मागच्या भागात आपण पाहीले की शामरावांनी आत्महत्या केल्यावर सुमित्राला संसाराचा गाडा चालवताना अनेक खस्ता खाव्या लागल्या त्यात काही वर्षांनी आजीही गेली. होती नव्हती ती जमिन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. सुमित्रा आता दोन मुलांना घेऊन दुसर्यांकडे शेतीचे, कुणाच्या घरचे घरकाम करून संसार चालवत होती.
गणेश म्हणजेच सुमित्राच्या मुलाला आईच्या कष्टाची जाणीव होती. आई मी शाळेत जाण्यापेक्षा तुला कामात मदत करतो असं तो म्हणायचा पण आईची इच्छा होती ती मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, मोठं व्हावं, नावं कमवावं. तरीही शाळा , अभ्यास करून सुट्टीच्या दिवशी घरातील कामात, लहान बहिणीला सांभाळून इतर कामात तो आईला मदत करायचा.
अशा परिस्थितीत एकटी बाई बघून गावात अनेकांचे वाईट अनुभव सुमित्राला यायचे. मदतीचा हात पुढे करत तिचा फायदा घेऊ बघणारे अनेक जण तिला भेटले पण सुमित्रा स्वाभिमानी होती. एकटी आहे म्हणून कुणापुढे न झुकता वाईट हेतूनेने कुणी जवळ येऊ पाहत असेल तर त्याची खरडपट्टी काढल्याशिवाय शांत बसायची नाही, ते त्या परिस्थितीत गरजेचे होते. मेहनत करून ती दोन मुलांना सांभाळत होती, त्यांनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे हे तिचे स्वप्न होते.
अशातच गणेश बारावी उत्तीर्ण झाला, मागोमाग दुर्गाचे सुद्धा शिक्षण सुरू होतेच. बारावीनंतर गणेश ने कृषी क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकला, गावातील इतर शेतकऱ्यांना आपल्या घरच्या सारखी वेळ येऊ नये म्हणून शक्य ती मदत करायची, आधुनिक तंत्रज्ञान शिकवायचे हे गणेशचे ध्येय होते.
गावातील एकाची शेती गणेशने वर्ष भर सांभाळायला घेतली, जमिनीची सुपीकता समजून घेऊन सिमला मिरचीचे पिक घेण्याची तयारी केली, योग्य ती काळजी घेऊन सिमला मिरचीचे उत्पन्न घेतले. जवळपास कुठेच हे पिक नसल्याने त्याला चांगला नफा मिळाला. गावातील अनेक लोक त्याच्या घरी शेती विषयक सल्ला घ्यायला येवू लागले. गणेशच्या मदतीने कुणी वेगवेगळ्या भाज्या, हळद अशा प्रकारचे उत्पादन करू लागले. म्हणायला सोपे असले तरी शेती म्हंटलं की मेहनत ही आलीच शिवाय निसर्गाची साथ हवीच. तरी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून योग्य ती काळजी घेत गावात शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ होत होती शिवाय योग्य ठिकाणी योग्य दरात विकून शेतकऱ्यांना मेहनतीचा पैसा मिळावा म्हणून गणेश पुरेपूर प्रयत्न करत होता. सोबतच थोडे फार कर्ज काढून त्याने शेती विकत घेतली, त्यात ऋतू नुसार सुपिकता लक्षात घेऊन वेगवेगळे पिक घेतले.
कित्येक वाईट दिवस बघितल्यावर आता गणेशची परिस्थिती सुधारली होती, आईला गणेशचा खूप अभिमान वाटायचा.
मागोमाग दुर्गा बारावी झाली, पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पुढे गावातील शाळेत शिक्षिका व्हायचं, गावातील मुलांना सुशिक्षित करायचं हे तिचं गोड स्वप्न होतं.
आता सुमित्राच्या कष्टाचे फळ तिला गुणी मुलांच्या स्वरूपात मिळाले होते. गावात गणेशची एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण झाली होती, कुणाला काही मदत लागली, कुठलीही अडचण आली तरी गणेश त्यांच्यासाठी धावून जायचा. शेतीविषयक सल्ल्यासाठी तर सतत गणेशला भेटायला कुणी ना कुणी येणारे असायचे. गणेशने तालुक्याला अर्ज देऊन, सरकारी कार्यालयात चकरा मारत गावात कालवे तयार करवून घेतले, नदी वरून पाइपलाइन टाकून शेतांमध्ये पाण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्याच्या या कार्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी सुद्धा त्याचा सल्ला घ्यायला येवू लागले.
एक सुशिक्षित, मेहनती, प्रामाणिक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सधन शेतकरी म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. आईला त्याच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान वाटला.
गणेशने झोपडीच्या जागी छोटंसं घर बांधलं, मेहनतीने कर्ज फेडण्यासाठी गेलेली जमिन परत मिळवली. आईने खूप कष्ट केले पण त्याचे खर्या अर्थाने चीज झाले.
जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने गणेशचा सत्कार आयोजित केला तेव्हा या सत्काराची खरी मानकरी माझी आई आहे, सगळं श्रेय आईला जाते हे तो अभिमानाने सांगत होता. आम्ही खूप हलाखीची परिस्थिती अनुभवली आहे.
तिमीरातूनी तेजाकडे येण्याचा आमचा हा प्रवास आईमुळे, तिच्या मेहनती मुळे शक्य झाला हे सांगताच सुमित्रा बाईंसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.
कथेतील परिस्थिती ही आपल्या देशात सत्य परिस्थिती आहे. कर्ज बाजारी शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खूप वाईट परिस्थितीतून जावे लागते. म्हणायला सोपे असले तरी अशा हलाखीच्या परिस्थितीत मेहनत करून एकटीने मुलांना सबल, सुशिक्षित बनविणे खरंच कौतुकास्पद आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती ही विचार करण्यासारखी आहे. शिक्षणा अभावी दलाल अथवा इतर कुणाकडून शेतकर्यांची फसवणूक होते, योग्य दर, हक्काचा मेहनतीचा पैसा त्यांना मिळत नाही. अशा वेळी गणेश सारखा प्रमाणिक सल्लागार, मदत करणारा कुणी असेल तर त्याचे खरंच केले तितके कौतुक कमीच आहे.
याविषयी तुमचं मत नक्की कळवा ?
लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही ?
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed