मागच्या भागात आपण पाहीले की अनघासोबत रितेश वाइल्ड लाइफ फोटोग्राफी साठी जातो, असंच रोजचं त्याच रूटीन बनतं. पाहता पाहता त्याला अमेरिकेत परत जाण्याची वेळ जवळ येत असते. एकत्र वेळ घालवून रितेश अजूनच अनघाच्या प्रेमात पडतो. अनघाचं सगळं लक्ष मात्र सध्या करीअर वर असतं. आता पुढे.
रितेश अनघाला सांगतो “आजचा दिवस संपूच नये असं वाटत आहे. माझी सुट्टी संपली, उद्या मला सकाळीच परत जायला निघायचे आहे. अनघा तुझ्यामुळे माझी सुट्टी खूप मजेत गेली, एक वेगळाच अनुभव अनुभवला मी, आयुष्यभर लक्षात राहील असा. Thank you so much ? “
अनघा त्यावर हसत म्हणाली ” झालं तुझं आभारप्रदर्शन ? कमॉन रितेश, हे असं औपचारिक होऊ नकोस, आपण चांगले मित्र आहोत, मैत्री मधल्या आठवणी मजेशीर असतातच.. पुढच्या सुट्टीला आल्यावर अजून नवीन जागी घेऊन जाते तुला..आता तर हस ?”
अनघा आता परत कधी भेटणार म्हणून रितेश भावनिक झाला, तो तिच्या प्रेमात बुडाला होता, पण अनघाला सांगायची हिम्मत होत नव्हती.
रितेश अमेरिकेत परत गेला पण अनघाच्या विचारातून काही केल्या तो बाहेर पडत नव्हता. मी इकडे असताना अनघाच्या आयुष्यात दुसरा कुणी आला तर..या विचाराने अस्वस्थ होऊ लागला. काही झाले तरी अनघा सोबतच लग्न करायचे, तिला मनातलं सगळं सांगायचं असं सारखं मनोमन ठरवून स्वतः चे समाधान करून घ्यायचा.
इकडे अनघा प्रोजेक्ट मध्ये व्यस्त झाली पण दोन आठवडे रितेश सोबत असल्याने तिला कुठे तरी काही तरी चुकल्यासारखे जाणवायला लागले.
काय होतं आहे कळत नसलं तरी ती रितेशला मिस करत होती. दोघांचे फोन वर चाटींग सुरू असायचेच.
एक दिवस अनघाला रितेशचा फोन आला, दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. अनघा तिच्या कामाबद्दल सांगत होती आणि सोबतच म्हणाली “काम मस्त चाललंय, आता प्रोजेक्ट पूर्ण होईल. काही नामांकित फोटोग्राफर ला मी अप्लीकेशन दिलं होतं, सोबत फोटो पाठवले. त्यात एकाने मला मुंबईला बोलावले आहे. माझ्या करिअरचा पहिला टप्पा बहुतेक सुरू होणार. मी खूप एक्साईटेड आहे.
बरं तुझं काय चाललंय, परत कधी येणार आहेस. तू परत गेल्यावर खूप मिस केलं तुला..तुझं आभारप्रदर्शन आठवून हसू येते मला अजूनही.”
अनघा सुद्धा आपल्याला मिस करते ऐकताच रितेशला आनंदी आनंद झाला. तो उत्साहाच्या भरात तिला म्हणाला “तू म्हणशील तेव्हा यायला तयार आहे मी, I miss you so much अनघा..”
अनघाला त्याच उत्तर ऐकून हसू आले आणि मनोमन आनंदही झाला. आपण रितेश साठी किती स्पेशल आहोत हे तिला जाणवलं. दोघांचे आता दररोज फोन, व्हिडिओ कॉल, चाटींग सुरू झाले.
अनघा आतुरतेने रितेशच्या फोनची वाट पहायची. दिवसभरात घडलेल्या गमतीजमती, गप्पा रितेशला सांगायची.
अनघाला मुंबईत नोकरी मिळाली, एका प्रख्यात फोटोग्राफर सोबत ती काम करायला मुंबईत गेली. तिचे स्वप्न पूर्ण होतं होते.
सोबतच ती रितेशच्या प्रेमात पडली होती पण तिला ते कळत नव्हते. रोजच्या दोघांच्या फोन वर गप्पा सुरू होत्याच.
काही दिवसांनी अनघाचा वाढदिवस होता. ती आई बाबांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी जाणार होती. आई बाबांसाठी तिनं स्वत:च्या कमाईने छान गिफ्ट घेतले. अगदी उत्साहात घरी जाण्याची तयारी सुरू होती पण मागच्या दोन दिवसांपासून रितेशने तिला फोन केला नव्हता. मॅसेज वर इतकाच रिप्लाय आला “काही दिवस मी कॉन्फरन्स मध्ये व्यस्त असणार आहे तेव्हा फोन करू शकणार नाही. त्यानंतर मॅसेजला सुद्धा काही रिप्लाय नाही.”
अनघाला अस्वस्थ वाटू लागले, ती घरी जायला निघाली पण तिचं मन मात्र रितेशला मिस करत होतं. फोन नाही तर साधा मॅसेज तरी करायचा ना.. इतकं काय बिझी असतात लोकं. आपण रितेश मध्ये गुंतलो आहे हे तिला जाणवत होते. ती त्याच्या विचारातच घरी पोहोचली.
आई बाबा अनघाला बघून खूप आनंदी होते, आईला तिच्या मनातली घालमेल कळत होती. नक्कीच रितेशच्या विचाराने अनघा बेचैन आहे हे आईने ओळखले.
दुसऱ्या दिवशी अनघाचा वाढदिवस होता, आज रितेश नक्कीच फोन करणार याची तिला खात्री होती, सतत ती त्याच्या फोनची वाट पहात होती.
आईने तिचे औक्षवान केले, जेवणात अनघाच्या आवडीचा मेनू बनवला पण अनघा मात्र नेहमी वाढदिवसाला जशी उत्साहात असते तशी आज नव्हती. आई बाबांनी तिच्या जुन्या मित्र मैत्रिणींना सायंकाळी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित केले. अनघा मात्र रितेशने फोन कसा केला नसेल, माझा वाढदिवस माहीत कसा नसेल अशा विचाराने बेचैन होती. रितेशच्या आई बाबांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या, न राहावून अनघाने त्याच्या आईला विचारले ” काकू, रितेश सोबत काही बोलून झालं का इतक्यात. ” त्यावर त्या म्हणाल्या ” हो कालच रात्री बोलले मी त्याच्याशी. का गं, तुमचं बोलणं चालणं सुरू आहे वाटतं ? असंही मिश्कीलपणे तिला चिडवत म्हणाल्या. “
अनघाला आता अजून विचारात पडली, आईला तर फोन केला मग माझ्या सोबत का बोलत नाहीये रितेश, तो मला टाळत तर नाही ना..
सायंकाळी ठरल्याप्रमाणे सगळे मित्र मैत्रिणी, अनघाची मावशी सगळे घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले, अनघा वर वर आनंदी दिसत असली तरी ती सतत रितेशचा विचार करत होती.
घरी बाबांनी मस्त सजावट करून सुंदर केक आणला. केक कापणार तितक्यात समोरून आवाज आला ” मला सोडून केक कापणार आहेस अनघा तू..”
बघते तर काय रितेश आणि त्याचे आई बाबा फुलांचा गुच्छ आणि हातात गिफ्ट घेऊन उभे.
अनघाचा आनंद ओसंडून वाहू लागला, धावत जाऊन ती त्याला बिलगली, डोळ्यात आनंदाश्रु आले रडतच त्याला म्हणाली ” तू खूप वाईट आहे..का मला फोन केला नाहीस, किती काळजी वाटली मला..एक एक क्षण जड जात होता तुझ्या शिवाय, एकही क्षण तुझ्या विचारांतून मला बाहेर येवू देत नव्हता… तुला कळत कसं नाही मी प्रेमात पडलीय तुझ्या, नाही राहू शकत तुझ्याशिवाय..I love you..I missed you so much..”
अनघाची आई म्हणाली “अनघा अगं आत तर येवू दे त्यांना..”
आईच्या बोलण्याने अनघा भानावर आली. आपण सगळ्यांसमोर काय काय बोललो, चक्क प्रेमाची कबुली दिली..अनघा लाजून चूर झाली आणि पळतच तिच्या खोलीत पळाली. रितेश सुद्धा लाजला, आई बाबांना आनंदही झाला. मावशी अनघाला बाहेर घेऊन आली.
रितेश सोबत अनघाने केक कापला आणि नंतर रितेशने गुडघ्यावर बसून अनघाचा हात हातात घेऊन तिला लग्नाची मागणी घातली. सुंदर अशी एक अंगठी तिच्या बोटात घातली. अनघा मनोमन इतकी आनंदी होती की एखाद्या स्वप्नात असल्याचा भास तिला होत होता. तिने होकारार्थी मान हलवून त्याच प्रपोजल स्विकारलं आणि सगळ्यांनी टाळया वाजविल्या. मागून आई म्हणाली ” अनू, हि घे अंगठी , रितेशच्या बोटात घाल. आम्हाला रितेशने सांगितले होते तो येणार असल्याचे आणि हा सगळा प्लॅन त्याचाच तर आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा अंगठी आणून ठेवली. “
अनघाला रितेशचं सरप्राइज खूप आवडलं. अशा प्रकारे जुळून आल्या रेशिमगाठी… दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडले. पुढे तयारी सुरू झाली त्यांच्या लग्नाची.
समाप्त.
अनघा आणि रितेशची ही प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा
नावासह शेअर करायला हरकत नाही
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed