लव ट्रॅंगल… प्रेमाचा त्रिकोण… भाग २

Love Stories

कांचनच्या मॅसेजने‌ संजय गोंधळला, नको असताना तिचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. नीलमला सुद्धा याविषयी काही माहिती नव्हते. आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या नीलमला नकळत दुखावले जाऊ नये म्हणून तो कांचनचा विचार टाळायचा प्रयत्न करू लागला. आपल्या आयुष्यात आता नीलमच सगळं काही आहे हे त्याला कळत होते. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याने नीलम सोबत काही दिवस गोव्याला फिरायला जायचा बेत आखला. आॅफिसमध्ये रजा घेऊन पाच दिवसांसाठी दोघेही गोव्याला गेले, तिथे छान मज्जा केली. नीलम ही खूप आनंदात, उत्साहात होती. पाच दिवसांनी परत आल्यावर संजयला आई कडून कळाले की त्याला भेटायला कांचन घरी येऊन गेली, तिला काही तरी मदत हवी आहे आणि त्यासाठी ती आली होती शिवाय संजय चा फोन नंबर ही घेऊन गेली. ते ऐकताच संजय हादरला. ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गोष्ट परत परत त्याच्या जवळ येत होती. संजयच्या आईला कांचन त्याच्या सोबत शिकायला होती एवढेच माहीत होते त्यामुळे ऑफिसशी निगडित नोकरी संबंधित काम असेल म्हणून त्यांनी फार मनावर घेतले नाही. या सगळ्या प्रकाराने नीलमही गोंधळली, कांचन कोण आहे, कशासाठी घरी आली, तिचं संजयकडे काय काम आहे हे प्रश्न तिला त्रास देत होते. संजयला संधी साधून याविषयी विचारले पाहिजे असा विचार नीलम करू लागली.
अशा परिस्थितीत काय करावे संजयलाही कळत नव्हते. नीलमला सुद्धा याविषयी अंधारात ठेवायचे नव्हते. योग्य वेळी नीलमला याविषयी सांगायचे अशे संजयने ठरविले.
रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागत नव्हती. नकळत तो भूतकाळात शिरला.
कांचन आणि संजय शाळेपासून एकत्र शिकायला होते, काॅलेजलाही एकत्र. कांचन श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर, हुशार,आत्मविश्वास तिच्या नसानसात भरलेला, कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही अशा विचारांची. तिच्या मीपणा असलेल्या स्वभावामुळे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. संजय गरीब घराण्यातील शांत स्वभावाचा समजुतदार मुलगा, तिच्या अल्लड स्वभावाची जाणीव त्याला होती, तिच्या घरी तिचे जास्त प्रमाणात लाड पुरवले जातात त्यामुळे ती हट्टी आहे हे त्याला माहीत होते. दोघांची शाळेपासून चांगली मैत्री होती. कुठलीही गोष्ट असो कांचन संजय पासून लपवत नव्हती, दोघेही अगदी बेस्ट फ्रेंड्स. शाळेत असताना अभ्यासातही संजय कांचनला मदत करायचा. संजयचा मित्र परिवार ब-यापैकी मोठा पण कांचन अगदी जवळची मैत्रीण.
शाळेत कुठल्याही स्पर्धा असो किंवा नृत्य, गायन स्पर्धा.. दोघेही सोबतच. बारावीच्या परीक्षेत संजय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. दोघांनाही योगायोगाने एकच काॅलेज मिळाले.
सुरवातीला कांचनला फक्त संजय हा एकच जवळचा मित्र पण आता कॉलेजमध्ये तिला तिच्यासारख्या घराण्यातील मित्र मैत्रिणी मिळाले, तिचा एक ग्रुप झाला, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीज, सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे सुरू झाले. संजयला घरच्या परिस्थितीची जाणीव होती, तो पार्टीज सारख्या गोष्टी शक्यतो टाळायचा. कांचनला मात्र जीवन शक्य तितकं एॅंजाॅय करायला आवडायचं, ती संजय सोबतही वेळ घालवायची पण त्यांच्या मैत्रीत एक अंतर पडत होतं. संजयला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं. कांचन आपल्या पासून दूर जात आहे ही गोष्ट त्याला खूप बोचत होती.
नकळत संजय पूर्णपणे कांचनच्या प्रेमात बुडाला होता. कांचनला एकदा मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत, तिचं प्रेम नसेल तरी या मैत्रीमध्ये अंतर पडता कामा नये हे सगळं एकदा कांचन सोबत बोलायला हवं नाहीतर ती आपल्या पासून दूर जाईल अशी भिती त्याला वाटत होती. कांचनला कुणीही मित्र मैत्रिणी नसताना प्रत्येक परीस्थितीत संजय सोबत असल्याने ती आपल्याला दुखावणार तरी नाही याची त्याला खात्री होती.
खूप हिम्मत करून एक दिवस संजयने कांचनला भेटायला बोलावले, तीही लगेच आली.
क्षणाचाही विलंब न लावता संजयने तिला सांगितल “कांचन, आपण दोघे बालपणापासून सोबत आहोत, एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत आलो, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस, आता मात्र आपल्या मैत्रीत एक अंतर पडत आहे, मला त्याचा खूप त्रास होतो. मला तू खूप आवडतेस कांचन, तू माझ्यापासून दूर गेलेली मला सहन होत नाही. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. “.
संजयच्या बोलण्यावर कांचन मिश्कीलपणे हसत म्हणाली ” कमाॅन संजय, हा काय बालीशपणा. आपण चांगले मित्र आहोत पण मला तुझ्या विषयी असं काहीच वाटत नाही. माझे स्वप्न खुप वेगळे आहे, मला जीवनात खूप काही करायचे आहे, आधी मला कुणी मित्र मैत्रिणी नव्हते पण आता माझा छान ग्रुप आहे, आम्ही छान मज्जा करतो. तुला हे सगळं आवडत नाही त्यात मी काही करू शकत नाही. शिवाय मी खूप प्रॅक्टिकल विचारांची आहे. मला तुझ्या सोबत आयुष्य घालवणे शक्य नाही कारण तुझी स्वप्न, तुझी आर्थिक परिस्थिती माझ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. मला छान वर्ल्ड टूर करायचा आहे, पार्टीज , शॉपिंग, एॅंजाॅयमेंट सगळं जे मला आवडतं ते तुला जमणार नाही तेव्हा तू माझा विचार सोड. आपल्या मैत्रीचा प्रवास इतकाच होता असं समज.”
एवढं बोलून कांचन निघून गेली. प्रेमाचा स्वीकार नाही केला ठिक आहे पण इतक्या वर्षांच्या मैत्रीचा प्रवास असा अचानक संपवणे कितपत योग्य आहे. तेही अशा प्रकारे भावना दुखावून. आता गरीब परिस्थिती आहे पण ती बदलू तर शकतेच, कांचनचा इतका अविश्वास असेल असं संजयला कधीच वाटले नव्हते. तो तिच्या बोलण्याने खूप दुखावला.
त्यानंतर कांचनने संजयला टाळायला सुरू केले, बोलणे बंद केले, या सगळ्याचा संजयला खूप त्रास होत होता. कांचनला मात्र काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या आयुष्यात खुश होती.
या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजयला खूप वेळ लागला, बालपणापासूनच्या तिच्या आठवणी, सोबत घालवलेले गोष्ट क्षण त्याच्या मनात घर करून बसले होते. तिने त्या सगळ्यांचा क्षणात चुराडा केला होता.
यातू्न स्वतःला कसं बसं सावरुन संजयने खूप मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले, चांगल्या कंपनीत त्याचं प्लेसमेंट झालं.
लवकरच नोकरी सुरू झाली, घरची परिस्थिती बदलायला वेळ लागला नाही. त्याला हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर पटापट प्रमोशन मिळत गेले. मनात मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या होत्या. कांचनने एका श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि ती परदेशात गेली एवढंच त्याला एका मित्राकडून कळालं होतं.
त्यानंतर नीलम त्याच्या आयुष्यात आली आणि त्या आठवणीतून तो बाहेर पडला.
पण अचानक अशा प्रकारे कांचनचं आयुष्यात परत येणं, मदत मागनं त्याला भुतकाळात ओढून नेत होतं.
कांचनच्या आयुष्यात असं काय घडलं की तिने संजयला मदत मागितली. तिचं अशा अचानक आयुष्यात येण्याने संजय आणि नीलमच्या नात्यात काही अंतर येयील का..नीलमला हे कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग लवकरच… तोपर्यंत stay tuned..
कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका… कथेचा पुढचा भाग लवकरच… त्यासाठी मला फॉलो करा.. 

©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
नावासह शेअर करायला हरकत नाही.

-अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed