“अय्या हीच का मोना, पंजाबी ड्रेस घालून आली लग्नात. होणार्या सासरची मंडळी भेटतील तर साडी नेसून जावं इतकं कसं कळत नसेल तिला. तुझी सून आतापासूनच मर्यादा ओलांडत आहे बघ रमा. तू तर म्हणाली होती की मुलगी संस्कारी घरातील आहे म्हणून. ” सुजयच्या काकू त्याच्या आईला म्हणाल्या.
सुजयच्या आईला ते ऐकून जरा अपमानास्पद वाटले. त्यांनी मोना ची घरी सगळ्यांशी ओळख करून दिली पण मनात मात्र काकूंचे वाक्य सतत बोचत होते. न राहवून त्यांनी मोनाला म्हंटले “अगं तू आमच्या घरची होणारी सून आहेस. साडी नेसून आली असती तर बरं झालं असतं, काय म्हणतील आता सगळे, लग्नाआधीच नावं ठेवायला सुरुवात होईल आता तुला आणि सोबतच मला.”
मोनाला ते ऐकून वाईट वाटले, त्यावर ती दबक्या आवाजात म्हणाली, “आई माझ्याकडे साडी ब्लाऊज तयार नव्हते. अचानकच लग्नाला यायचं ठरलं ना शिवाय मला दिवसभर साडी मध्ये सुचले नसते काहीच म्हणून ड्रेस घातला.”
सुजयच्या आई त्यावर काही न बोलता निघून गेल्या. घरी आल्यावर सुजयला ह्याविषयी त्यांनी सुनावले “आजकालच्या मुलींना कपड्यांचं भान नसतं, कुठे काय घालायचं कळतं नाही. लग्न व्हायच्या आधीच मला म्हणते साडी सांभाळायला दिवसभर सुचलं नसतं म्हणून. आम्ही नेसतोच ना नेहमी साडी, आम्हाला कसं जमतं साडी नेसून सगळं काम. कारणं आहेत नुसती.आता सगळे नातेवाईक नावं ठेवतील त्याचं काय”.
तर गोष्ट अशी आहे की मोना म्हणजे सुजयच्या बाबांच्या मित्राची मुलगी, दिसायला आकर्षक, हुशार, आत्मविश्वासू. सुजयला ती खूप आवडायची, दोघांच्याही घरी लग्नाची काही अजून तयारी नव्हती पण जुळवून ठेवायला काय हरकत म्हणून सुजयच्या बाबांनी त्यांच्या मित्राकडे मोना आणि सुजयच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. दोघांचेही कुटुंब पुण्यात स्थायिक झालेले, जरा मॉडर्न विचारांचे. दोघांच्याही घरी तशी काही हरकत नव्हती. अचानकच लग्न ठरले, साखरपुडा आणि लग्नाचे मुहूर्त चार महिन्यांनंतरचे होते. पुढच्याच तीन दिवसांत सुजयच्या नातेवाईकांकडे एक लग्न होते आणि त्यात सुजयच्या आईने आग्रहाने मोनाला बोलावून घेतले, कुटुंबात सर्वांशी ओळख करून देण्याच्या उद्देशाने. अचानकच सगळे ठरल्यामुळे मोना जवळ साडी, ब्लाऊज काहीच तयार नव्हते. ती छान गुलाबी रंगाचा पार्टी विअर पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. तिचा उंच बांधा, गोरा रंग, त्यात तिच्या लांबसडक केसांची हेअरस्टाईल सोबतच हलकासा मेकअप त्यामुळे ती अजूनच आकर्षक दिसत होती. तिला आज बघून सुजय अजूनच तिचा तिच्या प्रेमात पडला. सुजयच्या आईने तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले पण काकूंनी साडी नेसून आली नाही म्हणताच आईचं मत बदललं.
असं कपड्यांवरून कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवणे कितपत योग्य आहे. मोना नोकरी करणारी स्वतंत्र विचारांची, आई वडिलांनी तिला कधी कपड्यांच्या बाबतीत बंधन लादली नाहीत, कपड्यांवरून संस्कार ठरत नाही असे त्यांचे परखड मत होते, मोना समजुतदार होती, स्पष्टवक्ती होती. आई वडिलांचा तिच्यावर विश्वास होता आणि हे सगळे सुजयच्या घरच्यांच्या आधीच माहीत होते. लग्न ठरेपर्यंत त्याच्या आईला ह्या गोष्टीचा प्रोब्लेम नव्हता पण आता ती आपली सून होणार म्हणून त्यांच्या अपेक्षा बदलल्या होत्या त्याही नातेवाईक काय म्हणतील म्हणून.
असाच अजून एक किस्सा, नविन लग्न झाल्यावर आम्ही राहायचो तिथल्या घरमालकीण काकूंचा. काकू नेहमी नववारी साडीत असायच्या आणि त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला ती शोभून दिसायची. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आणि खाली घरमालक सोबतच बाजूला अजून एक कुटुंब भाड्याने राहायचे. काकूंची आणि माझी भेट दररोज सकाळी ,६ वाजता व्हायची. ती वेळ म्हणजे माझी आॉफिसला जाण्याची आणि त्यांची माॅर्निंग वाॅकला जाण्याची. त्या काही न बोलता फक्त माझ्या स्मितहास्यावर एक स्मितहास्य करायच्या. आमचं दोघांचं राहणीमान, आॅफिसमुळे दिसणारी धावपळ शिवाय मॉडर्न कपडे बघून काकूंना वाटायचे की मी घरी जेवण कधी बनवतच नाही, मला बनवायलाही येत नाही असं. एकदा घाईघाईने निघाले आणि टिफीन विसरले, मागोमाग नवरोजी आले टिफीन बॅग घेऊन तेव्हा काकूंनी आश्र्चर्यचकित होऊन विचारले “अगं, इतक्या लवकर सकाळी उठून तू टिफीन बनवला?” मी म्हणाले ” हो काकू, रोज दोघांचाही टिफीन बनवून निघते मी.” त्यावर त्या म्हणाल्या”अगं, मला वाटायचे तुला काही बनवता येत नाही, बाहेरच जेवत असाल तुम्ही. आमची सुनबाई तर अजून उठलीही नाही तू स्वयंपाक करून सगळं आवरून ६ वाजता ऑफिसला निघाली, खरंच विश्वास बसत नाही आहे गंं माझा. मी असं समजायचे की शिकलेल्या, नोकरी करणारर्या, जीन्स घालणार्या मुलींना घरची जबाबदारी, संसार नीट जमत नसेल पण तुला बघुन माझा गैरसमज दूर झाला बघ.” काकूंच्या बोलण्यावरून मनात विचार आला ” रहाणीमान, कपडे यावरून एखाद्याचं व्यक्तीमत्व ठरवणे खरंच योग्य आहे का.
ती माॅडर्न कपडे घालते , टिकली लावत नाही, मंगळसूत्र, जोडवे घालत नाही, अशा अनेक गोष्टींवरून व्यक्तीमत्व ठरवणे, सत्य परिस्थिती माहीत नसताना व्यक्तीला समजून न घेता नावं ठेवणे कितपत योग्य आहे.
कसे राहावे, काय घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्त्येकाच्या घरच्यांच्या आवडीनिवडीनुसार , परीस्थितीवर ते अवलंबून आहे. वरवर पाहता कुणाला हिणवणे, संस्कार काढणे खरंच खूप चुकीचं आहे.
कुठल्या वेळी काय घालायचं, कुठल्या पोषाखात आपण कम्फरटेबल आहोत हा विचार करून स्वत: त्या व्यक्तीला ते कळत असेल तर इतरांनी त्यावर चर्चा करणे खरंच योग्य नाही.
याविषयी प्रत्त्येकाचे मत वेगळे असू शकतात. कुणालाही दुखावण्याचा हेतू नसून केवळ कपड्यांवरून कुणाचेही व्यक्तीमत्व, संस्कार ठरवणे अयोग्य आहे हाच मूळ उद्देश.
तुमचे याविषयीचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा.
© लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. पोस्ट शेअर करताना नावासकट शेअर करावी.
– अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed