नीलम आणि संजय, एक आनंदी , सुखी जोडपं. वर्षभरापूर्वी लग्न झाले. संजय एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आणि नीलमही त्याचं कंपनीत नोकरीला. संजय नेहमी कामात मग्न असायचा, अतिशय हुशार, गरीब परिस्थितीतून वर आलेला. जास्त कुणाशी न बोलता आपलं काम करायचा, कामात चोख असल्याने लवकरच चांगल्या पदावर प्रमोशन मिळाले. नीलम बडबडी, दिसायला साधारण पण बोलण्यात गोडवा, मेहनती मुलगी. तिथे नोकरीला लागल्यापासून नीलमला संजय आवडायचा, ती स्वतः हून त्याच्याशी बोलायची संधी शोधायची. तोही तिला कामात मदत करायचा, नीलमच्या स्वभावामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. संजय क्वचितच हसायचा आणि नीलम कायम त्याला हसवायचा प्रयत्न करायची. संजय मुळातच इतक्या गंभीर स्वभावाचा आहे की काही कारणाने तो असा गंभीर, आपल्याच विश्वात मग्न असतो हा प्रश्न नीलमला पडायचा, याविषयी ती इतरांनीही विचारायची पण संजयच्या अबोल स्वभावामुळे कुणालाही काही माहित नव्हते. संजयच्या अबोल राहण्याच रहस्य जाणून घेण्यासाठी नीलम खूप प्रयत्न करायची. ऑफिसमध्ये नीलम ही संजयची पहिलीच मैत्रिण.
काही महीन्यात दोघांची छान मैत्री झाली तेव्हा नीलमने संजयला सुट्टीच्या दिवशी शाॅपींगला सोबत जाण्यासाठी आग्रह केला, बराच वेळ आग्रह केल्यावर संजय तयार झाला. ठरल्याप्रमाणे दोघांनी सोबत शॉपिंग केली, डिनर केला नंतर संजय नीलमला घरी सोडायला आला. आवडत्या व्यक्तीबरोबर छान वेळ घालवल्यामुळे नीलम जाम खुश होती. असेच नीलमच्या आग्रहाखातर संजय तिच्यासोबत वेळ घालवू लागला, त्यालाही तिची सोबत आवडायला लागली.
एक आठवड्यानंतर संजयचा वाढदिवस होता, नीलमने आॅफिसमध्ये छान सरप्राइज प्लॅन केला. संजय पहिल्यांदा आॅफिसमध्ये सगळ्यांसोबत एंजॉय करत होता. कित्येक वर्षांनी त्यानी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आज दिसत होता. आॅफिसनंतर संजयने स्वतः नीलमला डिनर साठी विचारले, नीलम तर एका पायावर तयार झाली. आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हरकत नाही असं मनोमन ठरवून नीलम छान तयार होऊन संजयला भेटायला गेली. संजय स्वतःहून मनातील भावना कदाचित व्यक्त करणारं नाही तेव्हा आपणच पुढाकार घेतला पाहिजे असा विचार करून नीलम छान लाल रंगाचा गुलाबाच्या फुलाचा गुच्छ जाताना घेऊन गेली. दोघांनी सोबत डिनर केला आणि परत जाताना नीलमने संजयला प्रपोज केले, आपल्या मनातील प्रेम व्यक्त केले. संजयला नीलमच्या मनातील भावना आधीच कळल्या होत्या, त्याच्यावर नीलम इतकं मनापासून प्रेम करते तिला दुखवायचे नाही हे संजयने मनोमन ठरवले होते कारण प्रेमभंग काय असतो हे त्याने जवळून अनुभवले होते. संजयने नीलमच्या प्रेमाचा स्वीकार केला, पण मनात अजूनही कांचनच्या आठवणी ताज्या होत्या. आता पुढचं आयुष्य नीलम सोबत आनंदात घालवायचा निर्णय त्याने घेतला. नीलमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. लवकरच संजय नीलमच्या घरी भेटायला गेला, दोघांच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि जन्मोजन्मीच नातं बांधून दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. आनंदात संसार सुरू झाला. संजय हसतखेळत राहायचा, पूर्वीचा गंभीर संजय आता आनंदी, उत्साही असायचा.
नीलमला खूपदा वाटायचे की संजयला त्याच्या भूतकाळाविषयी विचारावे, कोणत्या कारणाने तो इतका गंभीर, उदास असायचा जाणून घ्यावं पण संजयला ते आवडले नाही तर गोड नात्यात काही दुरावा यायला नको म्हणून तिची त्याविषयी विचारायची हिम्मत होत नव्हती.
एकदा शाॅपींग मॉल मध्ये दोघे फिरत असताना संजयला अचानक समोर कांचन दिसली , तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास दिसत नव्हता शिवाय एकटेपणा न आवडणारी ती आज एकटीच फिरत होती. कांचननेही संजयला पाहिले पण संकोचाने ती भराभर नजरेआड गेली. संजयने ते लगेच घेरले, आपल्याला पाहून कांचन लपली हे त्याला लक्षात आले शिवाय नीलम सोबत असल्याने तो गुपचूप तिथून निघून गेला. त्याच्या मनात मात्र विचार चक्र सुरू झाले, इतक्या वर्षांनी आज कांचन इथे कशी, ती तर परदेशी गेली होती. त्याच्या मनात तिच्या आठवणी परत नको असताना जाग्या झाल्या. आता याविषयी विचार करायला नको म्हणून संजय स्वतःला नीलम मध्ये गुंतवायचा प्रयत्न करायचा, तिला शक्य तितका जास्त वेळ द्यायचा.
एक दिवस अचानक संजयला फेसबुकवर कांचनचा मॅसेज आला “संजय, मी खूप अडचणीत आहे. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मला माहित आहे तुझ्या आयुष्यात मला आता काही स्थान नाही पण मला फक्त एकदा मदत कर. मी परत तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. ”
कांचनच्या मॅसेजने संजय गोंधळला. कितीही नाही म्हटले तरी कांचनचे परत अशा प्रकारे समोर येणे संजयला विचार करायला भाग पाडत होते.
कांचन आणि संजयच काय नातं होतं, नीलम आयुष्यात येण्यापूर्वी संजय का इतका गंभीर, उदास असायचा, कांचन कुठल्या अडचणीत आहे, तिला संजय कडून काय मदत पाहिजे आहे हे सगळं पुढील भागात जाणून घेऊच. तोपर्यंत stay tuned..
कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा..
©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
नावासह शेअर करायला हरकत नाही.
Comments are closed