अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा

Love Stories-Relations-Social issues

“समिधा…..समिधा……समिधा, अगं लक्ष कुठे आहे तुझं..मी काय विचारतेय? चहा घ्यायला जायचं ना? कोणत्या विश्वात रमली आज ऑफिसला आल्या आल्या..चल पटकन..”
समिधा ची मैत्रिण प्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून आवाज देत म्हणाली.

प्रियाच्या आवाजाने भानावर येत दचकून समिधा म्हणाली, “अ..हो..हो..जाऊया ना..चल… अगं नकळत विचारांमध्ये अशी गुंतले की कळालच नाही तू कधी आलीस ते..”

दोघीही चहा घ्यायला कॅन्टीन मध्ये निघाल्या. समिधा आज जरा अस्वस्थ आहे बघून प्रिया तिला म्हणाली, “समिधा, कशाचा विचार करते आहेस..सगळं ठीक आहे ना..काय झालंय..”

समिधा- “प्रिया, अगं अनिकेत ने बहुतेक आपलं ऑफिस जॉइन केलंय..आज मी पार्कींग मध्ये लिफ्टची वाट बघत उभी होते तेव्हा तिथे मला तो दिसला. आम्ही दोघंही असं अचानक एकमेकांसमोर आल्याने ना फारच वेगळं वाटलं… तो दिसल्या पासून ना मन अगदी अस्वस्थ झालंय..तुला माहित आहे ना मला भूतकाळातून बाहेर पडताना किती त्रास झाला.. कसं बसं सावरलं मी स्वतःला आणि आज हा असा परत माझ्यासमोर आल्यावर परत नको असताना‌ही माझं मन भूतकाळात भरकटत आहे ..”

प्रिया – “काय? त्याला माहीत होते का तू आता इथे नोकरी करते ते.. म्हणजे मुद्दाम तर इथे आला नाही ना तो..”

समिधा – “मला तरी असं वाटत नाही..कारण आमचा डिव्होर्स झाला त्यानंतर आम्ही जराही संपर्कात नाही इतकंच काय तर आमचे कॉमन मित्र मंडळ जे होते त्यांच्याशी सुद्धा माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि मी हे ऑफिस जॉइन केले हे घरच्यांना सोडून कुणालाही माहीत नव्हते..मुळात ते मला कुणालाच कळू द्यायचे नव्हते.. आणि अनिकेत तरी आता मुद्दाम कशाला माझ्या मागावर येणार ना..आमचे मार्ग वर्षभरापूर्वीच वेगळे झालेत..”

प्रिया – “समिधा, अगं मग झालं ना..सोड त्याचा विचार..त्यालाही कदाचित माहिती नसेल तू इथे अशी अचानक दिसशील ते..केवळ योगायोग म्हणून सोडून दे..नको लक्ष देऊ..अनोळखी समजून दुर्लक्ष कर..”

समिधा काहीही न बोलता चहाचा घोट घेत होती आणि परत समोरच्या काउंटरवर तो उभा दिसला…अजूनही तो तसाच हॅंडसम, अगदी नीटनेटके  रहाणीमान..समिधा क्षणभर त्याला बघतच राहिली आणि पटकन भानावर येत स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागली, “मी का त्याला बघते आहे..तो आता फक्त एक अनोळखी व्यक्ती आहे माझ्यासाठी..पण आता हा नेहमीच असा मला दिसत राहणार आणि मग मी अशीच…नाही नाही..समिधा मूव्ह ऑन..”

प्रिया काही तरी सांगत होती, बोलत होती पण समिधाचे तिच्याकडे जराही लक्ष नव्हते. समिधा डेस्क वर आली , इमेल चेक करून आजच्या कामाचे प्लॅनिंग केले पण आज कामात तिचं लक्षच लागत नव्हतं. नकळत ती भूतकाळात जाऊन पोहोचली.

समिधा आणि अनिकेत कॉलेजला असल्यापासून एकमेकांवर अगदी जिवापाड प्रेम करायचे. समिधा सुखवस्तू कुटुंबात वाढलेली एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, उंच कमनीय बांधा, गव्हाळ वर्ण, नीटनेटके आणि जरा मॉडर्न रहाणीमान असलेली समिधा बघता क्षणी कुणाच्याही नजरेत बसेल अशीच. अनिकेत साधारण परिस्थितीत लहानाचा मोठा झाला, दिसायला अगदीच हॅंडसम हिरो, उंचपुरा त्यात पिळदार शरीरयष्टी त्यामुळे कॉलेजमध्ये अनेक मुलींचा क्रश होता तो. समिधाला तो खूप आवडायचा आणि त्यालाही समिधा पहिल्यांदा बघताक्षणीच आवडलेली. त्यानेच पुढाकार घेऊन मग मैत्रीचा हात पुढे केला आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही. समिधाचा क्रश असणार्‍या अनिकेत ने तिला प्रपोज केले तो क्षण तर तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. तिला त्याच्या एकंदरीत परिस्थिती विषयी कल्पना होती, त्याच्या सहवासात अगदी झोपडीत सुद्धा रहायला तयार होती ती. त्याचेही तिच्यावर तितकेच प्रेम होते, समिधाला अगदी जिवापाड जपायचे असाच त्याचा गोड प्रयत्न असायचा नेहमी. कॉलेज नंतर दोघांनाही नोकरी मिळाली आणि आता लग्नासाठी घरी बोलायचे त्यांनी ठरविले. समिधाच्या आई बाबांना अनिकेत विषयी काहीच प्रोब्लेम नव्हता शिवाय समिधाच्या निवडीवर त्यांचा विश्वास सुद्धा होता. अनिकेत च्या घरी मात्र श्रीमंत घरातील मुलगी समिधा, आपल्या घरात रुळणार की नाही, रितीरिवाज, मानपान समजून घेत घरच्यांना बरोबर घेऊन संसार चालवेल की नाही याची काळजी होती, त्यांनी अनिकेत ला बोलूनही दाखवले पण दोघेही आपापल्या मतांवर ठाम आहे बघून ते या लग्नाला तयार झाले.

घरच्यांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले. दोघेही खूप आनंदात होते, त्यांचं प्रेम आता नात्यात बदललं होतं. अगदी लव्ह बर्ड सारखे हे गोड जोडपे होते. अनिकेत तिला अगदी राणी सारखं ठेवायच्या प्रयत्नात असायचा पण आता प्रेमा सोबतच जबाबदारी वाढली होतीच, संसाराला सुरुवात झाली होती.
दोघांचेही कुटुंब राहायला एकाच शहरात त्यामुळे समिधाला लग्नानंतर सुरवातीला फार काही वेगळे वाटले नाही पण हळूहळू नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळताना तिची फार चिडचिड व्हायला लागली. घरकामाला बाई असली तरी लहानसहान कामे पडायचीच पण समिधाला त्याची फारशी सवय नसल्याने तिला फार काही लोड झेपायचा नाही, सासूबाई मदतीला असायच्या पण आता जबाबदारी वाढलेली होतीच. पाहुण्यांचे येणे जाणे, सणवार असं सगळं रूटीन सुरू झालं. त्यात अनिकेतच्या घरातील सगळ्यांना समजून घेत त्यानुसार जरा जुळवून घेत संसार करताना अनिकेत आणि ती एकमेकांना फारसा वेळ देऊ शकत नव्हते. आता तर विकेंडला मूव्ही बघणे, शॉपिंग करणे , फिरणे सगळंच फार कमी झालेलं. अनिकेत दिवसभर त्याच्या कामात गुंतलेला असायचा, आता फक्त रात्रीच काय तो वेळ दोघांना एकत्र घालवायला मिळायचा. समिधा अचानक बदललेल्या या परिस्थितीला, जबाबदारीला जाम कंटाळली होती. अनिकेत नी तिला जरा समजून घेत आठवड्यात एक दिवस तरी पूर्णपणे तिच्यासाठी द्यावा असं तिला वाटे, ती त्याच्यावर चिडायची, रडायची, तुझं आता माझ्यावर प्रेमच राहीलं नाही म्हणत अनिकेत कडे पाठ फिरवून रडत रडत झोपी जायची. सुरवातीला तो तिची समजूत काढून तिला शांत करायचा पण समिधा ची वाढती चिडचिड बघून तोही रागाच्या भरात उलट काहीतरी बोलून जायचा. लग्नाला सहा महिने सुद्धा झाले नसतील तर दोघांचे भांडणं सुरू झाले मग कितीतरी वेळा समिधा रागारागाने आई बाबांकडे निघून जायची‌. अनिकेत बरेचदा तिला समजवायला जायचा, तिला परत घरी घेऊन यायचा पण काही दिवसांनी परत तेच घडत होतं..

अनिकेत च्या आई-बाबांना वाटलं, आपल्यामुळे दोघांना त्यांची स्पेस मिळत नसावी म्हणून ते सुद्धा गावी राहायला गेले पण त्यांच्या गावी जाण्याने प्रश्न सुटला नाही. समिधा मुळे आई बाबांना गावी जाऊन राहावं लागतंय ही गोष्ट अनिकेतला खटकत होती. दोघेही एकत्र असले तरी मनाने मात्र दुरावत चालले होते, संवाद संपत चालला होता.
दिवसेंदिवस अनिकेत आणि समिधा मध्ये मतभेद इतके वाढत गेले की एक दिवस समिधाची चिडचिड बघून अनिकेत बोलून गेला, “समिधा, मला ना तुझं काही कळतच नाहीये..तुझ्यामुळे आई बाबा गावी राहायला गेले…तरी तुझं समाधान झालं नाही..तुला नक्की काय हवंय हे तरी सांग..मला आता तुझ्या चिडचिडेपणाचा, भांडणाचा जाम कंटाळा आलाय..मला प्लीज शांत राहू दे..”

अनिकेतचे बोलणे समिधाच्या मनाला खोलवर वार करून गेले. ती परत एकदा रागाच्या भरात आई बाबांकडे निघून गेली ती कायमचीच..नंतर अनिकेत सुद्धा पूर्वी प्रमाणे तिची समजूत काढायला आला नाही. समिधाने महीनाभर वाट बघितली आणि वेगळं व्हायचा निर्णय घेतला. अनिकेत ने त्यावर जराही आक्षेप घेतला नाही, तो अगदी सहजपणे डिव्होर्स साठी तयार झाला ही गोष्ट समिधाच्या मनाला खूप लागली. दोघांचा अहंकार, गैरसमज यापुढे घरच्यांचे ही काहीच चालले नाही. शेवटी दोघे कायद्याने वेगळे झाले.

या सगळ्याचा मानसिक त्रास दोघांनाही झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी समिधाने नोकरी बदलली, नविन लोकांच्या सानिध्यात राहून वेळेनुसार सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं पण आज अनिकेत अचानक समोर आला आणि ती परत नकळत भूतकाळात शिरली.

जुन्या आठवणींच्या विश्वात रमली असतानाच मॉनिटरवर कुणाचं तरी पिंग आलं. बघते तर अनिकेत ने “हाय समिधा..हाऊ आर यू..” असं पिंग केलेलं.
त्याच पिंग बघून समिधाच्या डोळ्यात चटकन पाणी आले.

अनिकेत ला काहीही रिप्लाय नको द्यायला असा विचार करत मनातल्या मनात समिधा पुटपुटली, “नको ना रे परत नेऊ मला भूतकाळात… मनाच्या कोपऱ्यात सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत… आता कुठे मी भूतकाळातून बाहेर पडू बघत होते आणि तू परत समोर आलास आज..आता असं बोलायला सुरुवात करशील आणि मी परत नकळत तुझ्यात गुंतले तर…..नाही नाही… अनिकेत प्लीज नको घेऊन जाऊस मला भूतकाळात..”

अनिकेत ला काहीही रिप्लाय न देता तिने कामाला सुरुवात केली. दुपारी लंच टाईम मध्ये परत तो समोर आलाच, नजरानजर झाली आणि परत ती भावनिक झाली.

दुसऱ्या दिवशी परत ऑफिसच्या कम्युनीकेटर वर त्याचं “हाय..गुड मॉर्निंग..” असं पिंग आलं. शेवटी न राहवून तिने “हाय..” म्हणत रिप्लाय दिला.

लगेच त्याने एकामागोमाग एक पाच सहा मेसेज केले पण तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी ते अंधूक दिसत असतानाच तिने ती चॅट विंडो बंद करून मोठा श्वास घेतला, जणू वर्षभर त्याच्या विरहात मनी दाटलेल्या भावना आज नकळत अश्रू रुपात ओघळायला लागल्या होत्या.
अश्रूंना आवरत ती वाशरूम मध्ये निघून गेली, चेहर्‍यावर पाणी मारून जरा फ्रेश होऊन आली आणि कामाला लागली पण त्याचा विचार नको म्हंटलं तरी डोक्यातून जात नव्हता. का आला असेल हा परत माझ्या आयुष्यात ? का प्रयत्न करतोय आता बोलायचा…काही बोलायचं बाकी आहे का खरंच आता? नाही त्याला जाब विचारावा लागेल नाही तर मला इथे कामात कधी लक्षच लागणार नाही…
तिने चिडून त्याला पिंग केले , “मला तुला भेटायचंय… कॅन्टीन मध्ये येशील?”

त्याचा लगेच रिप्लाय आला, “हो नक्की.. साडेतीन ला भेटुया..?”

“ओके..” तिने रिप्लाय दिला.

साडेतीन वाजता समिधा कॅन्टीन मध्ये गेली तर अनिकेत तिची वाट बघत बसलेला होता. ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली आणि म्हणाली, “वेळेआधीच आलास..”

“नाही तसं काही नाही.. आत्ताच आलोय मी…कशी आहेस समिधा..”

“हा प्रश्न विचारून नक्की काय जाणून घ्यायचं आहे तुला…”

“असो.. कॉफी घेणार..?” – अनिकेत

समिधाने यावर काहीही उत्तर दिले नाही. तिचा नाराज सूर, उदास चेहरा बघून अनिकेत उठून गेला आणि दोन कप कॉफी घेऊन आला.

“थ्यॅंक्स…मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी..”

“समू..मला पण खूप काही बोलायचं आहे गं…एकदा संधी निघून गेली आणि सगळं विस्कटलं…नको असताना..”

“समू..? समिधा नाव आहे माझं..समू फक्त एकच व्यक्ती म्हणायचा, ज्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही त्याच्यावर.. बाकी कुणी समू म्हंटलेलं नाही आवडत मला.. ”

“तो मीच होतो ना गं…तुझा अन्नू….
समू…. सॉरी… ‌‌समिधा, मी खूप मिस केलं गं तुला‌.. असं नको होतं व्हायला…तू आयुष्यातून निघून गेलीस आणि सगळं विस्कटलं.‌.कामात लक्ष लागत नव्हतं, वारंवार चुका होत गेल्या.. माझी जी एक इमेज तयार झाली होती ना कंपनीत, ती लगेच धुळीला मिळाली माझ्या सततच्या चुकांमुळे..तीन महिने नुसताच ताणतणाव..शेवटी नोकरी गेली…
खरं सांगायचं तर आपल्या डिव्होर्स नंतर अगदी शून्य झालेलं माझं आयुष्य..
माझी अवस्था बघून आई बाबा सतत काळजीत होते..खरं तर ह्या सगळ्याला मीच जबाबदार होतो ना गं.. माझ्याच चुकांची शिक्षा मी भोगली‌…
मला तू परत हवी होतीस.. खूप शोधायचा प्रयत्न केला.. तू जुनी कंपनी सोडून गेलीस इतकंच कळालं… हातात नोकरी नव्हती.. आयुष्यात तू नव्हतीस..एक क्षण असं वाटलं संपवून टाकावं सगळं एका क्षणात पण कसंबसं स्वतः ला सावरून तुझा शोध घेतला..तू इथे नोकरी करतेस कळालं त्यानंतर या कंपनीत नोकरी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले..खरं तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी…”

समिधाच्या डोळ्यातून अश्रु टपकत होते. इकडे तिकडे बघत तिने डोळे पुसले आणि म्हणाली, “माझा डाऊट खरा निघाला तर..मला वाटलेच होते तू माझा पाठलाग करत आलास इथे‌‌..मला त्रास द्यायला…तुला काय पोरखेळ वाटतो काय रे सगळा… कोर्टाने संधी दिली होती ना.. तेव्हा तुला मी नको होते…तेव्हा का नाही माघार घेतलीस डिव्होर्स घेण्यापासून… आणि तुला काय वाटते,त्रास फक्त तुला झाला..मलाही मन आहे…त्रास मी सुद्धा सहन केलाच ना.. चूक
माझीही होतीच.. चिडचिड व्हायची मला खूप, सगळं आयुष्य अचानक बदललं होतं लग्नानंतर…नव्हती मला कधी सवय ऍडजस्ट करायची पण तू समजून घेत प्रेमाने डोक्यावरुन हात फिरवला असतास ना तर जुळवून घेत गेले असते मी वेळेनुसार..सवय झाली असती मला सगळ्या गोष्टींची पण लग्नानंतर तू माझा अन्नू राहीला नव्हतास..तू नवरा झाला होतास माझा..मी ही चुकले, मलाही मान्य आहे पण आपलं ठरलं होतं ना, एकमेकांच्या चुका सुधारत समजून घेत आयुष्यभर साथ द्यायचं.. त्या फक्त लग्नाआधी घेतलेल्या आणाभाका म्हणाव्या का?”

“समू, आय नो..पण तेव्हा नाही कळालं गं..जेव्हा चुक उमगली तेव्हा खूप उशीर झाला होता…मला कळायला हवं होतं तुझं मन त्या क्षणी…तू माझ्यासाठी सगळं सोडून आलेली पण नवीन परिस्थितीत जुळवून घेताना मी तुझी साथ द्यायला हवी होती.. सॉरी समू..खरंच चुकलो गं मी… तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे समू माझं…प्लीज मला एक संधी दे..मला माफ कर.. आपण सगळं नीट करूया… प्लीज माझ्या आयुष्यात परत ये..मी नाही जगू शकत गं तुझ्याशिवाय.. आणि हे फक्त म्हणत नाहीये मी, अनुभवलं आहे मी…प्लीज समू…कमी बॅक..”

“अनिकेत सगळं इतकं सोपं नाहीये…मी यातून कशी बाहेर पडले माझं मलाच माहीत… कित्येक रात्री रडत रडत जागले मी तुझ्या आठवणीत… झोपेच्या गोळ्या खाव्या लागल्या मला.. रात्र रात्र झोप लागत नव्हती…कामात लक्ष लागत नव्हतं… वाटायचं, ज्याच्यावर प्रेम केलं तो असा कसा वागू शकतो…माझ्या अल्लड हट्टी स्वभावाची जाणिव असताना लग्न केलंस पण नंतर समजून घेणारा अन्नू कुठेतरी हरवला होता…माझी अवस्था बघून आई सतत लक्ष ठेवून असायची.. तिच्या हातांनी झोपेची गोळी द्यायची, नजरेसमोर घे म्हणायची..तिला वाटायचं मी जीवाचं काही बरं वाईट करून घेईन..त्यातही नातलग दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन यायचे… खूप चिड यायची मला..आता कुठे जरा सगळ्यातून बाहेर पडले आणि तू परत समोर आलास..
माझं ना आता डोकं सुन्न झालंय…का आलास रे परत…” समिधा दोन्ही हात चेहर्‍यावर ठेवत म्हणाली.

“समू..मला तू परत हवी आहेस…आपण एक नवी सुरुवात करू…नाही दुखावणार गं मी परत कधी तुला.. मनात खोलवर जखम झाली आहे जी कायम मला लक्षात राहणार..अगदी शेवटच्या क्षणापर्यंत…प्लीज समू…एक संधी दे मला..”

“अनिकेत काय म्हणतील सगळे…संसार काही भातुकलीचा खेळ नहीं ना…हवं तेव्हा मांडला.. हवं तेव्हा मोडला…”

“समू, किती मॅच्युअर झालीस गं‌…किती विचार करते आहेस सगळ्यांचा..पण आता यापुढे कोण काय म्हणते आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही समू.. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस..माझी समू हवी आहे मला…आपल्या परत एकत्र येण्याने आई बाबांना आनंदच होईल असे..मला खात्री आहे तुझ्या घरी सुद्धा काही हरकत नसेल…मी माफी मागतो त्यांची..हात पसरतो हवं तर पण मला तू हवी आहेस समू..आय लव्ह यू समू…आय मिस्ड यू सो मच..”

“अन्नू तू वेडा झाला आहेस…”

“तुझ्याशिवाय खरंच वेड लागलं मला..प्लीज समू, ये ना परत… नेहमीसाठी… जन्मोजन्मी साठी… प्लीज..एक संधी दे, पहिली आणि शेवटची…”

समिधा ने भरल्या डोळ्यांनी अनिकेतच्या हातावर हात ठेवला आणि वर्षभर मनात दाटलेल्या भावना अलगद ओठांवर आणत म्हणाली, “आय मिस्ड यू टू अन्नू…प्लीज परत नको असा सोडून जाऊस मला अर्ध्या वाटेवर…”

समिधाच्या होकारार्थी उत्तराने अनिकेतच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटून आले, तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याने तिचा हात हातात घेत तिच्या पाणावलेल्या डोळ्यांत बघत मानेनेच उत्तर दिले.

दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला…आता कुणी काहीही म्हणो पण एकमेकांशिवाय आयुष्य शून्य आहे तेव्हा परत एक नवी सुरुवात नक्कीच करायला हवी हा विचार करत अनिकेत आणि समिधा परत एकत्र आले.

दोघांनाही आयुष्यात मोठी ठेच लागलेली पण स्वतः च्या चुकांची जाणीव सुद्धा झाली. दोघांच्या संसाराला, नव्या नात्याला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.

समाप्त!!!

कथा काल्पनिक असून वास्तविक आयुष्याशी संबंधित आढळल्यास केवळ योगायोग समजावा.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed