“आई, मी निघतेय गं. सायंकाळी उशीर होऊ शकतो, कळवते तुला घरी यायला निघाले की.” अनघा गाडीला चाबी लावतच आईला सांगत बाहेर जायला निघाली. आई बाबाही मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले.
अनघा आई बाबांना एकुलती एक, अगदीच बिनधास्त मुलगी, तिला पक्षी, प्राण्यांचे फोटो काढण्याचा छंद. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बनण्याचे तिचे स्वप्न तिला सत्यात उतरवायचे होते. अनघा एक आत्मविश्वासू मुलगी, तिला शोभेसा तिचा बॉयकट, शक्यतो टिशर्ट पॅंट शूज जॅकेट असा तिचा पोशाख असायचा. बाबा तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत करायचे पण आईला मात्र ते फारसं पटत नसलं तरी अनघाची जिद्द आणि बाबांचा पाठिंबा त्यापुढे आईचे काही चालत नव्हते. अनघाचे कॉलेज संपून तिने वाइल्ड लाइफ फोटोग्राफी चा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्या प्रोजेक्ट्स साठी ती शहराबाहेर फोटोग्राफी साठी जात असे.
असंच आज रविवार असून सुद्धा ती सकाळीच घराबाहेर पडली. आईला तिच्या अशा रूटीन मुळे फार चिडचिड व्हायची.
न राहावून आई बाबांना म्हणाली, “आता अनघा लहान नाही हो, किती दिवस असं बाहेर बाहेर राहणार. मुलीने जरा घरकामात मदत करावी, घर कसं सांभाळतात समजून घ्यावं, लग्नाचं वय झालं आता तिचं. करीअर ठिक आहे पण हेही महत्त्वाचे आहेच ना. तुम्ही तिला काही म्हणत नाही, माझं काही ती ऐकत नाही कारण बाबा असतात ना पाठीशी घालायला.”
आईचा मुड काही ठिक नाही याचा बाबांना मॉर्निंग वॉकला जातानाच अंदाज आला होता.
बाबा त्यावर म्हणाले ” अगं, जबाबदारी पडली की करेल ती सगळं, तू कशाला काळजी करतेस आणि लग्नाचं आताच काय घाई आहे, करीयर होऊ दे तिचं सेट, मग बघूया. खूप काही वय झालं का आपल्या मुलीचं.”
आईला ते ऐकून अजूनच राग आला. दुपारी अनघाच्या मावशीचा नेमका त्याच दिवशी फोन आला अनघा साठी स्थळ सुचवायला. मावशी म्हणाली ” ताई, आपल्या अनूसाठी साजेसे स्थळ आहे, मुलगा परदेशात नोकरी करतो. घरी एकुलता एक, परिस्थिती चांगली आहे. त्याची आई आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. मुलगा अगदी साधा सरळ, शांत स्वभावाचा आहे. अनूला शोधून सापडणार नाही असं स्थळ. पुढच्या आठवड्यात सुट्टीला येतोय तो, त्यांना मी अनू विषयी सांगितले, त्याच्या आईची इच्छा आहे की मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घ्यावा. तू अनूला कल्पना दे आणि भाऊजींना सांग हे स्थळ हातचं सोडू नका.”
आईने ते ऐकून अजूनच अनघाच्या लग्नाचं मनावर घेतलं आणि बाबांना याविषयी कल्पना दिली. बाबा म्हणाले “अनघाला सांगून बघूया पण घाई नको करायला.”
आई चिडून म्हणाली “अहो, बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे, पुढचं पुढे बघू. त्यालाही अनघा आवडायला नको का. तिच्या केसांचा बॉयकट, राहणीमान, तिचे विचार त्यांना पटेल याची काय खात्री. कित्येक वेळा सांगितलं तिला जरा मुलींसारख राहत जा. जरा केस वाढव. इतकं बिनधास्त राहणं बरं आहे का मुलींच्या जातीला. मी सांगितले ते तुझ्या दोघांनाही पटत नाही.”
आईला शांत करत बाबा म्हणाले “तू आधी शांत हो बघू. काळजी करू नकोस, मी बोलतो अनघा सोबत पण मला अजूनही वाटते की घाई नको करायला.”
बाबांना खात्री होती की अनघा आता लग्नाला नकारच देणार पण आईला वाईट नको वाटायला म्हणून बाबा बोलून गेले.
सायंकाळी अनघा घरी आली, तिच्या फोटोग्राफी मधल्या दिवस भराच्या गमतीजमती ती आई बाबांना सांगत होती. रात्री जेवण झाल्यावर आईने बाबांना इशारा करून अनघा सोबत लग्नाच्या स्थळा विषयी बोलण्याची आठवण करून दिली.
बाबा अनघाला म्हणाले “अनू बेटा, तुला आता करीअर सोबतच भविष्याचा, लग्नाचा विचार करायला हवा. लगेच लग्न कर असं म्हणत नाही आम्ही पण जरा आता मनावर घे, तुला कसा मुलगा हवा, तुझ्या अपेक्षा काय आहेत याविषयी जरा विचार कर.”
बाबांच्या अशा बोलण्याने अनघा जरा गोंधळली आणि तिला हेही लक्षात आले की आईने लग्नाचा विषय काढला असणार म्हणून बाबा असं म्हणत आहेत, ती म्हणाली “बाबा असं अचानक काय लग्नाचं, मला सद्ध्या तरी लग्न नाही करायचं.”
आई तिला चिडून म्हणाली “मग कधी करणार आहे लग्न तू, अगं जरा विचार कर आता, जरा इतर मुलींसारख राहायला शिक. करीअर सोड नाही म्हणत मी पण सोबत हे सगळं महत्त्वाचं आहे ना.”
आईचा पारा चढलेला बघून अनघा आईच्या मिठीत शिरून हसविण्याचा प्रयत्न करत म्हणाली “आई तुला मला सासरी पाठवायची किती घाई झाली गं, नको झाली का गं तुला मी. आई अगं मी आता लगेच लग्न नको म्हणते , कधीच नाही करणार कुठे म्हणाली.”
आई तिला समजावत म्हणाली “अनू , अगं आईच्या काळजीपोटी बोलते मी. योग्य वयात लग्न झालेलं बरं. सरळच सांगते तुला, एक स्थळ आणलं आहे मावशीने, पुढच्या आठवड्यात तू त्या मुलाला भेटावं असं वाटतं आम्हाला. चांगले स्थळ आहे, बघायला काय हरकत आहे.”
अनघाने बाबांकडे बघितले, बाबांनी इशार्याने हो म्हण म्हणून सांगितले.
अनघा इच्छा नसतानाही होकारार्थी मान हलवून म्हणाली “आई, ठिक आहे, मुलगा बघायला हरकत नाही पण त्याला मी आहे तशीच आवडली तर ठिक आणि माझं करीअर, माझं स्वप्न पूर्ण होत पर्यंत लग्न उरकून घ्यायची घाई नको हे सगळं मला त्याच्याशी आधी क्लिअर करायचे आहे. हे पटलं तर ठिक नाहीतर नको मला इतक्यात लग्न.”
त्यावर म्हणाली “अगं किती अटी घालशील, आधी बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. त्यांनी होकार दिला तर मग ह्या गोष्टींचा विचार करू.”
पुढे काय होते ते बघूया पुढच्या भागात ?
क्रमशः
पुढचा भाग लवकरच….
हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा ?
©अश्विनी कपाळे गोळे
लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव. नावासह शेअर करायला हरकत नाही.
Comments are closed