Tag: Relations

  • लग्नातली बेडी… भाग १

    नैना आणि राज च्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू होती.
    राज सरपोतदार नावाप्रमाणेच राजबिंडा, श्रीमंत नावाजलेल्या घराण्यातला, घरी मोठा व्यवसाय, घरी सगळ्या कामाला नोकरचाकर.
    नैना‌ सुद्धा साजेशा कुटुंबातील सौंदर्यवती, उच्चशिक्षित, चेहऱ्यावर आत्मविश्वास. नावाजलेल्या दोन्ही घराण्यांच्या ओळखीतून दोघांचा विवाह मुला मुलीच्या पसंतीनुसार घरच्यांनी ठरविला, अगदी राजेशाही थाटात साजरा करण्यासाठी सगळी तयारी सुरू होती. 
    तीन दिवसांपासून लग्नातील प्रत्येक विधी अगदी धूमधडाक्यात सुरू होता. हळद, संगीत, पांढर्‍याशुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक अगदी सगळं बघण्या सारखं. सगळ्यांच्या चर्चेत नैना आणि राज च्या लग्नाचा विषय होता गेल्या काही दिवसांपासून. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    मागच्या कित्येक महिन्यांपासून सगळी तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्याप्रमाणे लग्नमंडपात नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत पोहोचली. अगदी एखादा राजकुमार घोड्यावर स्वार होऊन अवतरला असाच भास होत होता त्याला नवरदेवाच्या पोषाखात बघून.
    त्याच्या स्वागताला नगारे, बॅंडबाजा, वधू पक्षातील मंडळी, सगळा प्रसंग टिपून घेण्यासाठी चौफेर कॅमेरे, वरच्या दिशेवरून द्रोण कॅमेरे, लग्नमंडपात मोठ्या स्क्रीनवर सगळे दृश्य प्रोजेक्टर वर दिसत होते. सगळीकडे धामधूम, उत्साह, नवरदेवाची धडकेबाज एंट्री त्या लग्नमंडपात झाली. तो स्टेजकडे मोठ्या थाटामाटात जायला निघाला. दोन्ही बाजूंनी गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू होता. अगदी एखाद्या चित्रपटातील लग्नाची दृश्य बघतो तशी सगळी जय्यत तयारी केली होती वधू पक्षाने.
    राज स्टेजवर येऊन उभा झाला, मागोमाग नैना वधूच्या वेशात अगदी एखादी अप्सरा जणू त्या डोलीतून राजकुमाराला भेटायला येत होती. तिचं अप्रतिम रूप बघता सगळे वधूच्या सौंदर्याचं कौतुक करीत होते.
    दोघेही स्टेजवर आले, आता अंतरपाट धरून मंगलाष्टक सुरू होणार तितक्यात त्या लग्नमंडपात एक खळबळ उडाली, एक जखमी अवस्थेतील  तरुणी पोलिसांना घेऊन त्या मंडपात आली. तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, कशीबशी ताकद गोळा करून ती स्टेज कडे येऊ लागली. सोबतीला काही पोलीस, एक‌ महीला पोलिसही होती.

    हा काय प्रकार आहे, कोण आहे ही , आत कशी आली अशा‌ प्रश्नांनी अख्खा लग्नमंडप गोंधळला. नवरदेवाच्या वडीलांनी पोलिसांकडे बघत पुढे येत प्रश्न केला, “कोण आहे ही, माझ्या मुलाच्या लग्नात हा काय प्रकार आहे. तुम्हाला माहीत आहे ना मी कोण आहे.”

    पुढे काही बोलण्याआधीच एक पोलिस निरीक्षक म्हणाला, ” मिस्टर सरपोतदार, तुमच्या मुलाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहेत, आम्हाला त्याला अरेस्ट करावं लागेल.”

    “व्हाट नॉनसेन्स, माझ्या मुलाच्या लग्नात तुम्ही असा अडथळा आणू नका. काय मॅटर आहे, आपण आपसात मिटवूया..”

    “हॅलो मिस्टर, पोलिसांच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका. हे लग्न होणार नाही. आमच्याकडे अटक वारंट आहे.”

    सगळा प्रकार बघून राज ही तिथे आला, मागोमाग नैना सुद्धा आली. त्या तरूणीच्या डोळ्यात एक प्रचंड राग दिसत होता.
    राज ला समोर बघताच ती चिडून म्हणाली , “हाच तो राक्षस मॅडम, माझं आयुष्य बरबाद करुन इथे मज्जा करतोय..सोडणार नाहीये मी ह्याला.. नैना, तू हे लग्न करू नकोस… धोकेबाज आहे हा राज… आयुष्य उध्वस्त केलं माझं…”

    तिचं बोलणं मध्येच बंद करत राज “काय…कोण आहेस तू..बाबा, नैना हि मुलगी कोण कुठली माझ्यावर वाट्टेल ते आरोप करते आहे…हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही.. अशा मुली पैशासाठी कुणाच्या सांगण्यावरून असं करतात..बाबा हे नक्कीच आपल्या शत्रूचं कारस्थान आहे.. पैसे देऊन पाठवलं असणार हिला कुणी तरी लग्नात विघ्न आणायला..”

    (महिला पोलिस राजला उद्देशून )-” शट अप मिस्टर राज, आमच्याकडे तुमच्या विरुद्ध तक्रारच नाही तर पुरावे सुद्धा आहेत. यू आर अंडर अरेस्ट (राजच्या दिशेने बेड्या पुढे करत ) ”

    “बाबा, तुम्ही बोला‌‌ ना, कुणीतरी मला‌ फसवत आहे, काही तरी करा बाबा. “‌ राज वडिलांच्या दिशेने जाऊन.
    नैनाच्या वडिलांना होत असलेला प्रकार बघून भयंकर संताप आला, ते चिडून राजच्या वडिलांना म्हणाले, “हा काय प्रकार आहे, तुम्ही आमची फसवणूक तर करत नाही ना, काही तरी नक्कीच लपवत आहात तुम्ही. कुठल्या गुन्ह्याच्या संदर्भात अटक करायला आलेत पोलिस. मान खाली घालायची वेळ आणली तुम्ही, कोण ही मुलगी..काय प्रकार आहे आम्हाला आता कळायलाच हवा..”

    राज चे वडिल नैना च्या वडिलांना, “तुम्ही काय बोलताय हे, इथे‌ आम्हालाच कळत नाहीये काय चाललं आहे ते, त्यात तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. कुणाचं तरी कारस्थान दिसतंय हे..”

    ती तरुणी त्यावर उत्तरली, ” मी सांगते ना, काय प्रकार आहे तर.. कुणाचही कारस्थान वगैरे नाही.. किंवा पैशासाठी केलेला प्रकार नाही.. पुरावे आहेत माझ्याकडे सगळे….राज आता तू सांगतोस की सांगू मी सगळ्यांसमोर..”

    राज आता जाम घाबरला, गोंधळलेल्या अवस्थेत काय बोलावं त्याला सुचेना. नैना‌कडे बघत तो म्हणाला, “नैना, तू ह्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मला फसविले जात आहे..”

    पोलिस‌ निरिक्षक – “राज, जे काही सारवासारव करायची ती आता पोलिस स्टेशन मध्ये…”

    राजच्या वडिलांनी त्या तरूणी कडे बघत, “थांबा इन्स्पेक्टर, मला ऐकायचं आहे हिच्याकडून काय आरोप आहे माझ्या मुलावर तर..खरं काय खोटं काय याची शहानिशा राज कडून मी इथेच करून घेईल..तो‌ जर खरच आरोपी असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जा त्याला नंतर..”

    लग्नमंडपात सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, क्षणात ते उत्साही वातावरण बदललं. दोन्ही कुटुंब एका वेगळ्याच काळजीत पडले, पुढे काय होणार आहे, ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आता त्या तरूणी कडे होते.

    क्रमशः

    पुढे काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच.

    कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • साथ लाभली वृद्धाश्रमाची…

    Momspresso नी दिलेल्या “एक वेळ अशी येते जेव्हा शब्दांची नाही तर सोबतीची गरज असते” या विषयाला अनुसरून एका स्पर्धेसाठी मी लिहिलेला हा एक लेख आहे.

    साठे आजींच्या आकस्मिक मृत्यू नंतर आजोबा अगदी एकटे पडले. साठे आजी आजोबा म्हणजे अगदी हसमुख, प्रेमळ जोडपं. दोघांची सत्तरी जवळ आलेली पण एकमेकांची थट्टा मस्करी मात्र अगदी लहान मुलांप्रमाणे.? एक दिवसही आजी आजोबांचे एकमेकांशिवाय काही पान हलत नव्हते. आजी जरा‌ कुठे बाहेर गेल्या की आजोबा घड्याळाकडे टक लावून बसायचे, कुणी मस्करी करत विचारलं की ,”आजोबा, किती काळजी करता हो आजींची, या वयात कुठे जाणार त्या पळून..येतीलच की घरी..?” त्यावर आजोबा म्हणायचे, “पळून जाणार नाही हो पण ती घरात नसली की घर कसं खायला‌ उठत बघा..ती प्राण आहे ह्या घराचा..”?
    आजी आजोबांचे प्रेम बघितले की खरंच खूप छान वाटायचे.
    साठे आजी आजोबांना दोन मुले, एक‌ मुलगी. सगळे लग्न होऊन आपापल्या संसारात व्यस्त. दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरात राहायला. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला सगळे गावी एकत्र यायचे. आजी आजोबा वर्षातून एकदा मुलांकडे जायचे. शहरी जीवन, बंदीस्त घर अशी सवय नसल्याने असेल किंवा मुलांच्या संसारात आपलं ओझं नको या विचाराने असेल पण आजी आजोबांना मुलांकडे काही करमत नसे.‌ दोघेही आयुष्यात खूप आनंदी होते.
    अशाच आनंदाला, आजी आजोबांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. अचानक एके दिवशी आजींना‌ हार्ट अटॅक आला आणि नियतीने त्यांना आजोबांजवळून हिरावून घेतले. आजीच्या अशा  आकस्मिक मृत्यूने आजोबा पार हादरले, आजीला बिलगून एखाद्या लहान बाळाप्रमाणे रडू लागले. “तू अशी मला‌ सोडून कशी गेलीस गं, तुला माहितीये ना तुझ्या शिवाय हे घर किती खायला उठत…माझा जराही विचार नाही केलास तू.. अशी अचानक साथ सोडली माझी…का गेलीस तू मला सोडून… सांग‌ना‌का गेलीस मला एकट्याला सोडून…?” या आजोबांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येक जण त्या दिवशी अश्रू गाळत होता.
    दोन्ही मुले, सुना , मुलगी, जावई, नातवंडे सगळे आजोबांना या धक्क्यातून सावरायला मदत करीत होते, आजीच्या जाण्याने घरातला प्रत्येक जण खूप दुखावला होता पण आजोबांची अवस्था बघून स्वतः चे दु:ख लपवून आजोबांना हिम्मत देत होते.
    मुलांच्या आग्रहाखातर आजोबा मोठ्या मुलाकडे रहायला गेले. मुलगा सून आणि एक नातू अशा त्या त्रिकोणी कुटुंबात आजोबांची भर पडली. मुलगा सून दोघेही नोकरीला, नातू शाळेत..आज़ोबा दिवसभर घरात एकटे.. काही दिवस कसेबसे काढले पण आता मात्र आजोबांचं त्या घरात काही मन लागेना… एकटेपणा, क्षणोक्षणी आजीच्या आठवणी त्यांना व्याकूळ करीत असे, मुलांना‌ सुनेला तेच ते मनातलं दुःख किती सांगायचं, आपल्यामुळे त्यांचा आनंद का हिरावून घ्यायचा असा विचार करणार्‍या आजोबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला, लहान मुलाने, मुलगी जावयाने आमच्या घरी या म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला‌ पण आजोबांना‌ मात्र कुणावर आपला भार टाकायचा नव्हता.
    आजोबांना या क्षणी कुणाच्याही सहानुभूतीच्या शब्दांची नाही तर एका सोबतीची गरज होती, अशी एक साथ हवी होती जी त्यांचं आजी गेल्यावरच दु:ख समजून घेईल, अशा जीवनाची साथ हवी होती जिथे मनातलं दुःख लपवत मनात आठवणींनी झुरत न‌ जगता , मनातले भाव व्यक्त करीत जगता येईल.. आजोबांनी निश्चय केला पुढचं आयुष्य वृद्धाश्रमात घालविण्याचा.
    मुलं, इतर नातलग म्हणायचे, ” आम्ही असताना‌ तुम्ही वृद्धाश्रमात जाणार, लोकं नावं ठेवतील आम्हाला.. आम्हाला काही अडचण नाही.. तुम्ही इथेच रहा.. ”
    आजोबा म्हणायचे ,”वृद्धाश्रमात काय घरचे सांभाळत नाही म्हणून जातोय मी असं नाही रे…मी पूर्वी यायचो तसा येत जाईल अधून मधून.. तुम्हीही येत जात रहा..आपण दिवाळीला एकत्र यायचो तसं आताही येऊच पण नेहमीसाठी नका बंधनात ठेवू रे मला..”
    आजोबांच्या बोलण्याने प्रत्येकाला कळून चुकले होते की ” आपण कितीही शाब्दिक आपुलकी दाखविली तरी आजोबांना एका सोबतीची गरज आहे, वृद्धाश्रमात त्यांच्या वयोगटातील अनेक वृद्ध होते..त्यांच्या सोबत काही काळ का होईना पण आजोबांना आजी नसल्याच्या दु:खाचा विसर पडे..त्यांचे त्या ठिकाणी बरेच मित्र मंडळ जमले.. एकमेकांच्या थट्टा मस्करी तर कधी जोडीदाराच्या आठवणी, कधी सुख दुःख वाटून घेत तर कधी भजन कीर्तन अशात आजोबा गुंतून गेले…आजी गेल्यानंतर जी सोबत त्यांना हवी होती ती या वृद्धाश्रमाने‌ त्यांना दिली.”

    असं म्हणतात की तरूणपणापेक्षाही उतारवयात नवरा बायकोला‌ एकमेकांच्या सोबतीची खूप गरज जाणवते, इतक्या वर्षांचा संसार, आयुष्यात आलेले सुख दुःख वाटून घेत, मुलांच्या जबाबदार्‍या सांभाळत एकत्र आयुष्य जगताना एकमेकांची खुप सवय झालेली असते.
    मुलं मोठी झाली, त्यांच्या संसारात गुंतली की आता आपण जबाबदारीतून मुक्त झालो, आता आपल्या दोघांचं आयुष्य जगायचं असाच विचार कदाचित येत असावा‌ त्यावेळी मनत. पण अशा या आयुष्याच्या वाटेवर जेव्हा जोडीदार एकटं सोडून जातो तेव्हा कशी अवस्था होत असेल ना‌ मनाची.
    तारूण्यात एक वेगळी उमेद असते, आई वडील, मुलं, प्रेम अशी जवळची नाती सोबतीला असतात शिवाय अंगात ताकद असते लढण्याची, पण उतारवयात जेव्हा असा एकटेपणा येतो त्या क्षणी कसं वाटतं असेल ते ज्याचे त्यालाच माहीत.
    इतक्या वर्षांच्या आठवणी, एकमेकांची‌ सवय, एकमेकांचा आधार अशा परिस्थितीत एकटेपणा आला‌ की नकोस वाटत असेल ना‌ आयुष्य..अशा वेळी शब्दांनी सांत्वन करणारे सगळेच असतात पण खरी  गरज असते सोबतीची.
    अशाच परिस्थितीत साठे आजोबांना साथ मिळाली वृद्धाश्रमाची, तिथल्या त्यांच्या वयोगटातील व्यक्तींची….
    वृद्धाश्रमाविषयी अनेक गैरसमज आहेत पण घरी कुणी सांभाळ करीत नाही म्हणून वृद्धाश्रमात जातात असंच नसून कधी कधी सगळे जवळ असूनही एकटेपणा वाटतो तेव्हाही साथ लाभते वृद्धाश्रमाची…तिथल्या मित्र मंडळाची…..

    या लेखातील विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही, याविषयी प्रत्येकाचे मत हे वेगळे असूच शकतात. ?

    लेखणाचे अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?

    © अश्विनी कपाळे गोळे

  • अनोळखी नातं..

    रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू खूश आहे हे ऐकून छान वाटले एवढंच तो बोलला. रीयाला त्याच्या बोलण्यात आज खूप फरक जाणवला. रीयाने विचारले, ‘”काय झालं अमेय, तू आज इतका शांत कसा , नेहमी तर माझी खिल्ली उडवत असतोस. मी किती अल्लड आहे हे मला पटवून देत असतोस, आज मी इतकी छान बातमी सांगितली पण तू मात्र आनंदी नाही असं वाटत आहे मला. सांग ना काय झाले, तू माझ्यासाठी खूश आहेस ना”.

    “रीया अगं मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, तुला हवा तसा जोडीदार तुला मिळाला हे ऐकून खरंच छान वाटले मला. तुझं जय बद्दलच वर्णन ऐकून तू आता अल्लड नसून मॅच्युअर झाली आहे हे मला जाणवलं. पण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता माझ्यासोबत जास्त बोलू शकणार नाही, माझे चांगले वाईट अनुभव, माझी प्रेमप्रकरणं आता मी कुणाजवळ सांगणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाची खिल्ली उडवणार मी म्हणून जरा उदास झालो एवढंच.” अमेय बोलला.

    अमेयचं उत्तर ऐकून रीयाला काय बोलावे कळत नव्हते, काही क्षण शांतता पसरली. एकीकडे आनंद तर एकीकडे मैत्री आता जरा कमी होणार म्हणून उदासीनता अशी दोघांची मनस्थिती झाली.

    आपली मैत्री अशीच राहणार असं म्हणत रीयाने शांतता दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अमेय तिला समजूत सांगत म्हणाला “रीया अगं तुझ्या आयुष्यात आता एक स्पेशल व्यक्ती आहे तो म्हणजे जय, तुझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पूर्ण आयुष्य तुम्ही एकत्र घालवणार आहे, आपल्या दोघांना माहित आहे की आपण खूप छान मित्र आहोत पण सगळ्यांना अशी मैत्री पटेल असं नाही. मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही, जय आणि तू हे दिवस खूप एंजॉय करा. आपल्या मैत्रीमुळे त्याला उगाच काही गैरसमज नको. अधूनमधून आपण बोलायला हरकत नाही पण नको तू छान वेळ दे त्याला, समजून घे जय ला आणि हो कधीही माझी आठवण आली, काहीही मदत लागली तर बिंदास सांग मला.” अमेयचं हे बोलणे ऐकून रियाने हो..चालेल.. बाय.. टेक केअर म्हणत फोन ठेवला.

    रीया आणि अमेय शाळेपासून चांगले मित्र मैत्रीण. अमेय अतिशय बिंदास मनमोकळ्या स्वभावाचा, बडबडा, नेहमी हसत खेळत, कॉमेडी मूड मध्ये असणारा पण सगळ्यांना मदत करायला तयार. रीया अगदी अल्लड, शांत, साधी भोळी मुलगी. रीयाला मित्र मैत्रीणी मोजकेच होते पण त्यात अमेय तिचा चांगला मित्र होता. त्याची सगळी प्रकरणं, मज्जा मस्ती तो तिला सांगायचा. रीया किती साधी भोळी आहे, तिला कुणी किती सहज फसवू शकतं ही जाणीव तिला करून द्यायचा. अमेयची गर्लफ्रेंड उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशी गेलेली त्यामुळे त्यांचं फार काही बोलून होत नसे पण तिची आणि अमेयची लव स्टोरी, त्यांची भांडणं, सरप्राइज अशे चांगले वाईट अनुभव तो रिया जवळ शेअर करायचा. रीया अमेय मुळ माणसं ओळखायला शिकली होती, कुठल्याही परिस्थितीत आनंदी कशे राहायचे हे तिला अमेय मुळे कळाले होते. इतके चांगले मित्र मैत्रीण असून एकमेकांचा आदर त्यांना होता, पवित्र अशी त्यांची मैत्री होती.

    फोन ठेवल्यानंतर रीया विचार करू लागली की मुलगा मुलगी ह्यांच्यात मैत्रीचं नातं नसू शकते का. लग्न होणार म्हणून अशी मैत्री अचानक कमी, का तर उगाच नवर्‍याला गैरसमज नको, तिला जरा विचित्र वाटले. आता आधी सारखा वेळ मित्र मैत्रीणी सोबत घालवता येणार नाही हे मान्य कारण आता नवं आयुष्य सुरु होणार, प्रायोरिटी बदलणार पण नविन आयुष्यात अशा मैत्रीमुळे गैरसमज नको हे तिला काही पटत नव्हते. ज्या पवित्र मैत्रीमुळे ती खरं जीवन जगायला शिकली, माणूस ओळखायला शिकली, कुणी आपली सहज फसवणूक करू शकते पण अमेय मुळे असं काही झालं नाही, बर्‍याच नविन गोष्टी अमेय मुळे आपल्याला कळायला लागल्या हे ती कधीच विसरू शकत नव्हती. असं हे नातं अनोळखी का आहे याचे उत्तर मात्र तिला मिळत नव्हते.

    तुमच्या मते या अनोळखी नात्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट मध्ये लिहा.

    – अश्विनी कपाळे गोळे