कांचनने कितीही प्रयत्न केला तरी आता कांचनशी संपर्क ठेवायला नको त्यामुळे नीलम दुखावल्या जाईल असा विचार करून संजय आपल्या कामात गुंतला.
आॅफिसमध्ये असतानाच त्याला एक दिवस फोन आला तो नंबर कांचनचा होता. फोन उचलताच ती म्हणाली” संजय फोन कट करू नकोस, मला खूप गरज आहे मदतीची, माझं बोलणं ऐकून घे. मी परत तुला त्रास देणार नाही.” संजयने त्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही फक्त ती काय म्हणतेय ते तो ऐकत होता.
कांचन म्हणाली “संजय, मला फोनवर सविस्तर बोलता येणार नाही. मला माहित आहे तू माझ्यावर खुप नाराज आहेस. कदाचित मला माफ करणार नाहीस पण माझ्यासाठी नाही तर माझया आई वडिलांसाठी मला एक मदत कर. आता फक्त एवढंच सांगू शकते कि बाबांना मागच्या महिन्यात हार्ट अटॅक आला, ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर, सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली, एवढेच काय तर हॉस्पीटलचे बील भरायला ही काका तयार नव्हते. आईच्या नावावर काही पैसे होते ते सगळे बाबांच्या उपचारासाठी खर्च झाले. आई बाबांना खूप मोठा धक्का बसला आहे. मी सतत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. मला ह्या सगळ्यात कुणाचाच आधार नाही. प्लीज मला एवढी एक मदत कर. मला तू एकदा भेटालास तर बरं होईल. सविस्तर चर्चा करता येईल.प्लीज संजय”
कांचनचं बोलणं ऐकून संजयला खूप वाईट वाटले. आधीच्या गोष्टी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून तो कांचनला भेटायला तयार झाला. सायंकाळी सहा वाजता एका कॅफे मध्ये भेटायचे ठरले. नीलमला नंतर सविस्तर सांगू म्हणून एका कामानिमित्त बाहेर जातोय, तू घरी जा, आॅफिसमधून निघताना माझी वाट नको बघू. घरी आल्यावर सविस्तर सांगतो म्हणून तो निघाला. भूतकाळात कांचन कशीही वागली असली तरी अशा परीस्थितीत तिला मदत करण्यापासून तो स्वत:ला थांबवू शकत नव्हता.
नीलमला मात्र संजयच्या वागण्यात बदल जाणवत होता, तो काही तरी लपवतो आहे हे तिला कळत होते. संजयच्या मागोमाग नीलम ही कॅफे मध्ये गेली, जरा लांबूनच पाहिले तर संजय आणि एक सुंदर मुलगी (कांचन) काही तरी बोलत बसलेले तिला दिसले. संजय तर म्हणाला कामानिमित्त बाहेर जातोय, मग ही कोण शिवाय आई सुद्धा म्हणाल्या होत्या कुणी तरी मुलगी संजयला भेटायला घरी आलेली म्हणून. संजय आपल्याला फसवत तर नाही ना, काय संबंध असेल दोघांमध्ये अशा विचारचक्रात नीलम अडकली. तशाच विचारात घरी गेली, संजय सोबत आज काय ते क्लिअर करायलाच पाहिजे असा निश्चय तिने केला.
इकडे कांचनने संजयला सगळी परिस्थिती सांगितली पण संजयला प्रश्न पडला की कांचनचा नवरा हिला मदत करत नसेल का.. त्यानं तिला ते विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्या डोळ्यात पाणी आले, तिच्या अश्रूंसोबत शब्द बाहेर पडले “संजय, तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, अगदी मला हवा तसा जोडीदार, भक्कम पैसा, परदेशात नोकरी करणारा, अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार होता तो. आम्ही दोघेही छान मज्जा करायचो पण दोघेही आम्ही चिडखोर, एकही शब्द ऐकून न घेणारे, वर्ष भर सगळं सुरळीत होतं पण नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले, नंतर किती किती दिवस अबोला, आमच्यातील अंतर वाढत गेलं शिवाय तिथे दोघांची समजुत काढणारं कुणी नव्हतं, वाद, मतभेद इतके वाढले की प्रकरण घटस्फोटावर आलं, त्याला आता मी नको आहे. या सगळ्या गोष्टींचा बाबांच्या तब्येतीवर परीणाम झाला, त्यांना हार्ट अटॅक आला. माझी अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती. काही महिन्यांपूर्वी मी भारतात परत आले. त्यानंतर बाबांच्या उपचारासाठी ते हाॅस्पिटलला असताना काकांनी आमचा बिझनेस, घर आणि सगळी प्राॅपर्टी स्वत:च्या नावावर केली. एकेकाळी श्रीमंत घराणे आमचं पण आज हातात काही शिल्लक नाही. काकांनी मोठी फसवणूक केली आहे, मला त्यांना शिक्षा द्यायची आहे, खोट्या सह्या घेऊन काकांनी केलेल्या फसवणूकीचा गुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे. आई बाबा सद्ध्या माझ्या मामाच्या गावाला आहेत, मी चांगल्या वकिलांच्या शोधात इकडे आले, इथे कुणी ओळखीचे नाही, विचार करतच त्या दिवशी माॅल मध्ये फिरताना तू दिसला आणि एक आशेचा किरण जागा झाला. यातून बाहेर पडले की मी तुला परत कधी त्रास देणार नाही. पण या सगळ्यात मला प्लीज मदत कर. पुढे मला आई बाबांना खूप आनंदात बघायचं आहे. तूच आहेस जो या परिस्थितीत मला मदत करू शकतो. मी तुला खूप दुखावले आहे, पण कधी काळी आपण चांगले मित्र होतो या नात्याने मला मदत कर.”
कांचनची अवस्था बघून संजयला वाईट वाटले, तिला शक्य ती मदत करायला तो तयार झाला.
दोघांनी नीट विचार करून दुसऱ्या दिवशी एका नामांकित वकिलांना भेटण्याचा बेत आखला. सगळं बोलून झाल्यावर संजय घरी आला तर नीलमच मूड बिघडलेला त्याला दिसला. ती खूप संतापलेली होती, चिडूनच तिने विचारले “कोण होती ती अप्सरा जिच्या साठी तू माझ्याशी खोटं बोलला, कामानिमित्त बाहेर जातोय सांगून कॅफे मध्ये गेला.”
संजयला नीलमच्या प्रश्नावर काय बोलावे कळत नव्हते, त्याने आधी तिचा राग शांत करायचा प्रयत्न केला, तिला विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगितलं. नीलमला ऐकून धक्काच बसला, ती रडायला लागली, संजयच्या मिठीत शिरून म्हणाली “तिला मदत करताना ते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना.” संजयच्या डोळ्यात चटकन पाणी आले, तिला घट्ट पकडून तो म्हणाला “नीलम, तू आयुष्यात आली त्यानंतर तर मी भूतकाळातून बाहेर पडलो. तुझ्यामुळे जगण्याचा नवा अर्थ शिकलो. मी जो प्रेमभंग अनुभवला तो कुणाच्याही वाट्याला येऊ नये, तू तर माझी अर्धांगिनी आहेस. तू माझ्यावर किती प्रेम करते याची मला जाणीव आहे. माझं आता फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरचं प्रेम आहे. राहीला प्रश्न कांचनला मदत करण्याचा तर तिच्या जागी कुणीही असतं तर माणुसकीच्या नात्याने मी मदत केलीच असती. या सगळ्याचा आपल्या नात्यावर काहीच फरक पडणार नाही, याची मी खात्री देतो.”
नीलम संजयच्या कुशीत शिरून म्हणाली “संजय, मी या सगळ्यात तुझ्या सोबत आहे. कांचनला यातून बाहेर काढण्यासाठी मीही तुला मदत करीन. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे. तू नक्कीच यातून कांचनला सोडवणार.” नीलमला कित्येक वर्षांपासून तिच्या मनात असलेला संजय च्या भूतकाळात बद्दलचा गुंता सुटल्याचे समाधान वाटले. संजयलाही आज नीलमला सगळं स्पष्ट सांगितल्यामुळे मन अगदी हलके वाटले. या प्रकारामुळे संजय आणि नीलमचे नाते अजून घट्ट झाले.
दोघांनी मिळून कांचनला मदत केली, तिला या सगळ्यातून बाहेर काढले. त्यादरम्यान कांचन आणि तिचा पती कित्येक महिने वेगळे राहील्या मुळे त्यांना आपापल्या चुकांची जाणीव झाली. संजयने समजूत काढल्यानंतर कांचनने पुढाकार घेऊन तिच्या पतीची माफी मागितली, त्यालाही कांचन शिवाय एकटेपणा जाणवत होता पण मीपणामुळे तो पुढाकार घेऊन कांचनशी बोलत नव्हता. कांचनने स्वत: फोन केल्यावर तो कांचनला घ्यायला भारतात आला. आई बाबांची संपत्ती संजय मुळे त्यांना परत मिळाली शिवाय नीलमने विश्वास ठेवून संजयला मदत केल्याने ते शक्य झाले.
कांचन पतीसोबत परत गेली, सगळयांनी संजयचे खूप कौतुक केले, आभार मानले. नीलमची मान आनंदाने आणि गर्वाने ताठ झाली.
कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका…
©2019 लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
नावासह शेअर करायला हरकत नाही.
-अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed