आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते.
सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार आई सकाळी सगळ्यात आधी उठून डबा बनवते, ती घरी असली तरी वेळेत सगळं तयार ठेवण्याची जबाबदारी तिची असतेच.
आई नोकरी करणारी असेल तरी तिची ही जबाबदारी चुकत नाही.
मुलं जशजशी मोठी होतात त्यानुसार त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-बाबा दोघांची असली तरी त्यात आईचा मोलाचा वाटा असतो.
मुलं वयात येऊ लागली की मुलांना मैत्रीण बनून समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे अशा अनेक जबाबदारी आई तत्परतेने सांभाळत असते. या सगळ्यात घरातील प्रत्येकाची काळजी तिला असतेच. घरात कुणी आजारी असेल तर त्यांची सगळी काळजी आईला, पण ती आजारी असेल तर सगळ्यांची दिनचर्या विस्कटून जाते.
आई हा प्रत्येक घराचा आधार स्तंभ असते, तिच्याशिवाय घरातील प्रत्येकजण अपुर्ण असतो.
तरुण वयात तसेच लग्नानंतर मुलीची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई. मनातलं सगळं आई जवळ सांगितले की मन कसं हलकं वाटतं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना तिचे मार्गदर्शन नेहमी महत्वाचे ठरते. घरात काय आहे काय नाही याची यादी, इस्रीवाला, दूधवाला, कामवाली अशे घरातले बाहेरचे सगळे मॅनेजमेंट खाते आईकडेच असते.
आईची भूमिका ही आयुष्यभर संपत नाही. नऊ महिने पोटात वाढवून त्या असह्य कळा सहन करत आई बाळाला जन्म देते, बाळासाठी अनेक रात्री जागून काढते. आपल्या बाळाला तळहाताच्या फोडासारखे जपते. मुलं स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत त्यांच्या मागे ती उभी असते, मुलांचे जीवन सुरळीत चालू आहे हे बघून ती आनंदात असते. शेवटपर्यंत तिला आपल्या मुलांची काळजी असते, कशाचीही अपेक्षा न ठेवता ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असते. स्वत: उपाशी राहीन पण ती घरात सगळ्यांना पोटभर खाऊपिऊ घालण्यासाठी धडपडत असते.
बाबांच्या सगळ्या सवयी, आवडीनिवडी ती जपते, त्यांच्या गरजा पूर्ण करते.
ती आयुष्यात स्वत: साठी खूप कमी जगते, तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती घरात सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.
ते म्हणतात ना”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ते खरेच आहे. आईविना आयुष्य अपूर्ण आहे. आईची माया, तिची भूमिका दुसरा कुणीच साकारू शकत नाही. आई या शब्दात खरंच खूप भावना दडलेल्या आहेत.
आईची महती जितकी लिहिली तितकी कमीच आहे.
©अश्विनी कपाळे गोळे
Comments are closed