अजिंक्य आणि प्रचिती नदीकिनारी पोहोचले. संथ वाहणारे नदीचे पाणी, आजुबाजुच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल, मंद वाहता गार वारा, वर निळेशार आकाश असं रम्य वातावरण बघताच प्रचिती मनोमन सुखावली.
प्रचिती – “काय मस्त वाटतंय ना इथे..इतक्या जवळून पहिल्यांदाच नदी बघते आहे मी..आय जस्ट लव्ह इट..”
तिने लगेच बॅग मधून कॅमेरा काढला आणि ते निसर्गसौंदर्य कॅमेरात कैद केलं. नंतर हळूच कॅमेरा अजिंक्य कडे वळवत म्हणाली, “स्माइल प्लीज..”
त्याचे लाजरे हसरे भाव फोटोत टिपले गेले.
दोघेही काठावरच्या एक दगडावर पाण्यात पाय बुडवून बसले. थंडगार पाणी पायांना स्पर्श करत होते.
अजिंक्य म्हणाला, “प्रचिती मॅडम, तुम्ही तुमच्या विषयी काही सांगा ना..मला आवडेल ऐकायला.. म्हणजे तुमच्या घरी कोण कोण असतं… अजून काही तुमच्याविषयी..”
प्रचिती ने त्याला तिच्या त्रिकोणी कुटुंबाविषयी सांगितले. तिची फुलांविषयीची आवड आणि बरंच काही ती उत्साहाने सांगत होती. अजिंक्य सुद्धा सगळं मन लावून ऐकत होता, तिच्या चेहऱ्याकडे बघत तिचे भाव मनात कैद करत होता. तिचं बोलून झाल्यावर ती थांबली तरीही तो तिच्याकडे बघतच आहे हे लक्षात येताच प्रचिती ने त्याला हळूच हातावर चिमटा काढला तसाच तो भानावर आला आणि मनातच पुटपुटला, “अज्या परत एकदा माती खाल्ली तू…असा काय बघतोय त्यांना.. मॅडम आहेत त्या..काय विचार करतील तुझ्याविषयी..”
अजिंक्य – “सॉरी मॅडम.. तुम्ही इतकं छान बोलत होतात ना की मी कसा हरवून गेलो कळालच नाही..”
त्यावर प्रचिती नुसतीच खळखळून हसली.
काय बोलावं त्याला काही कळेना. तो दुसरीकडे नजर फिरवत म्हणाला, “निघूया का…आई वाट बघत असेल जेवायला..उद्या सकाळी परत येऊ इकडे , तुमची काही हरकत नसेल तर…”
प्रचिती – “का नाही.. नक्कीच.. उद्याच काय..मी इकडे आठवडाभर आहे.. दररोज यायला आवडेल मला इथे..”
अजिंक्य – “नक्कीच.. मॉर्निंग वॉक साठी हवं तर डोंगरावर जाऊ.. तिथून सुर्योदय बघितला की दिवस जाम भारी जातो बघा..”
गप्पा मारतच दोघेही घराजवळ कधी येऊन पोहोचले त्यांनाच कळालं नाही.
अजिंक्य च्या आईने जेवणाचा खास बेत बनविला होता. पाटाभोवती रांगोळी काढून समोर दुसऱ्या पाटावर ताट अगदी पंचपक्वानांनी भरून होते. सगळा थाट बघून प्रचिती म्हणाली, “किती सुंदर सजावट.. खूप स्पेशल वाटतंय मला.. थ्यॅंक्यू काकू.. थ्यॅंक्यू रेश्मा..”
रेश्मा – “असं थ्यॅंक्यू म्हंटलं की परकेपणा वाटतो हो ताई..नो थ्यॅंक्यू..ओन्ली हॅपी हॅपी वाली स्माइल..”
त्यावर सगळे हसले . चौघांनी मिळून एकत्र जेवण केले. प्रचिती ने तिच्या आईला व्हिडिओ कॉल लावून सगळ्यांशी ओळख करून दिली. जरा वेळ सगळे गप्पा मारत बसले.
जरा वेळाने प्रचिती तिच्यासाठी तयार केलेल्या खोलीत लॅपटॉप वर तिचं काम करत बसली. मध्येच तिला कधी डोळा लागला कळालच नाही. सायंकाळी अजिंक्य गरमागरम चहा घेऊन वर आला आणि दारावर टकटक करत आत डोकावून बघतो तर काय प्रचिती शांत झोपलेली होती. तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत तो नकळत कुठेतरी हरवला. त्याच्या पाठोपाठ रेश्मा पाण्याची बाटली घेऊन वर आली आणि अजिंक्य ला असं प्रचिती कडे बघताना पाहून त्याला हळूच म्हणाली, “चहा थंड झाला बहुतेक…”
तिच्या आवाजाने अजिंक्य भानावर आला आणि रेश्माच्या हातात चहाचा ट्रे देत म्हणाला, “मी जरा शेतात जाऊन आलोच… मॅडम ला चहा दे तू..”
रेश्मा त्याचा गोंधळ बघून म्हणाली, “दादा.. कळतंय बरं का मला.. डोन्ट वरी..नाही सांगत तुझं गुपित कुणालाच ..”
अजिंक्य – “कसलं गुपित… असं काही नाही.. गप्प बस आता…चहा थंड होतोय..मी आलोच..”
रेश्मा गालातल्या गालात हसत आत गेली आणि प्रचिती ला उठवत म्हणाली, “ताई, चहा घ्या..”
प्रचिती रेश्माच्या आवाजाने जागी झाली. दोघींनी एकत्र चहा घेतला.
गप्पांच्या ओघात रेश्मा ने प्रचिती ला विचारले, “ताई, तुम्ही इतक्या सुंदर आहात…मग तुमच्या आयुष्यात कुणीतरी खास व्यक्ती नक्कीच असणार ना..”
अचानक विचारलेल्या रेश्मा च्या या प्रश्नाने प्रचिती जरा आश्चर्य चकित झाली आणि म्हणाली, “खास असं कुणी नाही… म्हणजे माझ्या मनात घर करेन असा कुणी अजून तरी भेटला नाही… मित्र मैत्रिणी भरपूर आहेत पण मी त्यांच्यासोबत आउटींग, पार्टी या सगळ्यात फारच कमी वेळा जाते त्यामुळे त्यांना वाटत माझ्यात खूप ऍटीट्युड आहे. मुळात मला माझ्याच विश्वात रमायला आवडतं.. मॉम, डॅड आणि मी इतकंच आमचं आयुष्य..पण आम्ही खूप एंजॉय करतो..मला कधी एकटेपणा जाणवलाच नाही बघ… आम्ही तिघेही अगदी फ्रेंडली राहतो घरी.. ”
रेश्मा हे ऐकताच मनोमन आनंदी झाली आणि म्हणाली, “आमचा अजिंक्य दादा पण असाच आहे…त्याच्या त्याच्यातच गुंतलेला असतो.. मित्र आहेत त्याचे पण दिवसात फार कमी वेळ त्यांच्यासोबत असतो तो..”
प्रचिती ला रेश्मा चे बोलणे कोड्यात टाकणारे होते.
सायंकाळी रेश्मा सोबत ती अंगणात फेरफटका मारत होती. तितक्यात रेश्मा च्या काही मैत्रिणी प्रचिती ला भेटायला आल्या. रेश्मा ने आम्हाला तुम्ही आल्याचं सांगितलं म्हणून खास भेटायला आलो मॅडम तुम्हाला म्हणत त्या प्रचिती च्या अवतीभवती जमल्या. त्यांचा उत्साह बघून प्रचिती ला मनोमन खूप आनंद झाला. आपण या सगळ्यांसाठीच किती खास आहोत हा विचार तिला सुखावुन गेला.
रात्री जेवताना प्रचिती अजिंक्य ला म्हणाली, “उद्या सकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉक साठी जायचं ना..रेश्मा आणि आई ला सोबत घेऊन जाउया..तितकीच अजून मज्जा येईल..”
तिच्या आग्रहाखातर रेश्मा लगेच तयार झाली यायला पण अजिंक्यची आई म्हणाली, “मला नाही बाळा चढा उतरायला जमणार इतकं.. तुम्ही तिघे जाऊन या…”
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रचिती, रेश्मा आणि अजिंक्य पहाटेच डोंगरावर जायला निघाले. रेश्मा सोबत असल्याने प्रचिती आणि रेश्माच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. अजिंक्य मात्र गुपचूप दोघींच्या सोबतीने चालत होता.
रेश्मा त्याची खोडी काढत म्हणाली, “दादा..तू पण आमच्या गप्पांत सामिल झाला तर चालेल बरं का..हो ना प्रचिती ताई..”
प्रचिती – “हो मग… तसंही आज अजिंक्य फार गुपचूप आहे..एक शब्दही बोलला नाहीत तुम्ही..”
रेश्मा – “मी आले तुमच्या सोबत म्हणून राग आला की काय दादा तुला…”
अजिंक्य – “गप गं रेश्मा…उगाच आपलं काहीतरी.. तुम्ही दोघी इतक्या बोलत होत्या की मला मध्ये काही बोलायला चान्स मिळालाच नाही..”
त्यावर तिघेही खदाखदा हसले. अजिंक्य हळूच प्रचिती च्या हसर्या चेहर्याकडे बघत राहीला आणि ते नेमके रेश्मा ने घेरले.
खोकल्याचे नाटक करत ती अजिंक्य ला म्हणाली, “आजची सकाळ खूपच छान आहे ना दादा… व्हेरी व्हेरी व्हेरी…..गुड मॉर्निंग झाली बघ…”
अजिंक्य ला तिच्या बोलण्याचा अर्थ लगेच कळाला. तो काहीही न बोलता समोर बघत वरवर चालत राहीला. मागोमाग रेश्मा आणि प्रचिती होत्याच. काही वेळातच तिघेही डोंगरावर पोहोचले. वरून बघितल्यावर सकाळचे दृष्य फारच सुंदर दिसत होते. झाडांवरच्या पक्ष्यांचा किलबिलाट, गार वारा, हिरव्यागार झाडांमागून डोकावणारी कोवळी सुर्य किरणे… सगळं बघून प्रचिती अगदी आनंदाने गोल गिरकी घेत म्हणाली, “सो ब्युटीफूल… उगवत्या सूर्याला बघून काय मस्त वाटतंय ना…”
अजिंक्य प्रचिती ला बघत म्हणाला, “खरंच…व्हेरी ब्युटीफूल…..(जरा ब्रेक घेऊन) सुर्योदय बरं का…”
रेश्मा त्याला बघून खदखद हसली आणि सुर्याकडे बोट दाखवून म्हणाली, “दादा…. सुर्योदय तिकडून होतोय..”
प्रचिती मात्र तिच्याच विश्वात रमून निसर्गसौंदर्य अनुभवत होती.
तिघांनी एकत्र छान वेळ घालवला, प्रचिती ने या क्षणांना तिच्या कॅमेरात कैद केले.
दुपारी प्रचिती आणि अजिंक्य शेतात आले. प्रचिती ने अजिंक्य कडून फुलांविषयी सगळी माहिती जाणून घेतली, फोटो घेतले. सगळी माहीत लॅपटॉप मध्ये रिपोर्ट ला ऍड केली.
सकाळी डोंगरावर मॉर्निंग वॉक, दिवसभर फुलांच्या रिसर्च चा सगळा अभ्यास नंतर सायंकाळी नदीकाठी जाऊन गप्पा मारत बसायचं असा जणू दोघांचा दिनक्रम झाला होता. अजिंक्य प्रचिती च्या नकळत तिलाच बघत असायचा, मनात तिचाच विचार यायचा, त्याला मनोमन ती आवडायला लागली होती पण दुसऱ्या क्षणी भानावर येत तो स्वतःशीच बोलायचा “अज्या, तू कुठे अन् मॅडम कुठे..तू इकडे शेतकरी आणि मॅडम इतक्या शिकलेल्या डॉक्टरेट पदवी साठी तयारी करत..तू गावात राहणारा तर मॅडम मुंबईत राहणार्या… त्यांच्या विषयी असा विचार सुद्धा करू नकोस…”
स्वतःची समजूत काढतच तो मनोमन निराश सुद्धा व्हायचा.
अशातच आठवडा कसा संपत आला प्रचिती ला कळत नव्हते. आज सायंकाळी तिला परत मुंबईला निघायचं होतं.
अजिंक्य सकाळपासूनच अगदी निराश झाला. उद्यापासून प्रचिती मॅडम इथे नसणार…परत कधी भेटणार किंवा कदाचित भेटणार सुद्धा नाही यानंतर या विचाराने तो बेचैन झाला. त्याची मनस्थिती रेश्मा ने ओळखली.
क्रमशः
कथा मोठी असल्याने भागांमध्ये लिहीत आहे. कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली की नाही हे नक्की कळवा 😊
© अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed