Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_चार_अंतिम

कांदेपोहे कार्यक्रम झाला आणि पाहुणे परत गेले. आता निधीच्या मम्मा पप्पांना तिच्या निर्णयाची उत्सुकता लागली होती. चार दिवस होऊन गेले तरी निधीचा निर्णय काही ठरत नव्हता. तिच्या मनात नुसताच गोंधळ उडाला होता.

बराच विचार करून एक दिवस निधीने ठरवलं आज फायनल काय तो निर्णय कळवायचा.

 

निधीच्या मनात विचार आला, “सुजय च्या जागी मी असते आणि सुजयच्या बाबतीत असा भूतकाळ कळाला असता तर कदाचित मी त्याला त्या कारणासाठी नकार दिला असता पण सुजय ने असं न करता माझीच समजुत काढली..वेदांत चा वाईट अनुभव आल्यावर प्रेम ,लग्न यावरचा माझा विश्वास उडाला पण कदाचित माझ्या नशिबात वेदांत नसेलच…आणि प्रॅक्टिकल विचार केला तर सुजयला नकार देण्यासारखं काहीच नाही… माझ्या गुणदोषांसकट, माझ्या भूतकाळासह मला तो स्विकारायला तयार आहे मग अजून काय अपेक्षा असाव्या माझ्या जोडीदाराकडून…मी सुजयला होकार कळवते… सुजयला भेटण्याआधी मम्मा पप्पांच्या आग्रहाखातर कितीतरी मुलांना मी लग्नासाठी भेटले त्यातल्या एकाही मुलाचा मी इतका विचार केला नाही.. सुजयला भेटल्या पासून

मात्र माझ्या मनातून त्याचा विचार जातच नाहीये..याचा अर्थ मला सुजय पसंत आहे..”

 

निधी मम्मा पप्पांना म्हणाली, “माझा निर्णय झालायं…मला सुजय पसंत आहे..”

 

ते ऐकताच मम्मा पप्पा आनंदाने जणू नाचायला लागले. पप्पांनी लगेच सुजयच्या घरी फोन करून होकार कळवला. निधीचा होकार मिळताच सुजय दुसऱ्या दिवशी तिला भेटायला येणार आहे असं सुजयने सांगितले.

 

तब्बल दोन वर्षांनी आज निधीच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले होते. रात्री निधीच्या फोनवर एक मेसेज आला,

” उद्या सकाळी नऊ वाजता भेटू..

सुजय.”

 

सुजयचा मेसेज बघताच निधीच्या गालावर हसू उमटले. तिने लगेच रिप्लाय केला, “नक्की..मी वाट बघते..”

 

तिचा रिप्लाय बघून सुजयला सुद्धा आनंद झाला.

 

निधीच्या मनात रात्रभर सुजयचाच विचार सुरू होता. उशिरा कधी झोप लागली तिचं तिलाही कळालं नाही.

सकाळी साडे सहा वाजताचा अलार्म झाला तशीच निधी खडबडून जागी झाली. लवकरच आवरुन तयार झाली.

 

मम्मा तिला बघत म्हणाली, “आज तर स्वारी स्वतः हून उठून तयार..तेही वेळेआधी..”

 

निधी लाजतच म्हणाली, “मम्मा अगं सुजय येतोय ना..त्याला भेटून मग ऑफिसला सुद्धा जायचं आहे..”

 

थोड्याच वेळात सुजय निधी कडे पोहोचला.

सुजय घरात आला आणि निधीला समोर बघताच दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांना बघतच राहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच भाव उमटला होता. मम्मा पप्पाही दोघांना एकांत मिळावा म्हणून नकळत तिथून निघून गेले. कितीतरी वेळ दोघेही फक्त नजरेनेच बोलत होते.

 

सुजयने निधीसाठी आणलेले गुलाबाचे फुल हळूच निधीला दिले आणि म्हणाला, “दिस इज फॉर यू…”

 

निधी – “थ्यॅंक्यू…”

 

सुजय – “आज सुट्टी घ्यायची..? तुझा होकार ऐकल्यापासून आनंदाच्या भरात माझं कशातच लक्ष लागत नाहीये..आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे.. प्लीज.. सुट्टी घे ना..आज एकत्र वेळ घालवू आपण..”

 

निधी जरा विचार करत म्हणाली, “चालेल..मलाही आवडेल आजचा दिवस सेलिब्रेट करायला..मी लगेच सुट्टीचं कळवते ऑफिसमध्ये ..”

 

मम्मा गरमागरम कॉफी घेऊन आली.

 

निधी मम्मा ला म्हणाली, ” मम्मा, आज आम्ही सुट्टी घेऊन बाहेर जायचा विचार करतोय…”

 

मम्मा – “अरे व्वा…छान एंजॉय करा..”

 

दोघांनी कॉफी घेतली आणि मम्मा पप्पांची भेट घेऊन सुजय निधीला घेऊन बाहेर गेला.

 

निधी‌- “आपण नक्की कुठे जातोय..”

 

सुजय – “ते तुझ्यासाठी सरप्राइज…”

 

सुजय निधीला एका निसर्गरम्य ठिकाणी घेऊन गेला. मंद वाहणारी नदी, आजुबाजूला हिरवागार झाडे , त्यातून डोकावणारे सुर्य किरणे ,पक्ष्यांचा किलबिलाट आणि सोबतीला मंद वाहता गार वारा…

 

निधी आजुबाजूला बघत म्हणाली, “शहरालगत इतका सुंदर परिसर आहे हे मला पहिल्यांदाच कळतंय..काय मस्त वाटतंय ना इथे..”

 

सुजय – “हो ना..माझी आवडती जागा.. पक्ष्यांचे फोटो काढायला मी पहाटेच्या वेळी येतो बरेचदा इकडे…इतकी शांत आणि प्रसन्न जागा कुठेच नाही असं वाटतं आणि म्हणूनच मी आज तुला इथे घेऊन आलो.. आपल्याला इतका छान एकांत शहरात दुसरीकडे मिळाला नसता ना.. ”

 

निधी – “खरंच… खूप प्रसन्न वाटतंय इथे..”

 

निधीच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत सुजय म्हणाला, “निधी, यु आर ब्युटीफूल.. थ्यॅंक्यू फॉर कमिंग इन माय लाईफ..”

 

ते ऐकून निधी गालावरची केसांची बट मागे करत नुसतीच लाजली.

 

सुजयने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “किती गोड लाजतेस…एकदा माझ्याकडे बघ ना..”

 

निधी मात्र अजूनच लाजून चूर झाली आणि सुजयच्या हातातून हात सोडवत नदीकडे चेहरा फिरवत म्हणाली, “सुजय…मी लाजत वगैरे नाहीये हा.. तुझं आपलं उगाच काहीतरी..”

 

सुजय – “अच्छा..लाजत नाहीये का… बरं बरं..मग एकदा बघ ना माझ्याकडे..”

 

निधीने हळूच तिचे डोळे मिटले आणि सुजय कडे पलटून बघत डोळे उघडून त्याच्याकडे हळूच बघितले तर तो एकटक तिलाच बघत होता. त्याच्या डोळ्यात तिच्याविषयीचे प्रेम तर चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. निधी ने लगेच जाऊन त्याला मिठी मारली आणि म्हणाली, “मला सोडून नाही ना जाणार कधीच..?”

 

सुजयने तिला अलगद मिठीत घेतले आणि म्हणाला “कधीच नाही..मी एकदा तुझा हात हातात घेतला, तो अगदी आयुष्यभरासाठी..आय लव्ह यू निधी..”

 

निधीच्या डोळ्यातून चटकन आनंदाश्रु ओघळले. तिने त्याच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली, “आय लव्ह यू टू..”

 

सुजयमुळे निधीचा प्रेम, लग्न यावरून उडालेला‌

विश्वास नव्याने बहरला.

 

समाप्त!!!

 

 

ही कथा तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

 

 

Comments

2 responses to “Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_चार_अंतिम”