Tag: marathi

  • लग्नगाठ (एक प्रेमकथा)

    “आरती, झालीस का गं तयार.. मुलाकडची पाहुणे मंडळी येतीलच इतक्यात..” – आरतीची आई घरात आवराआवर करतच म्हणाली.

     

    “हो गं आई.. झाली माझी तयारी..बघ एकदा, साडी नीट जमली आहे ना?” – आरती आईच्या समोर येत म्हणाली.

     

    आईने लगेच वळून आरती कडे बघितले तसंच आई म्हणाली, “किती गोड दिसते आहेस गं बाळा..ही साडी अगदी खुलून दिसते आहे तुझ्यावर.. ”

     

    आईचे कौतुक ऐकून आरतीने हलकीशी स्माईल दिली आणि मनातच पुटपुटली, “आई, कंटाळा आलाय गं आता असं सारखं तयार होऊन पाहुण्यांसमोर जायचा…असा कोण राजकुमार आहे नशिबात देव जाणे..इतकी स्थळ बघितली पण कुठे कुंडली जुळेना तर कुठे काही ना काही अडचणी.. ”

     

    आरती मनातल्या मनात स्वतः शीच बोलत असताना दारावरची बेल वाजली तशीच ती लगेच आतल्या खोलीत पळाली.

     

    इकडे दार उघडताच घरात आई बाबा , लहान बहीण भाऊ सगळे पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले.

     

    आरतीला बघायला आदित्य आणि त्याची फॅमिली आलेले.

     

    आदित्य हा एका नामांकित कंपनीत नोकरीला, दिसायला अगदी हिरो. त्याच्यासाठी हा पहिलाच कांदेपोहे कार्यक्रम होता पण आरती मात्र वर्षभर अनेक स्थळांना सामोरे जाऊन जरा वैतागली होती.

    आता आज परत काय नविन अनुभव येणार या विचाराने आरती जरा अस्वस्थ होती.

     

    आलेल्या पाहुण्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला आणि लहान बहीण आरतीच्या खोलीत येत म्हणाली, “ताई, चल तुला बोलावलंय बाहेर..आणि हा..एक सांगू का, मुलगा एकदम हिरो आहे गं…”

     

    आरती त्यावर काहीही न बोलता हळूच बैठकीत आली.

     

    आरती येताना दिसली तसाच आदित्य एकटक तिला बघतच राहिला. चेहऱ्यावर जराही मेकअप नसून एक वेगळंच तेज होतं. मोरपंखी रंगाची साडी तिच्यावर अगदीच शोभून दिसत होती. नाजुक नितळ प्रेमळ चेहरा, गव्हाळ वर्ण, उंच सुडौल बांधा असलेली ही आरती आदित्य ला पहिल्या नजरेतच आवडली. आदित्य च्या अगदीच समोर काही अंतरावर एका खुर्चीत ती बसली. आदित्य च्या वडिलांनी तिला काही औपचारिक प्रश्न विचारले , त्यावर अगदी हळूवारपणे ती उत्तर देत होती. तिचा नाजूक आवाज ऐकत आदित्य चोरट्या नजरेने तिचं रूप न्याहाळत होता. प्रश्नोत्तरे कार्यक्रम झाला आणि आदित्य च्या वडिलांनी तिची सगळ्यांशी ओळख करून दिली.

    “हा आदित्य” असं बाबा म्हणताच आरतीने त्याच्याकडे हळूच बघितले आणि दोघांची नजरानजर झाली. तशीच ती लाजली आणि नजर दुसरीकडे फिरवली. आदित्यने मात्र तिचे हे लाजरे भाव अलगद टिपले.

    नंतर दोघांना एकांतात बोलायला‌ बाजुच्या खोलीत पाठवले गेले. असं एकांतात बोलायचं म्हटल्यावर आरतीच्या हृदयाची धडधड आपसूकच वाढली होती.  असं बघायला आलेल्या मुलाशी बोलायचा अनुभव हा काही नविन नव्हता पण यावेळी आरतीला जरा वेगळाच भाव मनात जाणवला. आदित्यने बोलायला सुरुवात केली, दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी, छंद, अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

     

    आदित्य – “खरं सांगायचं तर कांदेपोहे कार्यक्रमाचा हा माझा पहिलाच अनुभव आणि कदाचित शेवटचा..”

     

    आरती जरा गोंधळून म्हणाली, “शेवटचा..?? म्हणजे..??”

     

    आदित्य – “मला जशी अपेक्षित तशी तू आहेस त्यामुळे माझा तर होकार असेल.. आता तुझ्याकडून होकार मिळाला तर मग हा कांदेपोहे कार्यक्रम पाहिला आणि शेवटचाच असणार ना..”

     

    आरती ते ऐकताच लाजली‌. काय बोलावं तिला काही कळेना. लाजतच ती म्हणाली, “असं एका भेटीत काही क्षणात तुम्ही निर्णय ठरवला सुद्धा..”

     

    आदित्य – “मनापासून सांगायचं झालं तर कधी कधी कितीतरी वर्ष एकत्र घालवून सुद्धा माणूस समोरच्याला नीट ओळखू शकत नाही‌, भावना जुळून येत नाहीत…. पण कधीतरी एका क्षणात समोरचा व्यक्ती आपला वाटायला लागतो.. कदाचित मनात रेखाटलेल्या अपेक्षित जोडीदाराची आकृती प्रत्यक्षात भेटल्याचा भास होत असावा अंतर्मनाला.. असंच काहीसं झालं आज माझं…जरा फिल्मी वाटत असेल पण मनापासून सांगतोय..”

     

    सगळं ऐकून आरती आदित्य कडे बघतच राहिली. आपल्याला अपेक्षित जोडीदार हाच ना याची खात्री कदाचित ती करत होती. दोघेही नकळत एकमेकांच्या डोळ्यांत बघत होते.

     

    ” कुठे हरवलीस..?” असं आदित्य जरा हसून म्हणताच आरती भानावर आली आणि दुसरीकडे नजर फिरवत, गालावर भुरभुरणारी केसांची बट मागे करत लाजून चूर झाली.

     

    काही वेळाने पाहुणे मंडळी घरी परतली. आदित्यने त्याचा होकार लगेच घरच्यांना सांगितला. आदित्यला मुलगी पसंत आहे म्हंटल्यावर घरच्यांना काही प्रोब्लेम नव्हताच. दुसऱ्या दिवशी सकाळीच आदित्य च्या वडिलांनी आरतीच्या घरी त्यांचा होकार कळविला. आता मुलीला मुलगा पसंत असेल तर पुढचं लवकरच ठरवूया म्हणत त्यांनी पुढचा निर्णय आरती वर सोडला.

     

    फोन ठेवताच आरतीचे बाबा आनंदाच्या भरात म्हणाले, “अगं, ऐकलं का? आदित्य कडून होकार मिळालाय..त्यांना आपली आरती पसंत आहे..”

     

    ते ऐकताच आरती लाजून चूर झाली. कसं व्यक्त व्हावं तिला काही कळत नव्हतं कारण तिलाही आदित्य मनापासून आवडला होता. घरच्या सगळ्यांनी आरतीला घेरले आणि आई आरतीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, “आरती, तुला हे स्थळ पसंत आहे ना? मुलगा आवडला का? आता तुझ्या निर्णयावर पुढचं अवलंबून आहे बाळा.. हवं तर नीट विचार करून मग सांग..”

     

    आरती आईला मिठी मारत म्हणाली, “आई, मला पसंत आहे मुलगा..”

     

    ते ऐकताच आरतीचे भावंडं तिला चिडवत म्हणाले,”आई,  बाबा ही लाजते बघा कशी.. आम्हाला तर कालच कळालं ताईला हा मुलगा जाम आवडलाय म्हणून..”

     

    “गप्प बसा रे तुम्ही.. काहीही सांगतात हे दोघं..” – आरती.

     

    आरतीच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले. आरतीच्या बाबांनी पाहुणे घरी बोलविण्या पूर्वीच स्थळाची सगळी चौकशी केली होती, सगळ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यावरच कांदेपोहे कार्यक्रम ठरलेला होता, त्यात आता मुलगा मुलगी एकमेकांना पसंत आहे कळाल्यावर पुढची बोलणी करायला हरकत नाही याची खात्री बाबांना होती.

     

    पुढच्या दोन दिवसांतच पुढची बोलणी करायला परत दोन्ही कुटुंबे एकत्र आले. लग्नाची तारीख काढायची म्हणून पंडीतजींना सुद्धा बोलावले गेले. दोघांची पत्रिका बघून पंडितजी म्हणाले, “लग्नाचे मुहूर्त हे पुढच्या दोन आठवड्यातले आहेत नाही तर नंतर डायरेक्ट आठ महिन्यांनी..मी तारीख काढून देतो.. तुम्ही ठरवा कधी करायचं ते..”

     

    आदित्य चे वडील त्यावर म्हणाले, “आठ महिने खूप होतात हो..लवकरचे मुहूर्त बरे.. माझं तरी असं मत आहे… तुम्ही काय म्हणता?”

     

    आरतीच्या बाबांना सुद्धा आठ महिने खूप जास्त वाटले. जरा चर्चा करत सगळ्यांचे मत लक्षात घेऊन पुढच्या दोन आठवड्यातच लग्न करायचं ठरलं.

     

    दोन आठवड्यात लग्न म्हंटल्यावर दोन्ही कुटुंबांची पार धावपळ सुरू झाली. या सगळ्या गडबडीत आदित्य आणि आरती यांचे फोन नंबर एकमेकांसोबत शेअर केले गेले. दोघेही त्यांच्या संसाराचे गोड स्वप्न मनात रंगवू लागले. सगळ्यांच्या नकळत फोनवर बोलायचं, चॅटिंग करायचं असा सगळा अनुभव दोघांसाठीही खूप खास होता.

     

    सगळ्या गोष्टी खूप भराभर होत असल्याने दोघांना लग्नापूर्वी फार काही वेळ एकत्र मिळत नव्हता. फोनवरच काय ते बोलणं व्हायचं.

     

    दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन लग्नाची खरेदी करायचं ठरलं. खरेदीच्या निमित्ताने का होईना पण लग्न ठरल्यावर पहिल्यांदाच आरतीला भेटायला मिळणार म्हणून आदित्य जाम खुश होता. इकडे आरतीला सुद्धा त्याच्या भेटीची ओढ लागली होती. उद्या आदित्य भेटणार म्हंटल्यावर छान तयार होऊन जायला हवं मग कोणता ड्रेस घालायचा, त्यावर कुठले कानातले घालायचे असं सगळं तिचं सुरू होतं.

     

    सकाळी भराभर आवरून सगळे खरेदीला निघाले. आदित्य आणि त्याची फॅमिली आधीच ठरलेल्या ठिकाणी पोहोचले होते. आदित्य सोबत त्याचे आई बाबा आणि वहिनी असे सगळे खरेदीला सोबत आलेले तर आरती आई बाबा आणि लहान‌ बहिण सोबत आलेली.

     

    आरतीला बघायला, भेटायला आदित्य अगदी आतुर झाला होता. आरती दिसली तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो परत एकदा एकटक तिला बघतच राहिला. लाल पांढर्‍या कॉंबिनेशनचा पंजाबी ड्रेस, नाजूक ओठांवर हलकिशी लिपस्टिक, काजळाने अजूनच उठून दिसणारे डोळे, कानात इवलेसे मॅचिंग कानातले, नीटसे अर्धवट बांधलेले केस यामुळे आरती आज अजूनच सुंदर दिसत होती, त्यात लाजरे भाव चेहऱ्यावर बघून तर आदित्यची अगदी विकेटच पडली. आरतीने चोरट्या नजरेने आदित्यला बघत हलकीशी स्माईल दिली आणि दोघेही क्षणभर एकमेकांच्या डोळ्यांत बघत राहीले.

     

    दिवसभर सगळी खरेदी करताना दोघांची लपून छपून नजरानजर होणे, मग आदित्य चे खट्याळ इशारे असं सगळं सुरू होतं. आरतीची साडी सिलेक्ट करताना ती हळूच आदित्य कडे बघायची आणि त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला की मग साडी सिलेक्ट झालीच समजा😀 त्यात आरतीची बहीण तिला आणि आदित्य ला चिडवायचा एकही चान्स सोडत नव्हती. दोघांची खेचाखेची करायला सोबत आदित्य ची वहिनी होतीच.

    दोघांना मात्र हे सगळं खूप आवडलं होतं.

     

    दिवसभर सगळी खरेदी झाली, दोघांनी एकमेकांच्या कपड्यांना मॅच होणार असे सगळे वेगवेगळ्या विधीला घालायचे कपडे सिलेक्ट केले. सायंकाळी सगळ्यांनी मिळून एकत्र डिनर करायचं ठरलं.

    दिवसभर समोरासमोर असून मात्र दोघांचं मन काही भरलं नव्हतं. आरतीला एकांतात भेटायची त्याची खूप इच्छा होती, खूप काही बोलावं वाटत होतं पण आम्हाला दोघांना एकांतात भेटायचं आहे असं सगळ्यांसमोर कसं विचारावं हे काही त्याला कळेना.

    दोघांच्या मनाची घालमेल बघून शेवटी वहिनी म्हणाली, “आई बाबा, आपण जेवण झाल्यावर आरती आणि आदित्य ला जरा वेळ एकत्र भेटू देऊया का? म्हणजे लग्न ठरल्यानंतर दोघेही भेटलेच नाही ना…तितकाच काय तो त्यांना गप्पा मारायला वेळ मिळेल.. आदित्य सोडेल आरतीला घरी..काय म्हणताय..?”

     

    त्यावर सगळ्यांनी लगेच होकार दिला तसाच आदित्य वहिनी कडे बघत हळूच थ्यॅंक्यू म्हणाला. त्याने एक कटाक्ष आरती कडे टाकला तर ती खाली बघत लाजत होती. तिचे लाजरे रूप बघून त्याला तिला भेटायची ओढ अजूनच घायाळ करत होती. सगळ्यांचे जेवण आटोपले आणि एकमेकांचा निरोप घेतला.

    आई आरतीला हळूच म्हणाली, “लवकर ये हं बाळा घरी..”

     

    वहिनी आदित्य ला म्हणाली, “उगाच तिला त्रास नको हं देऊन..लवकर घरी सोड तिला आणि ते परत..”

     

    आरतीची बहीण आरतीला चिडवत म्हणाली, “क्या बात है दिदी…लेट नाईट डेट.. मज्जा आहे बुवा..”

     

    आरती उगाच लाजून तिला म्हणाली, “गप्प बस गं.. डेट वगैरे नाही हं..येते लवकरच घरी..”

     

    आदित्य चा मित्र तिथे जवळच राहत होता, त्याला फोन करून आदित्यने बाईक ची व्यवस्था केली. आरती हळूच आदित्यला म्हणाली, “आपण नक्की कुठे जातोय?”

     

    आदित्य – “काही अंतरावर एक कॉफी शॉप आहे ते खूप उशिरापर्यंत सुरू असतं.. तिथे जाऊया.. निवांत बोलायला मिळेल तिथे..”

     

    आरतीने मानेनेच होकार दिला.

     

    दोघेही बाईक वरून जायला निघाले. आरती जरा अवघडून बसलेली बघून आदित्य म्हणाला, “तू माझ्या खांद्यावर हात ठेवलास तरी चालेल..”

     

    आरती – “नको..मी बसले आहे नीट..”

     

    आदित्य जरा थट्टा करत म्हणाला, “बघ हा..ब्रेक मारला तर पडशील..मी सुसाट गाडी पळवतो बरं..उगाच रिस्क नको घेऊ.. पकडून बस.. आणि लाजायचं कारण नाही, आपलं लग्न होणार आहे लवकरच..”

     

    आरतीने काहीही न बोलता गालातच हसत हळूच तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तिच्या त्या अलगद स्पर्शाने आदित्य अगदी मोहरून गेला. बाईक वरून जाताना नकळत दोघांना एकमेकांचा स्पर्श झाला तसंच दोघांनाही एक प्रेमळ भाव जाणवला. क्षणभर दोघांनाही आजुबाजुच्या विश्वाचा जणू विसरच पडला.

     

    हा सगळा अनुभव किती गोड आहे, रोमांचक आहे अशा काहीशा विचारताच दोघे कॉफी शॉप मध्ये पोहोचले.

     

    दोघांना एकांत मिळेल असा टेबल शोधून दोघेही तिथे बसले. अंधुक प्रकाश, गार वारा , त्यात गरमागरम कॉफी आणि सोबतीला आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार. हा क्षण दोघांसाठी खूप खास होता, लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदाच दोघे असे भेटले होते. आदित्य कडे बघत म्हणाला, “आज तू अजूनच सुंदर दिसते आहेस..”

     

    आरती जरा लाजून म्हणाली, “थ्यॅंक्यू..”

     

    नंतर कॉफी सोबतच दोघांच्या रोमॅंटिक गप्पा रंगल्या, नव्या आयुष्याचे, संसाराचे स्वप्न रंगवत वेळ कसा भराभर जात होता दोघांनाही कळाले नाही. ही रात्र कधी संपूच नये असे वाटत असतानाच आरतीने मोबाईल मध्ये बघितले तर साडे अकरा वाजलेले.

     

    आरती – ” बापरे..उशीर झालाय ना…निघूया का?”

     

    आदित्य – “इच्छा तर नाहीये जायची पण निघावं लागेल ना..आता कदाचित डायरेक्ट लग्नातच भेट होणार आपली..”

     

    आरती – “हो ना.. आणि मग कायम सोबत असणार आपण..”

     

    दोघेही परत जायला निघाले. पार्कींग मध्ये आल्यावर आदित्यने तिला मिठी मारली तशीच ती शहारली, डोळे घट्ट मिटून तिनेही त्याला प्रतिसाद दिला. हा अनुभव दोघांसाठीही खूप वेगळा होता. पहिली मिठी, पहिला स्पर्श अगदी कधीही न विसरता येणारा होता. काही क्षणात अलगद मिठीतून बाहेर येत आरती म्हणाली, “खूप उशीर झालाय..निघूया आता..”

     

    आदित्य – “हो..चल निघूया..आरती, एक सांगू..तुला असं भेटून खूप खूप छान‌ वाटतंय.. काही तरी वेगळाच अनुभव आहे हा..अगदी हवाहवासा वाटणारा.. थ्यॅंक्यू फॉर कमिंग इन माय लाईफ..”

     

    आरती – “मलाही खूप छान वाटतंय..अगदी सुरक्षित वाटतंय तुमच्या सहवासात..”

     

    दोघांच्याही मनात आनंद, प्रेम, रोमांच अशा अनेक भावना अनावर झाल्या होत्या.

     

    थोड्याच वेळात आदित्यने आरतीला घरी सोडले.

    पुढचे काही दिवस लग्नाची सगळी तयारी करण्यात भराभर जात होते. दोघांचं फोनवर बोलणं सुरु होतं पण आता कधी एकदा एकमेकांना भेटतोय असं दोघांनाही झालेलं.

    पहिली कॉफी डेट, पहिला स्पर्श, पहिली मिठी सगळं आठवून आरतीच्या अंगावर रोमांचक काटा आला. मनातच सगळं आठवून ती एकटीच मनोमन आनंदून गेली. लग्नाचा दिवस जवळ येत होता. हळदी, मेहंदी, इतर विधी, पुजा असे दिवस ठरलेले. या सगळ्याचे फोटो दोघेही एकमेकांशी शेअर करत होते. फोटो बघून मग तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक त्याच्याकडून ऐकून ती अजूनच आनंदात जणू उड्या मारत होती.

    एकीकडे आदित्यची ओढ तर दुसरीकडे माहेर सोडून जाण्याची अस्वस्थता अशी तिची द्विधा मनस्थिती झालेली.

     

    बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. धुमधडाक्यात दोघांचं लग्न पार पडलं. सप्तपदी, कन्यादान सुरू असताना त्याने तिचा हात हातात घेतला तसाच तो आनंदून गेला. आरतीच्या चेहऱ्यावर मात्र मिश्र भाव होते.

    बालपण, भावंडांबरोबर केलेली मज्जा मस्ती , आई बाबांकडून लाड कौतुक तर कधी वेळप्रसंगी ओरडा ज्या घरात मिळाला ते माहेरचे घर सोडून आता नवीन घरात जायचं या विचाराने ती हळवी झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत आदित्यने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात बघताच, नव्या आयुष्यात मी सदैव तुझ्या सोबतीला असेन असा विश्वास जणू त्याच्या नजरेत तिला जाणवला. तिनेही आपल्या भावनांना आवरत तिचा हात त्याच्या हातात देत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

     

     

     

    समाप्त!!!

     

     

    अशी ही आरती आणि आदित्य यांच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा 😊

     

     

    © अश्विनी कपाळे गोळे

     

     

     

     

     

     

  • संशयाचे भूत

           मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

    नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

         मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

    नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

    तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

    त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

    मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

    हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

    मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

         मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
         नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

    कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
    अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

      आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

         बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

    काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

          मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

        नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

          सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

        उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

         बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

    दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

        असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

    हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

    नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

    अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

    मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
    नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

    मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

    या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

    प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
    इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

    आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
    पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

    खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
    तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

    © अश्विनी कपाळे गोळे