देशी अमेय विदेशी जेसिका

अमेय आज खूप अस्वस्थ होता. पर्यटकांकडे त्याचं फारसं लक्ष लागत नव्हतं. काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक विदेशी नंबर वरून त्याला फोन आला , त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, तो मनापासून आनंदी होता. जणू तो त्याचं गोष्टींची वाट बघत होता. अमेय एक देखणा, उंच बांध्याचा तरूण असून पर्यटकांचा मार्गदर्शक होता. सुशिक्षित असल्याने, इंग्रजी चांगले बोलत असल्याने विदेशी पर्यटक बहुदा त्याची मदत घेत असे. गोव्यात त्याचं एक टुमदार घर, जवळचं सुंदर अशी एक बाग होती शिवाय त्याचे आई-वडील एक गोवा स्पेशल जेवणाची खाणावळ चालवायचे. एकंदरीत सुखी कुटुंब. 

जेसिका, अमेरिकन तरूणी , दिसायला अगदीच गोड, नाजूक, बोलके डोळे, हसरा चेहरा. ती गोव्यात आली, सगळं नवीन असल्याने तिला मार्गदर्शक हवा होता, तेव्हा अमेय सोबत तिची ओळख झाली. तिचं ते निरागस सौंदर्य बघून अमेय तिला बघतचं राहिला. अनेक विदेशी पर्यटक यायचे जायचे पण जेसिका जरा वेगळी आहे हे त्याला जाणवलं. 

तिच्याशी बोलून कळाले की तिने भारतीय संस्कृतीबद्दल खूप काही वाचले आणि त्याच उत्सुकतेने डॉक्युमेंटरी करायला ती गोव्यात आली होती. तिथल्या ऐतिहासिक गोष्टी बघून सगळं तिला जाणून घ्यायचे होते. अमेय लहानपणापासून गोव्यात राहत असल्याने त्याला सगळी पुरेपूर माहिती होती. तिला मदत करायला तो आनंदाने तयार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे दोघे भेटले, तो तिला आधी जवळच्या चर्चमध्ये घेऊन गेला. तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती. तिचं हसणं, बोलणं त्याला एका मोहात पाडत होतं. लगेच तो भानावर आला, तिला एक एक करून ऐतिहासिक ठिकाण दाखवून त्याची पुरेपूर माहिती देत होता, तीसुद्धा तिच्याजवळच्या कॅमेरात सगळं कैद करत होती. प्रत्येक ठिकाणी मग दोघांचा एक फोटो ती काढायची. दिवसा काही ठिकाणी भेट दिली की मग सायंकाळी सुर्यास्ताला तो तिला दररोज वेगवेगळ्या समुद्र किनारर्यावर घेऊन जायचा. त्यावेळी समुद्र किनारा, मोहक वातावरण दोघेही खूप आनंदात अनूभवायचे. तिलाही त्याच्यासोबत खूप मज्जा यायची. मग थोडावेळ किनार्यावर बसून ते गप्पा मारायचे, एकमेकांविषयी सांगायचे. दोघांची छान मैत्री झाली. अधूनमधून तो तिला त्याच्या घरी घेऊन जायचा, तिला त्याचं ते निसर्गरम्य परिसरात असलेलं घर खूप आवडायचं. नंतर तो तिला हॉटेलमध्ये सोडायचा. असं सगळं महिनाभर चालत राहिलं. 

एक महीना अगदी आनंदात गेला. तिची परत जायची वेळ आली. तो तिला सोडायला एयर पोर्टला गेला. तिला सोडून येताना तिच्या आठवणी, तिचा तो सुंदर हसरा चेहरा त्याच्या नजरेतून जात नव्हता. तिच्या आठवणी त्याला व्याकूळ करत होत्या. दिवसा कसंबसं काम करून सायंकाळी दोघांचे सोबतचे फोटो बघत तो 

किनार्यावर बसून असायचा. पर्यटकांना घेऊन कुठल्याही जागी गेला की तिच्या आठवणी त्याला त्रास द्यायच्या.

याआधी त्याची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. तो तिच्यात खूप गुंतला होता, तिच्या प्रेमात पडला होता. 

त्याच्या आई-वडिलांना सुद्धा त्याच्यातला हा बदल जाणवत होता. 

तिच्या फोनमुळे तो मनोमन आनंदी झाला. ती पुन्हा एकदा भारतात येत असल्याचे तिने सांगितले तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तीला यावेळी मुंबई, दिल्ली, आग्रा येथे ऐतिहासिक ठिकाणी जायचे असल्याचे तिने सांगितले, तेव्हा आपणही जेसिका सोबत सगळीकडे जायचे असे त्याने ठरवले. तीलाही तसे सांगितले, तो तिला मुंबई एयर पोर्ट वर घ्यायला जाणार असे ठरले. आता तिच्या येण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. ती आली की तिच्यासोबत छान वेळ घालवायचा, तिच्यावरचं प्रेमही व्यक्त करायचं असं त्याने ठरवलं. ती अमेरिकन असल्याने तिचं मत यावर काय असेल, ती आपल्याला फक्त मित्र मानत असेल का अशे विचार त्याच्या मनात येवू लागले. तीचं जे काही मत असेल ते आपण स्विकारायचं असं त्याने मनोमन ठरवले. आपलं प्रेम असलं तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे हे त्याला माहीत होते. त्याला आता तिच्यासोबत मिळालेले क्षण आनंदाने घालवायचे होते, त्या सुंदर आठवणी मनात जपून ठेवायच्या होत्या. आणि तिने जर प्रेम स्विकारलं तर त्याहून आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी कुठलीचं नव्हती.

तिच्या येण्याचा दिवस कधी येतो, तिला मी कधी एकदा भेटतो अशी उत्सुकता आता त्याच्या मनाला लागली. 

अमेयची उत्सुकता आता अजूनच वाढली.

त़ो दिवस आला, अमेय जेसिकाला घ्यायला मुंबई एयर पोर्टवर गेला, तिला बघून त्याला खूप आनंद झाला, मनोमन एक समाधान त्याला वाटले. तीला घेऊन तो हॉटेलमध्ये गेला. तिच्या रूममध्ये तिला सोडून तो जवळच्याच एका लॉजवर गेला. विश्रांती घेवून झाली की फोन कर असे सांगून तो निघाला. ती महिनाभर भारतात थांबणार होती. हा एक महीना कधी संपूच नये असे त्याला वाटत होते. सायंकाळी जेसिकाचा फोन आला, अमेय

तिला हॉटेलजवळच भेटला. दोघेही जवळपास असलेल्या समुद्र किनारर्यावर फेरफटका मारायला निघाले. दुसऱ्या दिवशीपासून मुंबईत प्रसिद्ध ठिकाणांवर आठवडाभर भेट देऊन मग दिल्लीला जायचे असे ठरले.

ती गेल्यावर तिची खूप आठवण आल्याचे त्याने तिला सांगितले. त्यावर त्याला बघून तिने फक्त स्मित केले. तिलाही ते गोव्यात घालवलेले दिवस नेहमी लक्षात राहील असे तिने सांगितले. तो एक पुर्ण महीना सगळं सोडून आपल्यासाठी आला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिने ओळखले होते. दुसऱ्या दिवशीपासून ठरल्याप्रमाणे दोघे एक एक करून मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांवर जात होते. गोव्याप्रमाणेच मुंबईतही ती सगळी माहिती गोळा करत तिथलं सगळं कॅमेरात कैद करत होती. अमेय यात तिला मदत करत होता. प्रत्येक ठिकाणी दोघांचा सोबत फोटो ठरलेलाच होता. 

आठवडा कसा गेला कळत नव्हतं, मग दोघे दिल्लीला गेले. दोघांनीही एकमेकांचा सहवास खूप आवडत होता. ते दिवस तो खूप एन्जॉय करत होता. भराभर दिवस पुढे जात होते. त्यानंतर आग्र्याला गेल्यावर ताजमहाल बघून झाल्यावर मन पक्क करून तिला आपल्या तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायचं ठरवलं. जेसिका मला तू खूप आवडतेस, तुला भेेटल्या पासून माझ्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण आले , माझं आयुष्य बदललं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला तुझं संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवायला आवडेल का, असं अमेय मनातलं सगळं बोलून गेला. तुझं मन मला त्यादिवशी फोनवर बोलतानाच कळाले असल्याचे तिने सांगितले. कुणी आपल्यासाठी महिनाभर सगळं सोडून यायला असं क्षणात तयार होतं, तेव्हा त्याचा बोलण्यातली उत्सुकता याची तिने त्याला आठवण करून दिली.

त्यालाही ते जाणवलं. तो थोडासा लाजला. अर्थातच दोघांच संभाषण इंग्रजीतून होत असे. त्यामुळे त्याचा इंग्रजीवरचा आत्मविश्वास वाढला होता. तेही त्याने तिला सांगितले. अजून तिने उत्तर दिले नव्हते, तो जरा कासावीस झाला. ती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होती.

अमेय तू खुप हुशार आहे, तुझ्यात खूप आत्मविश्वास आहे, तुला फक्त गोव्याचेच नाही तर सगळ्याच ठिकाणांचे, बऱ्याच विषयाचे ज्ञान आहे. तू आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो आणि त्यासाठी मी तुला मदत करेल. मला आवडेल तुझ्यासोबत आयुष्य घालवायला. जेसिकाच्या या बोलण्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आनंदी झाले. त्याने तिचा हात हातात घेतला, तिच्या डोळ्यात फक्त तो बघत राहिला. त्याला आनंदाच्या भरात काही सुचत नव्हते.

ती परत जाण्यापूर्वी दोघांनी गोव्यात जाऊन अमेयच्या आई-वडिलांना सगळं सांगायचं असं ठरलं.

त्याच एकूण सगळं ज्ञान, आत्मविश्वास बघता अमेरिकेत हिस्टोरिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये करीयर घडवायचे तिने सुचवले, त्यालाही ते पटले. शिवाय त्या विषयावर व्याख्यान द्यायला जाता येयील, तुझ्यातल्या विद्वत्तेमुळे तूं नक्कीच खूप पुढे जाऊ शकतो हेही पटवून दिले. तो खूप हुशार होता पण यादृष्टीने त्याने कधी विचारच केला नव्हता. 

दोघे गोव्यात आले, अमेयच्या आई-वडिलांसोबत सगळी चर्चा केली. आपला मुलगा यशस्वी होणार असेल तर तो अमेरीकेत जाण्याबद्दल आम्हाला काही अडचण नाही. अनेक भारतीय मुले नोकरी करत असताना विदेशात जातातच त्यामुळे यात काही वावगं नाही असे त्यांनी सांगितले. शिवाय जेसिकाला स्विकारायलाही ते तयार झाले. सगळ्या गोष्टी अमेयच्या मनाप्रमाणे होत गेल्या. आई-वडीलांनी इतक्या सहज सगळं समजून घेऊन असे बोलल्याने अमेय खुप सुखावला. दोघेही खूप आनंदात होते. त्याचं नोकरीचं ठरल्याप्रमाणे झालं की दोघांचं लग्न करायला हरकत नसल्याचेही त्याला वडीलांनी सांगितले. पण तिच्या घरच्यांना हे पटेल का ही शंकाही त्यांनी दर्शविली. ते तयार व्हायला काही अडचण नसल्याचे जेसिकाने सांगितले. 

जेसिकाला परत जायची वेळ आली. तो तिला मुंबईत एयर पोर्टला सोडून आला. फोनवरून दोघे संपर्कात होतेच. पुढच्या काही दिवसांतच तो अमेरिकेत जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची जुळवाजुळव करू लागला. लवकरच तिथे जाऊन जेसिकाच्या आई-वडीलांना भेटायचं आणि नोकरीचं बघायचं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. अमेरिकेत जरी राहिलो तरी दरवर्षी एक महिना आपण गोव्यात घालवायला असे त्यांनी ठरवले. नोकरीसाठी सगळी माहिती काढून त्यानुसार त्याची तिही तयारी सुरू होती. त्याला जेसिकामुळे जगण्यातला अर्थ कळाला होता. तिच्या येण्याने त्याचं आयुष्य पुर्णपणे बदललं होतं. एक वेगळाच आत्मविश्वास त्याला आला. आपल्याला नोकरी नक्कीच मिळणार याची त्याला खात्री होती. 

सगळ्यात महत्त्वाचं त्याला त्याचं प्रेम मिळालं होतं. काही महिन्यांतच त्याच्या सगळ्या फॉर्म्यालिटी पूर्ण झाल्या आणि दोन आठवड्यांसाठीचा व्हिजा मंजूर झाला. सगळं अगदी सहज जुळून येत होतं. तो खूप आनंदी होता. तो अमेरिकेत गेला, तिथे जेसिका त्याला भेटायला आली. तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या आई-वडिलांना तो भेटला. त्यांच्याबद्दल तिने खूप काही सांगितले असल्याचे तिच्या वडिलांकडून कळाले. त्यांना अमेयला भेटुन खूप आनंद झाला. वेळ न घालवता त्याने काही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज दिले. जेसिका त्याला मदत करत होती.तसे त्याने इकडे येण्यापूर्वीच आॅनलाइन अप्लीकेशन काही ठिकाणी पाठवले होते. आता पुढे सगळं सुरळीत होईल अशी त्याला खात्री होती.

सर्वात महत्त्वाचे त्याला त्याचे प्रेम मिळाले होते. त्याचं आयुष्य पुर्णपणे बदललं होतं. त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण आलं होतं. आता बाकी सगळं सुरळीत होणारचं होतं, त्याचं प्रेम आता त्याच्या सोबत होतं.

दोघ वेगवेगळ्या देशातील असले तरी भावना मात्र सारख्याच होत्या. लवकरच ते दोघे जेसिकाच्या आई-वडीलांसोबत गोव्यात येऊन लग्न करणार होते. अमेयने जेसिकाच्या प्रेमाला जिंकले होते. जेसिकाचही अमेय वर तितकंच प्रेम होतं. अशी ही दोघांची आगळीवेगळी प्रेमकथा होती. 

अश्विनी कपाळे गोळे