Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला

  • “निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली.

 

निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला‌ मिळतं निवांत.. ”

 

“निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?”

 

“मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे करत आहोत आपण..मला मूळात लग्नच करायचं नाहीये ”

 

“निधी, असं किती दिवस त्याच आठवणी मनात घेऊन लग्नाला नकार देत राहणार आहेस बाळा.. आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून काहीतरी शिकवण घेत पुढे जायचं असतं..सगळेच मुलं काही वाईट नसतात..”

 

“मम्मा प्लीज आज परत तो विषय नको..” – निधी उठून बसत म्हणाली.

 

“ओके बाबा, सॉरी..पण लवकर तयार हो..”

 

मानेनेच होकार देत निधी बाथरूममध्ये निघून गेली.

 

निधीची आई मात्र तिच्या काळजीने मनातच पुटपुटत म्हणाली, “हा योग जुळून येऊ दे देवा.. भूतकाळ आधीच माहीत असूनही मुलाकडचे तयार झाले..आता एकदा सगळं जुळून आलं की निधीची समजूत काढता येईल..होईल तयार ती लग्नाला..”

 

निधीच्या विचारात गुंतली असताना बाबांची हाक ऐकताच आई विचारातून बाहेर आली.

 

“आले हा..” म्हणत आई खोलीतून बाहेर गेली.

 

निधी दिसायला सुंदर, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज, आकर्षक व्यक्तीमत्व असलेली श्रीमंत घरातील आई वडीलांना एकुलती एक मुलगी. अगदीच लाडा कौतुकात ती लहानाची मोठी झाली. डिग्री नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. तिथे तिची ओळख वेदांत सोबत झाली. परदेशात आपली भाषा बोलणारा वेदांत भेटल्याने तिची त्याच्याशी मस्त गट्टी जमली. दोघांचीही अगदी घट्ट मैत्री झाली. विकेंड ला सोबत फिरणे, शॉपिंग, पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन सगळं अगदी सोबत करायचे दोघेही. निधीला वेदांतचा सहवास हळूहळू आवडायला लागला होता. वेदांतच्या मनातही निधी विषयी प्रेम होतेच पण त्याने ते व्यक्त केले नव्हते. न राहावून शेवटी निधीने तिचे त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आणि दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

दोघेही प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. दोन वर्षे एकत्र असताना‌ ते मनाने तर जवळ आलेच पण नकळत शरीरनेही एकरूप झाले. आता मायदेशी परतल्यावर घरी लग्नाचं बोलायचं आणि संसार थाटायचा असं दोघांचं ठरलेलं.

निधी ने तर तिच्या मम्मा पप्पांना व्हिडिओ कॉल वर वेदांत विषयी सगळं काही सांगितलं सुद्धा. निधीच्या घरचं वातावरण अगदीच फ्रेंडली त्यामुळे त्यात काही वावगं असं त्यांना वाटलं नाही पण मम्मा मात्र सारखं तिला म्हणायची, “निधी बेटा, बॉयफ्रेंड आहे हे ठीक आहे पण काही चुकीचं करून बसू नकोस..”

 

त्यावर निधी म्हणायची, “कम ऑन मम्मा.. मी काय लहान बाळ आहे का.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर..आता परत आलो ना की लग्नाचं ठरवूया म्हणतोय वेदांत..”

 

“आपली मुलगी तशी बोल्ड आहे..माणसांची योग्य पारख तिला आहे..आता ती अल्लड नाही..आपणच उगाच काळजी करतोय बहुतेक..” असा विचार करत स्वतः ची समजूत काढत मम्मा शांत बसायची.

 

वेदांतच्या घरी मात्र अजून निधी विषयी काही माहिती नव्हते. घरी परत गेल्यावर मी सगळ्यांशी बोलून आपल्या नात्याविषयी सांगतो..त्यांना काही प्रोब्लेम नसणार आहे असं वेदांत अगदी आत्मविश्वासाने सांगायचा.

 

बघता बघता दोन वर्षे संपले आणि दोघेही मायदेशी परतले. दोघेही वेगवेगळ्या शहरात राहायला‌ त्यामुळे आता फक्त फोन, व्हिडिओ कॉल यावरच भेट व्हायची.  निधी त्याला सारखं विचारायची, “वेदांत तू घरी बोललास का आपल्या विषयी..”

त्यावर वेदांत म्हणायचा, “निधी, एकदा‌ नोकरी हातात आली ना की लगेच सगळी बोलणी करुया.. तुझ्या घरी सुद्धा तुझा हात मागायला असं विना नोकरी कसं यायचं ना.. बसं काही दिवस थांब..”

 

निधीचेही नोकरीचे प्रयत्न सुरू होतेच पण वेदांत पासून दूर राहणे तिला फार अवघड होत चाललं होतं. दोन‌ वर्षांच्या सहवासात त्याची जणू सवय झाली होती.

एक दिवस वेदांतचा सकाळीच कॉल आला..त्याला मोठ्या कंपनीची ऑफर मिळाली होती, परत परदेशात प्रोजेक्ट साठी जावं लागणार आहे असं त्यानं सांगितलं.

 

ते ऐकून निधी अगदी आनंदाने नाचायला लागली. “वेदांत आता घरी बोलू शकतोस तू… लगेच लग्न करायचं असं नाही पण आपल्या विषयी कल्पना तरी देऊ त्यांना..”

 

“निधी, किती उतावीळ झाली आहेस तू…आता कुठे नोकरीची ऑफर मिळाली..बोलूया लवकरच घरी..धीर धर जरा..” असं वेदांत म्हणाला तेव्हा निधी मनोमन फार दुखावली.

 

“आपण दिवसेंदिवस वेदांत मध्ये गुंतत जातोय पण हा मात्र सगळं खूप सहज बोलून मोकळा होतो आहे.. वेदांत धोका तर‌ देणार नाही ना.. नाही.. नाही.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर…असा नाही करणार तो… त्याला जरा‌ वेळ द्यायला हवा… “अशी स्वतः ची समजूत काढत निधीने ठरवले की आता काही दिवस तरी त्याला या विषयी काही विचारायला नको.

 

निधीचे मम्मा पप्पा पण तिला अधूनमधून वेदांत विषयी विचारत म्हणायचे, “वेदांतला एकदा तरी घरी बोलावून घे..आम्हाला भेटायचं आहे त्याला… तुमचं पुढे काय ठरलं जरा बोलायला हवं ना..”

 

त्यावर निधी “हो..हो..” म्हणत वेळ निभावून न्यायची.

 

दिवसेंदिवस आता दोघांचं फोनवर बोलणं सुद्धा कमी होत चाललं होतं. निधीच्या मनात शंकाकुशंका यायला लागल्या होत्या.

 

बराच विचार करून निधी‌ मम्मा पप्पांना म्हणाली, ” पप्पा, आपण जायचं का वेदांत कडे…तो सध्या त्याच्या नव्या नोकरीत, व्हिजा वगैरे मध्ये बिझी आहे..आपण भेटायला जाऊ..त्याला सरप्राइज देऊ..मला पत्ता माहीत आहेच..”

 

“चालेल..काही हरकत नाही..” – पप्पा.

 

 

क्रमशः

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

 

संशयाचे भूत

       मयंक मोठ्या उत्साहात ऑफिसमधून घरी आला. दारातूनच मोठ्याने नैनाला हाक मारली, “नैना, अगं कुठे आहेस..लवकर बाहेर ये..एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला..”

नैना स्वयंपाकघरात काम करता करताच नॅपकिन ला हात पुसत बाहेर आली, “अरे, आज स्वारी फारच आनंदात दिसत आहे..काय खास बातमी सांगायची आहे म्हणालात तुम्ही..”

     मयंक नैनाला मिठी मारत म्हणाला, “नैना, अगं मला सहा महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आहे…ज्या संधीची मी गेली चार वर्षे वाट बघतोय ती संधी आज चालून आली आहे..दोन तीन आठवड्यात सगळी प्रोसेस पूर्ण होईल नंतर जावं लागेल मला…”

नैनालाही ते ऐकताच आनंद झाला, “अरे व्वा..क्या बात है..खरंच खूप छान बातमी दिली तुम्ही…”

तितक्यात अमन म्हणजेच मयंकचा धाकटा भाऊ घरी आला, दादा वहिनीला अगदी आनंदात गप्पा मारताना बघून तो जरा मस्करी करत म्हणाला, “काय दादा, काही खास… दोघेही आनंदात दिसताय म्हणून विचारलं..मी काका होणार आहे की काय?..”

त्यावर तिघेही हसले, नैना‌ लाजतच म्हणाली, “काय हो  भाऊजी, काही पण हा… बरं तुम्ही दोघे बसा, मी आलेच पाणी घेऊन..”

मयंकने अमनला अमेरीकेच्या संधी विषयी सांगितले. दोघेही भाऊ सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. नैना पाणी घेऊन आली तोच मयंक म्हणाला, “नैना प्लीज चहा ठेवशील कां..”

हो नक्कीच म्हणत नैना चहा बनवायला किचनमध्ये निघून गेली.

मयंक आणि नैना यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं.

     मयंक एका नामांकित कंपनीत नोकरीला, सुखवस्तू कुटुंबात वाढलेला.
     नैना मोहक सौंदर्य असलेली सालस मुलगी, ग्रामीण वातावरणात वाढलेली, लग्नानंतर पहिल्यांदाच शहरात आलेली. मयंक नैनाचे सौंदर्य बघता तिच्याबाबत नकळत दिवसेंदिवस पझेसिव्ह होत होता. त्यामुळे बाहेर नोकरी वगैरे नको म्हणत त्याने तिची आवड लक्षात घेऊन शिवणकामाची कल्पना सुचवली. घरीच ती शिवणकाम करायची, त्यामुळे सोसायटीत तिची ओळख होत गेली शिवाय वेळ सुद्धा चांगला जाऊ लागला. दोघांचा राजा राणीच्या अशा या आनंदी संसाराला एक वर्ष झाले.

कॉलेज संपल्यावर आता दोन महिन्यांपूर्वी अमनलाही त्याच शहरात नोकरी मिळाली त्यामुळे अमन सुद्धा दोघां सोबत राहू लागला.
अगदी आनंदात, हसत खेळत राहायचे तिघेही.

  आज मयंकला परदेशात जाण्याची संधी मिळाली तसाच तो सगळ्या तयारीला लागला. नैना मात्र जरा अस्वस्थ होती, पहिल्यांदाच तो आपल्यापासून दूर जाणार म्हणून ती वरवर आनंदी दिसत असली तरी मनातून जरा उदास होती.

     बघता बघता मयंकचा जाण्याचा दिवस आला. तो गेल्यावर इतके दिवस मनात साठवलेल्या अश्रूंनी वाट मोकळी केली. सहा महिन्यांचा हा दुरावा तिला असह्य झाला. मयंकला सुद्धा तिची अवस्था कळत होती पण करीअर साठी ही संधी सुद्धा तितकीच महत्त्वाची होती.

काही दिवस सासू सासरे,आई बाबा नैना सोबत थांबलेले पण ते परत गेल्यावर नैनाला परत एकटेपणा जाणवला. अमनला वहिनीची परिस्थिती समजत होती, आपली वहिनी दादाला खूप मिस करते आहे, त्याच्या आठवणीत एकटीच रडते हे त्याला बघवत नव्हते. शिवाय दादा वहिनीचे घट्ट प्रेम बघता समाधान सुद्धा वाटत होते. अशा वेळी आपण वहिनीला जरा वेळ द्यावा म्हणून सुट्टीच्या दिवशी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. याच दरम्यान त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया हिच्याशी सुद्धा नैनाची ओळख करून दिली. अमनच्या घरी प्रिया विषयी नैना सोडून कुणालाही काही माहीत नव्हते.

      मधल्या काळात दोन आठवड्यांसाठी नैना मयंक कडे जाणार होती. पहिल्यांदाच एकटी परदेशात जाणार होती तेव्हा सगळी व्हिसा प्रक्रिया, शॉपिंग ह्यात अमन आणि प्रियाने तिला खूप मदत केली. त्यासाठी नैना आणि अमनला बाहेर जाता येताना बर्‍याच जणांनी एकत्र बघितले आणि त्यांच्या नात्याचा भलताच अर्थ काढला.

    नैना दोन आठवडे मयंक कडे जाऊन आली. त्याला भेटल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. परत आल्यावर पुन्हा एकदा तोच एकटेपणा आणि मयंकची आठवण तिला अस्वस्थ करत होते. या दरम्यान अमन सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. अशातच तिची प्रिया सोबत असलेली ओळख मैत्रीत बदलली. प्रिया जरा मॉडर्न राहणीमान, विचारसरणीची. आता तिचे नैना कडे येणे जाणे वाढले होते आणि ही गोष्ट मात्र नैनाच्या शेजारीपाजार्‍यांना खुपत होती. पूर्वी नवर्‍याला सोडून घराबाहेर न पडणारी नैना आता अमन आणि प्रिया सोबत बाहेर फिरते, छोटे छोटे कपडे घातलेली प्रिया वेळी अवेळी घरी येते याचा सगळ्यांनी वेगळाच तर्क लावला.

      सहा महिन्यांनी मयंक परत आला तेव्हा नैना आणि अमन मधल्या नात्यात त्याला जरा फरक जाणवला. अमन नैना ला अगदी बहिणी समान वागणूक द्यायचा ,तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत आपले सिक्रेट शेअर करायचा पण मयंकला वरवर बघता त्यांच्या नात्याचा अर्थ कळलाच नाही. सहा महिने आपण दूर राहीलो तर नैना अमनच्या जास्तच जवळ गेलीय असा त्याचा समज झाला . त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यात भर म्हणून शेजार्‍यांची नैना आणि अमन विषयीची कुजबुज त्याच्या कानावर आली तेव्हा त्याचा संशय अजूनच वाढला. मयंक लहानसहान गोष्टींवरून नैना सोबत भांडण करू लागला. नैनाला त्याचे वागणे विचित्र वाटले पण तो असं का वागतोय हे काही तिला कळत नव्हते.

    उगाच तिच्यावर चिडचिड करत तो म्हणायचा हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नाही, अमन अमन करतेस तू सारखी, तू फार बदलली या सहा महिन्यात वगैरे. नैना त्याला समजविण्याचा बराच प्रयत्न करायची पण मयंकच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले होते. ती कधी छान तयार झाली तरी तो तिच्याकडे संशयाने बघायचा, अमन सोबत नैना जास्त बोललेली त्याला आता आवडत नव्हतं.

     बायको वर तर संशय घ्यायचाच पण सख्ख्या भावावर सुद्धा त्याला आता विश्वास वाटत नव्हता त्यात भर म्हणजे प्रिया अमनच्या आयुष्यात आहे याची त्याला कल्पना नव्हती. आपली बायको सुंदर आहे, तरुण आहे शिवाय अमनच्या वयाची आहे त्यामुळे तोही तिच्या प्रेमात पडला की काय असे त्याला वाटू लागले.

दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला, नैना आणि अमन सोबत त्याचे नाते सुद्धा बिघडायला लागले. दोघांच्या नात्यात आता सतत चिडचिड, भांडण, संशय. अमनला सुद्धा दादाच्या स्वभावात बदल जाणवला. त्याच्याशी बोलून सुद्धा तो असं का वागतोय हे कळाले नाही.

    असंच एक दिवस सकाळीच मयंक नैना वर कुठल्या तरी कारणावरून मोठ्याने ओरडला, अमन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. मयंक मोठ्याने वहिनीवर ओरडतोय हे त्याने पहिल्यांदाच बघितले आणि काय झालंय बघायला तो दोघांच्या भांडणात मध्ये पडला. तेच निमीत्त झालं, मयंक अमनला नको ते बोलला. त्याला रागाच्या भरात म्हणाला, “तुला काय गरज अमन आमच्या मध्ये पडायची…दादा वहिनीच्या मध्ये येताना लाज नाही वाटली तुला ? सहा महिने मी दूर काय गेलो, तू नैनाला नादी लावलं.. आणि नैना तुला सुद्धा लाज नाही वाटली का दिरासोबत असले चाळे करताना. मला कळत नाहीये का तुमच्यात काय चाललंय ते.. अख्ख्या सोसायटीत माहीत झाले आहे तुमचे लफडे..नैना‌ तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती..अमन, तुझं तर मला तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही… निघून जा आत्ताच्या आत्ता..”

हे सगळं ऐकून नैना आणि अमनला धक्का बसला. दोघेही मयंकचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहीले पण मयंक मात्र कांहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

नैनाला सगळं अगदीच अनपेक्षित होतं, मयंक आपल्याविषयी इतका घाणेरडा विचार करतोय याची नैनाला अक्षरशः किळस वाटली. भावासारखा आपला दिर आणि हा मयंक काय विचार करतोय..काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही हा..असा विचार करत ती ढसाढसा रडायला लागली.

अमन सुद्धा दादाच्या अशा संशयी बोलण्याने खोलवर दुखावला. ज्या दादाने आता पर्यंत आपल्याला जगण्याचे धडे दिले तो असा कसा बोलू शकतो, बहीणी समान  वहिनीच्या बाबतीत आपल्यावर अशें घाणेरडे आरोप…अमन अशाच मनस्थितीत घराबाहेर निघून गेला.

मयंक सुद्धा नैना कडे दुर्लक्ष करत ऑफिसला निघाला. नैना मात्र अजूनही रडतच होती, मयंक आपल्याविषयी असा कसा वागू शकतो, इतका अविश्वास?  हा प्रश्न तिला अस्वस्थ करत राहीला. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने असा संशय घेत अविश्वास दाखविला की संसाराची कडा कशी क्षणात मोडून पडली हे तिने अनुभवले.
नैनाच्या हळव्या मनाला हे सहनच झाले नाही. मयंकचे संशयी वाक्य, नादी लावलं, लफडे केले हे शब्द सतत तिच्यावर वार करत राहीले. क्षणभर तिच्या मनात स्वतः ला संपविण्याचा विचार सुद्धा येऊन गेला पण आपली काहीही चूक नसताना आपण स्वतःला का शिक्षा द्यायची म्हणून तिने निर्णय घेतला मयंक सोबतचे नाते कायमचे तोडण्याचा. ज्या नात्यात विश्वास नाही, प्रेम नाही, संवाद उरलेला नाही‌ ते नातं जपण्यात काय अर्थ आहे म्हणत तिने आपली बॅग भरली आणि ती‌ मयंकच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

मयंकने सुद्धा अहंकरा पोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अचानक नैना कडून आलेली डिव्होर्स नोटीस मयंकला मिळाली.

या दरम्यान अमन सोबत सुद्धा त्याचे संबंध जवळपास तुटलेले होते. आई बाबांनी मयंकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मयंकच्या मनात अजूनही नैना आणि अमन विषयी राग होताच.

प्रियाला अमनने हे सगळं सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. अमनच्या नकळत ती एक दिवस मयंकला जाऊन भेटली तेव्हा मयंकला अमन आणि प्रिया विषयी कळाले. प्रियाने हेही सांगितले की नैनाला आमच्या नात्याविषयी माहीत होते. अमन सुद्धा म्हणाला होता की दादा अमेरिकेहून परत आला की दादाला आपल्या विषयी सांगतो पण सगळं विचित्र झालं दादा. मला अमनने जेव्हा नैना आणि तुमच्या वेगळं होण्याविषयी सांगितलं, खरंच मला खूप वाईट वाटलं शिवाय अमन या सगळ्याचा दोष स्वतः ला देतोय. आपल्यामुळे वहिनीवर दादाने आरोप केले म्हणत स्वतःला दोषी मानतो आहे. दादा मला सांगा यात नक्की चूक कुणाची हो? तुम्ही नसताना अमनने वहिनीला मदत केली, एकटेपणा दूर व्हावा म्हणून माझ्याशी ओळख करून दिली, आम्ही तिघे भेटलो ना की वहिनी तुमचं किती भरभरून कौतुक करायच्या.  अमन सुद्धा सतत मला सांगायचा की माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझा दादा मयंक. मग ह्यात चूक नक्की कुणाची दादा, जरा विचार करा… तुम्ही नैना वहिनीवर अविश्वास दाखविला पण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला का? संवादातून सगळं काही सुरळीत झालं असतं पण तुम्ही ऐकण्याचा प्रयत्नच केला नाही. बाहेरच्या लोकांची कुजबुज ऐकून तुम्ही संशयाने तीन आयुष्य उद्ध्वस्त करत आहात दादा…
इतकं बोलून प्रिया निघून गेली आणि मयंक या प्रश्नांची उत्तरे शोधत राहीला.

आता उत्तर मिळूनही काही उपयोग नव्हता. नैना आणि मयंकच्या नात्यात संशयाचा किडा शिरून मोठी दरी निर्माण झाली होती. दोन्ही भावातील नाते कधीच पूर्ववत होऊ शकणार नव्हते.
पश्चात्ताप करण्याशिवाय मयंक जवळ कांहीही शिल्लक राहिले नव्हते.

खरंच आहे ना, संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. लग्नाच्या नाजूक बंधनात संशयाचे धुके दाटले की नात्याला कायमचा तडा जातो.
तेव्हा वेळीच सावरा, संवाद साधा. एकदा वेळ निघून गेली की मयंक सारखं पश्र्चाताप करण्याशिवाय काहीही हाती लागणार नाही.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

© अश्विनी कपाळे गोळे

तू आणि तुझं प्रेम हवंय…

     मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.

     मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, मग हळूहळू मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलले. मोहीनी गव्हाळ वर्णाची नाकी डोळी तरतरीत, बोलके डोळे, बडबड्या स्वभावाची सुखवस्तू कुटुंबात वाढलेली मुलगी. शुभम दिसायला देखणा, उंच पुरा, शांत स्वभावाचा मुलगा, गरीब घरात लहानाचा मोठा झाला त्यामुळे परिस्थीतीची जाणीव ठेवून तो आयुष्य जगत होता. त्याच्या परिस्थितीची माहिती मोहीनीला होतीच पण तरी तिला तो खूप आवडायचा.

कॉलेज संपल्यावर शुभमला शहरात नोकरी मिळाली. मोहीनी साठी मात्र कॉलेज संपले तसेच घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले. दोघांच्याही घरच्यांना दोघांच्या प्रेम प्रकरणाची जराही कल्पना नव्हती. मोहीनीने शुभमला फोन करून सांगितले, “शुभम अरे घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघत आहेत, तू काही तरी कर..मला‌ तुझ्याशी लग्न करायचं आहे,  दुसऱ्या कुणासोबत मी सुखी नाही राहू शकणार…तू तुझ्या घरच्यांच्या मदतीने माझ्या घरी मागणी घाल मग मी पण सगळं सांगते नीट आई बाबांना..”

शुभम ची मात्र नुकतीच नोकरी सुरू झालेली, फार काही पगार नव्हता पण तरीही मोहीनी शिवाय जीवन जगणे त्यालाही शक्य नव्हतेच. आता घरी बोलून मोहीनीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव मांडणे त्याच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. मोठी हिंमत करून, दोघांच्या प्रेमासाठी त्याने त्याच्या घरी मोहीनी विषयी सांगितले. त्याच्या आई बाबांना त्याच्या पसंती विषयी काही अडचण ही नव्हतीच पण ती जरा आपल्यापेक्षा मोठ्या घरची तेव्हा तिच्या घरचे आपला प्रस्ताव स्विकारणार की नाही हाच मोठा प्रश्न होता. तरी शुभम साठी आपण एकदा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे असा विचार करून शुभम आणि त्याचे बाबा मोहीनीच्या घरी गेले. मोहीनीने सुद्धा तिचं शुभम वर प्रेम असून त्याच्याशीच लग्न करायचं आहे हे घरी सांगून टाकले. हो नाही म्हणता म्हणता काही दिवसांनीं मोहीनीच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले.

  मोहीनी लग्नानंतर शुभम सोबत शहरात  रहायला गेली. आपली मुलगी शुभम सोबत आनंदात आहे हे बघून तिच्या घरच्यांना हायसे वाटले. सुरवातीला काही महिने अगदी आनंदाने दोघे नांदत होते पण हळूहळू मोहीनीची चिडचिड वाढू लागली त्यात कमी पगारात दोघांचा शहरातला खर्च, नविन संसार सगळं सांभाळताना शुभम ची खूप धावपळ होत असे. मोहीनीला मात्र लहानपणापासून कधीच काटकसर करण्याची गरज पडली नव्हती आणि आताही शुभम ची परिस्थिती लक्षात न घेता ती काटकसर करायला तयार नव्हती. राहायला चांगल्या घरातच असले पाहिजे मग घरभाडे जरा जास्त का असेना, त्यात घरात आवश्यक तितक्या सगळ्या वस्तू असूनही काही तरी नवनवीन वस्तू घ्यायचा तिचा हट्ट काही केल्या कमी होत नव्हता. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याचा हट्ट अगदी लहान मुलांसारखा ती करायची.
शुभम म्हणायचा, फिरायला आपण महीन्यात एकदा तरी जाऊच नक्की पण सारखं सारखं सुट्टीच्या दिवशी बाहेर नको गं, एकच दिवस एकत्र मिळतो आपल्याला. घरी आनंदात एकत्र घालवू, मला जरा आराम सुद्धा होईल पण मोहीनीला काही ते पटेना. तिला वाटायचे शुभमचे आता आपल्यावर प्रेमच नाही मग चिडणे, रडणे सुरू.

    शुभम तिला समजून सांगायचा आपला नविन संसार आहे, सध्या पगार कमी आहे तेव्हा जरा जपून खर्च करायला हवा, इकडे तिकडे फिरण्यात पैसे घालविण्या पेक्षा घरी एकमेकांना वेळ देऊया पण तिला ते जरा वेळ पटायचं परत काही दिवसांनी एखादा हट्ट हा सुरू. तिचे आई वडील पहिल्यांदाच तिच्या शहरातल्या घरी येणार म्हणून शुभम जवळ तिने नविन एक बेड घेण्याचा तगादा लावला. तो‌ तिला म्हणाला , “अगं, त्यापेक्षा आपण त्यांना काही तरी गिफ्ट देऊ, दोन दिवस जरा बाहेर फिरवून आणू..बेड एक आहेच, गाद्या सुद्धा आहेत मग नवीन बेड असायला हवा असं नाही ना…”
तिने तितक्या पुरते मान्य केले मात्र आई बाबा येऊन गेल्यावर तिची चिडचिड सुरू झाली. आई बाबा पहिल्यांदाच आलेले, त्यांना काय वाटलं असेल, घरात एकच बेड आहे..कुणी आलं गेलं तर हॉलमध्ये झोपावे लागते…आता आपण मोठा फ्लॅट घेऊ भाड्याने म्हणजे पाहुणे आले तर त्यांना एक वेगळी खोली राहील.”
शुभम तिची समजूत काढून थकलेला. एक झालं की एक सुरूच असायचा मोहीनीचा हट्ट. कधी तरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मोहीनी आता त्याला समजून घेण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे दोघे एकत्र घरी असले की नुसतीच तिची चिडचिड, रडारडी, शुभमला घालून पाडून बोलणे हेच सुरू असायचे. तिच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्याच्या शांत स्वभावामुळे पण तो तिला कधी चिडून ओरडून बोलत नव्हता.

अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे झाले.
शुभम परिस्थितीची जाणीव ठेवून भविष्याचा विचार करून खर्च करायचा. आता मुलंबाळं झालेत तर त्यांच्यासाठी जरा बचत करायला हवी म्हणून जरा जपून पैसे वापरायचा. पगार झाला की महीन्याला मोहीनीच्या हातात घरखर्चा व्यतिरिक्त काही जास्तीचे पैसे देऊन बाकी बचतीचे नियोजन त्याचे असायचे. मोहीनीच्या हातात मात्र पैसा टिकत नव्हता. काटकसर ही तिला काही केल्या जमत नव्हती. शुभम तिला नेहमी सांगायचा, “माणसाने कंजुषपणा कधीच करू नये पण काटकसर नक्कीच करावी.. भविष्यात याचा उपयोग होतो..”
मोहीनीला मात्र ते पटत नव्हते. तिला म्हणायची शुभम तू फारच चिंगूस आहे…

  एकदा अशाच एका गोष्टीवरून दोघांचा वाद झाला, मोहीनी रागाच्या भरात त्याला बोलली, “शुभम तुझ्याशी लग्न करून मला आता पश्चात्ताप होतोय, तू खूप बोरींग आहेस.. तुझ्याजवळ काहीही मागितले तरी तू सतत मला लेक्चर देतोस..मला ना आता नको वाटतोय तुझ्यासोबत राहायला.”

तिचे हे वाक्य ऐकताच शुभमला फार वाईट वाटले, आपण जिच्या साठी इतकं सगळं करतोय ती आपल्याला असं बोलतेय हे त्याला सहनच होत नव्हते. ती बराच वेळ बोलत होती पण तो मात्र मनोमन रडत होता. त्याला आठवले लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला सरप्राइज देण्यासाठी महाबळेश्वरला घेऊन गेला कारण तिला फिरायला आवडतं, छानसा ड्रेस गिफ्ट केलेला. त्या दिवशी किती आनंदी होती मोहीनी. दर महिन्याला कुठे तरी दिवसभर फिरायला जातोच बाहेर, कधी हॉटेलमध्ये जेवायला, कधी तिच्या आवडत्या मार्केट मध्ये खरेदी करायला.  लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हिला मी वर्षभर बचत करून छान सोन्याचे इअररींग गिफ्ट दिले, डिनरला घेऊन गेलो. तरी म्हणतेय मी कंजूस आहे, प्रेम नाही‌. हिला बरं नसेल तर सुट्टी घेऊन घरकामात मदत करतो…हिची नीट काळजी घेतो,  जेवण बनवायला त्रास नको म्हणून जेवणही अशा वेळी बाहेरून पार्सल आणतो.. अजून काय करायला हवं आता…

असा सगळा विचार करून तो रागातच कांहीही न बोलता घराबाहेर पडला.‌ तिनेही त्याला अडवले नाही उलट तिच्याशी न बोलता तो बाहेर गेला म्हणून ती अजूनच चिडली.
त्याला कळत नव्हते की ह्यात खरंच आपली चूक आहे की आपल्यातील समंजसपणाची. अशातच त्याने एका मित्राला फोन केला, जो मोहीनी आणि शुभम दोघांनाही चांगला ओळखायचा. कॉलेजमध्ये एकाच गृप मधे असायचे तिघेही. त्याला भेटून मन मोकळं करावं, काही तरी मार्ग काढायला त्याची नक्की मदत होईल म्हणून शुभम मित्राला भेटायला निघाला. आपली गाडी काढून तो रस्त्याने जात होता पण डोक्यात सतत मोहीनीचे वाक्य त्याला आठवत होते. आजुबाजूला काय चाललंय याचे त्याला भान नव्हते. तो खूप दुखावला गेला होता. ही मोहीनी असं कसं बोलू शकते जी कधी काळी म्हणायची मला तुझ्यासोबत झोपडीत राहायला सुद्धा आवडेल.

अशातच जोरात हॉर्नचा आवाज त्याचा कानावर पडला, विचारांच्या धुंदीत हरविल्यामुळे त्याचे मागून येणार्‍या बस कडे लक्षच नव्हते. क्षणात काय होतेय हे कळण्याच्या आत त्याला बसची धडक बसली आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून या जिवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला. भरधाव वेगाने जाताना बसची धडक बसल्याने त्याला चांगलंच मार लागला. जमलेल्या गर्दीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कुठे पोहोचला म्हणून विचारायला मित्राने फोन केला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून शुभमचा अपघात झाल्याचे त्या मित्राला कळविले. तसाच तो धावत रुग्णालयात पोहोचला. मोहीनीला त्याने घडलेली घटना फोन करून कळविली. ती रुग्णालयात पोहोचताच त्या मित्राला बघून ढसाढसा रडत म्हणाली, “माझ्यामुळे झालंय रे सगळं..माझ्या बोलण्यामुळे तो असा निघून गेला…आणि असं झालं…माझी खूप मोठी चूक झाली…”

ती असं का म्हणते आहे हे काही त्या मित्राला कळाले नव्हते कारण शुभमने त्याला भेटायला नेमके कशासाठी बोलावले हे त्याला काही शुभमने फोन‌वर सांगितले नव्हते.

दोघांमध्ये नक्कीच काही तरी बिनसलं आहे हे त्याला आता कळालं पण अशा परिस्थितीत काही प्रश्न विचारण्याची गरज त्याला वाटली नाही.

मोहीनीला तो शुभम जवळ घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला मलमपट्टी करून औषधे दिलेली त्यामुळे तो नुकताच झोपी गेलेला.

काही वेळाने शुभमला जाग आली तर बाजुला बसलेल्या मोहीनीचे डोळे रडून सुजलेले होते. त्याने अलगद आपला हात उचलून तिच्या हातावर ठेवला तेव्हा ती भानावर आली. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, “शुभम, मला माफ कर.. खूप वाईट वागले मी.. मनात येईल ते बोलले तुला… सॉरी शुभम… माझ्यामुळे झालंय हे सगळं…परत नाही वागणार मी अशी…मला‌ तू हवा‌ आहेस शुभम…आज तुला काही झालं असतं तर कशी जगले असते‌ रे मी.. स्वतः ला माफ करू शकले नसते…मला तू हवा आहेस.. फक्त तू आणि तुझं प्रेम हवंय… बाकी काही नको…मला माफ कर शुभम..मी खरंच चुकले रे…”

त्याच्याही डोळ्यात चटकन पाणी आले. तिला तिची चूक उमगली हेच त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो फक्त इतकंच म्हणाला , “मोहीनी, परत असं दुखवू नकोस मला.. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर…”

ते‌ ऐकून ती त्याला बिलगून म्हणाली, ” माझंही खूप प्रेम आहे शुभम तुझ्यावर…नाही वागणार परत मी अशी…”

आज या अपघातानंतर मोहीनीला शुभमचे तिच्या आयुष्यातील महत्व कळाले. रागाच्या भरात काहीतरी बोलून आपण आपल्या शुभमला कायमचं गमावलं असतं याची जाणीव तिला झाली. पैसा, घर, मोठेपणाचा दिखावा यापेक्षा आपला प्रिय व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे कधीही महत्वाचे हे तिला कळून चुकले.

या दिवसापासून दोघांच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली. या दिवसानंतर मोहीनी मध्ये बराच बदल शुभमला जाणवला. दोघेही अगदी आनंदाने नांदायला लागले.

एका सत्य घटनेवर आधारित ही एक कथा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळते. नातलग, शेजारीपाजारी यांच्याशी तुलना‌ करत घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता पती जवळ कुठल्याही गोष्टींवरून तगादा लावणे, तो काय म्हणतोय ते समजून न घेता उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलून मन दुखावणे असले प्रकार बर्‍याच घरी दिसतात. कधी कधी अशामुळे आपण आपल्या जवळच्या माणसाला कायमचे गमवून बसतो आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वेळीच सावरा, समजून घ्या, समाधानाने संसार करा इतकेच सांगावसे वाटते.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – अंतिम भाग

      सानिका आणि जाऊबाई यांनी आता सुशांतच्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा निश्चय केला. जाऊबाईंच्या सांगण्यावरून सुशांतच्या भावाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काही अडचण असेल तर मला सांग असंही म्हंटले पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या मला कामाचा बराच व्याप वाढला आहे, मी कामात व्यस्त असतो असंच सुशांत ने दादाला सांगितले. शिवाय सानिकाने दोघांच्या नात्याबद्दल दादा वहिनीला सांगितले याचा सुशांतला खूप राग आला. त्या रात्री घरी आल्यावर याच कारणावरून तो सानिकाला नको ते बोलला. तितकेच कारण सुशांतला सानिकाशी अबोला धरायला पुरेसे झाले. काही दिवस असेच निघून गेले, हळूहळू सासू सासर्‍यांना सुद्धा दोघांच्या भांडण, अबोला याविषयी कळाले पण त्यांनी यात सानिकालाच दोष दिला. तूच त्याला समजून घेत नसणार, तुझ्यातच काही तरी दोष असेल म्हणून सुशांत असा वागतोय असा आरोप त्यांनी सानिकावर केला. जाऊबाई तिची बाजू घ्यायच्या पण सासू मात्र दोघींचेही काही ऐकून घेण्याच्या तयारीत नसायच्या.

    सानिका आणि जाऊबाई यांनी सुशांत विषयी सत्य जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीच आले नव्हते. सुशांतच्या मोठ्या भावानेही शोध घेतला, याचे बाहेर कोणत्या मुलीसोबत अफेअर तर नाही ना हेही माहिती केले पण असं काही असल्याचे दिसून येत नव्हते. तो ऑफिस नंतर फक्त आणि फक्त मित्रांमध्ये व्यस्त असायचा, पार्ट्या, आउटिंग यात सुट्टी घालवायचा.
सानिकाला या सगळ्याचा खूप मनस्ताप झाला पण माहेरी तिने याविषयी एक शब्द सुद्धा सांगितला नाही. त्यांना उगाच काळजी वाटेल शिवाय सत्य काय ते आपल्याला माहित नाही म्हणून ती माहेरच्यांना याबाबत काही सांगत नव्हती.

कितीही त्रास होऊ दे पण सुशांतचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचेच हे तिने ठरवले.
सुशांतचे उशीरा घरी येणे, लहानसहान गोष्टींवरून सानिका सोबत भांडण करणे, अबोला धरणे असे प्रकार सुरू होतेच,
पण सानिका मागे हटणारी नव्हती. तिने परत एकदा सुशांत सोबत बोलून तो असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,
“काम सगळ्यांनाच असते सुशांत पण तुम्ही घरच्यांसाठी, बायकोसाठी दिवसांतला काही वेळ सुद्धा कसं काढू शकत नाही… असं कुठे व्यस्त असता तुम्ही? तुम्हाला मी आवडत नसेल तर तसं तरी सांगा मला…काय चुकतंय माझं…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या प्रेमाचा तरी आदर ठेवा.. काही अडचण असेल तर सांगा मला…पण असं नका ना वागू…”

त्यावर सुशांत चिडक्या सुरात म्हणाला, ” अरे, काय सारखं सारखं तेच घेऊन बसली आहे तू…मला काही रस नाहीये तुझ्यात..तुझ्यात काय कुठल्याच स्त्री मध्ये इंटरेस्ट नाहीये मला..उगाच इमोशनल ड्रामा नकोय आता…परत हा प्रश्न विचारू नकोस..”

ते ऐकताच सानिकाला धक्काच बसला. जरा गोंधळलेल्या अवस्थेत तिने विचारले, ” रस नाहीये म्हणजे? नक्की काय म्हणायचे आहे सुशांत…मला आज खरं काय ते जाणून घ्यायचेच आहे..बोला सुशांत बोला…”

सुशांतचा आवाज आता अजूनच वाढला, सानिका सतत मागे लागलेली बघून तो चिडून उत्तरला, “खरं ऐकायचं आहे ना तुला…मग एक, मला कुठल्याही स्त्री मध्ये जरा जराही इंटरेस्ट नाहीये… कांहीही भावना नाही माझ्या मनात स्त्री विषयी. माझा इंटरेस्ट आहे पुरुषांमध्ये..हो मी ‘गे ‘आहे ‘गे’…. झालं आता समाधान? मिळाले उत्तर…नाही जवळ येऊ शकत मी तुझ्या..काही भावनाच नाही मला त्याप्रकारे..मुळात लग्नच नव्हतं करायचं मला पण आईच्या आग्रहामुळे करावं लागलं…”

इतकं बोलून सुशांत बाहेर निघून गेला.

आता मात्र हे सगळं ऐकून सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा विश्वासघात…धोका… फसवणूक…. असं कसं करू शकतो हा सुशांत….इतकेच काय ते तिच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले..

एव्हाना दोघांच्या भांडणामुळे सुशांतच्या घरच्यांना सगळा प्रकार कळाला. त्यांनी त्याचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला. इतकी मोठी गोष्ट त्याने घरच्यांपासूनही लपविली होती.

आता सानिका आपल्या मुलाची बदनामी करणार म्हणून सुशांतच्या आईने आपल्या मुलाला पाठीशी घालत सानिकाला उलट बोलायला सुरुवात केली. तिला धमकी दिली की,

“जे काय झालं ते जर बाहेर सांगितलं तर आम्ही असं सांगू की तुलाच मासिक धर्म येत नाही…दोष तुझ्यात आहे अशीच तुझी बदनामी करू…बाळाला जन्म द्यायला तू सक्षम नाहीये असंच आम्ही सांगू… तेव्हा जे काय आहे ते गपगुमान सहन करावं लागेल नाही तर बदनामी तुझीच आहे…विचार कर…”

आता मात्र हद्द झाली होती. या सगळ्यात सुशांतचे बाबा, भाऊ एक शब्दही बोलत नव्हते.
जाऊबाई तितक्या सानिकाच्या बाजुंनी होत्या. तिलाही सासूबाई नको ते बोलल्या पण तरी त्यांचा विरोध पत्करून त्यांनी सानिकाची समजूत काढली.   

ही खूप मोठी फसवणूक आहे ज्यात सानिका विनाकारण भरडली जात आहे हे जाऊबाईंना कळाले होते. तिची काहीही चूक नसताना तिलाच फसवून तिचीच उलट बदनामी, तिच्या स्त्रित्वावर संशय, गालबोट लावलेले जाऊबाईंना सहन होत नव्हते पण त्यांच्याही हातात काही नव्हते.
त्यांनी तिला माहेरी निघून जाण्याचा सल्ला दिला. शिवाय सासरच्यांनी कितीही बदनामी करू दे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे तेव्हा खरं खोटं काय ते लपून राहणार नाही.. योग्य काय ती तपासणी केली की सत्य जगासमोर येणारच पण तू उगाच अशा वातावरणात राहून तुझ्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नकोस. सुशांतला यासाठी शिक्षा व्हायलाच हवी, तू आई बाबांकडे निघून जा… इथे तुला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार… आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या सोबत आहे.. काहीही मदत लागली तर मला सांग…पण यांना असं सोडू नकोस…शिक्षा व्हायलाच हवी… असंही सांगितलं.

सानिकाला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला. तिच्या निरागस भावनांचा अपमान झाला शिवाय तिचीच उलट बदनामी करण्याची धमकी तिला दिली गेली. अशाच परिस्थितीत ती जाऊबाईंच्या मदतीने सासरचे घर सोडून माहेरी निघून आली.

माहेरी आल्यावर हा सगळा प्रकार आई बाबांना तिने सांगितला तेव्हा त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

सानिका रडतच म्हणाली, “बाबा, मी आता सुशांत कडे परत कधीच जाणार नाही…त्याने मला पत्नीचा दर्जा तर कधी दिला नाहीच पण उलट त्याच्या आईने माझीच बदनामी करण्याची धमकी दिली, मी‌ कधीच आई बनू शकत नाही , मला मासिक धर्म येत नाही म्हणून…वरवर सभ्य दिसणारा सुशांत खूप विचित्र मुलगा आहे बाबा… खूप मानसिक त्रास दिलाय त्याने मला…माझ्या परीने सगळं सावरण्याचा प्रयत्न मी केला पण सगळ्यांवर पाणी फेरले गेले..”

त्यावर बाबा तिला म्हणाले, ” सानिका, बेटा या सगळ्याची शिक्षा त्यांना मिळणार..तू काळजी करू नकोस.. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… आता ते लोक नाक घासत इथे आले तरीही तुला आम्ही पाठवणार नाहीच उलट त्यांनी केलेल्या या फसवणूकची योग्य ती कारवाई आपण करू..हिंमत ठेव तू..”

या सगळ्यात सानिका मानसिक रित्या खूप दुखावली गेली. पण आई बाबांच्या मदतीने सुशांतला धडा शिकविण्यासाठी ती सज्ज झाली.
सानिका ने घटस्फोटाचा निर्णय घेतला, सोबतच सुशांतच्या घरच्यांनी जे काही आरोप तिच्यावर केले, जी काही फसवणूक केली याची केस कोर्टात सुरू झाली. नशिबाने जाऊबाई या सगळ्यात मुख्य पुरावा म्हणून सानिकाच्या पाठीशी निडरपणे उभ्या होत्या त्यामुळे सानिकाला बरीच मदत झाली. मेडिकल चेक अप करून सत्य काय याची खात्री झाली. सुशांतच्या आईने त्यांची चूक कोर्टात मान्य केली. सानिका आणि सुशांतचा घटस्फोट नक्की झाला पण आयुष्याचा जो काही खेळ झाला याचा गुन्हेगार कोण हा प्रश्न सानिकाला खूप त्रास देत राहीला.

हळूहळू सानिका यातून बाहेर पडत आपल्या भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. पण जो काही मानसिक त्रास तिला झाला यातून बाहेर पडणे खूप अवघड होते.

       एखाद्या व्यक्तीमध्ये दोष असणे ही त्याची चूक नाही पण स्वतः विषयी माहित असताना सुशांत ने सानिकाची फसवणूक केली, तिच्या भावनांचा खेळ केला. अशी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली जी एक दिवस तरी जगासमोर येणारच होती. योग्य वेळी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असता अथवा घरच्यांना स्वतः विषयी सत्य सांगितले असते तर अशाप्रकारे या सगळ्याचा शेवट झाला नसता, सानिका ही या प्रकारात विनाकारण बळी पडली नसती. आपल्या मुलाला पाठीशी घालत, त्याच्या विषयी इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सुद्धा सुशांतच्या आईने सानिकावर जे खोटे आरोप केले, तिची उलट बदनामी करण्याची धमकी दिली हे कितपत योग्य आहे. याची शिक्षा त्यांना मिळालीच पण या सगळ्यात सानिकाच्या कुटुंबांला बराच मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला.

अशा प्रकारच्या बर्‍याच फसवणूकच्या गोष्टी हल्ली कानावर येत आहेत. त्यावर आधारित ही एक कथा.

या प्रकारात नक्की चूक कुणाची आहे? याविषयी तुमचं मत नक्की कळवा.

समाप्त !!!

कथा कशी वाटली हे कळवायला विसरू नका.

मी लिहीलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

लग्न, फसवणूक, बदनामी ( तुटलेल्या संसाराची गोष्ट ) – भाग दुसरा

    सानिकाला सासरी जाऊबाई जरा जवळच्या वाटू लागल्या. त्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत होती. सासूबाई, सासरे तर त्यांच्याच दिनचर्येत व्यस्त असायचे. सनिकाच्या मनात मात्र सुशांत विषयी अनेक प्रश्न निर्माण होत होते. लग्नाला दोन आठवडे होत आले तरी नवरा म्हणून त्याने तिला अजूनही जवळ घेतले नव्हते. सध्या खूप काम आहेत तेव्हा काही दिवस मी तुला शक्य तितका वेळ देऊ शकत नाही पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. जरा कामाचा व्याप कमी झाला की छान कुठे तरी फिरून येऊ म्हणत त्याने सानिकाची समजूत काढली. कामाचं निमीत्त सांगून उशीरा घरी येणे, शक्य तितके सानिकाला टाळणे असे प्रकार सुरू होते.  सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुशांत घरी नसायचा‌. घरी कुणाला काही म्हंटलं की म्हणायचे काम असतील त्याला , जरा काही दिवस गेले की देईल तो तुला वेळ. सानिकाला मात्र हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. तिने याविषयी जाऊबाईला सुद्धा बोलून दाखवलं.

त्यावर त्या म्हणाल्या, “खरं सांगू का सानिका, सुशांत आधीपासूनच घरात फारसा नसतो, त्याचे मित्र आणि तो असंच होतं त्याचं लग्नापूर्वी सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर तरी घरात थांबेल पण आताही असंच दिसतंय. तू एक काम कर, त्याला सांग सुट्टी असली की एक दिवस तरी तुला वेळ द्यावा म्हणून. तुम्ही बोला एकमेकांशी याविषयी स्पष्टपणे.”

ते ऐकताच सानिकाला अजूनच विचित्र वाटले.

जेव्हा जाऊबाईंना कळाले की सानिका आणि सुशांत यांच्यात लग्नानंतर अजून एकदाही जवळीक आली नाही तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. त्यांनी सानिकाला याविषयी पुढाकार घे असंही सांगितलं.
जाऊबाई चे बोलणे ऐकून सानिकाला सुशांत विषयी अनेक शंका मनात आल्या. लग्न म्हंटलं की एकमेकांविषयी आपसुकच ओढ निर्माण होते, एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो, तसंच सानिका चेही झाले पण सुशांत मात्र सानिकापासून लांबच होता. त्याने आपल्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करावा अशा अनेक भावना तिच्या मनात उफाळून येत होत्या.
आता आपणच पुढाकार घेऊन सुशांतच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायला हवे असा निश्चय तिने केला. कदाचित तो खरच कामात गुंतलेला असेल त्यामुळे वेळ देत नसेल अशी स्वतः ची समजुत सुद्धा तिने काढली.

मनात काही तरी प्लॅनिंग करून तिने आज रात्री कितीही उशीर झाला तरीही सुशांत आल्याशिवाय झोपायचे नाही असे ठरवले. खोली छान आवरली, नवी कोरी बेडशीट बेडवर अंथरली. रात्री आठच्या सुमारास सुशांतला फोन केला आणि जेवणाविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, “मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या. मी बाहेरच खाऊन घेईल. ”

सानिका आणि जाऊबाईंनी जेवणाची तयारी केली, सगळ्यांनी एकत्र जेवण केले पण सानिका मात्र सुशांतला मिस करत होती. मोठे दिर जाऊ कसं छान एकत्र जेवतात, सासू सासरे सुद्धा दोन्ही वेळा एकमेकांशिवाय जेवण करत नाहीत पण आपण मात्र अजून एकदाही असं एकत्र बसून ना जेवण केलयं ना जरा गप्पा मारल्या अशा विचाराने तिला एकही घास घशाखाली उतरत नव्हता. कशीबशी ती जरा जेवली आणि स्वयंपाक घरात आवरून आपल्या खोलीत निघून गेली.

जाऊबाईंनी तिला सांगितले होतेच की, आज तू त्याच्या जवळ स्वतः हून जा, प्रेमाने त्याच्याशी बोल, त्याच्यावर तुझं किती प्रेम आहे हे त्याला जाणवू दे म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी तुला जरा तरी वेळ देईल शिवाय त्याचं असं घराबाहेर राहणं जरा कमी होईल. तू प्रयत्न कर तरी काही शंका वाटलीच तर सुशांतच्या दादाला सांगते मी त्याच्याशी बोलायला.

सुशांत रात्री बाराच्या सुमारास घरी आला. सानिका त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघत होती. तो आलेला दिसताच तिने स्वतः ला आरशात बघून कपाळावरची टिकली उगाच नीट केली आणि स्वतःशीच लाजून तिने खोलीचा लाइट बंद केला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर मंद मेणबत्त्या लावल्या. सुशांत खोलीत आला तसंच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले. त्याने एक कटाक्ष सानिकाकडे टाकला, ती लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती मोकळ्या केसात ती अजूनच सुंदर दिसत होती. तिला असं छान सजलेलं बघून सुशांत आनंदी होईल अशी गोड अपेक्षा तिला होती पण तिची अशी सगळी तयारी बघून त्याचा चेहरा उतरला. तो‌ काही एक न बोलता बाथरुम मध्ये निघून गेला.

त्याची अशी प्रतिक्रिया बघून सानिकाचा मूड खराब झालेला पण तरीही जरा शांत राहून ती त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. तो जरा फ्रेश होऊन बाहेर आला तशीच ती त्याला टॉवेल द्यायला जवळ गेली, त्याने तिच्याकडे न बघताच तिच्या जवळचा टॉवेल घेऊन चेहरा पुसला. आज तिला त्याच्या वरच्या प्रेमाची जाणिव त्याला करून द्यायची होती. ती अलगद त्याच्या जवळ गेली आणि त्याला काही कळण्याच्या आत त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली,
“सुशांत, किती उशीर केला यायला. खूप वाट बघत होते मी तुमची..बायको घरी आहे तेव्हा जरा लवकर येत जा ना.. प्लीज… दिवसांतला काही वेळ माझ्या साठी तर काढायला हवाच ना तुम्ही..माझा‌ हक्क आहे तितका…”

असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवायला मान वर केली तसंच त्याने तिला दूर केले आणि म्हणाला, “सानिका, अगं कळतंय मला पण सध्या कामाचा व्याप आहे खूप… नाही होत लवकर यायला…तू वाट नको बघत जाऊ असं…”

तिला त्याच्या अशा वागण्याचा जरा राग आलाच पण त्याला आपण समजून घ्यायलाच हवे असे ती स्वतःला समजून सांगत होती. ती त्याला उत्तर देत म्हणाली, ” सुशांत मलाही तुमची परिस्थिती कळते आहे पण असं किती दिवस दूर राहायचे आपण.. लग्नाआधी सुद्धा आपल्याला नीट बोलायला, समजून घ्यायला वेळ मिळाला नाही..आताही तेच होतेय.. मी खूप मिस करते तुम्हाला दिवसभर…”

सुशांत मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत थकल्याचे कारण सांगून झोपी गेला. सानिका त्या रात्री खूप खूप रडली, तिच्या भावनांचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. आपण इतकं सगळं बोलून दाखवले तरी सुशांतला कांहीच कसं वाटत नसेल आपल्याविषयी हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. रात्रभर कड बदलत ती बेडवर पडून होती.

सकाळी उठून तिने सुशांतला चहा करून दिला. त्याने मुकाट्याने चहा घेतला आणि तो घराबाहेर पडला. सानिकाचा चेहरा पाहून जाऊबाई काय ते समजून गेल्या. सासू सासरे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्यावर दोघीच घरात असताना सानिकाने रात्री घडलेला सगळा प्रसंग रडतच जाऊबाईंना सांगितला. जाऊबाई ते ऐकताच जरा गोंधळलेल्या अवस्थेत सानिकाला म्हणाल्या, “सानिका, तू शांत हो..मी आहे तुझ्या सोबत पण खरं सांगू का, मलाही आता सुशांत वर शंका यायला लागली..मी ह्यांना सांगते त्याच्याशी बोलायला… काय होते ते बघूया.. नाही तर खरं काय ते शोधून काढू आपण..तू काळजी करू नकोस..”

क्रमशः

सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत  सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम  भागात.

पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.

मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.

© अश्विनी कपाळे गोळे 

सासर ते सासरच असतं…

       सीमाला सकाळपासून जरा बरं वाटत नव्हतं, अंगदुखी, तापामुळे गरगरायला होत होतं त्यात आज घरी पाहुणे येणार म्हंटल्यावर झोपून तरी कसं राहावं असा विचार करत तिने चहा बिस्किटे खाऊन औषधे घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

   सासुबाईंच्या माहेरची पाहुणे मंडळी येणार होती त्यामुळे सासुबाई अगदी तोर्‍यात होत्या. काय करावे आणि काय नको असंच झालेलं त्यांना. अमित आणि सीमाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हि मंडळी घरी पाहुणे म्हणून येणार होती तेव्हा जेवणाच्या मेनूची यादी आदल्या दिवशीच तयार होती.
तापाने फणफणत असतानाच सीमाने एकटीने पूर्ण स्वयंपाक बनविला, डायनिंग टेबलवर सगळ्यांची जेवणाची तयारी केली, घर आवरून सगळी स्वागताची जय्यत तयारी केली. ह्या सगळ्यात घरात कुणाचीही तिला जराही मदत झाली नव्हती.
आता पाहुणे येत पर्यंत जरा बेडवर जाऊन पडणार तितक्यात सासूबाई म्हणाल्या, “अगं सीमा,  छान साडी नेसून तयार हो. लग्नानंतर पहिल्यांदाच बघतील तुला सगळे. घर छान आवरलं, छान स्वयंपाक केला पण आता तू सुद्धा मस्त तयार व्हायला हवं ना. माझ्या माहेरी कसं तुझ कौतुकच होईल गं म्हणून सांगते..”

आता इच्छा नसतानाही ती साडी नेसून तयार होतच होती तितक्यात पाहुणे मंडळी आली. मग पटकन तयार होऊन बाहेर येताच पाया पडण्याचा कार्यक्रम झाला, नंतर सगळ्यांना चहा पाणी दिले. आता मात्र सीमाला गरगरायला होत होते पण सगळ्यांसमोर कुणाला सांगावं , काय करावं म्हणून परत ती कामाला लागली. जेवताना सगळ्यांनी सासुबाई ची वाहवा करत म्हंटले, “तुझ्या सुनेच्या हाताला छान चव आहे बरं का…मस्त झालाय सगळा स्वयंपाक..”
ते ऐकताच सासूबाई हवेत पण इकडे सीमाला बरं वाटत नाही याकडे कुणाचही लक्ष नव्हतं. पाहुणचार आटोपून पाहुणे मंडळी परत गेल्यावर सीमा तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती औषधी घेऊन जरा पडली तशीच तिला झोप लागली. जाग आल्यावर बाहेर आली तर सासुबाईंची कुरकुर सुरू होती, “स्वयंपाक केला म्हणजे झालं का… बाकी सगळा पसारा आवरणार कोण..पाहुणे घराबाहेर पडत नाही तर गेली खोलीत.. इकडे पसारा आवरायला मी आहेच…”

सीमाला ताप आहे हे अमितला माहीत असूनही तो मात्र सगळं गुमान ऐकून घेत होता पण तिला ताप आहे, बरं नाही म्हणून ती झोपली असं म्हणण्याची हिंमत सुद्धा नसावी का मुलामध्ये याचं सीमाला खूप आश्चर्य वाटले. सगळा प्रकार बघून मनोमन ती दुखावली.

सायंकाळ होत आली होती. कुणाशीही काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली, चहा बनवून सगळ्यांना दिला‌ आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. सीमाला सतत सासुबाईंचे शब्द आठवून वाईट वाटत होते. ती मनात विचार करू लागली, “तब्येत बरी नसताना चेहऱ्यावर जराही कंटाळा न दाखवता सगळं केलं पण तरीही कौतुक सोडून किरकिर ऐकावी लागली. आईकडे असते तर जागेवरून उठू दिलं नसतं आई बाबांनी. खरंच सासर ते सासरच त्यात नवराही तसाच…त्यालाही काहीच वाटलं नसेल का..”

या क्षणी सीमाला आई बाबांची खूप आठवण आली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने स्वयंपाक केला. रात्री अमित सोबत एक शब्दही न बोलता ती झोपी गेली. तिला बरं नाही म्हणून झोपली असेल म्हणत त्यानेही साधी चौकशी केली नाही. 

सीमा आणि अमित यांचं अरेंज मॅरेज. नुकतेच चार महिने झालेले लग्नाला, सीमाने सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात स्वतःला घरात अगदी झोकून दिले पण यादरम्यान अमित आणि सीमा यांचं नातं मात्र बहरायचं राहूनच गेलं.
अमित आई बाबांना एकुलता एक, सगळ्या बाबतीत उत्तम. सीमा सुद्धा त्याला साजेशी गुणी मुलगी, स्वभावाने शांत, प्रेमळ. नविन नवरीच्या हातची मेजवानी खाण्यासाठी सतत पाहुण्यांची ये-जा सुरू होतीच. जो येईल त्याच स्वागत करत, सगळ्यांकडून कौतुक ऐकत चार महिने गेले. सगळ्या दगदगीमुळे सीमा आजारी पडली. पण तशातच परत आता पाहुणे म्हंटल्यावर तिला पदर खोचून कामाला लागावे लागले होते.

दुसऱ्या दिवशीही तेच, सकाळी उठताच सीमा नेहमीप्रमाणे कामाला लागली. अंगात जरा कणकण होतीच पण औषधे घेऊन काम करणे सुरूच होते.
अमित आवरून ऑफिसमध्ये गेला आणि तब्येत बरी वाटत नाही म्हणून दुपारीच परत आला.
तो असा अचानक घरी आला म्हंटल्यावर सासुबाईंनी अख्खं घर डोक्यावर घेत त्याची विचारपूस सुरू केली. त्याचा घसा दुखतोय म्हणून अमितला आल्याचा चहा, हळदीचा काढा शिवाय डॉक्टरांकडे जाऊन ये म्हणत सतत तगादा सुद्धा लावला. अमितला घसा दुखी, ताप आल्यामुळे तो झोपलेला होता. सीमा त्याला हवं नको ते हातात देत त्याची शक्य तशी काळजी घेत होती. पण एकंदरीत परिस्थिती पाहता सीमाला प्रश्न पडला , “काल आपण आजारी पडलो तर घरात साधी चौकशीही कुणी केली नाही. अमितने तितकी औषधे आणून दिली पण आज अमित आजारी म्हंटल्यावर सगळे किती काळजीने, आपुलकीने त्याला जपत आहेत. खरंच मुलगा आणि सुनेमध्ये इतका भेदभाव…”

आज मात्र सीमाला कळून चुकले की आपण कितीही धावपळ करत राबलो, काहीही केलं तरी कुरकुर ऐकावी लागणारच‌. शेवटी सासर आहे हे.. कौतुकाचे वारे शेवटी क्षणभरच असणार तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. माहेरी जसं शिंक आली तरी आई बाबा काळजी घ्यायचे तसं इथे नाही , जितकी काळजी मुलाची तितकी सुनेची नसणारच कारण सासर शेवटी सासरच असतं..

सीमाने त्याच क्षणी मनोमन ठरवलं, आता
कुणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता, उत्तम सुनबाई बनण्याचा नादात स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि आनंदाने जगायचे.

दुसऱ्या दिवशीच सासुबाईंना सीमाच्या वागण्यातला बदल जाणवला. पटापट सगळं आवरून ती स्वतः साठी वेळ देऊ लागली. आता पर्यंत कामाच्या नादात अमितला हवा तसा वेळ देता येत नसल्याने त्यालाही दोघांच्या नात्यात खास काही नाविन्य वाटत नव्हते.
आता मात्र अमित येण्याच्या वेळी सगळं आवरून फ्रेश होत मस्त तयार होऊन सीमा त्याचं हसत स्वागत करायची. त्याला शक्य तितका वेळ द्यायची. बायको मधला हा गोड बदल अमितला ही आवडला. घरी येताच पूर्वी प्रमाणे कामात गुंतलेली सीमा आता दिसत नसून त्याच्या साठी तयार होऊन त्याची वाट पाहणारी सीमा त्याला जास्त आवडू लागली. दोघांच्या नात्यात यामुळे बराच फरक पडला. अमित सुद्धा सीमाची जास्त काळजी घेऊ लागला.

सासुबाईंची कुरकुर सुरू असायचीच पण कर्तव्यात चुकत नसताना विनाकारण ऐकून घ्यायचे नाही असं सीमाने ठरवलं. जे पटलं नाही ते तिथेच बोलून मोकळं असं तिचं सुरू झालं. बोलणारे बोलणारच पण आपण आपलं कर्तव्य नीट सांभाळून स्वतः साठी जगायचा सीमाचा निश्चय तिला आनंदी राहायला खूप उपयोगी ठरला. ?

तर मग काय मैत्रिणींनो, तुम्हीही अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःसाठी जगायचं विसरलात तर नाही ना….असं असेल तर वेळीच सावरा स्वतःला…. आयुष्य एकदाच मिळते तेव्हा ते कुणाच्या दबावाखाली न जगता आनंदात जगायला हवं. त्यासाठी कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः खंबीर होत जगणं खुप महत्वाचे आहे. ?

पटतंय ना….

मग माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा ?

लेखनाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करा.

© अश्विनी कपाळे गोळे

आईची दुहेरी भूमिका…

रघू बांधकामांच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. त्याची पत्नी सविता सुद्धा दुसऱ्यांच्या घरचे धुणीभांडी करून संसाराला आर्थिक हातभार लावायची. सविताचे लग्न खूप कमी वयात झालेले, लग्नाच्या एक वर्षातच त्यांच्या संसारात गोंडस बाळाचे आगमन झाले, त्याचे नाव त्यांनी किशन ठेवले. या दरम्यान सविताचे काम करणे बंद झाले होते. रघूच्या मजुरीत संसार चालवताना पैशाची चणचण भासू लागली. आता किशन ला घरी सोडून कामावर कसं जायचं म्हणून तो एका वर्षाचा झाला तसाच सविता ने रघू जायचा त्या बांधकामांच्या ठिकाणी काही काम मिळते का याची चौकशी केली आणि योगायोगाने तिलाही काम मिळाले. कामाच्या ठिकाणी साडीची झोळी बांधून किशन ला झोपवून ती रघूला कामात मदत करायची. त्याची तहान भूक झोप सांभाळत काम करताना ती दमून जायची. रघूला तिची अवस्था कळायची, तू काम नाही केलं तरी चालेल असं तो म्हणायचा पण तितकाच संसाराला , पोराच्या भविष्याला हातभार म्हणून ती राब राब राबायची. 
जिकडे काम मिळेल तिकडे भटकायचं , बांधकाम संपले की स्थलांतर करत दुसरे काम शोधायचे असा त्यांचा संसार, एका ठिकाणी स्थिर होणे जवळजवळ अशक्यच. अशातच सविता दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तिच्याकडून कष्टाचे काम अशा परिस्थितीत होत नव्हते. किशन एव्हाना तीन वर्षांचा झाला होता. अशा परिस्थितीत अवघड काम नको म्हणून ती घरीच असायची.
भराभर नऊ महिने निघून गेले आणि सविताला मुलगी झाली. कन्यारत्न घरात आल्याने किशन, रघू सगळेच खूप आनंदात होते. अख्ख्या मजुरांना रघू आणि किशन ने साखर वाटलेली. सविता ची आई मदतीला तिच्या जवळ आलेली होती.
लेक वर्षाची होत नाही तितक्यात त्यांच्या सुखी संसारात संकट उभे राहिले. काम करताना रघू पाय घसरून सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि क्षणातच सगळं संपलं. तिथलाच एकजण धावत सविताच्या घरी आला आणि रडक्या सुरात म्हणाला, “भाभी, अस्पताल चलो..रघू उपर से गिर गया..उसको अस्पताल लेके गये है..”
ते ऐकताच सविताचा धक्का बसला, रडू आवरत , देवाचा धावा करत काळजाची धडधड वाढत अताना कडेवर मुलगी दुर्गा आणि एका हातात किशनचा हात पकडून ती त्या मजुराच्या मागोमाग दवाखान्यात पोहोचली. तिची नजर सैरावैरा रघूला शोधत होती, कामावरच्या बर्‍याच सहकार्‍यांची गर्दी तिथे झाली होती. इतक्या उंचावरून पडल्याने रघू जागेवरच मृत झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सविताचा टाहो फुटला. इवली इवली दोन मुलं पदरात टाकून रघू आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला करवत नव्हती. कुणी म्हणे त्याला उन्हाची चक्कर आली तर कुणी म्हणे तोल गेला. पोलिसांनी तर आत्महत्या असू शकते म्हणत चौकशीही केली पण काही झालं तरी रघू‌ तर परत येणार नव्हता. सविताला ही परिस्थिती सांभाळणे खूप कठीण झाले होते. किशन तिचे डोळे पुसत म्हणाला, “आई, बाबा कुठं गेले..आता परत नाही येणार का..” त्याला कवटाळून ती ढसाढसा रडली पण आता पदर खोचून कामाला सुरुवात केली पाहिजे, या इवल्या जीवांसाठी म्हणत तिने स्वतःला सावरलं. परत काही धुणीभांडी, इतर घरकाम करत संसार चालवायला सुरुवात केली. रघूच्या आठवणीने रोज रडायची पण सकाळी लेकरांचे चेहरे पाहून कामाला लागायची. सासर माहेरचे येत जात असायचे, गावी चल म्हणायचे पण कुणावर भार नको, माझं मी बघते म्हणत ती सगळ्यांना दुरूनच रामराम करायची. किशनला तिने शाळेत घातलं, गरजेनुसार शिकवणी लावून दिली. त्याच्या पाठोपाठ दुर्गा सुद्धा शाळेत जाऊ लागली. सविता शक्य ते काम करून सगळा घरखर्च चालवायची. असेच वर्ष जात होते. आता वयानुसार सविताचे शरीर थकले होते पण मुलं स्वतः च्या पायवर उभे होत पर्यंत कष्ट करणे तिच्या नशिबी आले होते. दुर्गा वयात आली तशीच सविताची धडधड अजून वाढत होती. बाप नसताना‌ आईच्या लाडाने पोरं बिघडली असं कुणी म्हणू नये म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच ती काळजी घेत होती. काय चूक काय बरोबर ते‌ वेळोवेळी दोन्ही मुलांना समजून सांगत होती. आजुबाजूला राहणारे, उनाडक्या करणार्‍या पोरांच्या नादी आपला किशन लागू नये म्हणून कामात व्यस्त असली तरी वेळेनुसार ती कडक ही व्हायची. दोन्ही मुलांना आई विषयी एक आदरयुक्त भिती होती शिवाय परिस्थितीची जाणीव सुद्धा होती.
दुर्गा आता घरकामात मदत करून अभ्यास सांभाळायची त्यामुळे सविताला जरा मदत व्हायची. किशन सुद्धा बाहेरचे काम, व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायचा. आपली मुलं वाईट वळणाला न लागता सगळ्या व्यवहारात तरबेज असावे‌ , स्वतः च्या पायावर उभे असावे असं सविताचं स्वप्न होतं आणि प्रयत्नही. किशन फर्स्ट क्लास मध्ये दहावी उत्तीर्ण झाला, सविताला त्या दिवशी रघूची खूप आठवण झाली. आता तंत्रनिकेतन महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेऊन त्याने इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे त्या बळावर त्याला बरेच कामे मिळायला सुरुवात झाली. आई आता तू काम सोडून दे, आराम कर असं म्हणत किशनने त्याची पहिली कमाई आईजवळ दिली, त्या क्षणी तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुर्गा सुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमाला होती सोबतच सरकारी नोकरीसाठी परिक्षा देत त्याचीही तयारी ती करीत होती.
हलाखीच्या परिस्थितीत एकटीने दुहेरी भूमिका सांभाळत मुलांना चांगले वळण लावताना तिला पदोपदी रघूची आठवण यायची. कधी अगदीच मृदू तर कधी अगदीच कठोर मन करून कडक राहून संगोपन करताना तिची फार तारांबळ उडायची. आजुबाजूच्या लोकांचे टोमणे, वाईट नजरा यावर मात करीत पाण्यापावसात कष्टाचे काम करून तिने मुलांना‌ घडवलं होतं. सोबतच मुलीच्या लग्नाची , भविष्याची तरतूद म्हणून जरा बचतही केली होती. या सगळ्यातून जाणे खरंच किती अवघड आहे हे तिलाच माहीत होते.
दररोज रघूचा फोटो बघून ती अश्रू गाळायची, अजूनही त्याच्या आठवणी ताज्या होत्या. कुठलीही चांगली गोष्ट घडली की ती त्याच्या फोटो जवळ जाऊन आनंदाने त्याला सांगायची. आज दोन्ही मुलांची प्रगती बघून ती एकटक रघूच्या फोटोला बघत मनात खुप काही बोलली त्याच्याशी. 

खरंच जेव्हा आईला सविता प्रमाणे दुहेरी भूमिका पार पाडावी लागते तेव्हा तिची अवस्था फक्त तिलाच कळत असते. लोकांचे बरे वाईट अनुभव, टोमणे सांभाळत मुलांना घडवणे सोपे नाही. त्यात आजूबाजूला सुशिक्षित वातावरण नसताना मुलगा वाईट वळणावर जाऊ नये शिवाय वयात आलेल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करुन घडवणे, स्वबळावर लढण्यासाठी सज्ज करणे किती महत्त्वाचे आहे, हे सगळं करताना कधी आई तर कधी बाबा बनून राहणे गरजेचे आहे. वास्तविक आयुष्यात अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी दिसते, अशा परिस्थितीत एकटीने मुलांना घडवणे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग २ (अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की रियाला अनिकेत भेटायला बोलावतो. ती जाते तेव्हा तिला कळते , डिव्होर्स नोटीस अनिकेत ने पाठवली नाही. ते ऐकताच ती अचंबित होते. आता पुढे.

रिया आणि अनिकेत यांचं अरेंज मॅरेज. एका मॅरेज ब्युरो मधून रिया आणि अनिकेत यांच्या कुटुंबीयांची ओळख होते.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
टपोरे डोळे, निरागस चेहरा, नाजुक अंगकाठी, खांद्यापर्यंत केसांचा शोभेसा हेअरकट असलेली रिया अनिकेतला बघता क्षणीच आवडते.
अनिकेतही तिच्या तोलामोलाचा, आकर्षक अशी पिळदार शरीरयष्टी, दिसायला राजबिंडा. अनिकेत आई बाबांना एकुलता एक, त्यामुळे अतिशय लाडका. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला. स्वभावाने प्रेमळ पण आई म्हणेल ती पूर्व दिशा अशा काहीशा विचारांचा.
दोघांचे लग्न ठरले, दोन्ही कुटुंबे अगदी धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीला लागले होते. काही महिन्यांनी लग्न झाले.
दोघांचे लग्न ठरल्यापासून रियाला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं त्याला.
लग्न ठरल्या पासून  लग्न होत पर्यंत तो दररोज रियाला न चुकता भेटायचा. रियाचे ऑफिस जवळच असल्याने रोज सायंकाळी तिला भेटणे सोपे होते. रियालाही त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं, त्याच रोज भेटणं , एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद अशा छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेणं तिला खूप सुखद वाटायचं. तिचा शांत , प्रेमळ स्वभाव , निरागस असं सौंदर्य याचे कौतुक करताना तो कधीच थकत नव्हता.  दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडले होते, लग्न झाल्यावर ती घरी आली तेव्हा त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
तिला नववधू च्या रूपात बघून त्याची परत एकदा विकेट उडाली होती. घरत बरीच पाहुणे मंडळी असताना लपून छपून तिच्याशी बोलायला यायचा, तिची झलक बघायला सतत बहाणा शोधायचा. सगळे चिडवत म्हणायचे सुद्धा,  याला काही चैन पडत नाही बाबा बायको चा चेहरा बघितल्या शिवाय. पूजा विधी सगळं आटोपलं, पाहुणे मंडळी परत गेली. राजा राणीच्या संसाराला प्रेमाने सुरवात झाली. दोघांची पहिली मिलनाची रात्र तिला अजुनही आठवते,  किती उत्साहाने त्याने सगळी तयारी केली होती त्याने , ते खास क्षण अविस्मरणीय बनविण्याची. आयुष्यात कधी साथ सोडणार नाही म्हणत हातात हात घेतला तेव्हा किती सुरक्षित वाटलं होतं..किती गोड्या गुलाबी ने दोघांचा संसार सुरु झाला होता. एकत्र ऑफिसला निघायचं, मौज मजा मस्ती, भरभरून प्रेम, किती गोड दिवस होते ते. झालं ते नव्या नवलाईचे नवं दिवस भुर्रकन उडून गेले, जणू कुणाची दृष्ट लागली दोघांच्या प्रेमाला. अनिकेत चे आई बाबा दुसऱ्या गावी राहत असले तरी अनिकेत ची आई सतत त्याला फोन करायची, घरी आलास का, इतका वेळ बाहेर कशाला फिरायचे, बायको डोक्यावर बसेल, जरा धाकात ठेव असेही सल्ले द्यायचे. त्याचे बाबा मात्र या सगळ्याच्या विरोधात, ते उलट सांगायचे नविन आयुष्याची सुरवात  आहे, खूप एन्जॉय करा पण बाबांनी आईला क्रॉस केले की अनिकेत ची आई मोठा ड्रामा करायची.

जेव्हा रियाला हे सगळं कळालं तेव्हा सासूबाईंच्या विचारांची तिला कीव आली. मुलगा सुनेचा संसार आनंदाने चाललेला जणू त्यांना बघवत नव्हते की आपला मुलगा आपल्या पासून दूर जातोय अशी असुरक्षितता, एक प्रकारची भिती त्यांना वाटत होती, कोण जाणे.

एकत्र राहत नसले तरी सतत फोन करून अनिकेत ला आई सगळे अपडेट विचारायची. अनिकेत सुद्धा त्यांना एकुण एक लहानसहान गोष्टी सांगायचा. सुरवातीला दुर्लक्ष केले पण हळूहळू सगळं विचित्र वाटत होतं रियाला. ती याबाबत अनिकेतला काही बोलली की त्याला वाटायचं रियाला माझे आई बाबा नकोय, दूर राहतात तरी इतक्या तक्रारी करते ही.. झालं अशा गोष्टींवरून वाद सुरू झाले. लग्नाला एक वर्षही झाले नव्हते,  अशाच गोष्टी वरून एकदा दोघांचा वाद झाला आणि रिया रागारागाने आई कडे निघून गेली. रियाचे आई बाबा त्याच शहरात राहायचे तेव्हा राग शांत झाला की अनिकेत नक्कीच घ्यायला येणार याची तिला खात्री होती पण झालं वेगळंच. अनिकेतने रिया अशी निघून गेल्याचा राग मनात धरून ठेवला, मी का माघार घ्यावी म्हणत त्यानेही पुढाकार घेतला नाही. अनिकेत चे आई बाबा त्यादरम्यान त्याच्याजवळ रहायला आले.
इकडे रिया त्याची वाट बघत एक एक दिवस मोजत होती आणि तिकडे आईच्या सल्ल्याने, धाकाने अनिकेत काही रियाला घरी आणण्याचा पुढाकार घेत नव्हता. अनिकेत चे बाबा त्याला खूप समजवायचा प्रयत्न करायचे, आईचं ऐकून दोघांमध्ये फूट पडू नये म्हणून प्रयत्न करायचे पण आईपुढे काही अनिकेत ठाम भूमिका घेत नव्हता.
रिया ची आई तिला समजून सांगायची पण तो घ्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही या रियाच्या निर्णयामुळे आई बाबांचे काही एक चालत नव्हते शिवाय अनिकेत आणि त्याच्या घरच्यांची विचित्र विचारसरणीची कल्पना तिने घरी दिल्यावर रियाच्या बाबांनाही अनिकेत चे वागणे पटले नव्हते. अशातच एक दिवस अचानक अनिकेत कडून डिव्होर्स नोटीस आली आणि रिया हादरली.

नवरा बायको यांच्यात भांडण, मतभेद हे होतातच पण असं अचानक डिव्होर्स नोटीस बघताच रियाला काही कळत नव्हतं, अनिकेत विषयी आधी जरा राग मनात होताच पण आता त्याच्या अशा वागण्याने तिला अजूनच संताप आला. त्याला , त्याच्या घरच्यांना मी नको असेल तर मलाही जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात परत जायचं ना नाही असा विचार करून ती आई बाबांकडे राहू लागली. 
अशातच सहा महिने गेले आणि आज अचानक अनिकेत रियाला भेटला.

अनिकेत रियाला सांगू लागला, “रिया अगं तू अशी रागात निघून गेली तेव्हा माझी खूप चिडचिड झाली, राग मलाही आलेलाच. तुला माझ्या घरच्यांशी प्रोब्लेम आहे असं मला वाटलं, माझं खरंच चुकलं रिया. तू निघून गेल्यावर आई बाबा आले, त्यांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा बाबांनी मला तुला परत आणण्यासाठी खूप समजावले पण आईला ते मान्य नव्हते. आईला वाटत होतं मी तुझ्यामध्ये खूप गुंतल्या मुळे तिला मी विसरतो की काय..आईचा खूप लाडका ना मी म्हणून कदाचित तिच्यापासून दूर जाण्याची भिती तिला वाटली असावी. तुझ्याविषयी का माहित नाही पण एक राग, चिड तिने मनात धरून ठेवली. मी खूप गोंधळलो, आई बाबा आणि बायको प्रत्येकाची आयुष्यात एक वेगळी जागा असते हे मला खूप उशीरा कळलं. मला निर्णय घेता येत नव्हता, तुझ्या शिवाय एकटा पडलो होतो मी, मनात सतत कुढत होतो पण मनातलं सगळं बोलून दाखवता येत नव्हतं मला, तुझी खूप आठवण यायची पण तुला कसं सामोरं जावं कळत नव्हतं शिवाय आई परत ड्रामा करेल , चिडेल म्हणून वेगळाच धाक. अशातच मला कंपनीतर्फे विदेशात जाण्याची संधी चालून आली. आई म्हणाली वेळ गेली, राग शांत झाला की तू स्वतः परत येशील, तिला राहू दे काही दिवस माहेरी, तू ही संधी सोडू नकोस. झालं, परत मी भरकटलो, मला खूप मनापासून वाटत होतं तुला ही बातमी सांगावी पण त्या दरम्यान तुझ्या आई बाबांनी मला तुला भेटू दिले नाही, त्यांना माझा राग आलेला. तूसुद्धा फोन उचलले नाही. मी सहा महिन्यांसाठी लंडनला गेलो. कामाच्या, नविन प्रोजेक्टच्या व्यापात गुंतलो. तुझी आठवण सतत यायची, तुला मेसेज केले पण तू मला उत्तर देत नव्हती. आपल्यात काही कम्युनिकेशन राहीले नव्हते आणि म्हणूनच गैरसमज निर्माण झाले.
इकडे आईने बाबांना असं सांगितलं की रियाला अनिकेत सोबत राहायची इच्छा नाही. आपल्या घरच्यांमध्येही गैरसमज झालेले त्यामुळे आईने त्या संधीचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीने तुला डिव्होर्स नोटीस पाठवली आणि परिस्थिती अजूनच बिघडली. मी परत आलो तेव्हा बाबांकडून मला सगळं कळालं, पण तू माझ्यासोबत राहायला तयार नाही यावर माझा विश्वास नव्हता. तुला डिव्होर्स नोटीस पाठवली हे ऐकून मला मोठा धक्का बसला, खूप रडलो मी बाबांजवळ, पण त्याक्षणी माझे डोळे उघडले. आईच्या संकुचित स्वभावामुळे आपल्या सगळ्यांमध्ये गैरसमज झाले, आपल्या दोघांमध्ये फूट पडली. मला कळून चुकलं की माझी ठाम भूमिका नसल्याने आपल्या नात्यात विष पसरलं. आई, बाबा आणि बायको प्रत्येकाला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात घेऊन मी नातं जपलं असतं तर अशी वेळ आली नसती. पण रिया अजूनही वेळ गेलेली नाही, मला तू हवी आहेस. मला एक संधी दे..परत असं नाही होणार..मी तुझाच आहे आणि तुझी साथ मी नाही सोडणार..मला माफ कर रिया.. प्लीज मला माफ कर.. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..गेले सहा महिने जो दुरावा निर्माण झाला त्यामुळे मला खरंच माझ्या प्रेमाची जाणीव नव्याने झाली आहे मला..”

हे सगळं ऐकून रियाला काय बोलावं कळत नव्हतं, तिचं खरंखुरं प्रेम होतं त्याच्यावर. दोघेही वेगळे राहून मनोमन कुढत, रडत होते पण मीपणा, गैरसमज यामुळे पुढाकार कुणी घेत नव्हते.
रिया काही न बोलता फक्त अश्रू गाळत होती.
अनिकेत तिला म्हणाला , ” रिया मी तुझ्या आई बाबांशी बोलून माफी मागतो, तुला मानाने आपल्या घरी परत घ्यायला येतो..आई ला बाबांनी समजावले आहे, तिचा स्वभाव बदलला नाही तरी मी यापुढे कधीच साथ सोडणार नाही. बाबा आणि मी तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सुट्टी आहे, मी घ्यायला येतो तुला, आपल्या हक्काच्या घरी घेऊन जायला. मला खरंच एकदा माफ कर.. खूप प्रेम आहे रिया माझं तुझ्यावर..”

रियाने अश्रू पुसत मानेनेच त्याला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते. अनिकेत ने रियाचा हात हातात घेतला त्या क्षणी तिला त्यांच्या लग्नानंतर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. तोच स्पर्श, तिच भावना आता नव्याने जागी झाल्याची तिला जाणीव झाली.रियाच्या आई बाबांना या गोष्टीचा आनंदच होईल हे तिला माहीत होते.
तिलाही हेच हवं होतं. त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिने त्याला माफ केलं. दोघांचे नाते आज परत एकदा नव्याने बहरले.
किती तरी वेळ ते हातात हात घेऊन शब्दाविना बरेच काही बोलले.

दूर राहून त्यांच्यातील नातं आज अजूनच घट्ट झालं आणि प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.

खरंच बर्‍याच जणांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नवरा बायको यांच्यातील नात्यात गैरसमज, मतभेद यामुळे फूट पडते. अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घेतले, ठाम भूमिका घेऊन विश्वास जपला तर नातं तुटण्या ऐवजी जोडल्या जाईल. अनिकेत ला उशीरा का होईना पण त्याच्या चुकीची जाणीव झाली, आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान आहे हे लक्षात आलं म्हणून दोघांचे नाते नव्याने बहरले.

समाप्त.

हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी संबंध आढळल्यास केवळ योगायोग समजावा ?

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

ये दुरिया…नजदीकियां बन गई… ( प्रेमकथा )- भाग १

“रिया, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, एक संधी दे ना मला..एकदा भेट मला.. प्लीज रिया…मी आज सायंकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट पाहिन.”

अनिकेत च्या अशा मेसेज मुळे रिया खूप अस्वस्थ होती, नको असताना त्याच्या विचारातून, भूतकाळातून ती बाहेर पडू शकत नव्हती.
मनातच विचार करत स्वतःशीच बोलत ती म्हणाली, “आता काय फायदा भेटून बोलून.. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीस… माझ्यावर विश्वास ठेवून कधी माझी बाजू समजून घेतली नाहीस…किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर, वाटलं होतं अनिकेत कधीच माझी साथ सोडणार नाही पण ह्याने इतका मोठा धक्का दिला मला.. नाही मी नाही भेटणार परत अनिकेत ला…आता आमचे मार्ग वेगळे आहेत..”

अशा भूतकाळातल्या विचारचक्रात गुंतली असताना मैत्रिणीच्याआवाजाने रिया भानावर आली.
“अगं रिया, लक्ष कुठे आहे तुझं..कधी पासून आवाज देत आहे तुला मी…लंच ला जायचं ना..मला जाम भूक लागली आहे गंं..” ( रियाची मैत्रिण पूजा तिला म्हणाली )

रिया आणि पूजा गेली पाच वर्षे एकाच ऑफिसमध्ये नोकरीला. दोघींची चांगली मैत्री जमलेली, एकमेकींच्या सुखदुःखात , अडीअडचणीला एकमेकींच्या सोबतीला असायच्या त्या.
अनिकेत दूर गेल्यानंतर रियाला सावरायला पूजाने बरीच मदत केलेली. पूजा अतिशय बिनधास्त पण समजुतदार मुलगी, ज्याचं चुकलं त्याला स्पष्टपणे बोलून मोकळं व्हायचं आणि हसतखेळत जगायचं असा तिचा जगण्याचा फंडा. 
रिया मात्र भाऊक, शांत स्वभाव, जरा अबोल. पण पूजा जवळ मनातलं सगळं सुखदुःख सांगायची ती, अगदी विश्वासाने आणि पूजाही तितक्याच आपुलकीने तिचा विश्वास जपायची.
दोघीही लंच ला निघाल्या, आज परत रियाला असं गप्प गप्प बघून पूजा म्हणाली, “काय मॅडम, आज परत मूड खराब दिसतोय…काय झालंय..सांग पटकन..”
रिया पडलेल्या चेहऱ्याने चिडक्या सुरात तिला सांगू लागली, “काही नाही गं, आज अनिकेतचा मेसेज आला.. त्याला मला भेटायचं आहे… आता मी जरा सावरायला लागले तर ह्याचा मेसेज आला एकदा भेट म्हणून.. खूप राग आहे गंं मनात पण तरी वाटतयं भेटावे का एकदा..पण असंही वाटतं का भेटायचं मी…गेली सहा महिने वेगळे राहीलो आम्ही तेव्हा नाही आठवण झाली माझी.. डिव्होर्स नोटीस पाठवताना काही नाही वाटलं..आता अचानक काय भेटायचं ….का म्हणून भेटू मी..”
पूजा तिला समजावून सांगत म्हणाली, ” रिया तू शांत हो बघू.. अगं तुला नाही भेटायचं ना मग नको विचार करुस..हे सगळं जरा अवघड आहे पण तुला आता निर्णय घेतला पाहिजे.. यातून बाहेर पडायला पाहिजे..”
रिया रडकुंडीला येत म्हणाली, “मी अजूनही खूप मिस करते गं अनिकेत ला..त्याच्या शिवाय अख्खं आयुष्य जगण्याची कल्पनाही करवत नाही मला.. वाटतं जावं त्याच्या जवळ, त्याला भेटून, भांडून  अनिकेतला परत मिळवावं पण त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली त्या क्षणापासून खूप राग येतोय त्याचा… खूप गोंधळ उडाला गं माझ्या मनात..काय करावं खरंच सुचत नाही मला आता..”

पूजा तिची अवस्था समजून होती, तिला धीर देत ती म्हणाली, ” रिया, तू एकदा भेटुन सगळं क्लिअर का करत नाही..मला अजूनही कळत नाहीये की अनिकेत इतका कसा बदलला..नक्की काय झालं की त्याने डिव्होर्स नोटीस पाठवली…मला खरंच वाटत अगं तू एकदा त्याला भेटायला पाहिजे.. सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे..”

रियाला सुद्धा मनातून वाटत होतं एकदा अनिकेत ला भेटावे, त्याला जाब विचारावा. आता पूजा ने म्हंटल्यावर खरंच एकदा त्याला भेटायच ठरवलं.

ठरलेल्या वेळी रिया त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच तिच्या ऑफिस जवळच्या बागेत पोहोचली. दुरूनच एका बाकावर अनिकेत पाठमोरा बसलेला तिला दिसला. त्याला बघता क्षणीच धावत जाऊन मिठी मारावी असं तिला वाटलं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याच्या दिशेने जायला निघाली. जसजशी ती त्याच्या दिशेने जात होती तसतशी तिची धडधड वाढत होती.
जसे दोघे एकमेकांसमोर आले तसाच अनिकेत उठून उभा झाला, रियाचा निरागस चेहरा बघताच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली, नजरानजर होताच तिच्या अश्रूंनी वाट मोकळी केली. किती तरी वेळ फक्त नजरेने बोलत होते ते, त्यालाही भावना आवरता येत नव्हत्या. इशारा करतच त्याने तीला बाजुला बसायला सांगितलं. ती त्याची नजर चुकवत इकडे तिकडे बघत होती. अनिकेत तिला शांत करत म्हणाला, “रिया प्लीज अशी रडू नकोस..आधी तू शांत हो.. मला माहिती आहे माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली आहे पण मला माझी चूक कळून चुकली गं..नाही राहू शकत मी तुझ्याविणा..एक संधी दे मला..आपल्या दोघांमध्ये खूप गैरसमज झाले आहेत..मला तेच दूर करायचे आहेत.. म्हणूनच तुला बोलावलं मी भेटायला..मला खात्री होती तू नक्कीच येणार…”
रिया अश्रू आवरत म्हणाली, “गैरसमज.. आपल्यात.. खूप लवकर कळालं रे तुला..सहा महिने आठवण नाही झाली माझी.. आणि संधी कशाची मागतोय..तुला तर डिव्होर्स पाहिजे ना… नोटीस पाठवलीस ना मला..मग आता काय बोलायचं बाकी राहीलं अनिकेत..तू माझा अनिकेत नाहीस..ज्याच्यावर मी प्रेम केलेलं तो अनिकेत तू नाहीस..तो माझ्याशी असा कधीच वागला नसता.. तुझ्या अशा वागण्याने माझी काय अवस्था झाली असेल कधी विचार केला तू…”
अनिकेत अपराधी भावनेने उत्तरला, ” रिया अगं ती डिव्होर्स नोटीस मी पाठवली नाही..तुला खरंच असं वाटतं का गं मी इतका वाईट वागेल तुझ्याशी.. मान्य आहे तुला मी दुखावलं, माहेरी जायला सांगितलं पण डिव्होर्स नोटीस खरंच मी नाही पाठवली..मी सगळं सांगतो तुला..मला तू हवी आहेस…मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय…”
अनिकेत चे बोलणे ऐकून रिया आश्चर्य चकित झाली, अनिकेत ने नोटीस नाही पाठवली मग कुणी पाठवली.. आणि का…पण मग अनिकेत सहा महिने भेटला नाही..बोलला नाही त्याचं काय..या सगळ्या विचाराने ती जरा गोंधळली.

क्रमशः

रिया आणि अनिकेत यांच्या आयुष्यात नक्की काय झालं जाणून घेऊया पुढच्या भागात ?
पुढचा भाग लवकरच…

तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार..मग कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून.

आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, तिच्या पाठोपाठ दोन लहान बहिण भाऊ, त्यांचीही लाडकी ताई. आई बाबा रागावले की ताई हट्ट पुरविते ते पण उत्तमरित्या समजुत काढून हेही त्यांना माहीत होते.

ईशाची एकच कमजोरी आणि ती म्हणजे ‘कोण काय म्हणेल’ असा विचार करत स्वतः चे मन मारणे.

वयाच्या एकविसाव्या वर्षी एक स्थळ सांगून आलं. मुलगा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे, सधन कुटुंब आहे, राणी बनून राहीलं बरं का ईशा असं ईशा च्या आत्याबाई ने सांगताच बाबांनी ईशाच्या लग्नाचं मनावर घेतलं. ईशा सांगू पाहत होती, “बाबा मला पुढे नोकरी करायची आहे, आताच लग्न नको” पण आई‌ बाबांनी तिचीच उलट समजुत काढली आणि म्हणाले , 

” अगं नोकरीचे काय, मुंबईत आहे मुलगा. लग्नानंतर तिथे गेली की शोध नोकरी. होणार्‍या नवर्‍याची मदतच होईल तुला..”

ईशाला कुणाचं मन मोडणं जमत नव्हतंच, हे तर आई बाबाचं. ती स्वतः चे नोकरीचे स्वप्न बाजुला ठेवून घरच्यांचा विचार करून लग्नाला तयार झाली. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला, अमन दिसायला देखणा, चांगल्या नोकरीला शिवाय त्याला ईशा पहिल्या भेटीतच आवडली मग काय ठरलं दोघांचं लग्न. 

अमन आणि ईशा फोन‌वर बोलायचे, तिला एकंदरीत तो चांगला वाटला पण मनात अजूनही एक खंत होतीच लवकर लग्न करतोय आपण याची. 

दोघांचं लग्न झालं, अमन तिला छान सांभाळून घ्यायचा, मुंबई सारख्या शहरात ती पहिल्यांदाच आलेली पण अमनने तिला तसं भासू दिलं नाही, नवनवीन ठिकाणी फिरायचे, हौसमौज करायचे, सगळं अगदी छान. लग्नाला सहा महिने होत आले, ईशा नविन घरात बर्‍यापैकी रुळली. आता आपण नोकरीसाठी विचार करायला हवा असं ठरवून अमनकडे तिने ते बोलून दाखवलं.

त्यावर अमन तिला म्हणाला , “ईशा, तुला नोकरी करायची ना..बिंदास कर पण तुला लोकल ने प्रवास, दगदग जमेल का..तू तयार असशील तर मी नक्कीच मदत करेल.”

ईशा ने अमनच्या प्रश्नाला होकार दर्शवत नोकरीचे मनावर घेतले आणि तसा प्रयत्न सुरू केला. अधूनमधून पहिला सण म्हणून वर्ष भर सासर माहेर वारी सुरु होतीच. नोकरीचे प्रयत्न सुरू होत नाही तोच ती आई होणार असल्याचे तिला कळाले. इतक्या लवकर बाळ, जबाबदारी नको वाटत होतं तिला पण अमन, सासूबाई, आई सगळ्यांनी तिचीच समजुत काढली की “अगं आता राहीलं तर होऊन जाऊ दे एक मुलं, वय वाढलं, अबॉर्शन केले की पुढे मुलं होताना‌ फार त्रास होतो.. नोकरी काय नंतरही करू शकतेच..”

आताही ती काही बोलू शकली नाही, बाळ होण्याचा आनंद तिलाही अनुभवायचा होताच पण इतक्या लवकर बाळ मनाविरुद्ध वाटत होतं..पण असो म्हणत तिने मातृत्व स्विकारले. एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळामध्ये ती इतकी गुरफटलेली की घर, अमन, बाळ याशिवाय आयुष्य असते याघा तिला काही काळ विसर पडला, वेळही तशीच होती म्हणा. 

मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर तिने परत मिशन नोकरी शोधा सुरू केले. योगायोगाने तिला एक नोकरी मिळाली ती सुद्धा घरा पासून काही अंतरावर, आता बाळा जवळ कुणाला ठेवायचे. इकडे सासुबाई तिकडे आई त्यांच्या जबाबदारीत अडकलेल्या त्यामुळे नेहमी साठी येणे त्यांना जमणार नव्हते. मग डे केअर चा ऑप्शन शोधला आणि नोकरी सुरू केली. पण मुलाला डे केअर ला सोडून, घर सांभाळून नोकरी करताना तिची तारांबळ उडायची शिवाय इवल्याशा जीवाला डे केअर ला सोडून जाताना ती मनोमन खूप रडायची. घरचे आणि अमनही तिलाच दोषी ठरवायचे, म्हणायचे “तुलाच नोकरीची हौस..”

कसंबसं पाच सहा महिने तिने धावपळ करत नोकरी केली पण मुलगा डे केअर ला गेल्यापासून सारखा आजारी पडतोय, रडत रडतच आई मला जायचं नाही तिथे म्हणतोय बघून तिने ती नोकरी सोडली. या दरम्यान तिची फार चिडचिड व्हायची, हळवी असल्याने इतरांचे मन जपताना स्वतः मनोमन खूप रडायची. अमन आणि ईशा मध्ये यादरम्यान लहान सहान गोष्टींवरून खटके उडायचे कारण दोघांना एकमेकांसाठी वेळच नव्हता. 

नोकरी सोडल्यावर घर,नवरा, मुलगा सगळी जबाबदारी सांभाळत ती स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती. काही महिन्यांनी मुलाची शाळा सुरू झाली, एकदा का मुलं मोठी व्हायला लागली की पुढचे वर्ष कसे भरभर जातात हे आता तिला कळत होतं. 

तिचं स्वप्न, तिच्या आवडीनिवडी सगळं ती काही काळ का होईना विसरूनच गेली होती. नातलगांचा आदरसत्कार, प्रत्येकाचं मन जपणं सगळं न चुकता ती करत आली होती. अशीच जबाबदारीच्या ओझ्याखाली वर्षे भराभर निघून गेली.

  

आज ईशाचा चाळीसावा वाढदिवस होता, मुलगा पार्थ सुद्धा एव्हाना अठरा वर्षांचा झाला होता. अमन आणि पार्थ दोघांनी मिळून मस्त सरप्राइज पार्टी अरेंज केली. ईशा मस्त अमन ने दिलेली साडी नेसून तयार झाली, एका मैत्रिणी च्या मदतीने हलकासा मेकअप केला, तिचं सौंदर्य आज उठून दिसत होतं. 

ईशा ला घेऊन दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. बघते तर काय आई बाबा भावंडे सासू सासरे , काही मित्र मैत्रिणी सगळेच तिथे हजर. सगळ्यांनी ईशाचे भरभरून कौतुक केले, प्रत्येक जण ईशा विषयी दोन-चार ओळी छान छान बोलत होते आणि पार्थ सगळं रेकॉर्ड करत होता. सगळ्यांकडून कौतुक ऐकताना ईशाच्या मनात विचार आला, 

“आपण सगळ्यांसाठी इतकं सगळं केलं त्याची पावती तर मिळाली पण आतापर्यंतचं आयुष्य सगळ्यांसाठी जगताना स्वतः साठी जगायच तर राहूनच गेलं..आता पार्थ मोठा झाला, चाळीशीचा उंबरठा ओलांडून आज मी नव्याने स्वतः साठी ही जरा वेळ काढणार, आवडीनिवडी जपणार..नोकरीचे माहीत नाही पण आता जरा का होईना स्वतः साठी जगणार , नाही तर साठी उलटताना परत एकदा वाटेल स्वतः साठी जगायचं राहूनच गेलं….”

टाळ्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर पडली, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणून आता जरा वेळ का होईना पण  स्वतः साठी जगायचं असं मनोमन ठरवून तिने केक कापला. 

खरंच विचार करण्याजोगे आहे नाही का?

ईशा प्रमाणे आपणही असंच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी जगायचं विसरून जातो. जेव्हा जाणिव होते तेव्हा कशात रस नसतो पण आयुष्य एकदाच मिळते तेव्हा जरा का होईना स्वतः साठी वेळ काढून आवडीनिवडी जपत, आपला आनंद शोधून स्वतः साठी जगायचं मनावर घ्यायलाच पाहिजे नाहीतर आपल्यालाही म्हणावं लागेल, ” स्वतः साठी जगायचं तर राहूनच गेलं…”

याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

जन पळभर म्हणतील हाय हाय….

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय ?

कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत.

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?

अगदी खरंय, आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं  आहे, कुणाचं आयुष्य किती कुणालाच माहीत नाही. काही विपरीत घडले तर कुणाला काय फरक पडतो हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

खरंच विचार केला तर फरक हा पडतोच आणि तो म्हणजे आपल्या आई वडीलांना ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून आपल्याला लहानाचं मोठं केलं असतं, आपण आई वडील होतो तेव्हा जाणवतं की आपल्या आई वडीलांना आपल्याला इथवर पोहोचवताना किती खस्ता खाव्या लागल्या असणार. आपल्या पदरात मुलबाळ असताना आपल्यावर चुकून वाईट प्रसंग ओढावला तर खरंच फरक पडतो त्या इवल्याशा जीवाला. आई वडील दोघांचीही गरज असते मुलांना‌ जशी आपल्याला अजूनही वाटते.
इतर नातलगांना मात्र दोन दिवसाचे दु:ख होते आणि परत ते आपापल्या कामी लागतात. निसर्गाचा नियम आहे तो, अपवाद फक्त आई वडील आणि मुले.

अनेक बातम्या कानावर पडतात, अपघात, आत्महत्या, हिंसा, आजारपण त्यामुळे ओढावलेला मृत्यू…ते ऐकताच प्रश्न पडतो जाणारा जातो पण त्या जन्मदात्या ला, त्यांच्या मुलाबाळांना किती बिकट परिस्थितीतून जावे लागत असेल, मनात शेवट पर्यंत एक दु:खाची सल कायम राहत असेल ना. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतील पण काही गोष्टींची काळजी घेत आपण आनंदाने आयुष्य जगणे कधीही चांगले.

नवरा आणि बायको यांच्यातलं नातं म्हणाल तर तेही पूनर्विवाह करून आपल्या आयुष्यात गुंतल्या जातात पण अशा वेळी मुलांची मनस्थिती काय असते हे त्यांचं त्यांनाच कळत असावं.

या जगात कुणीच कुणाचं नसतं, ज्याचं त्यालाच पहावं लागतं.  गेल्यावर दोन दिवस गोडवे गाणारे अनेक असतात पण जिवंतपणी कौतुक करणारे मोजकेच.

आई वडीलांची उणीव ही कुणीही भरून काढत नाही.  म्हणूनच कुणाकडून  काहीअपेक्षा  न बाळगता स्वतः ची काळजी स्वतः घेणे कधीही फायद्याचेच, स्वतः साठी, आई‌वडिलांसाठी आणि मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी.

काय मग , पटतंय ना.  स्वतः ची काळजी घ्या,  तंदुरुस्त रहा, बिनधास्त राहून आनंदाने आयुष्य जगा…हसत रहा…हसवत रहा ?

© अश्विनी कपाळे गोळे

म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

पंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले.

कंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात काय माल आहे.. ”

आजोबा हसून उत्तरले,

“काय माल बिल नाही बाबा…आमच्या म्हातारीनं मोठ्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या इवल्या झाडांवर आलेले टमाटर, मिरची, वांगे , कोथींबीर हाय..तालुक्याला आज बाजार हाय.. तिथं जाऊन इकतो..जरा का होईना पैसा मिळेल तितकाच म्हातारीच्या हातात तिच्या मेहनतीचा मोबदला..पण न चुकता त्या पैशातले काही पैसे मलाही देते ती मोठ्या प्रेमानं तिकीट काढून जाऊन विकण्याचा मोबदला म्हणून..”

आजोबांचं उत्तर ऐकून कंडक्टर आणि आजुबाजुच्या लोकांना आजी आजोबांचे प्रेम बघून खूप उत्सुकता वाटली. शेजारच्या सीटवर बसलेल्या एका तरूणाने आजोबांना विचारले “किती मोबदला मिळतो आजोबा..आणि एरवी मग कशावर चालतं घरदार..”

आजोबा – ” पोरा, मी सरकारी नोकरीत होतो. मिळते जरा पेंशन… दोघांना पुरेसं हाय तितकं पण आमच्या म्हातारीला आधीपासूनच स्वतः च्या कमाईचे पैसे बटव्यात असल्याशिवाय काही दम निघत नाही. अगुदर तीच जायची बाजारी पण आता तिच्या आजारपणामुळे तिच्या कडून प्रवास व्हत नाय… म्हणून म्या जातुय..तिची औषधं बी आणल्या जातात.. म्या कधी जवळचे पैसे टाकून खोटं बोलून जास्त पैसे दिले तरी म्हातारी लगेच वळखते..लय हुशार हाय ती..”

अशाच गप्पा सुरू असताना आजोबांचा स्टॉप आला आणि ते उतरले. दिवसभर भाजी विकून तीनशे वीस रुपये जमलेले. आजीने दिलेला जेवणाचा डबा खाऊन आजोबा म्हातारीचे औषधे घ्यायला गेले. वाटेत गजरा विकणारा लहान मुलगा त्यांना दिसला. खिशातून दहा रुपयांची नोट काढून आजोबांनी आजी साठी मोगर्‍याचा गजरा घेतला. आजोबा परतीला निघाले, घरी पोहोचताच आजीच्या पांढर्‍या केसांच्या आंबाड्यात गजरा माळून तीनशे वीस रुपये आजीच्या हातात ठेवले. आजीने वरचे वीस रुपये मोठ्या प्रेमाने आजोबांना मोबदला म्हणून दिले आणि म्हणाल्या,

“हे वय हाय होय माझं गजरा माळायचं.. तुमी पण उगाच खर्च करता..”

DLF

आजोबा लाडात येऊन आज्जीची मस्करी करत म्हणाले, “अगं आज आपल्या लग्नाचा पंचावन्न वा वाढदिवस.. म्हणून लय प्रेमानं आणलायं बघं गजरा..”

आजी लाजून , “ठाउक हाय मला म्हणून तर तुमच्या आवडीचा बेत केला रातच्या जेवणाला.. पुरणपोळी, भरल्या वांग्याची भाजी ते बी म्या मेहनतीनं लावलेल्या इवल्या झाडाचे ताजे वांगे बरं का..चला हात पाय धुवा..चहा ठेवते.”

आजी आजोबांच्या घरी नेहमी मंद आवाजात रेडिओ सुरू असायचा..आजही सुरू होता आणि त्यावर गाणं लागलं होतं,

“तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं….”

आजी आजोबांना मुलं बाळं नव्हते. दोघेच गावातील घरात राहायचे, अख्या गावातील मुलांचे लाडके होते दोघेही कारण सगळ्यांना जीव लावायचे मग ते पशू पक्षी का असेना. काही गोडधोड केले की आजुबाजूला, येणाजाणार्‍याला आग्रहाने खाऊ घालायचे. आजोबा सरकारी नोकरीत कामाला, आजीने सुरवातीपासूनच अंगणात छान बाग तयार केलेली. त्यात फुले, फळे, भाज्या सगळंच असायचं. आजी मग गावच्या बाजारात तर कधी तालुक्याला जाऊन ते विकून यायच्या. आजोबा म्हणायचे अगं मी चांगला सरकारी नोकर, दोघांना पुरून उरेल इतकं आहे आपल्याकडे, कशाला उगाच राबतेस पण आजीच मत असं की कुठल्याही कामाची लाज नको वाटायला शिवाय माझ्या मेहनतीचे पैसे बटव्यात असल्याशिवाय मला नाही बाई आवडत.
आजोबांना आजीच्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटे.

आजीचं मन राखायला आजोबाही मदत करायला लागले होते.

आजीला दम्याचा त्रास होता त्यामुळे ये-जा करणे आता पेलायचे नाही पण आजोबा मात्र अजूनही तरतरीत.‌ दोघेही छान बाग कामात, घरकामात एकमेकांना मदत करायचे. आजोबा अगदी चिरतरुण हृदय असलेले, गमतीजमती करत आजीला हसवायचे, चिडवायचे. गावात अनेक जोडप्यांसाठी ते एक प्रेरणास्थान होते.

एकदा अशेच आजोबा तालुक्याला जाऊन सायंकाळी घरी आले, बघते तर काय दरवाजा उघडा आणि आजी झोपलेली. आजोबांनी आजीला आवाज दिला आणि नेहमीप्रमाणे मस्करीच्या सुरात म्हणाले, “आज कशी काय सायंकाळी झोपली गं, मला दुरून येताना बघून मुद्दाम जाऊन झोपली वाटतं.. बरं आज मीच करतो च्या दोघांसाठी मग तर झालं..बरं आइक ना आज तुझ्या बागेतले पेरू सगळे विकल्या गेले. हे घे सगळे धरून चारशे साठ रुपये हाती आले…”

आजोबा हात पाय धुवून परत आले तरी आजी काय उठल्या नव्हत्या. आजोबांनी जाऊन हलवले तर आजी स्तब्ध होऊन निर्जीव वस्तू सारख्या पडल्या होत्या, बाजुला आजीचा बटवा सुद्धा होता. आजोबा घाबरले, शेजारच्या गण्याला हाक मारली, आजोबांच्या हाकेने आजुबाजुची मंडळी घरी आली, बघतात तर काय , आजी आजोबांना कायमच्या सोडून गेल्या होत्या. घरात मंद आवाजात आजीच्या रेडिओ वर गाणे सुरू होते,

“भातुकलीच्या खेळा मधली..राजा आणिक राणी…

अर्ध्या वरती डाव मोडला अधुरी एक कहाणी….”

आजी गेली म्हणताच आजोबा ढसाढसा रडायला लागले. थंडीचे दिवस त्यात आजीला दम्याचा आजार असल्याने श्वास घेताना त्रास होऊन त्या गेल्या असल्याची शक्यता गावातील वैद्याने सांगितली.

आजीच्या जाण्याने आजोबा खूप खचले, आता कुणासाठी जगायचे असं म्हणत स्वतः कडे दुर्लक्ष करत त्यांनीही स्वतः च्या तब्येतीवर चांगलाच परिणाम करून घेतला.
आजी आजोबांनी मिळून तयार केलेली बाग, बागेतील प्रत्येक झाडाला , इवल्या इवल्या रोपट्याला आजीने जिवापाड जपले होते. आजीच्या जाण्याने आजोबां सोबतच बाग ही ओसाड , सुकलेली दिसत होती.

कथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १

अदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली,

“नेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस…? कधी थांबतो कुणास ठाऊक….चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल..”

अदिती कॉफी घ्यायला निघाली आणि जाताना आजुबाजूला फ्लोअर वर एक नजर टाकली तर मोजकेच लोक होते.. शुक्रवार असल्याने बरेच जण लवकर निघून गेलेत वाटतं असा विचार करून ती कॅन्टीन मध्ये निघून गेली.

एका टेबल खुर्ची वर बसून कॉफी घेत समोरच्या काचेतून बाहेरचा पाऊस बघत ती मग्न झालेली असतानाच एक आवाज आला,

“excuse me miss Aditi….मी इथे बसलो तर चालेल..?”

तो आवाज ऐकताच तिने वळून पाहिले , “अविनाश तू…अरे बस ना… कधी आलास इकडे..तू UK ला होतास ना..”

अविनाश समोरच्या खुर्चीवर बसून, अदिती च्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदी होत बोलला,

“आजच जॉइन झालो अगं इकडे… मागच्या आठवड्यात आलो परत..दोन वर्षांचा प्रोजेक्ट होता..संपला..आलो परत…तू सांग कशी आहेस.. अजूनही तशीच दिसतेस..जशी ऑफिसच्या पहिल्या दिवशी दिसत होती ? आठवतोय मला तो दिवस… तेव्हाही असाच पाऊस सुरू होता…आठवतो ना…”

अदिती जरा लाजत, मनातल्या भावना आनंद लपवत , ” काहीही काय रे…तू पण ना..मी मजेत आहे….तू सांग कसं वाटलं दोन वर्षे..आणि आज दिवसभर तर दिसला नाहीस..आता अचानक इथे कसा.. म्हणजे उशीर झाला ना.. म्हणून म्हणतेय..”

अविनाश एकटक अदितीला बघत होता, तिचा नाजूक चेहरा, तिला शोभून दिसणारे कुरळे केस, तिच्या गालावरची ती खळी, मध्यम उंचीची साधी सिंपल पण अगदीच गोड मुलगी.

मध्यमवर्गीय कुटुंबातली , आई वडिलांना एकुलती एक. हुशार, समजुतदार आणि मेहनती, त्यामुळे कामात परफेक्शन. स्वभावाने जरा लाजाळू, अबोल पण हसरी मुलगी. ?

तिच्या डोळ्यातले भाव टिपत तो म्हणाला, “दिवसभरात किती वेळा तुझ्याशी भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत येऊन बघितलं पण मॅडम बिझी..एकदा कॉलवर, एकदा मिटिंगमध्ये.. लक्षही नव्हतं तुझं..कामात मग्न होतीस, व्यत्यय नको आणायला म्हणून काही तुला डिस्टर्ब केलं नाही..म्हंटलं आता आज भेटतात मॅडम की नाही काय माहित.. म्हणून थांबलो तुमची वाट बघत…”

“म्हणजे तू मला भेटायला थांबलास…. अरे, सध्या खूप काम आहे त्यामुळे कुठेच आजुबाजूला लक्ष नसतं..रोज घरी जायला उशीर होतो..” अदिती.

“हो, खरं तर तुला भेटायलाचं थांबलो..किती कॉल, मेसेज, इमेल केले तुला.. ऑफिसच्या मेसेंजर वर सुद्धा किती तरी वेळा मेसेज केला पण तू मात्र काहीच उत्तर दिले नाही…आज ठरवलं होतं तुला भेटूनचं जायचं घरी..” अविनाश.

अदिती विषय बदलत म्हणाली, “कॉफी घ्यायची का अजून एक.. बोलता बोलता ही कॉफी कधी थंड झाली कळालेच नाही..”.

“अजूनही तशीच कॉफी प्रेमी आहेस वाटत तू… थांब मी घेऊन येतो…” अविनाश.

अदिती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती.
( अविनाश उंच पुरा, गोरापान, रूबाबदार व्यक्तीमत्व, हुशार, आत्मविश्वास असलेला होतकरू मुलगा. अगदीच मॉडर्न विचारांचा, घरी मोठा व्यवसाय असूनही पारंपरिक व्यवसाय नको म्हणून स्वबळावर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. घरचा व्यवसाय वडील आणि भाऊ सांभाळायचे. दोघेच भाऊ. घरी आई वडील, भाऊ ,वहिनी आणि अविनाश सगळ्यात लहान. )

अविनाश दोघांसाठी कॉफी घेऊन आला.

अदिती आधीच्या गोष्टींवर बोलण्याच्या मूड मध्ये नाही हे लक्षात घेऊन अविनाश तिला चिडवत म्हणाला, “काय मग, पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही.. कशी जाणार आहेस घरी..”

अदिती बाहेर एक नजर टाकत, “हो ना..पाऊस कधी थांबतो काय माहीत.. आई-बाबांना कळवायला पाहिजे.. काळजी करत असतील ते.. कॅब मिळते का बघते आता.. बसने जाणे तर अशक्यच वाटतेय..”

“तुझी हरकत नसेल तर मी सोडतो ना तुला.. पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून कार घेऊन आलेलो आज..” अविनाश.

“नको अरे मी बघते कॅब मिळते का…तुला उगाच चक्कर होईल मला सोडून घरी जायला…” अदिती.

“अगं, किती ही औपचारिकता…खरंच इतक्या पावसात आता कॅब मिळेल का.. मिळाली तरी मी नाही जाऊ देणार तुला एकटीला..नऊ वाजत आलेत आता..चल मी सोडतो.. काही चक्कर वगैरे होणार नाही मला…” अविनाश.

“बरं ठीक आहे, मी आईला फोन करून कळवते..तसं आज उशीर होईल ते सांगितलं होतंच पण इतका उशीर होईल वाटलं नव्हतं…हा पाऊस पण ना…” अदिती.

“बरं झालं आला ना पाऊस.. नाही तर काम आटोपून निघून गेली असतीस..मला तुझ्याशी भेटताही आलं नसतं…?” अविनाश.

त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अदीती म्हणाली,

“चला, निघायचं का…”

न बोलताच अदीतीला मान हलवून होकार देत अविनाश चल म्हणाला.

दोघेही पार्कींग कडे निघाले.

क्रमशः

अदिती आणि अविनाश यांच्यातल्या नात्याला जाणून घेऊया पुढच्या भागात ?

पुढचा भाग लवकरच…

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ??

लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव.

नावासह शेअर करायला हरकत नाही ?

© अश्विनी कपाळे गोळे

तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

तिला काही सांगायचंय..
हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची.
लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे झाले तरी पुढे आयुष्याचे निर्णय ती मनाप्रमाणे घेऊ शकेलच असं नसतं. आई वडिलांना दुखवायचं नाही , घराण्याचा मान सन्मान जपायचा म्हणून बर्‍याच गोष्टी मनात साठवून ती पुढे जात असते.
आयुष्याच्या कोवळ्या वळणावर ती आपलं प्रेम शोधत असते. राजा राणीचा संसार असावा, त्या संसारात भरभरून प्रेम असावं अशीच तिची अपेक्षा असते. वास्तव्यात मात्र असंच सगळं असेल असं नसतं.
एकमेकांवर प्रेम असलं तरी संसार म्हंटलं की अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचं मन जपून स्वतःच मन मारणं हे सोबतीला असतंच.
घरात प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, अपेक्षाभंग झाला की दोष तिलाच. नविन घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, मग त्यांच्या स्वभावानुसार आदरसत्कार करीत सगळ्यांचं मन जिंकण्याच्या नादात ती मात्र मन मारून जगत असते.
असं सगळं करूनही तिचं कौतुक होईलच असंही नसतं.
खूप काही अपेक्षा नसतात तिच्या, प्रेम आणि प्रेमाचे दोन शब्द इतकंच तर अपेक्षित असतं तिला.
संसार, घर, मुलबाळ, नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतः साठी वेळच नसतो तिला, तिच्याही काही आवडीनिवडी असतात, इच्छा आकांक्षा असतात पण जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या दबून जातात.
ती मन मारून जगत असली तरी नवर्‍याची एक प्रेमळ साथ तिला मिळाली की सगळा शीण निघून जातो तिचा. इतर कुणाकडून अपेक्षित नसलं तरी तिची धडपड बघता नवर्‍याने कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे, थोडा वेळ का होईना पण दोघांच्या एका वेगळ्या विश्वात रममाण व्हावे इतकीच तर अपेक्षा असते तिची.
कधीतरी वाढदिवसाला छान सरप्राइज द्यावं, कधीतरी कुठे बाहेर फिरायला जाऊन रोजच्या जबाबदारीतून जरा वेळ का होईना मुक्त व्हावं इतकंच पाहिजे असते तिला.
राब राब राबून मानसिक आणि शारीरिक थकवा आल्यावर ‘ थकली असशील ना, आराम कर ‘ असे शब्द ऐकायला मिळाले की थकवा दूर होऊन एक नवा उत्साह येतो तिला.
आर्थिक संतुलन, मुलांच्या भविष्याची काळजी तिलाही असतेच. स्वतःच अस्तित्व टिकवावे म्हणून नोकरी करण्यासोबतच भविष्याची तरतूद, नवर्‍याला आर्थिक हातभार म्हणून नोकरी करणारी स्त्री ही असतेच.
आई म्हणून एक वेगळ्या वळणावर आलेली ती घर सांभाळून बाळाच्या संगोपनात दमून जाते पण नवर्‍याच्या प्रेमळ शब्दाने पुन्हा प्रफुल्लित होते.
तिच्या मनात खुप काही दाटलं असतं, सगळ्यातून काही वेळ मुक्त व्हावं वाटतं, कुणाचाही विचार न करता स्वतः साठी जगावं वाटतं पण जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकल्यावर यातून बाहेर पडणं तिला जमत नसतं.
मनाची चिडचिड होते, संताप येतो पण कधी कधी व्यक्तही होता येत नसतं, कारण या चिडचिडेपणाचं कारण शब्दात सांगता येत नसतं.
खूप घुसमट होत असते मनात पण शब्द मात्र सापडत नसतात, खूप काही सांगायचं असतं पण व्यक्त होणंही प्रत्येक वेळी शक्य नसतं.
प्रेमाचे आणि कौतुकाचे दोन शब्द, तिला समजून घेणार मन, एक खंबीर साथ हेच तर तिला अपेक्षित असतं ?

प्रत्येक स्त्रिच्या मनाची कुठेतरी कधीतरी अशीच घुसमट होत असते. पण यावर उपाय हा एकच, स्वतः साठी जगायला‌ शिकायचं. ?
कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता , प्रत्येक वेळी इतरांचा विचार न करता,  आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ते करायचं.
कसंही वागलं तरी बोलणारे ते बोलतातचं मग आपला आनंद शोधून आयुष्य जगलं तर मनाची घुसमट नक्कीच कमी होईल.

आयुष्य एकदाच मिळते मग ते इतरांच्या इच्छेनुसार न जगता , स्वतः च्या इच्छा आकांक्षा विचारात घेऊन आनंदात जगलेले कधीही चांगलेच ?

अश्विनी कपाळे गोळे

लग्नातली बेडी… भाग १

नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

“व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

“हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

(महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

“बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

क्रमशः

पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

© अश्विनी कपाळे गोळे

Free Email Updates
We respect your privacy.