आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग दुसरा

Love Stories

     अमन आणि आरती एकाच वयाचे. आरती दिसायला सुंदर, उजव्या गालावर पडणारी तिची खळी कुणालाही वेड लावणारी. गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, साधं सरळ राहणीमान असलेली आरती अमनची बालपणीची मैत्रीण, दोघे दिवसभर एकत्र खेळायचे या अंगणात.  लहान असताना कधी मामांसोबत शेतात बैलगाडी सफर करायचे तर कधी मामा, आरतीचे बाबा यांच्यासोबत नदीवर पोहायला जायचे. प्रत्येक सुट्टीला आजोळी आल्यावर अमन आरतीला भेटायला अगदी आतुर असायचा. आरती सुद्धा मोठ्या उत्साहाने त्याची वाट बघायची. जरा वयात यायला लागल्यावर दोघांचे एकत्र खेळणे कमी झाले पण भेटीगाठी गप्पागोष्टी सुरू झाल्या. मुलगा मुलगी एकत्र दिसल्यावर गावात लोकं नावं ठेवतील म्हणून ती खेळायला वगैरे येत नसे पण लपून छपून कधी नजरेने तर कधी समोरासमोर भेटून दोघे खूप काही बोलायचे.

     दहावीची परीक्षा झाल्यावर अमन चांगला महीनाभर मामांकडे राहीला होता, त्यावेळी दोघांना एकमेकांविषयी जरा वेगळीच ओढ निर्माण झाली. बालपणाचा टप्पा पार करून आता तारुण्याची नवी उमेद, एकमेकांविषयी काही तरी आकर्षणाच्या भावना दोघांनाही जाणवल्या होत्या. त्यावेळी परत जाताना त्याचा पाय काही केल्या मामांकडून जायला निघत नव्हता पण आई बाबा घ्यायला आले आणि तो शहरात निघून गेला. त्याने आरतीला पत्र लिहिले होते,

“आरती, मला तू खूप आवडतेस..माझं प्रेम आहे तुझ्यावर..आता आपली भेट कधी होईल सांगू शकत नाही पण कॉलेज संपल्यावर लवकरच चांगली नोकरी शोधून तुला मागणी घालायला घरी नक्की येईल. मला खात्री आहे तू नक्कीच माझी वाट बघशील…आता परत आलो‌ की आपल्या नात्याविषयी घरी सांगणार आहे मी…
पत्र कुणाला दिसू देऊ नकोस, उगाच माझ्यामुळे तुझ्यावर काही आरोप झाले, कुणी काही उलट बोललं तुला तर मला सहन‌ नाही होणार ते… काळजी घे…

तुझाच,
अमन…”

ती भेट आरती सोबतची शेवटची भेट होती. तिला दिलेलं वचन पूर्ण करायला, नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी तिला सांगायला तो गावी आला होता पण ती मात्र कधीच हे जग सोडून गेली होती. किती‌ वाट पाहीली असेल आरतीने आपली पण या सहा वर्षांत आपण एकदाही येऊ शकलो‌ नाही इकडे याची त्याला खंत वाटली, आपसुकच त्याचे डोळे पाणावले. त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू बघताच एक आवाज आला,
“अमन, रडू नकोस..तुला रडताना नहीं बघवत रे…जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही..”

अमन‌ त्या आवाजाच्या दिशेने बघतो तर आजुबाजुला कुणीच नव्हते. घरातले सगळे एव्हाना झोपी गेले होते.

अमन अस्वस्थ होत इकडे तिकडे बघत म्हणाला, “आरती…तू का दिसत नाहीये मला.. कुठे आहेस तू.. मला अशी कशी सोडून गेलीस गं…काय झालंय तुझ्यासोबत…आरती एकदा तरी माझ्या समोर येत ना… खूप काही बोलायच आहे.. खूप काही सांगायचं आहे तुला… कुठे आहेस तू…”

” अमन, आता मला तुझ्या समोर नाही येता येणार… खूप वाट बघितली रे मी तुझी..मला माहित होतं तू नक्की येणार पण थांबता नाही आलं मला तुझ्यासाठी… पण मी तुझ्यासाठी एक डायरी लिहून ठेवली आहे…उद्या सकाळी माझ्या घरी जा, माझी आई देईल तुला ती डायरी. तिला लिहीता वाचता येत नाही त्यामुळे त्यात काय आहे हे तिलाही नाही माहित पण जसं तू मला ऐकू शकतोस ना तसं आई सुद्धा मला ऐकू शकते, माझ्या आवाजाच्या सहाय्याने ती निदान जगते तरी आहे. माझ्या आणि बाबांच्या मृत्यू नंतर ती स्वतः ला संपविणार होती पण माझं अस्तित्व, माझा आवाज यातून मी तिला शपथ दिली की मी देवघरात लपवून ठेवलेली डायरी अमन आल्यावर त्यालाच द्यायची, तो एक दिवस नक्कीच येणार तोपर्यंत तरी तुला जगायचं आहे. तुझ्या येण्याने माझ्या मृत्युचे सत्य तुझ्या समोर, जगासमोर नक्की येईल याची मला खात्री होती. आईला सत्य कळाले तरी ती काही करू शकणार नाही आणि गावात कुणाला सत्य कळूनही ते काहीही करणार नाही म्हणून माझी डायरी फक्त तुझ्या हातात‌ यावी‌ आणि मला न्याय मिळावा यासाठी ही माझी इच्छा अपूर्ण असल्याने मला आजवर मुक्ती मिळाली नाही. उद्या आईला भेटून डायरी घे आणि नदी किनारी मला भेटायला ये. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुला.”

“आरती…का गेलीस अशी सोडून मला…काय झालं नक्की तुझ्यासोबत…ये ना परत आरती…ये ना…”

अमन ओक्साबोक्सा रडत तिला आजुबाजूला शोधत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आरतीच्या आईला मी जाऊन भेटतो असं झालेलं त्याला.

आरतीच्या विचारातच रात्री उशिरा त्याला झोप लागली. सकाळी जशी जाग आली तसाच तो खाडकन उठून बसला. लवकरच आवरुन बाहेर आला तोच मामींनी गरमागरम चहा नाश्ता दिला. घाईघाईत चहा नाश्ता करून तो आरतीच्या घरी गेला, दारातून आरतीच्या आईला हाक मारली. अमनला समोर बघताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमन घरात गेला तोच त्याचे लक्ष समोरच्या भिंतीवर लावलेल्या आरतीच्या आणि तिच्या बाबांच्या हार घातलेल्या फोटोंकडे गेले. आरतीच्या आईने डोळे पुसत त्याला बसायला एक खुर्ची पुढे केली आणि त्या आत गेल्या. अमनची नजर आरतीच्या फोटोवर स्थिरावली. तिचा निरागस चेहरा बघत दु:ख, प्रेम, विरह अशा मिश्र भावनांनी त्याचे डोळे पाणावले.

आरतीच्या आई पाण्याचा ग्लास त्याला देत त्याला म्हणाल्या, “अमन बाळा, आरती आपल्याला सोडून गेली रे… पण तिनं आत्महत्या केली नाही तर तिचा घातपात झाला असं सारखं वाटतं मला. तिच्या जाण्याचं सत्य अजूनही मी शोधतच आहे रे..वर्ष होईल तिला जाऊन पण आजही माझ्या आजूबाजूला वावरते ती असंच वाटतं मला.. त्यामुळे तर मी जगते आहे..आणि हो ही डायरी तितकी तुझ्यासाठी ठेवून गेली ती..तेही मला ती गेल्यावर कळालं..बघ बाबा काय लिहिलंय त्यात..”
त्या परत तिच्या आठवणीने रडायला लागल्या.

अमन ती डायरी हातात घेत त्यांना म्हणाला, “काकी, असं रडू नका, हिंमत ठेवा..मी आलोय ना.. सत्य शोधून काढल्याशिवाय नाही जाणार मी.. विश्र्वास ठेवा माझ्यावर..मला काही मदत लागली तर सांगतो .. आलोच मी..”

अमन डायरी घेऊन नदी किनारी जायला निघाला.

क्रमशः

डायरीत आरतीने नक्की काय लिहीले आहे? आरतीच्या मृत्यूचे सत्य काय आहे? याची उत्सुकता लागली ना…तर हे जाणून घेऊया पुढच्या म्हणजेच अंतिम भागात.

पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.

कथेचा हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा 😊

ही कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी याचा कांहीही संबंध नाही.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed