फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा

Love Stories

परत मुंबईला जायचं म्हणून प्रचिती ने प्रोजेक्ट रिपोर्ट चे सगळे काम दुपारपर्यंत संपविले.
अजिंक्य – “प्रचिती मॅडम, उद्या पासून तुम्ही इथे नसणार…ही रंगिबेरंगी फुले तुम्हाला खूप मिस करणार..एकदा नदीकाठी जाऊन येऊया का?… आठवडाभरात आम्हाला सगळ्यांना तुमची खरंच खूप सवय झाली…”

प्रचिती – “अच्छा..फक्त ही फुलेच मिस करणार का मला…मलाही या फुलांची खूप आठवण येईल म्हणून तर माझ्या कॅमेरात कैद केलंय मी त्यांना.. आणि हा जाऊया एकदा नदीकाठी…मलाही परत एकदा डोळेभरून बघायचं आहे सगळं..”

दोघेही नदीकाठी आले. आज अजिंक्य फार उदास आहे हे प्रचिती ला कळाले होते.

प्रचिती – “खरं सांगू, मला इथे येऊन आठवडा झाला असं वाटतच नाहीये.. तुम्ही इतकी छान वागणूक दिली, भरभरून प्रेम दिलं त्यामुळे आपल्याच माणसांजवळ आहे मी असंच वाटलं मला.. तुम्ही तिघेही या ना एकदा तरी मुंबई ला आमच्याकडे..फार मज्जा येईल..”

अजिंक्य ने नुसतीच मान हलवली. त्याचे डोळे पाणावले होते, त्याची नजर आज सतत नदीच्या संथ वाहत्या पाण्याकडे होती.

जरा वेळ दोघेही शांत होते. अजिंक्य म्हणाला, “कॉलेजला असताना मी शायरी करायचो.. नंतर कधी वेळच मिळाला नाही..आज का कोण जाणे पण अचानक खूप काही सुचतंय..”

प्रचिती – “क्या बात है.. तुम्ही शायर पण आहात हे फार उशिरा कळालं नाही तर दररोज ऐकायला मिळाली असती‌.. बरं आता काय सुचतंय ते तरी ऐकवा..”

अजिंक्य पाण्याकडे बघतच म्हणाला,

“मंद वाहती ही सरिता
ओढ तिला सागराची ,
आसुसलेल्या माझ्या मनाला
आस लागली तुझ्या प्रितीची”

प्रचिती- “अजिंक्य..काय मस्त शायरी केलीस चटकन…मनाला भिडणारी…वाह वाह…”

अजिंक्यने नुसतेच स्मित करत आभार मानले.

सायंकाळी प्रचिती परत जायला निघाली. अजिंक्य ची आई आणि रेश्मा यांनी प्रचिती ला पाणावलेल्या डोळ्यांनी मिठी मारली‌. अजिंक्य गाडी घेऊन तिला सोडायला स्टॉप वर आला. वाटेत दोघेही गप्पच होते.
प्रचिती – “मला ना इथे खरंच खूप मज्जा आली..इथल्या निसर्गसौंदर्याने तर वेड लावलं मला..I will definitely miss this…”

अजिंक्य – “and will miss you mam…”

प्रचिती – “आता तरी मॅडम नको म्हणू… प्रचिती म्हण..मी पण बघ तू म्हणाले तुला.. आठवडाभरात इतकी मैत्री तर आपल्यात झालीच आहे..हो ना?”

अजिंक्य जरा घाबरतच – “होय प्रचिती..खरंच मला तुझ्या रुपात एक खूप छान मैत्रीण मिळाली.. खरं सांगायचं तर माझी पहिलीच खास मैत्रीण..”

अचानक इतकं बोलल्यावर अजिंक्य विचार करू लागला, “जरा जास्त बोलून गेलोय की काय मी..परत एकदा माती खाल्ली अज्या..”

प्रचिती- “बघ असं तू मी म्हणत नावाने हाक मारली तर किती छान‌ वाटतंय.. आणि हो तुला मी एक सरप्राइज देणार आहे मुंबईला जाऊन..”

अजिंक्य- “सरप्राइज… नक्की काय करणार आहे.. प्रचिती मुंबई ला गेल्यावर अधून मधून फोन करणार  ना ? विसरू नका मॅडम आम्हाला..”

प्रचिती – “अरे असं काय म्हणतो आहे.. नक्कीच संपर्कात राहणार आहोत आपण.. तुमच्या सगळ्यांमुळे इतका छान वेळ घालवला मी.. असं कसं विसरणार..”

हे ऐकून अजिंक्य मनोमन आनंदी झाला.

प्रचिती ची बस आली. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. प्रचितीची बस दूरवर जात पर्यंत अजिंक्य पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच दिशेने एकटक बघत होता. त्याच्या मनात विचार आला, “इतका का विचार करतोय मी प्रचिती चा.. असं कुणाच्या बाबतीत मी कधीच हळवा झालो नाही…मी प्रेमात पडलोय का? नाही नाही..असा विचार सुद्धा करायला नको मी.. कुठे प्रचिती आणि कुठे मी..”

अजिंक्य घरी परतला त्या क्षणापासून तो उदास होता, गप्प गप्प होता. रेश्माला त्याची मनस्थिती कळाली होती. रात्री जेवताना ती अजिंक्य कडे बघत आईला म्हणाली, “आई प्रचिती ताई ची आठवड्याभरात किती सवय झाली न आपल्याला..त्या आज गेल्या तर जेवण पण जात नाहीये गं..आठवण येतेय त्यांची..”

आई – “हो ना..गोड आहे पोर..लळा लागला होता तिचा…शहरात राहून असली तरी अगदी नम्र प्रेमळ आहे..कशी मिसळून गेलेली आपल्यात…मलाही आज करमत नाहीये ती गेल्यापासून..”

अजिंक्यला भावना अनावर झाल्या पण कसाबसा स्वतः ला सांभाळत त्याने जेवण केले आणि खोलीत जाऊन बेडवर पडला. रात्रभर तिच्याच आठवणीत रमला, उशीरा कधीतरी त्याला झोप लागली.
सकाळी फोन वाजला तसाच तो खाडकन उठला.
प्रचिती चा फोन आलेला बघून त्याने पटकन फोन उचलत, “गुड मॉर्निंग मॅडम..” म्हंटलं तशीच ती खदाखदा हसत म्हणाली, “गुड मॉर्निंग..पण हे काय, लगेच विसरलास.. मॅडम नाही.. प्रचिती.. बरं मी हे सांगायला फोन केला की मी अगदी सुखरूप घरी पोहोचली…”

अजिंक्य- “अरे व्वा..छान.. प्रवास नीट झाला ना.. काही त्रास नाही ना झाला..”

“नाही नाही..अगदी छान झाला प्रवास.. बरं मी बोलते नंतर.. मॉम डॅड ला भेटते आता..बाय..”

प्रचिती आली तसेच तिचे डॅड धावतच तिच्याकडे आले आणि तिला मिठीत घेत म्हणाले, “माय प्रिन्सेस..हाऊ आर यू..आय मिस्ड यू सो मच..”

प्रचिती -” आय मिस्ड यू टू..पण तिकडे ना जाम मज्जा आली..”

प्रचिती मोठ्या उत्साहात तिथल्या सगळ्या आठवणी आई बाबांना सांगत होती.

मॉम – “प्रचिती.. फ्रेश तरी होऊन ये..आज आम्ही दोघेही तुझ्यासाठी घरीच असणार आहोत..किती दिवसांनी एकत्र आलो आपण.. तुझे डॅड महीनाभर नव्हते..तू आठवडाभर नव्हती…मी अगदी एकटी पडलेले बाबा…आज मस्त मज्जा करू आपण..”

प्रचिती – “क्या बात है मॉम…अमेझिंग…मलाही खूप काही सांगायचं आहे तुम्हाला..”

प्रचिती दिवसभर फक्त आणि फक्त अजिंक्य आणि त्याची आई आणि रेश्मा विषयी बोलत होती. अजिंक्य चे नाव तर क्षणोक्षणी तिच्या ओठांवर येतं होते..तिने तिथले सगळे फोटो व्हिडिओ मॉम डॅड ला दाखवले. प्रचिती ची एकंदरीत वागणूक बघून मॉम तिला म्हणाली, “प्रचिती, आर यू इन लव्ह विथ मिस्टर अजिंक्य… दिवसभर तुझ्या तोंडून आम्ही फक्त आणि फक्त अजिंक्य अजिंक्य ऐकतोय.. आम्ही कसे आहोत किंवा आमच्याविषयी इतर काहीही चौकशी सुद्धा केली नाहीस तू..”

प्रचिती – “नो मॉम.. असं काही नाही..पण खरंच तिथला अनुभव खूप छान होता..आमच्यात चांगली मैत्री झाली इतकंच…”

मॉम – “प्रचिती, मी आई आहे तुझी…स्पष्ट सांगायचं तर त्याचा विचार सुद्धा करू नकोस…हे सगळं ना क्षणिक समाधान असतं… आयुष्य नाही काढू शकणार तू त्या ग्रामीण भागात…”

डॅड मॉम कडे बघत – “अगं पण डायरेक्ट असं टोकाचं काय बोलते आहेस..तो अजिंक्य गावात राहतो म्हणून अशाप्रकारे जज नको करू.. प्रचिती मोठी झालीय..ती असा काही विचार करत असेल असं मला नाही वाटत आणि जर तिच्या मनात असं काही असेल तर ती पूर्ण विचार करूनच निर्णय घेईन असं वाटतंय मला..”

प्रचिती विचार करू लागली, “खरंच आपण अजिंक्य च्या प्रेमात पडलोय का? मॉम म्हणते ते खरं आहे, मी एकदाही मॉम डॅड ची चौकशी केली नाही..फक्त अजिंक्य विषयी बोलते आहे…त्यालाच मिस करते आहे..ओह नो..मला खरंच काही कळत नाहीये..”

प्रचिती -” मॉम डॅड, आता तरी मला काही कळत नाहीये… प्रेम वगैरे असा काहीच विचार नाहिये माझ्या मनात पण खरं सांगू तो खूप चांगला मुलगा आहे..गावात राहतात पण त्याची शेती बघितली का तुम्ही तो अगदी देशभरात लाखोंचा बिझनेस करतो, त्याची बुद्धीमत्ता वापरून..हुशार आहे..केअरींग आहे.. हॅंडसम आहे..माझ्याच वयाचा आहे त्यामुळे एक बॉंड नॅचरली निर्माण झाला आमच्यात हे मलाही कळतंय पण प्रेम वगैरे असं काही नाही आमच्यात..”

मॉम डॅड डोक्यावर हात ठेवून म्हणाले, “प्रचिती, तू खरंच वेडी झाली तिकडे जाऊन..काय काय डायलॉग सुचत आहेत तुला.. बरं …ते जाऊ दे..तुझा प्रोजेक्ट झाला की नाही नीट..”

प्रचिती – “हो एकदम मस्त झालाय.. आणि हा, डॅड मला एक मदत हवी आहे.. अजिंक्य चा व्हिडिओ मला न्यूज चॅनलवर दाखवायचा आहे..तुमचे मित्र आहेत न एका चॅनलचे हेड..प्लीज त्यांच्याशी बोलून बघा ना..प्लीज..”

डॅड – “ओके ओके..उद्या बोलतो मी..चला आता मस्त मूव्ही वगैरे बघूया.. लेट्स एंजॉय..”

तिघांनी पूर्ण दिवस एकत्र घालवला. रात्री झोपताना प्रचिती ने अजिंक्य ला मेसेज केला, “हाय..काय करतोय…”

अजिंक्य -“तुझा मेसेज आलेला बघून आनंदात उड्या मारतोय… खरंच..आई आणि रेश्मा ला खूप आठवण येते आहे तुझी..”

प्रचिती -“आणि तुला…”

अजिंक्य – “खूप आठवण येतेय…”

आता असं दोघांचं मेसेज फोन वर बोलणं हळूहळू सुरू झालं. प्रचिती आता खात्री पटली होती की आपण अजिंक्य मध्ये गुंतलो आहे, त्याच्या प्रेमात पडलोय..पण पुढे काय.. मॉम डॅड मान्य करतील का हे नातं..या विचाराने ती अस्वस्थ झाली.

क्रमशः

कथा मोठी असल्याने भागांमध्ये लिहीत आहे. कथेचा पुढचा भाग लवकरच.

कथेचा हा भाग कसा वाटला, पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली की नाही हे नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Comments are closed