सानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली. हसतमुख चेहरा असलेल्या सानिकाचे डोळे रडून सुजलेले होते, चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता. तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आई बाबांच्या काळजात धडकी भरली. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत. नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता. काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडली. आई बाबांनी तिला आधी शांत केले, बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला. सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की काय झालंय ते ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं.
सानिका अजूनही रडतच होती, बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सानू, आधी तू चहा घे, नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला.
कसंबसं रडू आवरून ती चहा प्यायली. आई बाबा पुढे काही बोलण्याआधी ती म्हणाली, “आई बाबा, आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी… खूप मोठी फसवणूक..” इतकं बोलून ती परत रडायला लागली.
तिचं हे वाक्य ऐकताच आई बाबांना अजूनच काळजी वाटली.
बाबांनी तिला विचारले, “सानू, असं का म्हणते आहेस.. नक्की काय झालंय ते नीट सांग बघू…तू काय बोलते आहेस काही एक कळत नाहीये आम्हाला..”
सानिका रडत रडत सगळं सांगायला लागली. ती जे काही सांगत होती ते ऐकून आई बाबांना मोठा धक्का बसला.
सानिका आणि सुशांत यांचे काही महीन्यांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झाले. दोघांचेही अरेंज मॅरेज.
सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत, उंच सडपातळ बांधा, स्वभावाने जरा लाजाळू, अबोल, सहनशील. भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी. मोठा भाऊ नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात राहायचा.
सानिकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांत चे स्थळ आले.
सुशांत सरकारी नोकरीत कामाला, दिसायला राजबिंडा, घारे डोळे, उंच पुरा, पिळदार शरीरयष्टी. सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले. दोघांचे लग्न ठरल्यावर महीनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना बोलायला भेटायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला. वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबाविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.
लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आई बाबांना घर अगदी खायला उठू लागले. इकडे सानिका सुद्धा नविन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्न म्हंटलं की प्रेम, उत्साह, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले.
लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांत ची वाट बघत राहीली पण तो आलाच नाही. शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला, सानिका लाजतच त्याला म्हणाली ,”रात्री बराच वेळ वाट बघितली मी तुमची..”
त्यावर तो इतकंच बोलला, “सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलचं नाही…..त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती, जरा वेळ जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला..मुळात येऊच दिले नाही मला..असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला..तू ही दमली असणार ना लग्नाच्या धावपळीत….”
सुशांत अगदी सहज असं बोलून गेला. पहिल्या रात्री पेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालंय की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार, असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्याचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटत असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही.
फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली. मोठे दिर जाऊ, सासू सासरे सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला. सुशांत सुद्धा जरा फ्रेश होऊन त्यांच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला. जाऊबाईंनी हळूच सानिकाला विचारले, “काय मग, कशी होती पहिली रात्र.. काही त्रास तर होत नाहीये ना..काही वाटलं तर मला बिनधास्त सांग…मोठ्या बहिणी प्रमाणे आहे मी तुला..”
जाऊबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं. तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली.
क्रमशः
सानिका आणि सुशांत यांचं नातं प्रेमाने बहरेल की नाही? सुशांत सानिका पासून काही लपवत तर नाहीये ना..? सानिका माहेरी निघून आल्यावर आई बाबांना म्हणाली की सुशांत नी तिची, तिच्या घरच्यांची फसवणूक केली आहे…हे सगळं नक्की काय आहे… फसवणूक नक्की कशाबद्दल….हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागात.
पुढचा भाग लवकरच पोस्ट करण्यात येईल.
पुढच्या भागाची उत्सुकता नक्कीच लागली असणार ना…मग कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.
मी लिहिलेली ही कथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed