हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग

मागच्या भागात आपण पाहीले की मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त अमनने काही तरी सरप्राइज प्लॅन केला होता. ते कळाल्यापासून काही केल्या मैथिलीला रात्री झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती. विचार करतच कशी बशी ती झोपी गेली तोच सकाळ झाली. सासूबाई लवकर उठून आंघोळ करून पूजा करत होत्या, त्या आवाजाने मैथिली जागी झाली. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर सकाळचे सात वाजले होते, आजूबाजूला अमन नव्हता. बेडच्या बाजुला टेबलवर एक सुंदर फुलांचा गुच्छ आणि हॅपी बर्थडे लिहिलेले कार्ड होते.
फ्रेश होऊन मैथिली बाहेर आली, सासूबाईंनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मैथिलीची नजर मात्र अमनला शोधत होती. सासूबाईंना ते लक्षात आले, त्यांनी तिला लगेच सांगितले “अमन तुझ्यासाठी काही तरी आणायला गेला, तो येत पर्यंत तू आवरून तयार हो. आई बाबा निघालेत, येतीलच ते इतक्यात.”
मैथिलीचे मन अजूनही गोंधळलेले होते, ती आवरून तयार झाली, चहा बनवला. थोड्याच वेळात आई बाबा आले, मागोमाग अमनही केक घेऊन आला. सर्वांनी मैथिलीला शुभेच्छा दिल्या. बाबा आज गप्प गप्प आहेत, भावनीक वाटत आहे हे मैथिलीने ओळखले. आईला विचारले असता आईने फक्त एवढंच म्हणाली “आज आम्ही दोघेही खूप आनंदात आहोत, तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अमन सारखा जोडीदार मिळाला. ”
आईचं बोलणं मैथिलीला कोड्यात पाडणारं होतं, आई असं का म्हणते आहे काही कळत नव्हते.
तितक्यात अमन‌ आला आणि म्हणाला ” चला निघुया, वाटेतच मैथिलीच्या आवडत्या ठिकाणी नाश्ता करू.”
मैथिली – “कुठे जायचे आहे?”
अमन – तेच तर सरप्राइज आहे राणी ?”
अमन, मैथिली, सासुबाई, आई बाबा सगळे कुठे तरी जायला निघाले, मैथिली सोडून सगळ्यांना माहीत होते की आपण कुठे जात आहोत. अमनने तशी पूर्व कल्पना दिली होती. वाटेत एका ठिकाणी छान नाश्ता केला आणि नंतर एका अनाथाश्रम मध्ये पोहचले. मैथिलीला काय सुरू आहे काही कळत नव्हते. तिथे गेल्यावर एका सात वर्षाच्या गोड मुलीला अमन मैथिली जवळ घेऊन आला आणि म्हणाला “कोण म्हणतं की तू कधीच आई होऊ शकत नाही, ही तुझीच मुलगी आहे राणी. तू तिला पहिल्यांदा बघत असली तरी हीने तुझ्याच उदरातून जन्म घेतला आहे. आता पर्यंत ती अनाथ म्हणून या आश्रमात राहीली पण आता आपण हिला दत्तक घेऊन आपल्या घरी घेऊन जायचे आहे. हीच आपली मुलगी आहे, निधी नाव ठेवूया का आपण तिचं. आणि आता यापुढे माझी राणी तू उदास राहायचं नाही.? आम्हा सगळ्यांना हे सत्य माहीत आहे आणि मान्यही आहे. निधी बाळ चल आईला हॅपी बर्थडे म्हणा.”
निधी ,हॅपी बर्थडे आई म्हणताच मैथिली तिला मिठीत घेऊन ढसढसा रडू लागली.
अमनचे आभार कसे मानावेत, कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते.
बाबांनी मैथिलीची माफी मागितली आणि म्हणाले “माझ्यामुळे तुला तुझ्या पोटच्या गोळ्यापासून दूर रहावे लागले , पण जे मी केले ते तुझ्या भविष्यासाठी बाळा. मनावर दगड ठेवून मी लेकराला अनाथाश्रमात ठेवले पण आई आणि मी नेहमीच तिला भेटायला यायचो. कुणीही तिला दत्तक घेऊ नये याची खबरदारी घ्यायचो.
तू खरच खूप भाग्यवान आहेस, तुला अमन जोडीदार म्हणून भेटला, खूप प्रेम आहे त्याच तुझ्यावर, तुझं हरवलेलं आईपण अमनमुळे नव्याने तुझ्या पदरात पडलं. अमन आणि त्याच्या आईचे आई बाबांनी खूप आभार मानले.”
अमनच्या आईने सगळं समजून घेतलं, मुलगा सुनेचं सुख कशात आहे ते बघून योग्य निर्णय घेतला याचा मैथिलीच्या आई बाबांना अभिमान वाटला.
मैथिलीला मात्र प्रश्न पडला की हे अमनला कसं कळाल.
मैथिलीच्या आईने तिला मिठीत घेतले आणि म्हणाली ” त्या दिवशी अमन मुद्दामच घरी आम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांनी तुझी अवस्था सांगितली मला, शिवाय हेही सांगितले की तू कधीच आई होऊ शकत नाही. या गोष्टींमुळे तू स्वतःला दोष देत उदास राहते, डॉक्टरांनी गर्भाशयाच्या इजा विषयी विचारताच तू अस्वस्थ होत रडायला लागली, तेव्हा अमनला कळाले होते की काही तरी कारण नक्कीच आहे जे तू त्यांना सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी मला विश्वासात घेऊन विचारले. मला‌ राहावलं नाही, बाबांच्या भितीने तुझ्या भूतकाळाविषयी शब्द ही काढता येत नव्हता पण ते घरी नाही हे बघून मी अमनला सत्य सांगितले. जे होईल ते होईल पण किती दिवस सगळं लपवायचे म्हणून मी सांगितले. त्याने ते स्विकारले हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. अमनने आईला याची कल्पना दिली, त्यांनीही तुमच्या दोघांच्या प्रेमापोटी ते स्विकारले. तू खरंच नशिबवान आहेस बाळा. आईला आणि अमनला कधीच दुखवू नकोस.”
मैथिलीला अमन‌ इतकं गोड सरप्राइज देईल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.
आई बाबा अमन सासूबाई निधी सोबत गप्पा मारत होते, सगळे खूप आनंदात होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मैथिलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू काही केल्या थांबत नव्हते. तशीच ती भूतकाळात शिरली.
मैथिली आणि निनाद कॉलेजमध्ये सोबत शिकायला होते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम. कॉलेज संपल्यावर सगळे मित्र मैत्रिणी कुठे तरी फिरायला गेले. निनादचं प्लेसमेंट झालं होतं आणि नोकरीनिमित्त बेंगलोरला जाणार होता, आता आपण दोघे परत कधी भेटणार म्हणून दोघेही सगळ्यांसोबत फिरायला गेले असले तरी खूप भावनिक झाले होते. अशातच ते एकमेकांच्या खूप जास्त जवळ आले. अशातच मैथिलीला दिवस गेले.  सुरवातीला घाबरून तिने कुणाला काही सांगितले नाही पण नंतर निनादला याची कल्पना दिली. आई बाबांशी बोलून आपण लग्न करू, सत्य आहे ते सांगू म्हणून निनादने तिची समजूत काढली. आईलाही हे कळाले , ती खूप संतापली, आईने तिला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला पण भितीपोटी ती नाकारत होती शिवाय निनाद बाबांशी बोलून लवकरच लग्न करायचं म्हणाला म्हणून आईला विनवण्या करत होती. निनाद आई बाबांना भेटायला आला, बाबांना हा प्रकार कळाला, ते भयंकर संतापले, दोघांनाही नको ते बोलले पण बदनामी नको शिवाय निनाद लग्नाला तयार आहे म्हणून त्यांनी लवकरच दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. बाहेर कुणाला लग्नापूर्वी हे कळू नये म्हणून खबरदारी घेतली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच. निनाद बेंगलोरला परत जात असताना त्याच्या ट्रॅव्हल्स ला अपघात झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. मैथिली झाल्या प्रकाराने हादरली, स्वतः ला संपवायचा विचार करू लागली. आई बाबांना ही परिस्थिती सांभाळणे कठीण झाले होते. ओळखीतल्या डॉक्टर कडे तपासणी केली पण खूप उशीर झाला होता. आई बाबांनी मैथिलीची खूप समजूत काढली. काही महिन्यांत तिने एका मुलीला जन्म दिला पण त्या बाळाला बघून मैथिली भावनिक होऊन खचून जाऊ नये म्हणून भविष्याचा विचार करून बाबांनी बाळाला तिला न दाखवता अनाथाश्रमात ठेवले. बाळंतपणात मैथिलीला खूप त्रास झाला, तिने अनेकदा स्वतः ला करून घेतलेला शारीरिक त्रास, वेदना यामुळे तिची अवस्था नाजुक होती, अशातच तिच्या गर्भ पिशवीला इजा झाली होती. मैथिली बाळा विषयी विचारायची पण बाबांनी तिच्या भविष्यासाठी तिला एवढेच सांगितले की बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे, यापुढे तुझा बाळाशी काही संबंध नाही. तू भविष्याचा विचार कर. यातून बाहेर पडण्यासाठी तिला वर्ष लागले, नोकरीला लागल्यावर काही काळ का होईना ती यातून बाहेर पडली पण मनात या वेदना ताज्या होत्या. हेच ती लग्नापूर्वी अमनला सांगायचं प्रयत्न करत होती पण बाबांचा धाक, बदनामीची भिती यामुळे ती फक्त मनात झुरत होती.
हा सगळा भूतकाळ आठवत असतानाच निधी तिच्या जवळ आली आणि हात ओढत म्हणाली “आई , बाबा बोलवत आहेत, माझ्या इथल्या मित्र मैत्रिणी सोबत आपण केक कापायचा आहे. चल पटकन.. “

मैथिली निधीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अश्रू सांभाळत उठून तिच्या बरोबर जाऊ लागली. मैथिलीचं हरवलेलं आईपण तिला अमनमुळे नव्याने लाभलं.?

कथा कशी वाटली हे नक्की कळवा.

अशाच नवनवीन कथा, माहिती वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका ?

© अश्विनी कपाळे गोळे

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.

Comments

6 responses to “हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग”

  1. Monika pankaj shah Avatar
    Monika pankaj shah

    Tumchi story me roj follow krte…. mla khup avdtat….

    1. Ashvini Goley Avatar
      Ashvini Goley

      Thank you so much dear ??

  2. Shraddha Avatar
    Shraddha

    Nys story

    1. Ashvini Goley Avatar
      Ashvini Goley

      Thanks ?

      1. Shashikant Mangale Avatar
        Shashikant Mangale

        Khup chan,sundar

        1. Ashvini Goley Avatar
          Ashvini Goley

          Thanks