हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग १

Love Stories

मैथिली आणि अमन, दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करून काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, दोघांच्याही काही टेस्ट दोन दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार होते.
मैथिलीच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ उडाला होता, भूतकाळात जे झाले त्यामुळे तर काही अडचण येत नसेल ना, या विचाराने ती अस्वस्थ होती. इतक्या वर्षांपासून लपवलेली गोष्ट, आपला भूतकाळ सगळं जर अमनला कळाले तर अमन आपल्याला सोडून तर देणार नाही ना.. त्याला काय वाटेल..आपणं खूप मोठी चूक केली का अमनला अंधारात ठेवून..अशे अनेक प्रश्न मैथिलीला त्रस्त करीत होते.
दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले, डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितले की मैथिलीची गर्भ पिशवी कमकुवत आहे, बाळाच्या वाढीसाठी सक्षम नाही आणि म्हणूनच आता पर्यंत केलेले सगळे प्रयोग अपयशी ठरले आहे. ट्रिटमेंट घेऊनही त्यात पाहिजे तसा बदल दिसून येत नाही, गर्भ पिशवीला काही तरी मोठी इजा झाली असेल तर अशे होते हेही सांगितले. सगळं ऐकून मैथीली खूप घाबरली.
डॉक्टरांनी जेव्हा तिला विचारले “कधी काही अॅबॉर्शन , काही अपघात अथवा इजा होण्यासारखे काही घडले आहे का” त्यावर मैथिली काही न बोलता रडायला लागली, तिला अस्वस्थ वाटायला लागले. काही सांगितले तर अमनला भूतकाळ कळेल आणि त्याने तो स्विकारला नाही तर…या विचाराने परत मैथिली घाबरली.. तिच्या मनात एक विचार आला की सगळं खरं काय ते सांगून मोकळं व्हावं..जे होईल ते होईल..पण सत्य सांगण्याची हिम्मत होत नव्हती…अशातच दोघेही घरी पोहोचले.. मैथिली जरा शांत झाल की तिच्याशी नीट बोलून पुढे ठरवू म्हणून अमन तिला घेऊन परत आला.

हॉस्पिटलमधून आल्यापासून सतत रडत होती, सासूबाई आणि अमन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मैथिली मात्र स्वतः ला दोशी ठरवत रडत बसली, मनोमन पश्चात्ताप करत बसली. आपण कधीही आई होऊ शकणार नाही ही गोष्ट तिला कळल्यापासून ती पूर्णपणे खचून गेली.  शिवाय भूतकाळात झालेलं सगळं इतके वर्ष अमन पासून लपवले, काही तरी मार्ग निघेल आणि आईपण लाभेल म्हणून एक आशा मनात ठेवून अमन पासून लपविलेलं कटू सत्य आता समोर आले तर काय.. या विचारांचं ओझं तिला जास्त कमजोर बनवत  होतं.
अशा विचारातच तिला झोप लागली… काही वेळाने जाग आली, सायंकाळचे सहा वाजले होते.. आदल्या रात्री काळजी करत झोप लागली नव्हती म्हणून आज रडून थकली आणि कधी झोप लागली तिला कळाले नव्हते. उठून चेहऱ्यावर पाणी मारून लगबगीने खोलीच्या बाहेर आली तर अमन घरात नव्हता. सासूबाई स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. मैथिलीला बघून म्हणाल्या “अगं उठलीसं, बस मी मस्त आलं घालून चहा बनवते.. अमन जरा बाहेर गेला आणि तुला झोप लागली तर मला एकटीला काही चहा जाईना. तुझीच वाट बघत होते उठण्याची. माझ्या हाताच्या चहाने बघ फ्रेश वाटेल तुला.. “
मैथिली मात्र काळजीतच होती, होकारार्थी मान हलवून ती  विचार करू लागली ,किती प्रेमळ सासू आहे माझी, किती काळजी घेतात..सून‌ म्हणून कधीच वागणूक नाही..जसा अमन‌ तशी मी असंच समजून मला जीव लावतात आणि मी मात्र त्यांना अंधारात ठेवते आहे.. सासूबाईंना सांगितले सत्य तर त्या समजून घेतील का.. एकदा आई सोबत या विषयी आता बोलायला हवं, ती नाही म्हणाली तरी अमनला आणि सासूबाईंना सत्य परिस्थिती सांगून टाकायची..मनातला गोंधळ कमी होईल..एक ओझं घेऊन किती दिवस जगायचं..पुढे जे होईल ते होईल..आता वेळ आली आहे भूतकाळ पुढे आणण्याची.. हिम्मत करून सगळं काही सांगायचं ठरवत असताना सासूबाई‌ चहा घेऊन आल्या.
चहा घेताना मैथिलीची समजूत काढत म्हणाल्या ” तुला असं उदास बघवत नाही मैथीली, तू हसत खेळत राहिली तर अमन आणि मी आनंदी राहू. आपण प्रयत्न करतोय पण यश आलं नाही तरी तू हताश होऊ नकोस.. तुला उदास बघून अमनही खचून जाईल.. त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे..तो तुला आनंदात  बघण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.. आणि माझं म्हणालं तर तुम्ही दोघांनी मुलं दत्तक घेतले तरी माझी हरकत नाही..पण तू स्वतःला दोष देत उदास राहू नकोस..”
मैथिलीला सासूबाईंच्या बोलण्याने एक आधार वाटला.. आपण किती भाग्यवान आहोत हेही जाणवले..
तू आराम कर..मी करते स्वयंपाक.. असं म्हणतं त्या स्वयंपाक घरात निघून गेल्या.
मैथिलीने खोलीत जाऊन आईला फोन केला तेव्हा कळाले की अमन मैथिलीच्या घरी‌ गेलेला आहे.. तेव्हा तू तब्येतीची काळजी घे बाळा.. आराम कर..अमन आलेत त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवते, तुझ्याशी नंतर बोलते म्हणून आईने फोन बंद केला..ते ऐकून तिला धक्काच बसला..
आई बाबा अमनला खरं काय ते सांगणार तर नाही ना… अमनला सत्य कळाले तर पुढे काय या विचाराने परत मैथिली हैराण झाली, नकळत दोघांचा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला.

अमन आणि मैथिलीची भेट कशी झाली.. मैथिलीचा भूतकाळ काय आहे..ती काय आणि का लपवते आहे ..ती अमनला सत्य सांगेल का.. त्यावर अमनची प्रतिक्रिया काय असेल हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागांमध्ये… तोपर्यंत stay tuned….

कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका… ?

© अश्विनी कपाळे गोळे

लेखनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव.. नावासह शेअर करायला हरकत नाही..

Comments are closed