प्रीत तुझी माझी

सुर्य मावळतीला आला होता..

 

तांबड्या रंगाच्या छटा क्षितीजावर पसरल्या होत्या..

 

निळाशार समुद्र या क्षणी अजूनच सुंदर भासत होता..

 

गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता अन् लाटांचा आवाज मन प्रसन्न करत होता..

 

मानसीचं मन मात्र आज कशातच रमत नव्हतं. ती एकटीच त्या सुर्याकडे बघत कुठेतरी हरवली होती. पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या..मन अस्वस्थ झालं होतं. तिच्या मनात विचार आला, “किती प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर..ऑफिस नंतर कितीतरी वेळा असंच या समुद्र किनार्‍यावर एकांतात बसून स्वप्न रंगवायचो‌. इथेच बसून तासंतास माझं कौतुक करणारा माझा रोहन आज लग्नाचा वाढदिवस सुद्धा विसरला. गेल्या सहा महिन्यांत नुसताच दुरावा..नुसतीच जबाबदारी.. श्या..”

 

 

 

आज मानसी आणि रोहनच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. दोघांचा प्रेमविवाह घरच्यांच्या साक्षीने वर्षभरापूर्वी पार पडला होता. लग्नानंतर दोन‌ महीने कसे गेले कळालेच नाही अन् लगेच रोहनला युरोपची संधी मिळाली. भविष्याचा विचार करून रोहनने संधी स्विकारली. नोकरीला काही महिने झाले की मानसीला सोबत घेऊन जायचे असा विचार करून तो व्हिसा च्या तयारीला लागला. मानसीची नोकरी इकडे सुरू होती, सोबतीला रोहनचे आई वडील असल्याने सुरवातीला मानसीला एकटेपणा फारसा जाणवला नाही पण नंतर रोहनच्या ओढीने ती अस्वस्थ व्हायची. सहा महिन्यांपूर्वी रोहन एकदा भेटायला आलेला पण तो एक आठवडा अगदी भर्रकन संपला.

 

फोन, मेसेजेस, व्हिडिओ कॉल वरच काय ते बोलून व्हायचं. त्यातही गेल्या दोन दिवसांपासून रोहन सोबत काहीच संपर्क झाला नव्हता. दुसऱ्या शहरात कॉन्फरन्सला जातोय तेव्हा पुढचे काही दिवस फोन नाही करू शकणार इतकंच काय ते त्याने सांगितलं होतं.

 

मानसीला वाटलं कितीही काम आलं तरी आज रोहनचा फोन नक्कीच येईल विश करायला..पण सायंकाळ होत आली तरी त्याचा साधा मेसेज सुद्धा आला नव्हता. मानसीने सकाळी फोन केला तर तो ही बंदच होता.

 

दिवसभर ऑफिसमध्ये सुद्धा तिचं लक्ष लागलं नाही..बर्‍याच जणांनी विश करायला फोन मेसेजेस केले पण ज्याच्या शुभेच्छांची ती आतुरतेने वाट बघत होती त्याला आजचा दिवस लक्षातच नव्हता. रोहन चे आई बाबा सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेले. आजचा स्पेशल दिवस पण सोबतीला आज कुणीही नाही या विचाराने मानसी हळवी झाली. ऑफिस नंतर एकटीच किनार्‍यावर बसून हळव्या मनाला आवरत भूतकाळातील क्षणांना आठवू लागली.

 

 

” अतिशय हुशार, आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला रोहन ज्याने याच मावळत्या सुर्याच्या साक्षीने मला लग्नासाठी मागणी घातली होती अन् मी ही त्याला इथेच होकार दिला होता.”  हे आठवून ती स्वतःशीच हसली अन् दोघांनी या किनाऱ्यावर एकत्र घालवलेले क्षण एक एक करत तिच्या नजरेसमोर यायला लागले.

 

 

“त्या दिवशी इथेच याच वेळी रोहनने माझा हात पहिल्यांदाच हातात घेतला होता.. त्याच्या स्पर्शाने अंगावर रोमांचक काटा आलेला अजूनही आठवतोय..” तो क्षण आठवत असतानाच वार्‍याची मंद झुळूक मानसीला स्पर्शून गेली जणू मी ही त्या क्षणाची साक्षीदार आहे हे सांगून गेली.

 

 

मानसी परत विचारात हरवली..

 

“असंच एकदा मी इथे उदास बसलेली असताना त्याने माझे चेहऱ्यावर भुरभुरणारे केस अलगद बाजूला करत माझा चेहरा हातात घेऊन किती प्रेमाने विचारपूस केली होती..त्या क्षणी रोहनचे माझ्यावरचे प्रेम अगदी स्पष्ट जाणवत होते..

 

दोघांच्या घरून लग्नाला होकार मिळाल्यावर रोहनने मारलेली पहिली मिठी..

 

त्याने माझ्यावरच्या प्रेमाची दिलेली कबुली..”

 

असे कितीतरी क्षण तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले.

 

अनावर झालेल्या अश्रूंचा बांध फुटला अन् ते चटकन गालावर ओघळले.

 

मानसीने अलगद आपले अश्रू पुसत क्षणभर दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले. लाटांचा खळखळाट कानावर पडत होता अन् अचानक कुणीतरी तिच्या चेहऱ्यावर भुरभुरणारी केसांची बट अलगद मागे केली..त्या ओळखीच्या स्पर्शाने ती दचकली..पटकन डोळे उघडून ताडकन उभी राहिली तर समोर रोहन होता.

 

 

हे कसं शक्य आहे..नक्कीच आपल्याला भास होतोय म्हणत ती एकटक त्याचा हसरा आकर्षक चेहरा न्याहाळत उभी राहिली.

 

 

क्षणाचाही विलंब न लावता त्याने तिच्या आवडत्या जरबेराच्या फुलांचा गुच्छ फिल्मी स्टाईल मध्ये गुडघ्यावर बसून तिच्यासमोर धरला आणि म्हणाला, “हॅपी ऍनिवर्सरी माय लव्ह..”

 

मानसीला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता. ती अडखळत म्हणाली, “रोहन..तू खरंच आलाय.. म्हणजे तुला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे..”

 

“असा कसा विसरेन मी..तुला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून कॉन्फरन्स ला जातोय सांगून जरा खोटं बोललो.. पण खूप खूप सॉरी..इकडे यायच्या गडबडीत होतो.. म्हणून तुझ्याशी बोलून झालं नाही..आणि आता आलोय ते तुला माझ्या सोबत घेऊन जायला..”

 

सगळं ऐकून मानसीच्या अश्रूंची जागा आनंदाश्रु ने घेतली. फुलांचा गुच्छ हातात घेऊन ती त्याच्या मिठीत शिरली. रोहनने तिचा चेहरा अलगद हातात घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला, “आय मिस्ड यू सो मच..”

 

मानसीने अश्रू आवरत त्याच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली ,” आय मिस्ड यू टू.. हॅपी ऍनिवर्सरी रोहन..आय लव्ह यू…”

 

रोहन तिच्या सुंदर, नाजूक चेहर्‍यावर हात फिरवत म्हणाला, “आय लव्ह यू टू..आणि परत एकदा सॉरी.. आजच्या स्पेशल दिवशी मी तुला रडवले..”

 

“इट्स ओके… आपल्या खास क्षणांची उजळणी करत बसलेले मी तुझ्या आठवणीत… आणि तू इतकं भारी सरप्राइज दिलंय ना आज..मी शब्दांत सांगू शकत नाही‌ये माझा या क्षणीचा आनंद..” – मानसी.

 

“तू बोलली नाहीस तरी मला सगळं स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर” – रोहन.

 

रोहनने खिशातून एक नाजुक डायमंड रिंग काढली आणि मानसीच्या बोटात घातली. हळूच तिच्या हाताचे चुंबन घेत म्हणाला, “मला पुढच्या पाच वर्षांसाठी तिकडे कामाचं अप्रूव्हल मिळालं आहे..आता पुढच्या काही दिवसांत तुझ्या व्हिसाचे काम करून सोबतच परत जाऊ..आता नाही अशी वाट बघायला लावणार मी तुला..”

 

दोघांनीही परत एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांनाही हा स्पर्श, ही मिठी हवीहवीशी वाटत होती.  कितीतरी महिन्यांचा हा दुरावा आज जणू संपला होता.

 

रोहन हळूच मानसीच्या कानात म्हणाला, “आता नको हा दुरावा‌.. पुढचं सेलिब्रेशन घरी जाऊन करूयात..”

 

मानसीने लाजतच त्याच्या हातात आपला हात दिला आणि मानेनेच हो म्हणत त्याच्या सोबत घरी जायला निघाली.

 

पाठीमागे सुर्य जणू समुद्रात गुडूप व्हायला लागला होता. आजच्या खास रोमॅंटिक क्षणाचा परत एकदा तो साक्षीदार झाला होता.

 

 

समाप्त..!!!

 

 

© अश्विनी कपाळे गोळे

 

 

अशी ही दोघांच्या प्रेमाची गोड कथा तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा.