Tag: Summer vacation

  • इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा

    तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”
    आई म्हणाली “बरं, तुला हवा तो क्लास लावून देते, आता वेळ आहे तुझ्याकडे. शिकून होईल आणि वेळही जाईल तुझा. सध्या खूप काम आहे गंं, सुट्टी नाही मिळणार मला. तरी बघूया काही दिवसांनी, तोपर्यंत तू स्विमींग, डान्सिंग, जे काही शिकायचे ते शिकून घे.”
    तनूचा इवलासा चेहरा पाहून आईला मनातून वाईट वाटले आणि मनात विचार आला की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीची किती आतुरतेने वाट बघायचो आपणं, किती मज्जा करायचो.
    सुट्टी सुरू झाली की मामाच्या गावाला कधी कधी जाणार ही‌ घाई असायची, कारण तिथे मज्जा सुद्धा तशीच यायची. सगळे भावंडे एकत्र येणार, मामा मामी, मावशी ‌काका, आजी आजोबां कडून मस्त लाड पुरवले जायचे. सकाळ‌ पासून रात्र कशी झाली कळायला वेळ नसायचा. सगळी भावंडं एकत्र जमली की‌ नुसतीच मज्जा. एकमेकांच्या खोड्या काढत, मनसोक्त खेळत,‌ छान छान खाऊन कुठे दिवस जायचा कळत नव्हतं.
    विहीरीत पोहायला जायचं, ज्यांना अजून पोहता येत नाही त्यांच्या पाठीला भोपळा किंवा जूना‌ टायर बांधून मामा,‌मोठी भावंडे पोहायला शिकवायचे. मनसोक्त पोहून झालं की‌ मस्त भूक लागायची मग मामींच्या ,‌आजीच्या हातचे नवनवीन पदार्थ, शेतातल्या ताज्या कैरी,‌आंबे अगदी नैसर्गिक रित्या आलेले सगळं खाण्याचा मोह आवरायचा नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत अंगणात, घरात इकडे तिकडे भटकायच, मनसोक्त खेळत मज्जा मस्ती करायची. त्यात भर दुपारी सायकलवरून कुल्फी वाला, आइस कॅंडी वाला यायचा मग सगळी बच्चे कंपनी त्याच्या भोवती गोळा, मला‌ ही कुल्फी, मला‌ लाल आइस कॅंडी, मला‌ हे मला‌ ते…काय मज्जा यायची नाही त्यात. कधी मग भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे‌ लग्न, त्यात आजी मग खाऊ बनवून देणार, कधी कबड्डी, कधी खो-खो, घरभर पळत लपाछपी, मातीचा खेळ, लगोरी अगदी उत्साहात खेळ रंगाचे. कधी बैलगाडीची सफर असायची. पूर्ण वर्षभराचा‌ रिचार्ज केल्यासारखे वाटायचे. भावंडांची भांडणे, त्यांचं प्रेम , चिडवाचीडवी यामुळे त्यांचं नातंही तितकंच घट्ट व्हायचं.
    खाण्या पिण्याची मज्जा, खेळण्यातील मौजमस्ती, मोठ्यांचा एक वेगळाच अनुभव, गप्पा गोष्टी, पापड , शेवया , वाळवणी पदार्थ बनवायची त्यांची वेगळी मज्जा.
    रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर किंवा अंगणात गादी टाकून सगळे झोपायचो आणि आकाशातील तार्‍यांची मज्जा बघायची, चंद्राची लपाछपी‌ बघायची, आजी मग छान छान गोष्टी सांगणार ते ऐकत झोपायचो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात.
    ही सुट्टी कधी संपूच नये असं वाटायचं. त्यात घरी कुणाचं लग्न‌ जर असेल मग तर विचारायलाच नको, सगळीकडे आनंदीआनंद…
    भेटीसाठी होऊन एकत्र वेळ घालवून नात्यांमधला गोडवा टिकून राहायचा, सुखदुःख वाटले जायचे, एकमेकांची ओढ वाटायची.
    हल्ली शहरांमध्ये नोकरी करताना‌, शहर असो किंवा ग्रामीण भाग ही सगळी मज्जा कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. आई‌ वडील इच्छा असूनही मुलांना वेळ देऊ शकत नाही, मग इंटरनेट‌ मुलांचा‌ मित्र बनतो, मोबाईल, टिव्ही, व्हिडिओ गेम यामुळे मामाच्या गावाला जी मज्जा यायची ती खरंच  हरवली आहे. नात्यात एक दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब, फोन वरून औपचारिक बोलून ती आधी सारखी आपुलकी, नात्यातला‌ जिव्हाळा कुठे तरी हरवला आहे. आई‌ वडीलांना‌ वेळ नसतो मग‌ मुलांना‌ मनासारखी सुट्टी अनुभवता येत नाही. या वेळी समर‌ कॅम्प, या वेळी हा क्लास असा अगदी टाइमटेबल ठरलेला असतो, त्यात जो‌ वेळ मिळेल तो मग इंटरनेटवर गेम, टिव्ही,‌मोबाइल. यामुळे मग मुलांनाही नात्यात ओढ वाटत नाही, आई बाबा कामात, भावंडे असली तरी मोबाईल गेम मध्ये व्यस्त. सुट्टीच्या दिवशी फार फार तर सिनेमा, माॅलमध्ये फिरायला जायचं. काही दिवस सुट्टी मिळालीच तर मग जवळपास कुठे फिरून यायचं अशी हल्ली सुट्टी संपते पण त्यात पूर्वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा नसते.
    खरंच वाईट वाटत‌ं ना विचार करून. म्हणूनच मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवून त्यांना वेळ देण्याची गरज आहे, आजोळी काही दिवस घालवले, घरातल्या घरात न राहता बाहेर मनसोक्त खेळू दिले, मुलांना जबरदस्तीने व्यस्त ठेवण्यासाठी क्लास न लावता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देऊन हवं ते शिकू दिले, आवडीची‌ गोष्टींची पुस्तकं दिली तर त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लक्षात राहील. ?

    याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?

    तुमच्या लहानपणच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या आठवणी आमच्या सोबत शेअर करायला विसरू नका ?

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.
    नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • मुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा

    शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..????”.
    आई मनात पुटपुटली “तुमची मज्जा..आमची सजा..?..बरं आता मस्त फ्रेश होऊन ये..आराम कर जरा‌ वेळ..”
    नेहमी फ्रेश हो म्हणत ‌अर्धा तास जायचा, आज‌ मात्र पाच मिनिटांत मॅडम कपडे बदलून फ्रेश होऊन तयार.
    निधी- “आई, माझा‌ व्हिडिओ गेम कुठे आहे गंं, तू म्हणाली होतीस परिक्षा संपली की काढू.”
    आई – “अगं, आताच घरी आलीस, जरा खाऊन घे, आराम कर..दोन‌ महिने आहेत खेळायला.”
    निधी – ” नको आज आम्हाला शाळेत स्नॅक्स होता ना, भूक नाही.. झोप पण नाही आली..सांग ना‌ कुठे आहे व्हिडिओ गेम.. “
    आई – ” बाबा आल्यावर काढायला‌ सांगते रात्री..आता‌ नको..”
    निधी – “असं ‌काय करतेस गं, तूच म्हणाली होती परिक्षा संपली की काढू..बरं मग मी रिमा कडे जाऊ खेळायला..”
    आई‌ – ” अगं, सायंकाळी जा‌ खेळायला..आता‌ जरा आराम कर..”
    निधी – ” काय गं आई‌ ..हे नको ते नको.. सुट्टीची मजा घेऊ‌ दे मला. “
    नंतर निधी‌ टिव्हीवर कार्टून बघत बसलेली…
    आई – ” निधी जरा आवाज कमी करशील का टिव्ही चा..”
    आईच्या डोक्यात विचार आला.. आजच सुट्टी सुरू झाली की इतका गोंधळ.. पुढचे दोन महिने काही खरं नाही..
    रात्री बाबा घरी आल्यावर तर विचारायलाच नको..आई‌ जेवायला‌ आज हे बनव.. नाश्त्याला ते बनव.. सकाळी आईची‌ ड्युटी स्विमींग ला‌ घेऊन जाणे..नंतर घरकाम..बाहेर उन्हामुळे ‌दिवसभर घरात टिव्हीचा, व्हिडिओ गेमचा आवाज..सोबत कुणी ना कुणी मित्र मैत्रिणी..मग निधीच्या खाण्या पिण्याच्या डिमांड.. एक मिनिट दुपारी आराम नाही..
    पूर्ण घर डोक्यावर घेऊन निधी सुट्टीचा‌ पुरेपूर आनंद घेत होती.
    सायंकाळी पाच वाजले की‌ एक सेकंद इकडे तिकडे न होऊ देता खेळायला बाहेर.. नंतर सात वाजले तरी घरात यायचं नावं नाही..
    घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण झाले की बाबांसोबत मस्ती.. दोघांची बडबड..बाबा दिवसभर घरी नसतात‌ मग आल्यावर काय करू नी काय नको…आई मात्र कधी एकदा जाऊन झोपते अशा विचारात..
    निधी शाळेत गेली की ‌आईला‌ जरा‌ स्वतः साठी वेळ मिळायचा.. घरातील काम आवरले जायचे..आता‌ मात्र दिवसभर आईचे काम काही संपत नाहीत.. त्यात निधी मॅडम‌ रात्री सुद्धा लवकर झोपायचे नावं घेत नाही..आई गोष्टी सांग ना..आताच काय झोपते..बाबा चला ना हे खेळू..ते खेळू..मग निधी आणि बाबांचा लुडो‌, बुद्धीबळ, सापसिडी तर कधी पेंटिंग ‌असा काही ना‌ काही कार्यक्रम उशीरा पर्यंत सुरू.. आईनेही झोपायचे नाही..?
    बाबांनी मग काही दिवस सुट्टी घेतली आणि फिरायला जायचा बेत आखला, तर आठवडाभर आधी निधीची तयारी..आतुरता..तिथे गेल्यावर असं करायचं तसं करायचं.. प्लॅनिंग ची मोठीं यादी तयार आणि आईने ती यादी दररोज ऐकायची.
    आई बिचारी मनात विचार करत बसायची , का शाळेला‌ इतक्या सुट्ट्या देतात.. घरात किती पसारा झालाय.. मैत्रिणींना ही भेटले नाही मी इतक्यात..सगळा वेळ निधीच्या मागे.. निधीची परिक्षा संपली आणि माझी सुरू झाली..?

    निधीच्या आई सारखी सगळ्या आयांची परिक्षा असते, मुलांची उडालेली झोप आणि अर्थातच आईची सुद्धा..दिवस भर घरात गोंधळ.. टिव्हीचा आवाज.. भावंडांची भांडणे.. अरे शांत बसा, भांडू नका अशी आईची कमेंटरी ..नोकरी करणारी आई असेल तर वेगळी काळजी..डे केअर अथवा मावशी जवळ सोडून जात‌ असेल तर सुचनांची यादी.. आईने सुट्टी घ्यावी म्हणून मुलांची चिडचिड..खाण्या पिण्याच्या डिमांड..हा क्लास तो क्लास.. नेऊन सोडा.. घेऊन या.. रात्री उशिरापर्यंत मस्ती.. आणि बरंच काही.. बिचारी थकलेली‌ आई?

    © अश्विनी कपाळे गोळे