मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई...मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..”
मीनूच्या अशा प्रश्नाने रिता गोंधळली पण तिला ठाऊक होते, मीनू एक दिवस हा प्रश्न विचारणारच.
मीनू बाळ, आपण आता घरी जाऊ, मग सांगते मी तुला सगळं समजावून.. भूक लागली असेल ना माझ्या पिल्लाला. चला आधी घरी जायचं. ” – रीता
घरी आल्यावर जेवताना मीनू शाळेतल्या गमतीजमती सांगत असताना परत म्हणाली, “आई , माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात घरी बाबा सोबत खूप मज्जा करतो आम्ही, बाबा खाऊ आणतात, फिरायला घेऊन जातात..आई सांग ना गं माझा बाबा कुठे आहे..”
रीता – मीनू , अगं आपले बाबा ना खूप छान होते, सगळ्यांचे आवडते..मीनूचा तर खूप लाड करायचे ..आपल्या संपूर्ण देशाचे आवडते होते बाबा.. सगळ्यांचं रक्षण करायचे ते. आपला इतका मोठा देश, त्याच रक्षण करायला बाबा सारखे खूप जण असतात सीमेवर , शत्रू पासून आपल्या देशाला वाचवतात.. त्यांच्यामुळेच तर आपण असं मोकळं जगू शकतो, फिरू शकतो, सुरक्षित असतो. एकदा बाबा आपल्याला भेटायला येणार होते पण यायच्या काही दिवस आधीच शत्रूंनी हल्ला केला, बाबा खूप लढले त्यांच्याशी, बाबांसारखे खूप जण होते तिथे लढाई करायला शेवटी शत्रूला हरवले सगळ्यांनी मिळून पण आपले बाबा लढताना शहीद झाले. आता ते आपल्याला भेटू शकणार नाही पण आपले बाबा खूप शूर होते, ते अमर झाले आहे बाळा. इतरांचे बाबा घरच्यांचं रक्षण करतात पण आपले बाबा पूर्ण देशाचं रक्षण करायचे.. खूप धाडसी होते बाबा..”
मीनू – “आई, म्हणजे बाबा देवबाप्पा कडे गेलेत का..जशी आजी गेली..”
रीता – “हो बाबा देवबाप्पा कडे गेलेत पण बाबा अमर आहेत, ते तिथून तुला बघतात, त्यांना मीनूला शूर झालेलं, खूप शिकून मोठं झालेलं बघायचं आहे..ते आपल्या सोबत नसले ना तरीही आपल्या मनात बाबा जीवंत आहेत…”
मीनू – “मग मी पण आता शाळेत सांगणार, माझे बाबा खूपप शूर, धाडसी होते म्हणून , देशाचं रक्षण करायचे, शत्रू सोबत लढाई करायचे, अमर आहेत माझे बाबा.. सुपरमॅन पेक्षा स्ट्रॉंग होते बाबा..हो ना आई..
मला पण बाबांसारखं मोठं व्हायचं आहे… शूर व्हायचं आहे..”
मीनू बाबां विषयी ऐकून अल्बम मधले फोटो बघण्यात रमली पण रीता परत एकदा भूतकाळात शिरली.
रीता नुकतीच पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाली होती , तितक्यात महेशचे स्थळ आले. महेश सैन्यात होता. रूबाबदार व्यक्तीमत्व, घरी दोघे भाऊ आणि आई असंच छोटंसं कुटुंब. महेशचे वडील सुद्धा सैन्यात होते , एका चकमकीत ते शहीद झालेले. त्यांच्यामुळे महेशला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची, देशाची सेवा करण्याची जिद्द लागली होती. महेशचा मोठा भाऊ शेती सांभाळायचा.
मुलगा सैन्यात आहे म्हंटल्यावर रिताच्या आईला हे स्थळ मान्य नव्हते पण रिता चे मात्र स्वप्न होते एका फौजी ची अर्धांगिनी बनण्याचे. एकंदरीत परिस्थिती पाहता दोघांच्याही घरच्यांनी रिता आणि महेशचं लग्न ठरवलं.
लग्नानंतर नवलाईचे नवं दिवस संपत नाही तेच महेशला आणीबाणी मुळे सुट्टी रद्द करून तातडीने परत बोलवले गेले. महेश अचानक परत गेल्याने रीताला अस्वस्थ वाटत होते. नंतर काही महिन्यांनी तो रजेवर आला तेंव्हा मात्र ती जाम खुश होती. फौजी ची अर्धांगिनी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून ती खूप आनंदी होती पण सतत एक धाकधूक मनात असायची त्यामुळे अस्वस्थ सुद्धा होती. महेश रजेवर आला की जितके दिवस एकत्र राहता येईल ते आनंदात घालवायचे हेच आता महत्वाचं होतं.
अशातच त्यांच्या संसाररूपी वेलीवर नवीन फुल उमलण्याची चाहूल लागली. महेशाला फोन वरून ही गोड बातमी कळवली तेव्हा तो खूप आनंदी झाला.
सासूबाई, मोठे दिर, जाऊ आणि त्यांचा मुलगा सुयश असे सगळेच रीता सोबत घरी होते, सगळे तिची पुरेपूर काळजी घ्यायचे. बाळाचं आगमन झालं, काही दिवसांनी महेश बाळाला भेटायला आला. त्या गोड परीला बघताच पूर्ण जगाचा विसर पडला त्याला पण कुणाला माहीत होते की ही बाप लेकीची पहिली आणि शेवटची भेट असेल. रजा संपल्यावर तो परत गेला.
रिता आता मीनू मध्ये रमली होती, महेश पुढच्या सुट्टीला आला की तिघे छान मज्जा करायचं गोड स्वप्न ती बघत होती.
एक दिवस सकाळी टिव्हीवर बातमी झळकली “कश्मिर मध्ये आतंकी हमला, पाच जवान शहीद.” महेशची पोस्टींग आणि हमला झालेलं ठिकाण एकच आहे म्हंटल्यावर रीताची धडधड वाढली. सतत देवाचा धावा ती करू लागली. दिवसभर घरात सगळे अस्वस्थ होते. सायंकाळी घरातला फोन खणखणला तेव्हा सगळ्यांचीच धडधड वाढली होती. रिताने फोन घेतला, ज्याची भिती तेच घडलं, महेश शहीद झाल्याची बातमी मिळाली आणि रीताच्या पायाखालची जमीन सरकली.
एरवी सुट्टीचं नक्की नसल्याने इतका लांबचा प्रवास ट्रेनच्या वॉशरूम जवळ बसून करणारा महेश आज विमानाने गावी येणार होता, एरवी साधी चौकशीही न करणारे नातलग, शेजारीपाजारी आज महेशच्या हिमतीचे, त्याच्या धैर्याचे कौतुक करत डोळे पुसत होते, त्याच्या धाडसीपणा चे गोडवे गात होते. रिता मात्र मनातून खचली होती, वरवर स्वतः ची समजूत काढत असली तरी आयुष्याच्या या वळणावर, इवलीशी मीनू पदरात असताना महेश गेल्याने तिची काय मनस्थिती होती हे फक्त तिलाच कळत होतं. देशासाठी बलिदान दिलेल्या एका फौजी ची अर्धांगिनी असली तरी स्त्रिमनातल्या भावना तर सारख्याच असतात ना.
तिरंग्यात लपेटून आणलेला महेशचा मृतदेह बघताच तिचा बांध फुटला, इतका वेळ मनात दाटलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर आल्या.
महीनाभर सर्वत्र ही बातमी झळकली, सोशल मीडिया वर फोटो फिरले, देशातून अनेकांनी सहानुभूती दाखवली, काही जण भेटायला यायचे, सांत्वन करत महेशच्या हिमतीचे, धैर्याचे गोडवे गात रीताला नशीबवान सुद्धा म्हणायचे.
महिना लोटला तसेच सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. महेशची आई मोठ्या मुलामध्ये, नातवंडांमध्ये गुंतली, नातलग, शेजारीपाजारी सगळ्यांना हळूहळू दु:खाचा विसर पडला पण रीताचे काय…
तिला तिचा महेश आणि मीनूला तिचा बाबा परत मिळणार नव्हता.
मीनू कडे बघत रीताने स्वतः ला सावरलं, आता स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन तिने तालुक्याच्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. सैनिकांच्या घरच्यांना सरकारी मदत मिळत असली तरी आपण आपल्या पायावर उभे राहणे गरजेचेच. पदवीधर आणि सोबतच संगणकाचे ज्ञान असल्याने तिला नोकरी मिळाली. मीनू आणि सासुबाईंना घेऊन ती गाव सोडून तालुक्याला राहायला आली. बघता बघता मीनू सहा वर्षांची झाली. अजूनही महेशच्या आठवणी रीताच्या मनात ताज्या होत्या.
दोन वर्षांच्या संसारात दोन महिने सुद्धा महेश एकत्र घालवता आले नव्हते.
आजारपणामुळे सासूबाईंनाही देवाज्ञा झाली, मीनू त्यावेळी सहा वर्षांची होती. सगळे असूनही रीता आणि मीनू एकट्या पडल्या. मीनूला आजीचा खूप लळा होता, दिवसभर आजी सोबत घरी असायची ती, आजी देवाघरी गेली म्हणून सतत आजीची आठवण काढत रडायची. अशा परिस्थितीत घरची इतर मंडळी येत जात असायचे, सहानुभूती दाखवायचे. दिर जाऊ म्हणायचे आमच्या जवळ रहा पण त्यांनाही त्यांचा संसार आहेच तेव्हा कुणावर भार नको म्हणून रीता मीनू सोबत राहायची, सणावाराला दोघीही दिराकडे गावी जायच्या.
मीनूला शाळेतून नेणे आणणे पूर्वी आजी करायची पण आता आईची जबाबदारी वाढली होती. सकाळी कामावक्ष जाताना मीनूला शाळेत सोडायचं आणि शाळा सुटण्याच्या आत ती मीनूला घ्यायला हजर असायचं असं ठरलेलंच. आता मीनूला बर्याच गोष्टी कळू लागल्या होत्या. आई आणि मी इतकंच आपलं कुटुंब समजणारी मीनू आता मोठी होत होती, तिचे प्रश्न, उत्सुकता वाढत होती. सगळ्यांचे बाबा दिसतात मग आपले बाबा कुठे आहे हा प्रश्न मीनूला पडणे रीताला अपेक्षित होतेच आणि आज तो दिवस आला होता.
मीनूच्या बोलण्याने रीता भूतकाळातून बाहेर आली. मीनू मुळे काही काळ रीताला या जगाचा विसर पडायचा, मीनू चे उज्ज्वल भविष्य हेच रीता चे ध्येय होते.
फौजी असणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कुटुंबा पासून दूर राहून देशसेवेसाठी बलिदान देणारा खरंच शूर, धैर्यवान असतो. पण भविष्यात रीता सारखी वेळ कधीही येऊ शकते याची पुरेपूर कल्पना असताना त्याची अर्धांगिनी बनून राहणे हेही तितकेच धैर्याचे आहे. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा अशी वेळ येते, फौजी शहीद होतो तेव्हा काही दिवस, महिने त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूती, आदर , सांत्वन मिळते पण त्यांच्या अर्धांगिनी , मुलं ह्यांचं काय..
त्या अर्धांगिनीला किती बिकट परिस्थितीतून जावे लागते, एकटीला संसाराची धुरा सांभाळत मुलांचे संगोपन करून आयुष्य जगणे काय असते हे तिचे तिलाच कळत असते.
अशा समस्त भगिनींना सलाम. तुम्ही खरंच खूप धैर्यवान आहात.
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed