Tag: Love Triangle

  • तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

     
         मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले.
    “हाय मानसी..!”
    या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक  मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी शाळेत एकाच वर्गात होते पण कधीच बोलणं वगैरे झालं नव्हतं. नावाने आणि चेहर्‍याने फक्त दोघांची ओळख होती. आज मात्र या अनोळखी कॉलेजमध्ये त्याला बघताच मानसी मनोमन आनंदी झाली.

    “हाय विनय..तू इथे..म्हणजे तुला याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला का..”

    तिच्या आश्चर्यकारक प्रश्नावर त्याने हो म्हणत उत्तर दिले तशीच ती अजूनच आनंदी झाली. या अनोळखी शहरात , कॉलेजमध्ये ओळखीची व्यक्ती भेटल्यावर किती बरं वाटलं तिला हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
    विनय क्षणभर तिच्या गोड निरागस चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यालाही तिला तिथे बघून खूप आनंद झाला होता.
    मानसी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, सडपातळ उंच बांधा, लांबसडक केसांची वेणी, साधे पण नीटनेटके राहणीमान. मानसी लहान असताना आई आजारपणाने देवाघरी गेली आणि वडीलांनी दुसरं लग्न केलं. तेव्हापासून मामा मामींनी तिला लहानाचं मोठं केलेलं.
          बारावीपर्यंतचे शिक्षण जरा ग्रामीण भागात झाल्यावर आता पहिल्यांदाच ती शहरी वातावरण अनुभवत होती. मुळातच अभ्यासू, मेहनती असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या जवळच असलेल्या होस्टेलमध्ये ती राहणार होती. विनय हा तिचा पहिलाच मित्र.
    हळूहळू ती या शहरी वातावरणात रमायला लागली.
    होस्टेलमध्ये तिची रुममेट मोना हिच्याशी मानसीची लवकरच मैत्री झाली. मानसी मुळे मोना आणि विनयची सुद्धा ओळख झाली. तिघांचीही हळूहळू चांगली मैत्री झाली. एकमेकांना अभ्यासात मदत करणे, सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे सुरू झाले. 
    शाळेत असल्यापासूनच शांत, सालस, निरागस मानसी विनयला खूप आवडायची पण कधी बोलणं सुद्धा झालं नव्हतं. आता योगायोगाने दोघे एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मैत्रीचं नातं त्यांच्यात निर्माण झालेलं. विनयच्या मनात आपल्याविषयी प्रेमाची भावना आहे याची जराही कल्पना मानसीला नव्हती. विनय सुद्धा तिला काही जाणवू देत नव्हता. योग्य वेळ आली की मानसीला प्रपोज करायचे असे त्याने ठरवले होते.
      विनय उंचपुरा, दिसायला साधारण पण आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला, स्वभावाने प्रेमळ, मदतीला धावून जाणारा. कुणालाही आपलसं करेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. यामुळेच मोनाला पहिल्या भेटीतच विनय खूप आवडला होता. जसजशी मैत्री घट्ट झाली तशीच मोना विनयच्या प्रेमात पडली. त्याच्या मनात मात्र मानसी होती.

         कॉलेजचे पहिले वर्ष संपत आले होते. पुढच्या  आठवड्यात मानसीचा वाढदिवस होता. तिच्यासाठी काही तरी खास प्लॅन करून तिचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्याचा विचार विनयच्या डोक्यात सुरू होता. या सगळ्यात मोनाची मदत घ्यायची असे त्याने ठरवले आणि त्यासाठी विनयने मोनाला फोन केला. त्याने तिला एकटीला भेटायला बोलावले शिवाय याविषयी मानसीला काही सांगू नकोस असंही सांगितलं. ते ऐकताच मोनाच्या मनात आनंदाने लाडू फुटायला लागले.

      विनय ने कशासाठी बोलावले असेल, त्याचेही माझ्यावर प्रेम असेल का ? त्याविषयी तो काही बोलणार असेल का? अशे अनेक प्रश्न मोनाच्या मनात गोंधळ निर्माण करायला लागले. त्याला पहिल्यांदाच असं एकट्यात भेटायचं म्हंटल्यावर ती छान तयार झाली. मोनाला असं चार वेळा आरश्यात स्वतः ला निरखून बघत, लाजत लाजत तयार होताना बघून मानसीने तिला विचारले,” काय मॅडम, आज काय खास..छान दिसतेस पण निघाली कुठे..तेही मला न सांगता, मला एकटीला रूमवर सोडून?”

    काही खास नाही गं, शाळेतली मैत्रिण भेटायला येतेय म्हणून जरा बाहेर जाऊन येते तासाभरात असं मानसीला सांगून ती बाहेर पडली.

    ठरलेल्या ठिकाणी विनय पाठमोरा उभा तिला दिसला. त्याची पाठमोरी आकृती बघतच ती त्याच्या दिशेने निघाली. जसजशी जवळ जात होती तशीच तिची धडधड वाढली होती. चेहऱ्यावर लाजरे भाव होते. ती जवळ पोहोचताच ती लाजतच म्हणाली,

    “विनय… उशीर झाला का रे मला..बराच वेळ वाट बघतोय का..”

    तिचा आवाज ऐकताच तो‌ तिच्याकडे वळून म्हणाला, “हाय मोना… अगं नाही..मी जरा लवकर पोहोचलो..तू वेळेत आलीस..बरं आपण त्या पुढच्या बाकावर बसूया का? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी.”

    ते ऐकताच ती अजूनच लाजून चूर झाली. दोघेही जवळच्या एका बाकावर जाऊन बसले. बसताना नकळत त्याच्या हाताचा स्पर्श तिला झाला तशीच ती क्षणभर एका विश्वात रमली. काय बोलणार असेल विनय असा विचार करत जरा अस्वस्थ सुद्धा झाली. आपण विनय साठी छान तयार होऊन आलोय पण ह्याने नीट बघितलं सुद्धा नाही किंवा काही प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही म्हणून तिला जरा त्याचा रागही आला.

    विनय मोनाला म्हणाला, ” मोना, आज तुला मी माझं एक सिक्रेट सांगायला बोलावलं आहे. खूप दिवसांपासून एक गोष्ट माझ्या मनात आहे आणि आज तुझ्यासोबत ती गोष्ट शेअर करणार आहे.”

    विनयचे हे शब्द ऐकताच मोना मनोमन आनंदी झाली. आता विनय आपल्याला बहुतेक प्रपोज करणार असं तिला वाटलं. ज्याच्यावर मी मनोमन प्रेम करते त्याच्या मनात सुद्धा आपल्या विषयी अगदी त्याच भावना आहे, आणि तो आज चक्क व्यक्त होतोय.. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असा काहीसा विचार करून ती अगदी गुलाबी स्वप्न बघितल्या प्रमाणे अत्यानंदी झालेली होती.

    त्याच्या बोलण्यावर फक्त गोड स्माइल देत ती ऐकत होती‌. तो पुढे म्हणाला, “मोना, माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे…अगदी मनापासून प्रेम. मी आज पर्यंत तिला याविषयी जाणवू दिले नाही पण आता मला ते व्यक्त करायचे आहे. तुला माहित आहेच की मानसी आणि मी शाळेपासूनच एकत्र शिकलो पण मैत्री मात्र कॉलेजमध्ये आल्यावर झाली. पण मला शाळेपासूनच ती आवडते. माझं खरंच खूप प्रेम आहे मानसी वर. मला आता ते व्यक्त करायचे आहे. पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आहे तेव्हा खास काही तरी प्लॅन करून तिच्या विषयीच्या माझ्या मनातील भावना मला तिला सांगायच्या आहेत. यासाठी मला तुझी मदत हवी आहे. करशील ना मला मदत. ”

    हे ऐकताच गुलाबी स्वप्न रंगवत असलेल्या मोनाचे मन अगदी क्षणभरात तुटले. असं काही असेल याची तिला जराही शंका आली नव्हती. ज्या विनय वर आपलं प्रेम आहे तो आपल्या समोर दुसऱ्या मुलीवरील प्रेमाविषयी बोलतोय हे तिला सहनच होत नव्हते. तिला अगदी मोठ्याने रडून त्याला सांगावं वाटत होतं की विनय अरे तू माझा आहेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…पण त्याने जे काही सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. काय प्रतिक्रिया द्यावी तिला कळत नव्हते.

    विनय तिच्या डोळ्यापुढे उभा होऊन म्हणाला, “मोना, प्लीज करशील ना मला मदत..”

    त्यावर कसंबसं ती “हा..” म्हणाली.

        विनय बरंच काही बोलत होता पण मोनाचे त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. ती मनोमन रडत होती, दु:खी झाली होती. प्रेमभंग काय असतो याची जाणीव तिच्या या क्षणी झालेली.
    या क्षणी कुछ कुछ होता है मधल्या काजोल प्रमाणे आपली अवस्था झाली याची जाणीव तिला झाली. तिचं मन अगदी या गाण्या प्रमाणे रडत होतं.

    “रब्बा मेरे, इश्क किसी को ऐसे ना तडपाये, होय
    दिल की बात रहे इस दिल में, होठों तक ना आये
    ना आये….

    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    तुझे याद ना मेरी आयी किसी से अब क्या कहना
    दिल रोया की अंख भर आयी
    दिल रोया की अंख भर आयी किसी से अब क्या कहना…”

    विनय मानसी जवळ प्रेम व्यक्त करेल का? मानसी या प्रेमाचा स्वीकार करेल का..मोना हा धक्का कसा सहन करेल..मानसी आणि मोनाच्या मैत्रीत यामुळे फूट पडेल का… याची उत्सुकता तुम्हाला लागली असणार ना..

    तर हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.

    पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होईल याविषयी तुमचा अंदाज अशा प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा 😊

    मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

    © अश्विनी कपाळे गोळे

     

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… अंतीम भाग

    कांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे नीलम दुखावल्या जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला.
    आॅफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता. फोन उचलताच ती म्हणाली” संजय फोन कट करू नकोस, मला खूप गरज आहे मदतीची, माझं बोलणं ऐकून घे. मी परत तुला त्रास देणार नाही.” संजयने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही फक्त ती काय म्हणतेय ते तो ऐकत होता.
    कांचन म्हणाली “संजय, मला फोनवर सविस्तर बोलता येणार नाही. मला माहित आहे तू माझ्यावर खुप नाराज आहेस. कदाचित मला माफ करणार नाहीस पण माझ्यासाठी नाही तर माझया आई वडिलांसाठी मला एक मदत कर. आता फक्त एवढंच सांगू शकते कि बाबांना मागच्या महिन्यात  हार्ट अटॅक आला, ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर, सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली, एवढेच काय तर हॉस्पीटलचे बील भरायला ही काका तयार नव्हते. आईच्या नावावर काही पैसे होते ते सगळे बाबांच्या उपचारासाठी खर्च झाले. आई बाबांना खूप मोठा धक्का बसला आहे. मी सतत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला ह्या सगळ्यात कुणाचाच आधार नाही. प्लीज मला एवढी एक मदत कर. मला तू एकदा भेटालास तर बरं होईल. सविस्तर चर्चा करता येईल.प्लीज संजय”
    कांचनचं बोलणं ऐकून संजयला खूप वाईट वाटले. आधीच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून तो कांचनला भेटायला तयार झाला. सायंकाळी सहा वाजता एका कॅफे मध्ये भेटायचे ठरले. नीलमला नंतर सविस्तर सांगू म्हणून एका कामानिमित्त बाहेर जातोय, तू घरी जा, आॅफिसमधून निघताना माझी वाट नको बघू. घरी आल्यावर सविस्तर सांगतो म्हणून तो निघाला. भूतकाळात कांचन कशीही वागली असली तरी अशा परीस्थितीत तिला मदत करण्यापासून तो स्वत:ला थांबवू शकत नव्हता.
    नीलमला मात्र संजयच्या वागण्यात बदल जाणवत होता, तो काही तरी लपवतो आहे हे तिला कळत होते. संजयच्या मागोमाग नीलम ही कॅफे मध्ये गेली, जरा लांबूनच पाहिले तर संजय आणि एक सुंदर मुलगी (कांचन) काही तरी बोलत बसलेले तिला दिसले. संजय तर म्हणाला कामानिमित्त बाहेर जातोय, मग ही कोण शिवाय आई सुद्धा म्हणाल्या होत्या कुणी तरी मुलगी संजयला भेटायला घरी आलेली म्हणून. संजय आपल्याला फसवत तर नाही ना, काय संबंध असेल दोघांमध्ये अशा विचारचक्रात नीलम अडकली. तशाच विचारात घरी गेली, संजय सोबत आज काय ते क्लिअर करायलाच पाहिजे असा निश्चय तिने केला.
    इकडे कांचनने  संजयला सगळी परिस्थिती सांगितली पण संजयला प्रश्न पडला की कांचनचा नवरा हिला मदत करत नसेल का.. त्यानं तिला ते विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्या डोळ्यात पाणी आले, तिच्या अश्रूंसोबत शब्द बाहेर पडले “संजय, तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, अगदी मला हवा तसा जोडीदार, भक्कम पैसा, परदेशात नोकरी करणारा, अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार होता तो. आम्ही दोघेही छान मज्जा करायचो पण दोघेही आम्ही चिडखोर, एकही शब्द ऐकून न घेणारे, वर्ष भर सगळं सुरळीत होतं पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले, नंतर किती किती दिवस अबोला, आमच्यातील अंतर वाढत गेलं शिवाय तिथे दोघांची समजुत काढणारं कुणी नव्हतं, वाद, मतभेद इतके वाढले की प्रकरण घटस्फोटावर आलं, त्याला आता मी नको आहे. या सगळ्या गोष्टींचा बाबांच्या तब्येतीवर परीणाम झाला, त्यांना हार्ट अटॅक आला. माझी अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती. काही महिन्यांपूर्वी मी भारतात परत आले. त्यानंतर बाबांच्या उपचारासाठी ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर आणि सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली. एकेकाळी श्रीमंत घराणे आमचं पण आज हातात काही शिल्लक नाही. काकांनी मोठी फसवणूक केली आहे, मला त्यांना शिक्षा द्यायची आहे, खोट्या सह्या घेऊन काकांनी केलेल्या फसवणूकीचा गुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे. आई बाबा सद्ध्या माझ्या मामाच्या गावाला आहेत, मी चांगल्या वकिलांच्या शोधात इकडे आले, इथे कुणी ओळखीचे नाही, विचार करतच त्या दिवशी माॅल मध्ये फिरताना तू दिसला आणि एक आशेचा किरण जागा झाला. यातून बाहेर पडले की मी तुला परत कधी त्रास देणार नाही. पण या सगळ्यात मला प्लीज मदत कर. पुढे मला आई बाबांना खूप आनंदात बघायचं आहे. तूच आहेस जो या परिस्थितीत मला मदत करू शकतो. मी तुला खूप दुखावले आहे, पण कधी काळी आपण चांगले मित्र होतो या नात्याने मला मदत कर.”
    कांचनची अवस्था बघून संजयला वाईट वाटले, तिला शक्य ती मदत करायला तो तयार झाला.
    दोघांनी नीट विचार करून दुसऱ्या दिवशी एका नामांकित वकिलांना भेटण्याचा बेत आखला. सगळं बोलून झाल्यावर संजय घरी आला तर नीलमच मूड बिघडलेला त्याला दिसला. ती खूप संतापलेली होती, चिडूनच तिने विचारले “कोण होती ती अप्सरा जिच्या साठी तू माझ्याशी खोटं बोलला, कामानिमित्त बाहेर जातोय सांगून कॅफे मध्ये गेला.”
    संजयला नीलमच्या प्रश्नावर काय बोलावे कळत नव्हते, त्याने आधी तिचा राग शांत करायचा प्रयत्न केला, तिला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं. नीलमला ऐकून धक्काच बसला, ती रडायला लागली, संजयच्या मिठीत शिरून म्हणाली “तिला मदत करताना ते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना.” संजयच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिला घट्ट पकडून तो म्हणाला “नीलम, तू आयुष्यात आली त्यानंतर तर मी भूतकाळातून बाहेर पडलो. तुझ्यामुळे जगण्याचा नवा अर्थ शिकलो. मी जो प्रेमभंग अनुभवला तो कुणाच्याही वाट्याला येऊ नये, तू तर माझी अर्धांगिनी आहेस. तू माझ्यावर किती प्रेम करते याची मला जाणीव आहे. माझं आता फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरचं प्रेम आहे. राहीला प्रश्न कांचनला मदत करण्याचा तर तिच्या जागी कुणीही असतं तर माणुसकीच्या नात्याने मी मदत केलीच असती. या सगळ्याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही, याची मी खात्री देतो.”
    नीलम संजयच्या कुशीत शिरून म्हणाली‌ “संजय, मी या सगळ्यात तुझ्या सोबत आहे. कांचनला यातून बाहेर काढण्यासाठी मीही तुला मदत करीन. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तू नक्कीच यातून कांचनला सोडवणार.” नीलमला कित्येक वर्षांपासून तिच्या मनात असलेला संजय च्या भूतकाळात बद्दलचा गुंता सुटल्याचे समाधान वाटले. संजयलाही आज नीलमला सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे मन अगदी हलके वाटले. या प्रकारामुळे संजय आणि नीलमचे नाते अजून घट्ट झाले.
    दोघांनी मिळून कांचनला मदत केली, तिला या सगळ्यातून बाहेर काढले. त्यादरम्यान कांचन आणि तिचा पती कित्येक महिने वेगळे राहील्या मुळे त्यांना आपापल्या चुकांची जाणीव झाली. संजयने समजूत काढल्यानंतर कांचनने पुढाकार घेऊन तिच्या पतीची माफी मागितली, त्यालाही कांचन शिवाय एकटेपणा जाणवत होता पण मीपणामुळे तो पुढाकार घेऊन कांचनशी बोलत नव्हता. कांचनने स्वत: फोन केल्यावर तो कांचनला घ्यायला भारतात आला. आई बाबांची संपत्ती संजय मुळे त्यांना परत मिळाली शिवाय नीलमने विश्वास ठेवून संजयला मदत केल्याने ते शक्य झाले.
    कांचन पतीसोबत परत गेली, सगळयांनी संजयचे खूप कौतुक केले, आभार मानले. नीलमची मान आनंदाने आणि गर्वाने ताठ झाली.

    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग २

    कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला, नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. नीलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते. आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या नीलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला. आपल्या आयुष्यात आता नीलमच सगळं काही आहे हे त्याला कळत होते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याने नीलम सोबत काही दिवस गोव्याला फिरायला जायचा बेत आखला. आॅफिसमध्ये रजा घेऊन पाच दिवसांसाठी दोघेही गोव्याला गेले, तिथे छान मज्जा केली. नीलम ही खूप आनंदात, उत्साहात होती. पाच दिवसांनी परत आल्यावर संजयला आई कडून कळाले की त्याला भेटायला कांचन घरी येऊन गेली, तिला काही तरी मदत हवी आहे आणि त्यासाठी ती आली होती शिवाय संजय चा फोन नंबर ही घेऊन गेली. ते ऐकताच संजय हादरला. ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गोष्ट परत परत त्याच्या जवळ येत होती. संजयच्या आईला कांचन त्याच्या सोबत शिकायला होती एवढेच माहीत होते त्यामुळे ऑफिसशी निगडित नोकरी संबंधित काम असेल म्हणून त्यांनी फार मनावर घेतले नाही. या सगळ्या प्रकाराने नीलमही गोंधळली, कांचन कोण आहे, कशासाठी घरी आली, तिचं संजयकडे काय काम आहे हे प्रश्न तिला त्रास देत होते. संजयला संधी साधून याविषयी विचारले पाहिजे असा विचार नीलम करू लागली.
    अशा परिस्थितीत काय करावे संजयलाही कळत नव्हते. नीलमला सुद्धा याविषयी अंधारात ठेवायचे नव्हते. योग्य वेळी नीलमला याविषयी सांगायचे अशे संजयने ठरविले.
    रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागत नव्हती. नकळत तो भूतकाळात शिरला.
    कांचन आणि संजय शाळेपासून एकत्र शिकायला होते, काॅलेजलाही एकत्र. कांचन श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, हुशार,आत्मविश्वास तिच्या नसानसात भरलेला, कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही अशा विचारांची. तिच्या मीपणा असलेल्या स्वभावामुळे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. संजय गरीब घराण्यातील शांत स्वभावाचा समजुतदार मुलगा, तिच्या अल्लड स्वभावाची जाणीव त्याला होती, तिच्या घरी तिचे जास्त प्रमाणात लाड पुरवले जातात त्यामुळे ती हट्टी आहे हे त्याला माहीत होते. दोघांची शाळेपासून चांगली मैत्री होती. कुठलीही गोष्ट असो कांचन संजय पासून लपवत नव्हती, दोघेही अगदी बेस्ट फ्रेंड्स. शाळेत असताना अभ्यासातही संजय कांचनला मदत करायचा. संजयचा मित्र परिवार ब-यापैकी मोठा पण कांचन अगदी जवळची मैत्रीण.
    शाळेत कुठल्याही स्पर्धा असो किंवा नृत्य, गायन स्पर्धा.. दोघेही सोबतच. बारावीच्या परीक्षेत संजय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दोघांनाही योगायोगाने एकच काॅलेज मिळाले.
    सुरवातीला कांचनला फक्त संजय हा एकच जवळचा मित्र पण आता कॉलेजमध्ये तिला तिच्यासारख्या घराण्यातील मित्र मैत्रिणी मिळाले, तिचा एक ग्रुप झाला, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीज, सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे सुरू झाले. संजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती, तो पार्टीज सारख्या गोष्टी शक्यतो टाळायचा. कांचनला मात्र जीवन शक्य तितकं एॅंजाॅय करायला आवडायचं, ती संजय सोबतही वेळ घालवायची पण त्यांच्या मैत्रीत एक अंतर पडत होतं. संजयला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं. कांचन आपल्या पासून दूर जात आहे ही गोष्ट त्याला खूप बोचत होती.
    नकळत संजय पूर्णपणे कांचनच्या प्रेमात बुडाला होता. कांचनला एकदा मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत, तिचं प्रेम नसेल तरी या मैत्रीमध्ये अंतर पडता कामा नये हे सगळं एकदा कांचन सोबत बोलायला हवं नाहीतर ती आपल्या पासून दूर जाईल अशी भिती त्याला वाटत होती. कांचनला कुणीही मित्र मैत्रिणी नसताना प्रत्येक परीस्थितीत संजय सोबत असल्याने ती आपल्याला दुखावणार तरी नाही याची त्याला खात्री होती.
    खूप हिम्मत करून एक दिवस संजयने कांचनला भेटायला बोलावले, तीही लगेच आली.
    क्षणाचाही विलंब न लावता संजयने तिला सांगितल “कांचन, आपण दोघे बालपणापासून सोबत आहोत, एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत आलो, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस, आता मात्र आपल्या मैत्रीत एक अंतर पडत आहे, मला त्याचा खूप त्रास होतो. मला तू खूप आवडतेस कांचन, तू माझ्यापासून दूर गेलेली मला सहन होत नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. “.
    संजयच्या बोलण्यावर कांचन मिश्कीलपणे हसत म्हणाली ” कमाॅन संजय, हा काय बालीशपणा. आपण चांगले मित्र आहोत पण मला तुझ्या विषयी असं काहीच वाटत नाही. माझे स्वप्न खुप वेगळे आहे, मला जीवनात खूप काही करायचे आहे, आधी मला कुणी मित्र मैत्रिणी नव्हते पण आता माझा छान ग्रुप आहे, आम्ही छान मज्जा करतो. तुला हे सगळं आवडत नाही त्यात मी काही करू शकत नाही. शिवाय मी खूप प्रॅक्टिकल विचारांची आहे. मला तुझ्या सोबत आयुष्य घालवणे शक्य नाही कारण तुझी स्वप्न, तुझी आर्थिक परिस्थिती माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला छान वर्ल्ड टूर करायचा आहे, पार्टीज , शॉपिंग, एॅंजाॅयमेंट सगळं जे मला आवडतं ते तुला जमणार नाही तेव्हा तू माझा विचार सोड. आपल्या मैत्रीचा प्रवास इतकाच होता असं समज.”
    एवढं बोलून कांचन निघून गेली. प्रेमाचा स्वीकार नाही केला ठिक आहे पण इतक्या वर्षांच्या मैत्रीचा प्रवास असा अचानक संपवणे कितपत योग्य आहे. तेही अशा प्रकारे भावना दुखावून. आता गरीब परिस्थिती आहे पण ती बदलू तर शकतेच, कांचनचा इतका अविश्वास असेल असं संजयला कधीच वाटले नव्हते. तो तिच्या बोलण्याने खूप दुखावला.
    त्यानंतर कांचनने संजयला टाळायला सुरू केले, बोलणे बंद केले, या सगळ्याचा संजयला खूप त्रास होत होता. कांचनला मात्र काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या आयुष्यात खुश होती.
    या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजयला खूप वेळ लागला, बालपणापासूनच्या तिच्या आठवणी, सोबत घालवलेले गोष्ट क्षण त्याच्या मनात घर करून बसले होते. तिने त्या सगळ्यांचा क्षणात चुराडा केला होता.
    यातू्न स्वतःला कसं बसं सावरुन संजयने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले, चांगल्या कंपनीत त्याचं प्लेसमेंट झालं.
    लवकरच नोकरी सुरू झाली, घरची परिस्थिती बदलायला वेळ लागला नाही. त्याला हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर पटापट प्रमोशन मिळत गेले. मनात मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या होत्या. कांचनने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि ती परदेशात गेली एवढंच त्याला एका मित्राकडून कळालं होतं.
    त्यानंतर नीलम त्याच्या आयुष्यात आली आणि त्या आठवणीतून तो बाहेर पडला.
    पण अचानक अशा प्रकारे कांचनचं आयुष्यात परत येणं, मदत मागनं त्याला भुतकाळात ओढून नेत होतं.
    कांचनच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने संजयला मदत मागितली. तिचं अशा अचानक आयुष्यात येण्याने संजय आणि नीलमच्या नात्यात काही अंतर येयील का..नीलमला हे कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग लवकरच… तोपर्यंत stay tuned..
    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.

    -अश्विनी कपाळे गोळे

  • लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग १

    नीलम आणि संजय, एक आनंदी , सुखी जोडपं. वर्षभरापूर्वी लग्न झाले. संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि नीलमही त्याचं कंपनीत नोकरीला. संजय नेहमी कामात मग्न असायचा, अतिशय हुशार, गरीब परिस्थितीतून वर आलेला. जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा, कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले. नीलम बडबडी, दिसायला साधारण पण बोलण्यात गोडवा, मेहनती मुलगी. तिथे नोकरीला लागल्यापासून नीलमला संजय आवडायचा, ती स्वतः हून त्याच्याशी बोलायची संधी शोधायची. तोही तिला कामात मदत करायचा, नीलमच्या स्वभावामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. संजय क्वचितच हसायचा आणि नीलम कायम त्याला हसवायचा प्रयत्न करायची. संजय मुळातच इतक्या गंभीर स्वभावाचा आहे की काही कारणाने तो असा गंभीर, आपल्याच विश्वात मग्न असतो हा प्रश्न नीलमला पडायचा, याविषयी ती इतरांनीही विचारायची पण संजयच्या अबोल स्वभावामुळे कुणालाही काही माहित नव्हते. संजयच्या अबोल राहण्याच रहस्य जाणून घेण्यासाठी नीलम खूप प्रयत्न करायची. ऑफिसमध्ये नीलम ही संजयची पहिलीच मैत्रिण.
    काही महीन्यात दोघांची छान मैत्री झाली तेव्हा नीलमने संजयला सुट्टीच्या दिवशी शाॅपींगला सोबत जाण्यासाठी आग्रह केला, बराच वेळ आग्रह केल्यावर संजय तयार झाला. ठरल्याप्रमाणे दोघांनी सोबत शॉपिंग केली, डिनर केला नंतर संजय नीलमला घरी सोडायला आला. आवडत्या व्यक्तीबरोबर छान वेळ घालवल्यामुळे नीलम जाम खुश होती. असेच नीलमच्या आग्रहाखातर संजय तिच्यासोबत वेळ घालवू लागला, त्यालाही तिची सोबत आवडायला लागली.
    एक आठवड्यानंतर संजयचा वाढदिवस होता, नीलमने आॅफिसमध्ये छान सरप्राइज प्लॅन केला. संजय पहिल्यांदा आॅफिसमध्ये सगळ्यांसोबत एंजॉय करत होता. कित्येक वर्षांनी त्यानी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आज दिसत होता. आॅफिसनंतर संजयने स्वतः नीलमला डिनर साठी विचारले, नीलम तर एका पायावर तयार झाली. आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हरकत नाही असं मनोमन ठरवून नीलम छान तयार होऊन संजयला भेटायला गेली. संजय स्वतःहून मनातील भावना कदाचित व्यक्त करणारं नाही तेव्हा आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार करून नीलम छान लाल रंगाचा गुलाबाच्या फुलाचा गुच्छ जाताना घेऊन गेली. दोघांनी सोबत डिनर केला आणि परत जाताना नीलमने संजयला प्रपोज केले, आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले. संजयला नीलमच्या मनातील भावना आधीच कळल्या होत्या, त्याच्यावर नीलम इतकं मनापासून प्रेम करते तिला दुखवायचे नाही हे संजयने मनोमन ठरवले होते कारण प्रेमभंग काय असतो हे त्याने जवळून अनुभवले होते. संजयने नीलमच्या प्रेमाचा स्वीकार केला, पण मनात अजूनही कांचनच्या आठवणी ताज्या होत्या. आता पुढचं आयुष्य नीलम सोबत आनंदात घालवायचा निर्णय त्याने घेतला. नीलमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लवकरच संजय नीलमच्या घरी भेटायला गेला, दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि जन्मोजन्मीच नातं बांधून दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. आनंदात संसार सुरू झाला. संजय हसतखेळत राहायचा, पूर्वीचा गंभीर संजय आता आनंदी, उत्साही असायचा.
    नीलमला खूपदा वाटायचे की संजयला त्याच्या भूतकाळाविषयी विचारावे, कोणत्या कारणाने तो इतका गंभीर, उदास असायचा जाणून घ्यावं पण संजयला ते आवडले नाही तर गोड नात्यात काही दुरावा यायला नको म्हणून तिची त्याविषयी विचारायची हिम्मत होत नव्हती.
    एकदा शाॅपींग मॉल मध्ये दोघे फिरत असताना संजयला अचानक समोर कांचन दिसली , तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास दिसत नव्हता शिवाय एकटेपणा न आवडणारी ती आज एकटीच फिरत होती. कांचननेही संजयला पाहिले पण संकोचाने ती भराभर नजरेआड गेली. संजयने ते लगेच घेरले, आपल्याला पाहून कांचन लपली हे त्याला लक्षात आले शिवाय नीलम सोबत असल्याने तो गुपचूप तिथून निघून गेला. त्याच्या मनात मात्र विचार चक्र सुरू झाले,  इतक्या वर्षांनी आज कांचन इथे कशी, ती तर परदेशी गेली होती. त्याच्या मनात तिच्या आठवणी परत नको असताना जाग्या झाल्या. आता याविषयी विचार करायला नको म्हणून संजय स्वतःला नीलम मध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा, तिला शक्य तितका जास्त वेळ द्यायचा.
    एक दिवस अचानक संजयला फेसबुकवर कांचनचा मॅसेज आला “संजय, मी खूप अडचणीत आहे. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मला माहित आहे तुझ्या आयुष्यात मला आता काही स्थान नाही पण मला फक्त एकदा मदत कर. मी परत तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. ”
    कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला. कितीही नाही म्हटले तरी कांचनचे परत अशा प्रकारे समोर येणे संजयला विचार करायला भाग पाडत होते.

    कांचन आणि संजयच काय नातं होतं,  नीलम आयुष्यात येण्यापूर्वी संजय का इतका गंभीर, उदास असायचा, कांचन कुठल्या अडचणीत आहे, तिला संजय कडून काय मदत पाहिजे आहे हे सगळं पुढील भागात जाणून घेऊच. तोपर्यंत stay tuned..
    कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

    ©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही.