आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

Love Stories-Relations

रोहन पेशाने सिव्हिल इंजिनिअर, उंच पुरा रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला अत्यंत हुशार पंचेवीशीतला मुलगा. एका छोट्याशा गावातील धरणाच्या कामाची मुख्य जबाबदारी रोहनवर सोपवण्यात आली होती आणि त्या निमित्ताने तो एका त्या गावात काही महिन्यांसाठी वास्तव्यास होता. गावात आला तसंच इंजिनिअर साहेब आलेत म्हणत गावकरी त्याच्या मागेपुढे होते, गावात प्रत्येकाला रोहन विषयी फार कौतुक वाटत होते. इतका मानपान, इतकी वाहवा बघता रोहनला मनोमन आनंद होत होता पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांनी आपल्याला असं तुम्ही आम्ही करत मागेपुढे धावणे त्याला जरा अवघडल्यासारखे वाटले. असो, गावकऱ्यांचे प्रेम म्हणून तोही त्यांच्यात रमला. आपल्या कामाची आखणी करत बसला असतानाच एक दिवस गावातला रामू त्याला आवाज देऊ लागला, “रोहन सायब, तुमास्नी गावच्या मंदिरात बोलावलं सरपंचांनी. भजनाचा कार्यक्रम हाय, जरा वेळ या म्हणत्यात तुमास्नी..”

रोहन जरा विचार करत म्हणाला , “ठिक आहे. आलोच थोडा वेळात काम संपवून. ”

रोहन हातातील काम संपवून मंदिराच्या दिशेने निघाला तोच त्याच्या कानावर भक्तीगीताचे मधूर सूर पडले, ते सुर एखाद्या तरूणीचे आहे हे लक्षात आले होतेच पण या लहानग्या गावात कोण इतकं छान गात आहे हे बघण्यासाठी तो आतुर झाला.
जसाच तो मंदिरात पोहोचला तसेच गावकरी साहेबांना खुर्ची द्या, पाणी द्या करत मागेपुढे, आजुबाजूला जमले. तो मात्र त्या गाण्यात तल्लीन झाला होता,

“श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
लोग करें मीरा को यूँ ही बदनाम

साँवरे की बंसी को बजने से काम
राधा का भी श्याम वोतो मीरा का भी श्याम

जमुना की लहरें बंसीबट की छैयां
किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया
श्याम का दीवाना तो सारा बृज धाम..”

रोहनचे डोळे त्या आवाजाकडे लागले, ती अगदीच सगळ्यात समोर देवापुढे बसून गाण्यात तल्लीन झाली होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत रोहन क्षणभर हरवला होता. त्या आवाजात जणू काही जादूच असल्यासारखे त्याला जाणवले. पुढच्या काही वेळातच भजन संपून आरतीचा कार्यक्रम झाला आणि इतका वेळ पाठमोरी दिसणारी ती त्याला समोरासमोर दिसली. पांढराशुभ्र सलवार कमीज, लाल ओढणी, केसांची लांबसडक वेणी, त्या वेणीत मळलेला मोगर्‍याचा गजरा, गव्हाळ वर्ण, बोलके डोळे, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेली मीरा आरतीचे ताट हातात घेऊन जशी रोहनला दिसली तसाच तो एकटक तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या साध्या राहणीमानात ती खूप सुंदर दिसत होती.

देवाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच पुजारीजींनी रोहनच्या हातात प्रसाद देत तिची ओळख करून दिली,
“साहेब ही माझी मुलगी मीरा. अख्ख्या गावात मुलींमध्ये एकटीच सगळ्यात जास्त शिकलेली आहे. तालुक्याला जाऊन पदवी घेतली माझ्या पोरीने. दिवाळीनंतर लग्न आहे तिचं, तुमच्या सारखाच मोठ्या नोकरीत आहे होणारा पाहूणा.”

ते ऐकताच क्षणभर मिराच्या आवाजाने तिच्याकडे आकर्षित झालेला, तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतच घायाळ झालेला रोहन मनात लड्डू फुटत असतानाच मनोमन उदास झाला. आजुबाजूच्या लोकांचे बोल त्याला आता ऐकू येत नव्हते. मिराकडे चोरून बघताना त्याच्या मनावर झालेला घाव त्याला तिच्याकडे आकर्षित होण्यापासून वाचवत होता. आज अचानक असं काय झालंय,का इतका आकर्षित झालो मी तिच्याकडे हा विचार करतच रोहन त्याच्या राहण्याच्या खोलीवर परत आला.

रात्री उशिरा पर्यंत त्याला झोप लागत नव्हती, ते गाण्याचे बोल, तो सुमधुर आवाज त्याच्या कानात अजुनही गुंजत होता. मीराचा चेहरा सतत डोळ्यापुढे येत होता. पहिल्यांदाच रोहनची अशी अवस्था झाली होती. तिच्याच विचारात त्याला झोप लागली. सकाळी उठून कामावर जाताना‌ आज पहिले तो मंदिरात गेला. तिथे देवाचे दर्शन घेऊन मग कामावर जायला निघाला तेव्हा मीरा मंदिरात येत होती, तिचे ओले केस, निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस तिला अगदी शोभून दिसत होता. हातात फुलांनी भरलेले पुजेचे ताट होते.

दोघांची नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना एक स्माइल दिली. ती मंदिराच्या पायर्‍या चढून वर येताच घंटी वाजवून आत गेली. परत एकदा तिच्या विचारात क्षणभर हरवलेला रोहन त्या घंटानादाने भानावर आला.

तिचं लग्न ठरलं आहे, ती आपली कधीच होऊ शकत नाही हे कळत असूनही तो तिच्यात गुंतत होता. ती न चुकता सकाळी नऊ वाजता मंदिरात येते हे लक्षात आल्यापासून तोही तिची एक झलक बघायला त्याच वेळी तिथे यायचा आणि मग साइटवर जायचा. रोजची ती नजरानजर, ती गोड स्माइल त्याच्या दिनचर्येचा भाग बनले होते.
कितीही आवरलं तरी तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. आपण मीराच्या प्रेमात पडलो आहे हे त्याला एव्हाना कळून चुकले होते. तिलाही त्याचे भाव कदाचित कळाले असावेत.

एकदा कागदपत्रातील माहिती ऑनलाइन भरून एक रिपोर्ट तयार करायचा होता. अवधी कमी आणि भरपूर काम असल्याने त्याची तारांबळ उडत होती. या परिस्थितीत त्याला मीराची बरीच मदत झाली, तिचे संगणक प्रशिक्षण झाले असल्याने गावकऱ्यांनी तिला रोहनच्या मदतीला पाठवले होते. त्या प्रसंगामुळे जरा का होईना पण दोघांचे बोलणे झाले.

रोहन आता तिच्यात खूप गुंतला होता, प्रेमात पडला होता पण त्या प्रेमात कुठलाही स्वार्थ, कुठलीही वासना नव्हती. एक निस्वार्थ निरागस प्रेमाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती पण ती भावना तो कधीही व्यक्त करू शकणार नव्हता. गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास त्याला जपायचा होता, मीराला आनंदी बघायचं होतं, तिच्या नजरेत आपल्याविषयी आदर आहे तो टिकवून ठेवायचा होता.

तिला त्याच्या मनातले भाव कदाचित कळाले होते पण या नात्याला काहीही भविष्य नाही हे त्याला कळत होते. त्याचा प्रोजेक्ट आता संपत आला होता. या काही महिन्यांत मीराच्या अनेक आठवणी त्याने मनात साठवून ठेवल्या होत्या.
गावाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी एक छोटासा समारोप सोहळा त्याच मंदिरात आयोजित केला होता. सरपंचांनी रोहन चे भरभरून कौतुक करत त्याचा सत्कार केला. त्या सोहळ्यात रोहनची नजर मीराला शोधत होती पण ती काही दिसली नाही.

परत निघताना गाडीत बसला तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी हात हलवत निरोप देणारी मीरा त्याला अखेर दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याने गावाचा निरोप घेतला.

मीरा विषयी मनात असलेलं प्रेम आठवणी या कायम रोहनच्या स्मरणात राहणार्‍या होत्या. ते एक अव्यक्त प्रेम होते.
तिची आठवण आली की तो मनोमन एकच प्रार्थना करायचा, “मीरा तू जिथे कुठे असशील, आनंदी रहा..हसत रहा..”

आता जेव्हा केव्हा धरणाची पाहणी करण्यासाठी त्याला त्या गावात जावं लागायचं त्यावेळी त्या सगळ्या आठवणी नव्याने ताज्या व्हायच्या. आजही ते सुमधुर आवाजातील गाणे त्याच्या कानात गुंजत असायचे.

“श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
लोग करें मीरा को यूँ ही बदनाम..”

अशी ही एक आगळीवेगळी अव्यक्त प्रेमकथा कशी वाटली हे नक्की कळवा ?

मी लिहिलेली ही प्रेमकथा माझ्या नावासह शेअर करायला माझी हरकत नाही.
लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed