती झिजलो, कुणालाही गरज असो सुमित्रा तयार आणि आज आपल्यावर वेळ आली तर तब्येतीची साधी चौकशी नाही. वरून अपमानास्पद बोलून मोकळे होतात सगळे. आता बस झाल्या इतरांच्या सेवा, आता मी स्वतः साठी जगणार.. स्वतः ची काळजी घेणार.”
    सुमित्रा एकोणीस वर्षांची असताना लग्न करून बापूरावांच्या आयुष्यात आली. बापूराव प्रतिष्ठित घरातले , एकत्र कुटुंबात राहणारे. तिचं सौंदर्य बघता बापूराव तिला कुठे ठेवू कुठे नाही असे अगदी फुलाप्रमाणे जपायचे. नव्या नवरीचे नवलाईचे नवं दिवस संपले आणि ती जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकली. कुणालाही कुठल्या कामासाठी नाही म्हणने सुमित्राला जमत नव्हते. कुटुंबात कुठलाही सोहळा असो , कुणाचं आजारपण असो किंवा बाळंतपण असो सुमित्रा मदतीसाठी तत्पर असायची. अशा स्वभावामुळे सगळे तिची वाहवा करायचे शिवाय बापूरावांची मान अख्ख्या कुटुंबात वाढलेला बायकोच्या वाहवा मुळे अगदी ताठ असायची. सगळ्यांचं करता करता घरासाठी राबत असताना सुमित्रा आणि बापूरावांच्या नात्यात मात्र फूट कशी पडली सुमित्राला कळालेही नाही. त्यात भर म्हणजे कित्येक प्रयत्न केले तरी सुमित्राला आईपण काही लाभत नव्हते. सासूबाई ह्या त्या देवस्थानात नवस बोलायच्या, दवाखान्याच्या चकरा सुरूच पण सुमित्रा कडून आनंदाची बातमी काही मिळत नव्हती. असं करता करता लग्नाला सहा वर्षे झाली. गावातील लोक, नातलग नावं ठेवायला लागली. मग सासूबाईंनी सूर काढला बापूरावांच्या दुसऱ्या लग्नाचा, बघता बघता लवकरच अगदी मुलगी शोधून लग्न करायची तयारीच झाली. सुमित्राला ते ऐकून धक्का बसला, तिने आई वडीलांना सांगितले, त्यांची परिस्थिती जेमतेम, ते म्हणाले “अजून लहान बहीणींचे लग्न व्हायचे आहे तेव्हा तू कायमची माहेरी आली तर लोक काय म्हणतील शिवाय बहिणीच्या लग्नात अडथळा येयील.” क्षणभरात माहेरही तिच्यासाठी परकं झालं.
    सुमित्राच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. कुणालाही नाही म्हणने तर तिचा स्वभावच नव्हता. बापूरावांनी दुसरं लग्न करून सवत घरी आणली. लग्नानंतर दोन महिन्यांत तिला दिवस गेले, मग काय सगळ्यांनी तिला अगदी डोक्यावर घेतले, तिचे लाड पुरवले जाऊ लागले. सुमित्रा दिवसभर राब राब राबून घर सांभाळायची पण कुणीही तिच्या कडे फारसे लक्ष देत नव्हते. एखाद्या मोलकरीणी  सारखी तिची अवस्था झाली होती. बापूराव सुद्धा साधं कधी प्रेमाने बोलत नव्हते, कामापुरते काम ठेवायचे. सुमित्रा रोज रडायची, आयुष्य संपवायचा विचार करायची पण काही उपयोग नव्हता.
    तिच्या सवतीचे दोन बाळंतपण तिनेच केले. अजूनही कुटुंबात कुणाला मदतीची गरज पडली की बापूराव तिला त्यांच्या घरी नेऊन सोडायचे. तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन सगळ्यांचे बाळंतपण, म्हातारपणी सेवा,. लग्न असो किंवा कुठलाही सोहळा समारंभ , सगळं ओझं सुमित्रा वरच असायचं. तिची सवत सुद्धा तिला मोलकरीण समजून राबवून घ्यायची. घरात जिव्हाळा, प्रेम देणार कुणीच उरलं नव्हतं. जिथे नवराच आपला राहीला नाही तर इतरांकडून काय अपेक्षा असं समजून सुमित्रा जगत होती, माहेरी सुद्धा एक पाहुणीच. अशातच वयाची पन्नाशी जवळ आली, तब्येत आधी सारखी धडधाकट राहीली नव्हती, पण कुटुंबात अपेक्षा मात्र संपल्या नव्हत्या.  असंच आज अंगात इतका ताप असूनही साधी विचारपूस तर नाही पण कामात मदत केली नाही म्हणून तिची सवत तिला कुरकुर करत होती. औषधी घेऊन जरा वेळ सुमित्राला झोप लागली.
    काही वेळाने जाग आली तर कानावर शब्द पडले ” सुमित्रा आहे ना, पाठवा की तिला.”
    ते ऐकताच सुमित्रा बाहेर आली तर बापूराव,त्यांच्या आई आणि सवत बोलत होते. सुमित्राला बघताच सासूबाई म्हणाल्या “सुमित्रा, लहान काकी दवाखान्यात भरती आहे, तुला त्यांच्या जवळ जावं लागेल. एक जण बाई माणूस पाहिजे त्यांच्या सेवेत.”
    त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सुमित्रा म्हणाली “मी जाणार नाही, माझ्या अंगात इतका ताप, अशक्तपणा, तुम्हा कुणाला माझी अवस्था कळत नाही, माझा फक्त गरजेच्या वेळी वापर केला इतके वर्ष तुम्ही. पण आता बस..मला नाही जमणार जायला. हे तसं तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण आता माझे डोळे उघडले. सूनेच्या नात्याने कर्तव्य म्हणून मी राबत गेले पण आता बस.. नाही जमणार मला.”
    सगळे सुमित्राच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. सुमित्राचे हे रुप सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. उशीरा का होईना पण नाही म्हणण्याच्या कलेत सुमित्रा नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करत होती, स्वतः साठी जगण्याची नवी उमेद तिच्या मनात नव्याने जागी झाली होती.

    अशा अनेक सुमित्रा आज समाजात आहेत ज्यांना नाही म्हणता येत नाही आणि म्हणून मग सगळे फायदा घेतात. अशावेळी घरात कुणालाच आपुलकी नसेल तर त्याचा किती त्रास होतो हे सहन करणार्‍यालाच माहीत असते म्हणूनच योग्य वेळी नाही म्हणने खुप गरजेचे असते.

    लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

    नावासह शेअर करायला हरकत नाही. लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २

    मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे ?

    अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर आधार म्हणून तिने नकळत अचानक तिचा‌ हात अजितच्या खांद्यावर ठेवला आणि तिच्या हाताच्या स्पर्शाने अजितची अजून एकदा विकेट उडाली. संपदाच्या लक्षात येताच ती पटकन हात काढून लाजतच सॉरी म्हणाली आणि त्यावर अजितने लगेचच हात ठेवलास तरी हरकत नाही म्हणताच तिने परत आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. आज दोघांचीही अवस्था जरा‌ वेगळीच झाली होती. असं ठरवून भेटल्यावर काय बोलावे काय नाही अशी दोघांची अवस्था झालेली होती. कॉफी शॉप मध्ये पोहोचताच अजितने दोघांसाठी कॉफी मागवली, दोघेही आजूबाजूला बघत लाजत अवघडल्यासारखे एकमेकांसमोर बसले होते. चुकून नजरानजर झाली की संपदा एक गोड स्माइल द्यायची आणि अजित त्या स्माइल मुळे घायाळ??. बराच वेळ दोघे शांतपणे बसून नजरेनेच बोलत होते, काही वेळाने  अजितने पुढाकार घेत गप्पा सुरू केल्या. ही वेळ कधी संपूच नये अशी अजितची अवस्था झाली होती.
    अशाच दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. संपदाचा सहवास अजितला हवाहवासा वाटू लागला.संपदा कधी भेटायला तयार व्हायची तर कधी मुद्दामच अजितची मज्जा बघायला काही कारण काढून भेटायला नकार द्यायची. मनातून तर तिही त्याला भेटायला तितकीच उत्सुक असायची. असं दोघांचं भेटणं, बोलणं सुरू होत, आता संपदाला मनातल्या भावना सांगायला हव्या, तिला लग्नासाठी विचारायला हवं असं अजीतने मनोमन ठरवलं.
    येत्या रविवारी संपदाला निवांत भेटून प्रपोज करायचं असं ठरवून अजित तयारीला लागला. कसं प्रपोज करायचं याची प्रॅक्टीस आठवडाभर सुरु होती. संपदा आठवडाभरात दोन वेळा भेटली, फोनवर संवाद हा सुरू होताच. त्याने तिला रविवारी भेटायचं विचारलं तेव्हा काहीही आढेवेढे न घेता ती तयार झाली.
    ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी अजित एक सुंदर लाल गुलाबांचा गुच्छ, एक छानसा दोघांचा फोटो असलेलं पेंडंट घेऊन संपदाची वाट पाहात होता. आज नेहमीपेक्षा जास्त तयार होऊन मोठ्या उत्साहात तो भेटायला आला.
    संपदाला यायला मात्र बराच उशीर झाला, फोन केला तरी ती उत्तर देत नव्हती, तेव्हा संपदा नक्की येयील ना भेटायला, असं तर ती वागत नाही. यायचं नसतं तर आधीच नकार कळवलं असतं संपदाने अशा विचारांमध्ये अजित गुंतला असतानाच मागून येऊन कुणीतरी अजितचे़ डोळे हातांनी झाकले. त्या नाजूक बोटांचा स्पर्श अजितने लगेच ओळखला. हळूच तिचे हात पकडून डोळयांवरून बाजूला करत तो काही बोलणार तितक्यात ती म्हणाली, ” I’m really sorry..मला यायला खूप उशीर झाला..बराच वेळ वाट पहावी लागली ना तुला..sorry again..”

    अजितने मागे वळून पाहिले, संपदा सुद्धा आज छान तयार होऊन आलेली. तिचं निरागस रूप पाहून अजितचा मूड एकदम फ्रेश झाला आणि नकळत तो बोलून गेला, “अगं, sorry म्हणू नकोस, तुझ्यासाठी एक तास काय , आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे मी….? ( जरा वेळ दोघेही स्तब्ध राहून परत अजित बोलला)खूप सुंदर दिसत आहेस संपदा तू.. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..आज तुला यायला जरा उशीर झाला तर अस्वस्थ वाटू लागले होते मला, पण विश्वास होता तू येणार म्हणून.. मला आता तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाहीये.. आयुष्यभर साथ देशील माझी..?”
    अजित अचानक सगळं बोलून गेला, संपदाला त्याच्या मनातील भावना कळत होत्या पण अचानक तो व्यक्त झाल्याने त्यावर काय बोलावे तिला कळत नव्हते. जरा लाजत, गोंधळलेल्या अवस्थेत संपदा म्हणाली, “अजित , मलाही तू खूप आवडतोस पण मला जर वेळ हवा आहे विचार करायला..जरी आपलं प्रेम असलं तरी बाकी गोष्टींचा विचारही करायला हवा.. माझं कुटुंब साधारण आहे, तू श्रीमंत घरातला..तुझ्या घरी आपलं प्रेम स्विकारतील का.. शिवाय माझ्या घरच्यांनाही हे पटेल की नाही मला नाही माहित..प्रेम महत्त्वाचं असलं तरी घरच्यांना नाही दुखावू शकणार मी..मला प्लीज वेळ दे विचार करायला….”
    संपदाच्या अशा उत्तराने अजित जरा नाराज झाला. ” संपदा, अगं तू तयार असशील तर मी घरच्यांशी बोलेल या विषयावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत..प्लीज समजुन घे..”
    “अजित, अरे तू असा विचार नको करू, मी फक्त वेळ मागते आहे विचार करायला.. नाही म्हणत नाहीये..पण लग्न म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे.. तेव्हा घरच्यांच्या परवानगीने सगळं झालं तर चांगलं असेल..”
    आता मात्र अजित गोंधळला, संपदाच्या बोलण्याने त्याला तिचा अभिमानही वाटला.. भावनेच्या भरात निर्णय न घेता वास्तविकतेचा विचार करणारी संपदा त्याला आज अजूनच आवडली..”संपदा, तू हवा तितका वेळ घे. माझं खूप मनापासून प्रेम प्रेम आहे गंं तुझ्यावर.. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे.. ” इतकंच तो बोलला.
    आज याविषयी बोलल्यावर दोघेही स्तब्ध झाले.. पुढे काय बोलावे दोघांनाही काही सुचत नव्हते..
    संपदा घरी आल्यावर तिच्या मनात सतत अजितचा विचार सुरू होता. तिचही त्याच्यावर प्रेम होतच पण घरची परिस्थिती लक्षात घेता ती आता विचारात पडली होती.
    संपदाच्या भावाने तिच्या मनातली घालमेल ओळखली. काही तरी नक्कीच बिनसलंय, त्याशिवाय आपली चिमुकली बहीण अशी सतत विचारात राहणार नाही हे त्याच्या लक्षात आले. संपदा शी प्रत्यक्ष बोललो तर ती सांगेल की नाही त्याला शंका वाटली. त्याने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने माहिती काढली तेव्हा त्याला अजित विषयी कळाले. आपली चिऊताई आता मोठी झाली, कुणाच्या तरी प्रेमात पडली या विचाराने दादाला जरा आश्चर्याचा धक्का बसला पण या परिस्थितीत संपदाला मदत करायची असं दादाने ठरवलं.
    पुढचे काही दिवस संपदा आणि अजित भेटलेही नाही आणि फारसं पूर्वी सारखं बोलणंही नाही.. इकडे अजित सतत संपदाच्या उत्तराची वाट बघत होता आणि तिकडे संपदा सगळ्यांचा विचार करून गोंधळलेली होती.
    संपदाची अंतिम वर्षाची परीक्षा जवळच होती, कसाबसा अभ्यास करायची पण पूर्वी सारखं तिचं कशातच मन लागत नव्हतं.
    दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता.

    आता दादा अजितला भेटून पुढे संपदाला कशी मदत करतो..त्याला अजित बहिणीचा जीवनसाथी म्हणून आवडेल का..दोघांच्या घरी याविषयी कळाल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

    पुढचा भाग लवकरच..तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे

  • प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १

    संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची.
    अजितची गाडी बंद पडल्याने तोही आज बसने ऑफिसमध्ये जायला‌ निघाला. सकाळच्या वेळी बस मध्ये बरीच गर्दी असल्याने बरेच जण उभेच होते. अजितला काही वेळाने जागा मिळाली आणि तो लगेच त्या जागी जाऊन बसला. पुढच्या स्टॉप वरून एक वृद्ध आजोबा बस मध्ये चढले पण गर्दी मुळे  बसायला जागा नसल्याने काठीचा आधार घेत कुठे जागा मिळते का याचा अंदाज घेत सर्वत्र नजर फिरवू लागले, तितक्यात संपदा आजोबांजवळ आली, तिने आजोबांना जागा करून दिली. त्याच क्षणी अजितची नजर संपदावर पडली, तिचं मदतीला धावून जाणं, तिचं ते मोहक रूप पाहून अजितची नजर काही केल्या संपदा वरून हटत नव्हती.
    अजित हा आई वडिलांना एकुलता एक, सधन कुटुंबात वाढलेला, नुकताच नोकरीला लागला. दिसायला देखणा, उंच बांधा, स्टायलीश राहणीमान. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर फिदा पण हा कुणाला भाव द्यायचा नाही. मित्रांनी चिडवले की म्हणायचा , “अरे, वो मेरे टाइप की नहीं..” त्याच असं म्हणनं होतं की बघता क्षणी असं वाटलं पाहिजे, “तुम्हे जमी पे बुलाया‌ गया है मेरे लिये..”
    संपदा अगदी अजितच्या विरूद्ध पण अजितला तिला बघताच मनात गाणं सुरू झालं, “देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार..”
    संपदाच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत असताना अजितला आजुबाजूला काय चाललंय काही भान नव्हते. संपदाचा स्टॉप आला आणि ती उतरली ‌तसाच अजित भानावर आला.
    ऑफिसमध्ये सतत संपदाचा चेहरा त्याच्या डोळ्यापुढे येत होता. कामात नेहमी प्रमाणे लक्ष लागत नव्हते. आपल्याला असं कधीच वाटलं नाही, आज पर्यंत इतक्या सुंदर सुंदर मुलींनी प्रपोज केले, मैत्री साठी स्वतः पुढाकार घेतला पण आपल्याला कुणा विषयी काही वाटले नाही. मुली इतक्या भाव देतात म्हणून टाइमपास व्हायचा, मज्जा वाटायची पण आज त्या बस मधल्या मुलीला बघून वेगळंच वाटत आहे. कोण असेल ती, इतका का विचार करतोय मी तिचा अशा मनस्थितीत अजितचा पूर्ण दिवस गेला. सायंकाळी मित्रा सोबत घरी परत गेला.संपदाला बघण्याच्या ओढीने दुसऱ्या दिवशी परत अजित बसनेच ऑफिसला निघाला. आज ती येयील की नाही हेही त्याला निश्चित माहीत नव्हते पण पुन्हा ती दिसल्यावर त्याला मनोमन आनंद झाला. त्या वीस मिनीटांच्या प्रवासात त्याच लक्ष फक्त संपदा कडे होते. संपदाच्याही ते लक्षात आले. नकळत अधून मधून दोघांची नजरानजर व्हायची.
    असाच बसने जाण्याचा कार्यक्रम आठवडाभर चालला. एक दिवस योगायोगाने दोघांना आजुबाजूला बसायला जागा मिळाली. अजितचा आनंद गगनात मावेनासा झाला(मन में लड्डू फुटा..)
    जरा वेळ इकडे तिकडे उगाच बघत अजितने बोलण्यासाठी पुढाकार घेतला, “हाय, मी अजित..”
    त्यावर संपदा जरा लाजत, “हाय..”
    अजित ( जरा घाबरून ‌दबक्या आवाजात)- तुम्ही दररोज जाता का बसने.. काही दिवसांपासून मी येतोय तर तुम्ही दररोज दिसता म्हणून विचारलं..”
    संपदा – हो..मी गेली दोन वर्षे बसनेच जाते कॉलेजला..
    असा हाय हॅलो वरून संवाद सुरू झाला. अजित संपदाला भेटायला म्हणून रोज गाडी असूनही बसने प्रवास करायला लागला. कधी हाय हॅलो तर कधी संधी मिळाली तर थोडंफार बोलणं सुरु झालं. काही दिवसांनी दोघांची मैत्री झाली, फोन नंबर एकमेकांसोबत शेअर झाले. अजितला संपदा आवडायला लागली, तिला न बघता, तिच्याशी न बोलता त्याचा दिवसच अपूर्ण वाटू लागला. ती दिसणार नाही म्हणून रविवार नकोसा वाटायचा.
    एक दिवस अजितने संपदाला कॉफी साठी विचारले, बरेच आढेवेढे घेत शेवटी ती कॉलेज नंतर यायला तयार झाली. अजितने ऑफिसमधले काम लवकर संपवले आणि तो वेळेच्या आधीच तिला घ्यायला कॉलेज जवळ पोहोचला. समोरून संपदा येताना‌ दिसली, तिची लांबसडक वेणी उजव्या खांद्यावरून समोर आलेली, लाल पांढरा सलवार कमीज, डोळ्यातलं ते तेज, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघताच अजितची परत‌ एकदा विकेट उडाली. त्याची नजर एकटक तिच्याकडे होती,  स्वप्नातली अप्सरा जणू आपल्या जवळ येत आहे असा भास क्षणभर त्याला झाला. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणाली आणि अजित भानावर आला.

    क्रमशः

    पुढचा प्रवास पुढच्या भागात.. तोपर्यंत stay tuned..?
    लवकरच भेटूया‌ पुढील भागात…

    कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ??

    © अश्विनी कपाळे गोळे