Month: November 2019

  • कोण होतीस तू👸🥰☺️… काय झालीस तू..😣😢

    नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघणारच होती तितक्यात मोहन म्हणजेच तिचा पती तिची वाट अडवून म्हणाला, “माहेरी जायला निघाली आहेस खरी पण रिकाम्या हाताने परत येणार असशील तर मुळीच घरी येऊ नकोस. भावांकडून घराचा हिस्सा घेतल्याशिवाय परत आलीस तर माझ्या घरात पाय ठेवायचा नाही. ”

    नलिनीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मोहनचे बोलणे ऐकून त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ती गपगुमान माहेरी जायला निघाली. वाटेत तिचे अश्रू अनावर झाले आणि ती भूतकाळात हरवली.

    नलिनी सुखवस्तू कुटुंबात लाडाकौतुकात वाढलेली. आई वडील दोघेही नोकरी करायचे. तीन भावंडे, त्यात ही सगळ्यात लहान. दोन्ही भावांची आणि आई वडिलांची लाडकी लेक. नलिनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तिच्या आईचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आईच्या अशाप्रकारे अचानक झालेल्या निधनामुळे अख्ख्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, नलिनी चे वडील पूर्णपणे खचून गेलेले. मुलांचे शिक्षण पूर्ण होतंच आलेले होते.
    “आता लवकरच तिन्ही मुलांचा थाटलेला आनंदी संसार बघितला की आपले आयुष्य मार्गी लागले म्हणून समजा. ” असं मोठ्या उत्साहाने म्हणणारी आई बाबांना सोडून गेल्यावर हा संसार एकट्याने कसा सांभाळावा हाच प्रश्न बाबांना पडलेला.
    त्यातून स्वतः ला कसंबसं सावरून बाबांनी मुलांना धीर देत आईची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात नलिनीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेले. मुलेही आता शिक्षण पूर्ण करून काही तरी कामधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. बाबांनी दोन्ही मुलांना लहानसहान व्यवसायात गुंतवले. आता नलिनी साठी साजेसा मुलगा मिळाला की तिचं लग्न लावून द्यायच म्हणजे एक मोठी जबाबदारी पूर्ण होणार असाच काहीसा विचार केलेला नलिनीच्या बाबांनी. बाबा आणि दोन्ही भावांनी नलिनी साठी वर संशोधन सुरू केले. आई गेल्यापासून नलिनीला फार एकटेपणा जाणवायचा. भाऊ आणि बाबा वेळेनुसार आपापल्या आयुष्यात गुंतलेले पण नलिनी मात्र आईच्या आठवणीने दररोज रडायची. बाबांना तिची अवस्था कळत होती. तिची शक्य ती काळजी घेत, भरभरून प्रेम देत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न ते करत होते पण म्हणतात ना आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, असंच काहीसं झालेलं.

    आता नलिनीला तिच्यावर भरभरून प्रेम करणारा नवरा मिळावा , तिने संसारात रमून आनंदी राहावं हीच बाबांची इच्छा होती. पण झालं मात्र काही तरी वेगळंच.

    नलिनी साठी बरेच स्थळ बघितल्यावर मोहनचे स्थळ आले. वरवर बघता एकंदरीत छान वाटलेले आणि मोहन सोबत नलिनी चे लग्न झाले. लग्नानंतर नव्यानवलाईचे नऊ दिवस संपले तसेच मोहनने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. मोहन व्यवसाय करायचा तेव्हा नफा तोटा आलाच पण कधी फार काही नुकसान झालेच तर त्याची फार चिडचिड व्हायची मग सगळा राग तो नलिनी वर काढायचा. दारूच्या नशेत तिच्यावर हातही उचलायचा. आईच्या मायेला पोरक्या झालेल्या नलिनीच्या नशिबात सासरीही सुख नव्हतेच. वडीलांना सांगितले तर त्यांना काळजी वाटेल म्हणून तिने वडीलांना याबाबत सुरवातीला काही सांगितले नाही. पण दिवसेंदिवस मोहन तिला फार त्रास द्यायला लागला. तुझ्या माहेरचे माझा मानपान करत नाहीत, दिवाळसणाला काही दागिना नाही केला म्हणून तिला सतत टोमणे मारायचा. मोहन सारख्या लोभी व्यक्तीला सासर कडून मोठमोठ्या अपेक्षा असायच्या पण आई नसताना बाबा कसं घर सांभाळत आहेत हे नलिनी बघत आलेली त्यामुळे ती माहेरी कुणालाही मोहन विषयी काही सांगत नव्हती. अशातच तिला दिवस गेले आणि लवकरच ती एका मुलाची आई झाली. गरोदरपणात सुद्धा मोहन‌ असाच वागला. माहेरी आई नसताना तिचे बाळंतपण कोण करणार याचा जराही विचार न करता त्याने तिला माहेरी नेऊन ठेवले. बाबांनी कामवाल्या मावशीच्या मदतीने तिची नीट काळजी घेतली. भाऊ सुद्धा सोबतीला होतेच. या दरम्यान नलिनीच्या माहेरी येऊन मोहन उगाच काहीतरी तमाशा करायला लागला. तेव्हा तिच्या दोन्ही भावांनी त्याला चांगलाच दम दिला पण नलिनी मध्ये पडून तिने मोहनला परत जायला सांगितले. बाळंतपणानंतर सासरी गेल्यावर तिची एकटिची चांगलीच तारांबळ उडत होती. सासुबाई वयस्कर त्यामुळे त्यांची काही मदत होणे शक्य नव्हते. बाळ, घर आणि मोहनचा असा चिडखोर स्वभाव , त्याचा छळ सहन करणे असंच तिचं आयुष्य झालेलं.

    माहेरी आता बाबांनी दोन्ही भावांची लग्न उरकले. दोघेही भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झालेले. बाबा असताना‌ ती हक्काने माहेरी जाऊन राहायची. चार दिवस का होईना पण सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात यायचे. काही वर्षांतच आजारपणाने बाबा देवाघरी गेले आणि तिचं माहेर संपल्या सारखे झाले. दोन्ही भाऊ वहीनी संसारात गुंतल्याने तिच्याकडे कुणी फारसे लक्ष देत नव्हते. भावाकडे पाहुणी म्हणून आली तरी दोन‌ दिवसांपेक्षा जास्त तिला आता राहावं वाटत नव्हतं. सासरचे, नवर्‍याचे प्रश्न भावाजवळ मांडले की वहिनीला आवडत नव्हते. त्या म्हणायच्या आपला संसार आपण बघावा, आम्हाला मध्ये घेऊ नये. भावाचे मन दुखत असले तरी वहिनी पुढे दोघेही काही बोलेना.
    एकदा तर मोहनने तिला दारू पिऊन मारहाण केली आणि घराबाहेर काढले. रडत रडत ती माहेरी आली . मोठ्या भावाला झाला प्रकार सांगितला तर तो म्हणाला, “नलू, आता हे नेहमीचं झालंय. एक तर तू त्याला सोडून दे नाही तर तुझं तू बघून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसाच हा मोहन काही केल्या सुधारत नाही. आम्हाला सांगून काय फायदा, तुझ्या नशिबात हेच असेल. सहनशक्ती नसेल तर आत्महत्या कर पण सारखं तेच रडगाणे गाऊ नको. ”

    भावाचे हे असे बोलणे ऐकल्यावर ती मनोमन खुप दुःखी झाली. एके काळी याच घरात लाडात , मोठ्या तोर्‍यात वावरणारी मी. आज मला माझ्याच या घरांत हा दादा आत्महत्येचा सल्ला देतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. अश्रू ढसाढसा वाहत होते पण तोंडातून शब्द निघत नव्हता. आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी ती मोहन‌कडे परतली.
    सख्खा भाऊ असा बोलतोय मग इतर नातलगांना सांगून काय फायदा म्हणत ती आहे त्या परिस्थितीला सामोरे जात होती.

    परत तेच मोहनचे टोमणे, मारझोड सहन‌ करत तिचा संसार सुरू होता. मुलगा भराभर मोठा होत होता. त्याच्यासाठी का होईना आपण जगायला हवं म्हणून ती सगळं सहन करत होती.
    आपली जरा आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने लहान मुलांना शिकवणी, खाणावळ चालवणे यांसारखे उद्योग करण्याचा प्रयत्न केला पण मोहनने त्यावर पाणी फेरले. कुणाचा जराही पाठींबा नसताना स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे तिचे प्रयत्न असफल झाले.
    भाऊ वहीणीचे इतके सगळे बरेवाईट अनुभव आले तरी बहीणीची माया म्हणून ती दर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला माहेरी जायची. वरवर का होईना पण एक दिवस तरी भाऊ बहिणीच्या नात्यात तिला गोडवा जाणवायचा. परिस्थिती वाईट आहे, आपले भाऊ वाईट नाही असाच विचार ती करायची. माहेरी आली की बालपणीच्या आठवणीत क्षणभर रमून जायची आणि आई बाबांच्या हार घातलेल्या फोटोंना नमन करून भरल्या डोळ्यांनी सासरी परत जायची.

    अशातच नलिनीचा मुलगा बारा वर्षांचा झालेला. आता मोहन‌चा व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नव्हता. त्याने नलिनीच्या मागे एक वेगळाच तगादा लावला. तो‌ तिला म्हणायचा की तुझ्या माहेरी आता आई वडिल तर नाहीत तेव्हा आहे ती मालमत्तेच्या वाटण्या करून तू तुझा हिस्सा माग.
    तिन्ही भावंडांचे लग्न, शिक्षण , वडिलांचे आजारपण यात होते नव्हते ते पैसे गेले याची तिला जाणीव होती. होते फक्त त्यांचे राहते घर. त्यातही भावांचे मन दुखावून काहीही हिस्सा वगैरे नको होता पण मोहन मात्र हात धुवून तिच्या मागे लागलेला. मोहनला नाही म्हंटले की तो तिला मारझोड करत शिवीगाळ करायचा. या अशा वातावरणात मुलाला ठेवले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करून मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तिने मुलाला होस्टेलमध्ये ठेवले होते.
    दिवाळी झाल्यावर मुलगा होस्टेलमध्ये परत गेला आणि नलिनी भाऊबीज साजरी करण्यासाठी माहेरी निघाली.

    ती मालमत्तेच्या वाटण्या, हिस्सा मागणे याविषयी भावांना काही एक बोलणार नव्हती. दोन दिवस आनंदात माहेरी राहून परत यायचे, मोहन‌ला काय करायचं ते करू दे पण मला हे दोन दिवस मिळणारं माहेरपण जपायला हवे. उगाच पैशावरून भाऊ बहिणीच्या नात्यात फूट नको असेच तिने मनोमन ठरवले होते.

    रिक्षावाला म्हणाला, “ताई, इथेच उतरायचं ना तुम्हाला. ”
    त्याच्या बोलण्याने ती विचारांमधून बाहेर आली, रिक्षातून उतरून घरात जाताना परत एकदा त्याच बालपणीच्या आठवणीत क्षणभर हरवली.

    समाप्त!

    अशी ही नलिनीच्या आयुष्याची व्यथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
    खरंच आई वडील असेपर्यंत हक्काने वावरता येणारे माहेर त्यांच्या नसल्याने पोरके झाले की मनाची काय अवस्था होत असेल याचा अनुभव नलिनी प्रमाणे अनेक भगिनींना येतो.
    अशा बर्‍याच मुली आपल्या आजूबाजूला आहेत ज्या मोहन सारख्या नवर्‍याचा छळ सहन करत संसाराचा गाडा चालवताना दिसतात. पैशासाठी, हुंड्यासाठी बराच त्रास सहन करतात.
    छळ सहन करायला नको म्हणून अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी धडपड करताना कधी कधी मार्ग सापडत नाही. अशा वेळी आहे त्या परिस्थितीला शरण जातात.
    यासाठी आई‌ वडिलांनी मुलींना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे, अन्याय सहन‌ न करता परिस्थितीशी लढायला शिकविणे खूप गरजेचे आहे.

    याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.

    लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

    © अश्विनी कपाळे गोळे

  • यशापयशाचे अवकाश

    डॉ. चिटणीस एक प्रसिद्ध समुपदेशक (काऊन्सेलर ). आज अमेयची अपॉइंटमेंट होती त्यांच्याकडे. अमेय विषयी संपूर्ण माहिती एकत्र करून बनविलेली फाइल असिस्टंट मनिषा  चिटणीसांना देत म्हणाली,
    “सर , अमेयचे आई वडील येत आहेत त्याला घेऊन. हि त्याची फाइल, त्याच्या घरच्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत परिस्थिती मी तुम्हाला सांगते.”
    मनिषा बोलू लागली, “सर, पेशंटचे नावं अमेय पटेल, वय वर्षे सोळा. हा अमेय म्हणजेच प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर शाम पटेल यांचा एकुलता एक नातू. शाम पटेल यांच्या मुलाने म्हणजेच अमेयच्या वडिलांनी परंपरागत उद्योग न चालवता वेगळे क्षेत्र निवडले, ते पेशाने मोठ्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मुलाने उद्योग सांभाळला नाही म्हणून त्यांचा मुलावर जरा राग होताच, पण माझा नातू माझा उद्योग सांभाळून घराण्याचे नावं अजून मोठे करणार म्हणत अमेयच्या बालवयापासून आजोबांनी त्याच्या मनावर उद्योग सांभाळण्याचे धडे रूजवायला सुरू केले. अमेयला कळत नसताना ते त्याला शाळेनंतर कंपनीत घेऊन जायचे, त्या वातावरणात राहून तो आपसूकच सगळं शिकेल असं त्यांचं मत. पुढे मेकॅनिकल इंजिनिअर होऊन उद्योग सांभाळण्यासाठी अमेयला तयार करायचे हे त्यांचं ध्येय बनलं पण अमेयला ह्या सगळ्यात आवड आहे की नाही याचा विचार त्यांनी कदाचित केला नाही. हि झाली आजोबांची बाजू, आजीला फारसे कळत नसल्याने आजी काही ह्यात बोलत नाहीत. दुसरी बाजू अमेयच्या वडिलांची, ते अतिशय हुशार नावाजलेले प्राध्यापक तेव्हा आपल्या मुलाने भरपूर मार्क्स मिळवून नाव कमवावे, मोठ्या आय आय टी सारख्या प्रसिद्ध कॉलेजमधून, परदेशातून शिक्षण घेत प्रगती करावी हे त्यांचे स्वप्न पण इथेही तेच झाले, मुळात अमेयची बुद्धीमत्ता, आवड याचा विचार दूरच राहिला.
    अमेयला मुळात आवड आहे ती क्रिकेटची. आजोबा आणि वडिलांच्या लपून छपून आईच्या मदतीने तो पूर्वी क्रिकेट खेळायला जायचा पण आता दहावी जवळ आली, अभ्यास वाढला म्हणून आईने वडील आणि आजोबांच्या धाकाने त्याचे खेळणे बंद केले. आता फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास असंच त्याच्या मनावर घरात प्रत्येकाने रुजवले. दोन वर्षांपासून त्याची इच्छा असूनही खेळणे बंद झाले.
    आजोबा म्हणायचे भरपूर अभ्यास कर तुला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे आहे तर बाबा म्हणायचे तुला आय आय टी मधून, नंतर परदेशातून शिक्षण घ्यायचे आहे. अमेय आता विचित्र परिस्थितीत अडकला होता, कितीही वेळ पुस्तकांमध्ये एकनिष्ठ झाला तरी त्याचा अभ्यास काही एका विशिष्ट पातळीच्या पुढे जात नव्हता. डोक्यावर अपेक्षांचे ओझे होते. अशातच त्याची दहावीची परीक्षा झाली, फार काही खास नव्हते गेले पेपर पण आता निकाल काय लागतो बघूया म्हणून तो सतत एका दडपणाखाली जगत होता. अशातच निकाल लागला, अमेय सगळ्या विषयात अगदी काठावर पास झाला, सरासरी चौरेचाळीस टक्के गुण मिळाले. ते गुण बघून तो रडू लागला. बाबांचे, आजोबांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही म्हणून खूप निराश झाला. आता घरच्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. घरातला प्रत्येक जण एकमेकांना दोष देत आपला राग अमेयवर काढत होता. बाबा म्हणे आईच्या लाडाने असं झालं तर आजोबा म्हणे बाबांच्या दडपणाखाली जाऊन असं झालं पण आपण सगळ्यांनीच त्याला समजून न घेता, आवड लक्षात न घेता त्याच्यावर अपेक्षांचे ओझे लादले हे मात्र कुणी मान्य करत नव्हते. अमेयला स्वतःला हरल्याची भावना मनात निर्माण झाली, त्याचा त्याला खूप त्रास झाला. आपण घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात असमर्थ ठरलो म्हणत तो एक प्रकारे डिप्रेशन चा शिकार बनला. या दिवसात कुणी त्याच्याशी नीट बोलले नव्हते. आजीचा, आईचा जीव तुटायचा पण ती परिस्थिती हाताळणे त्यांना जमले नाही. अमेय ने स्वतः ला एका खोलीत बंद करून घेतले, कुठल्यातरी औषधी गोळ्या त्याच्या हाती लागल्या आणि त्या सगळ्या गोळ्या एकावेळी खाऊन स्वतः ला संपविण्याचा प्रयत्न त्याने केला. काही वेळातच कामवाली ने खोली स्वच्छ करण्यासाठी दरवाजा ठोठावला पण आतून उत्तर मिळाले नाही म्हणून आरडाओरडा केला तेव्हा अमेयच्या घरच्यांना हा प्रकार कळाला. लगेच त्याला दवाखान्यात घेऊन गेले, त्यातून तो कसाबसा वाचला पण एका मोठ्या डिप्रेशन मध्ये तो अडकलाय. कुणाशीही न बोलता नजर स्थिर करून एकटक कुठे तरी बघतो. या सगळ्या प्रकाराने घरात प्रत्येकाला आपापली चुक कदाचित उमगली, त्यांनी त्याला खूप समजावले पण आता उशीर झाला आहे तो आमचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं त्याच्या घरचे सांगताहेत..सर इतकी माहिती मिळवली आहे मी… ”

    चिटणीस विचाराधीन होऊन मनिषाला म्हणाले, ” थॅंक्यू मिस मनिषा, अमेय आला की तुम्ही फक्त त्याच्या आई वडिलांना आत पाठवा ..आणि हो ड्रायव्हर ला गाडी तयार ठेवायला सांगा. मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन तासात कुणालाही अपॉइंटमेंट देऊ नका..”

    ओके सर म्हणत मनिषा केबिन बाहेर गेली. बाहेर अमेय आई बाबांसोबत आलेला होता. त्याच्याकडे मनिषाने  बघितले तेव्हाही तो एकटक खाली जमिनीकडे बघत होता, या उमलत्या वयात अशा परिस्थितीत अमेयला बघताच मनिषाला मनातून वाईट वाटले. त्याला इथेच थांबू द्या, तुम्ही दोघे आत जा, सरांना तुम्हा दोघांशी आधी बोलायचे आहे. अमेय कडे मी लक्ष देते म्हणत मनिषा ने मिस्टर  अँड मिसेस पटेलला आत पाठवले.

    मिस्टर पटेल काळजीच्या सुरात डॉ चिटणीस यांना‌ म्हणाले , ” सर, मी मिस्टर पटेल. तुम्हाला कदाचित अमेय विषयी कल्पना दिली मिस मनिषाने. खूप काळजी वाटते आहे आम्हाला त्याची. आम्ही कमी पडलो त्याला समजून घेण्यात पण आम्हाला तो हवाय सर.. प्लीज हेल्प..”
    “एस आय नो..मला अमेयची अवस्था कळाली‌ आहे. मी त्याला जरा बाहेर घेऊन जाणार आहे..तो इथे क्लिनिक मध्ये मला प्रतिसाद देण्याची शक्यता कमी आहे म्हणूनच दररोज दोन तास तो माझ्यासोबत एकटा असेल.. बाकी काळजी करू नका..आय विल ट्राय माय बेस्ट..” डॉ. चिटणीस.

    “बाहेर म्हणजे नक्की कुठे..तो तयार होईल यायला..” आई काळजीच्या सुरात म्हणाली.

    “ते तुम्ही माझ्यावर सोडा..” डॉ. चिटणीस.

    “ठिक आहे सर पण प्लीज त्याला यातून बाहेर काढा..” अमेयची आई कळकळीने सांगत होत्या.

    डॉ चिटणीस अमेयला घेऊन बाहेर जायला निघाले. वाटेत चिटणीस अमेयशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होते पण फार काही प्रतिसाद मिळत नव्हता. शहरातील एका मोठ्या स्पोर्ट्स क्लब मध्ये दोघेही पोहोचले. अमेय जरा निराशेने आजुबाजूला बघत होता. डॉ चिटणीस त्याला एका ठिकाणी बसवून  समोर सुरू असलेली बॅडमिंटन स्पर्धा दाखवत सांगत होते, “अमेय हा बघ केदार…माझ्या ओळखीचा आहे.. आम्ही शेजारी राहायचो पूर्वी..साधारण तुझ्याच वयाचा मुलगा तो..तो आणि मी छान बॅडमिंटन खेळायचो सकाळी बरोबर सहा ते सात. न चुकता माझ्या आधी हजर असायचा, मलाही आवडतं बॅडमिंटन खेळायला आणि त्यालाही. तो मात्र माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मस्त खेळायचा. मागच्या वर्षी दहावीला होता, फार काही चांगले गुण मिळाले नाही, घरच्यांचे खूप बोलणे खाल्ले पण जिद्दीच्या जोरावर राज्य पातळीवर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली त्याची, जिंकून आला. त्याच अभिनंदन करायला गेलो तेव्हा म्हणाला , “काका, तुमच्यामुळे दररोज तासभर प्रॅक्टिस व्हायची आणि नंतर शाळेत खेळायला सुरु केले. घरी माहिती नव्हते त्यात कमी गुण मिळाले तेव्हा खूप निराश झालो पण मूळात माझं ठरलं होतं क्रिडा क्षेत्रात करिअर करायचं, मग काय नाव नोंदविले राज्य स्तरीय निवड समिती मध्ये. घरच्यांचा विरोध होता पण त्यांचा विरोध सांभाळत खेळत गेलो. बॅडमिंटन हे माझं स्वप्न माझं ध्येय होतं..आज मी राज्य पातळीवर नावं कमावलं…”
    अमेय तुला सांगतो त्याने हे सगळं करताना अभ्यास केलाच पण कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. आता लवकरच तो अठरा वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहे..त्याचीच तयारी करतोय तेही शाळा सांभाळून.

    अमेय हे सगळं ऐकून चकित होत केदार कडे बघत होता. त्याने स्वतः ला केदारच्या जागी ठेवून बघितले. इतर कुणाचाही विचार न करता क्रिकेट मध्ये नाव कमवायचे असं ध्येय ठेवून आपण खेळलो तर आपणही केदार प्रमाणे एक ओळख बनवू शकतो हे त्याला मनोमन वाटले.
    नंतर चिटणीस त्याला क्रिकेट ग्राउंड कडे घेऊन गेले, तिथल्या कोच सोबत बोलून अमेयच्या हातात बॅट दिली. अमेय निराशेने बॅट कडे बघत होता पण चिटणीस आणि कोच यांच्या आग्रहानंतर त्याने बॅट हातात घेतली. त्याची आवड होती ती, ध्येय होतं जे घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलं होतं. आज जशी बॅट हातात आली तसेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो फटाफट बॉल उडवत खेळण्यात मग्न झाला. त्याला असं बघून चिटणीस मनोमन आनंदी झाले, त्याचा खेळतानाचा एक व्हिडिओ त्यांनी तयार केला. दोन तास त्या स्पोर्ट्स क्लब मध्ये घालवून दोघे परत निघाले. अमेय आता जरा बोलू लागला. क्रिकेट मधलं त्याच सखोल ज्ञान चिटणीस यांना तो ऐकवू लागला. चिटणीस त्याची प्रशंसा करत त्याचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. क्लिनिक आले तसेच तो परत निराश झाला, परत घरी जायची त्याला जराही उत्सुकता नव्हती. चिटणीस त्याला आता केबिनमध्ये घेऊन गेले आणि परत केदार विषयी आठवायला लावले. चांगल्या गोष्टींना सगळीकडून विरोध हा होत असतो पण असं निराश न होता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे कधीही चांगले हे त्याच्या मनावर रुजवले.
    आता उद्यापासून दररोज दोन ते तीन तास स्पोर्ट्स क्लब मध्ये जायचे मनसोक्त खेळायचे, लक्षात ठेव तुला या क्षेत्रात नावं कमवायचे आहे बरोबर ना..
    अमेय त्यांनां एक हलकी स्माइल देत म्हणाला , “हो सर.. खूप मोठा क्रिकेटपटू होणार मी.. जिद्दीने प्रयत्न करणार..आणि हो शिक्षण सुरू असेल सर… तुम्ही सांगितल्या प्रमाणे. 🙂”
    “ग्रेट.. खूप शुभेच्छा तुला.. आणि हो उद्या परत जाऊया आपण आजच्या जागेवर..उद्या तुझी नोंदणी करायची आहे स्पोर्ट्स क्लब चा मेंबर म्हणून..”

    अमेयच्या आई वडिलांना आत बोलावून चिटणीस त्यांना व्हिडिओ दाखवत म्हणाले, “हे बघा आपला अमेय..आज मनसोक्त खेळला.. पुढचे काही दिवस मी त्याला तिकडे घेऊन जाईल..त्याच ध्येय आहे क्रिकेटपटू बनण्याचे..त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत केली तर तो नक्कीच यातून बाहेर पडेल.. राहीला प्रश्न शिक्षणाचा तर तो‌ आय आय टी मधून शिकला नाही तरी साध्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करून का होईना पण तुमचं नाव नक्कीच मोठं करेल..कमी वयात काय कमाल ज्ञान आहे त्याला क्रिकेट बद्दल…”

    त्यावर आई बाबा म्हणाले, “आम्ही नक्की त्याला सपोर्ट करू..आम्हाला तो हवाय बाकी काही नाही..आमची चूक कळली आम्हाला.. आमच्यामुळे, आमच्या अपेक्षांमुळे आम्ही मुलाला गमावून बसलो असतो.. कधीही स्वतः ला माफ करू शकलो नसतो..त्याच्या आजोबांना ही धक्का बसला अमेय ची अवस्था बघून..तेही आजारी आहेत..आता आम्ही नव्याने सुरुवात करणार अमेय साठी..त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी..”

    अमेय ला घेऊन आई बाबा घरी आले. आता दररोज खेळण्याचा कार्यक्रम सुरू झाला तसाच तो डिप्रेशन मधून बाहेर पडायला लागला. घरीही प्रत्येकाने त्याला समजून घेत शक्य ती मदत केली.

    यश अपयश हे केवळ पेपरवर लिहिलेले मार्क बघून ठरवता येत नाही तर मुळात मुलांच्या आवडी लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना मदत करून त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरीत करता येते. अमेय थोडक्यात बचावला , नव्याने जगायला लागला. आवडीनुसार क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडू लागला. पण अशे कितीतरी अमेय घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून स्वतःचा जीव गमावतात त्याचे काय..?

    खरंच पालकांची जबाबदारी आहे ती. मुलांची मनस्थिती समजून घेत योग्य मार्गदर्शन केले, त्यांची गुणवत्ता केवळ मार्क बघून न ठरवता त्यांचे ध्येय, स्वप्न लक्षात घेत त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर अशी परिस्थिती खरंच येणार नाही. त्यासाठी आपली मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे.

    © अश्विनी कपाळे गोळे

    मी लिहीलेला हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा 😊