मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..

Parenting

“आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता.
आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.”
अमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे नेहमी. विनय माझ्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त करतो. नंतर पाहिजे तेव्हा सापडत नाही मला. मी नाही देणार, त्याची खेळणी का नाही खेळत तो. आता मी गिटार प्रॅक्टीस करतोय तर त्यालाही तेच पाहिजे आहे.”
विनय आणि अमन, दोघे भावंडे. विनय अगदी तीन वर्षांचा तर अमन‌ बारा वर्षांचा. अमन समजूतदार , जरा अबोल तर विनय खूप मस्तीखोर. हळूच अमनच्या खोड्या काढायचा आणि काही न झाल्यासारखा दूर पळायचा. दोघांमध्ये जास्त अंतर असल्याने नेहमी दोघांचे भांडण झाले की नेहमी अमनला ओरडा खावा लागायचा, तू मोठा आहेस, विनय अजून लहान आहे, त्याला समजून घे. विनयला वाटायचं आपण काही केले तरी आई बाबा दादाला रागावतात, मग हळूहळू तो या गोष्टीचा बालीश पणे फायदा घ्यायचा.
सारखं आई बाबांचा ओरडा खाऊन अमन मनातल्या मनात विनयचा राग करायला लागला, त्याला वाटायचं अमन खोड्या करतो आणि ओरडा मी खातो, विनय झाल्यापासून आई बाबा विनय वरच प्रेम करतात‌, काही झाले की मलाच ओरडतात, माझ्यावर आता आई बाबा प्रेमच करत नाही. ही भावना हळूहळू अमनच्या मनात घर करत होती.
आई बाबांना वाटायचे इतर भावंडा प्रमाणे हे दोघेही भांडतात पण नेहमी अमनला रागविल्याने तो मनात सलते विचार करायला लागला. एकदा बाबा घरी आले तेव्हा दोघेही अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडत होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून आल्यावर दोघांचे भांडण बघून घरात येताच बाबा अमनवर ओरडले ” अमन‌ हे काय चाललंय, किती भांडता दोघे, लहान आहेस का तू आता,  उगाच कशाला विनयला त्रास देतो, इतका मोठा झाला तरी अगदी लहान असल्यासारखा वागतो.”
बाबा रागाच्या भरात बोलून गेले पण अमनच्या मनाला ते खूप खोलवर लागलं. तो त्याच्या खोलीत जाऊन दार बंद करून रडत बसला.
आईलाही त्याच असं वागणं बघुन अजूनच राग आला, खोलीचं दार वाजवत आई म्हणाली “अमन हा काय वेडेपणा, दार का लावून घेतलंस. उघड दार पटकन आणि ये बाहेर.”
अमनने रडतच दार उघडले आणि आई-बाबांना रडतच म्हणाला “मी तुमचाच मुलगा आहे ना नक्की… काही झालं की मलाच ओरडता तुम्ही दोघे..विनय किती कुरापती करतो, खोड्या काढतो त्यालाही कधीच रागवत नाही..मला नाही राहायचं इथे..मला हॉस्टेलवर ठेवा मी नको असेल तुम्हाला तर..माझ्यावर कुणाचं प्रेमच नाही..”
अमनच्या अशा बोलण्याने, वागण्याने आई बाबांना धक्का बसला. बाबांना वाईटही वाटले की आपण असं ओरडायला नको होतं, जरा समजून सांगायला पाहिजे होतं.
बाबांनी अमनला जवळ घेतले आणि त्याला समजावत म्हणाले ” अमन बेटा, असा का म्हणतो आहेस तू.. अरे आमचं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे..तू इतका समजूतदार आहेस तरी असं म्हणतोय..फक्त तू मोठा आहेस आणि विनय अजून लहान आहे तेव्हा त्याच्याशी नुसतं भांडण न करता दादा म्हणून ते त्याला हक्काने समजून सांग..तू असं चिडलास तर विनय तुझं अनुकरण करून तोही चिडेल.. हट्ट करेल.. त्याच्याशी चिडून न‌‌‌ बोलता, नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होणार नाही. मी दमून आलो रे घरी आणि तुम्ही अशे आरडाओरड करताना बघून माझी चिडचिड होणारच ना.. आणि तुझ्यावर प्रेम नसतं तर तुला वाढदिवसाला गिटार गिफ्ट दिली असती का..तुला pets आवडतात म्हणून तर आपण टफी (Tuffy – त्यांच्या घरचा पाळीव कुत्रा) घेऊन आलो ना घरी. तेव्हा असा विचार परत करायचा नाहीस..हस बघू आता..”
आईनेही अमनची समजूत काढली. त्याला पटवून दिले की आई बाबांचं प्रेम हे सारखंच असतं.
झालेल्या प्रसंगावरून आई बाबांनाही त्यांची चूक लक्षात आली, आपण अमन मोठा आहे तेव्हा त्यानेच समजून घ्यावे, विनय लहान आहे त्याला तितकं कळत नाही म्हणून अमन कडून अपेक्षा ठेवत गेलो पण यामुळे विनय अजून हट्टी आणि खोडकर झाला असून अमनला इतका मोठा गैरसमज झाला , तो दुखावला गेला याचे दोघांनाही वाईट वाटले.
यापुढे हा लहान हा मोठा असा विचार न करता दोघांनाही चूका‌ केल्यास समजून सांगायच्या असे आई बाबांनी ठरवले शिवाय अशी वेळ परत यायला नको याची पुरेपूर काळजी घेतली.

भावंडं म्हंटले की छोट्या छोट्या खोड्या काढणे, भांडणे हे आलेच पण त्यावरून मुलांमध्ये एकमेकांविषयी राग, घरात आपल्यावर कुणाचं प्रेम नाही कारण मलाच नेहमी रागावतात ही भावना जास्त प्रमाणात निर्माण झाली तर ते धोक्याचे ठरते. मुलं वयात यायला लागली की त्यांच्यातील शारीरिक मानसिक बदल समजून घेत वर्तणूक करणे तितकेच महत्वाचे आहे.

  • अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed